Friday, 22 November 2013

DIWALICHYA DIVASANCHE MAHATV

 दिवाळीची धूम सुरु होते शुक्ल पक्षातल्या द्वादशी पासून. द्वादशीला   म्हणतात 'गोवत्स द्वादशी' किंवा 'वसू बारस.'  वसू बारस म्हणजे गाई_वासराची पूजा करणे.  गाय आणि वासराला कुंकू लावतात, फुलांनी सजवतात, त्यांची ओवाळणी करतात, आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.
वात्सल्याचे प्रतीक असते गाय आणि बालपणाची निरागसता दिसते वासरामध्ये, त्या वात्सल्याचे आणि निरागसतेची ही आराधना!

दुसरा दिवस 'धनत्रयोदशी' चा. धनत्रयोदशीला  आरोग्याची देवता म्हणजे धन्वंतरीची पूजा करण्याचा दिवस.
धन्वंतरी
आरोग्य सेवा आणि संबंधित सेवा पुरविणारे किंवा त्यात सहभागी असणारे लोक धन्वंतरीची पूजा करतात. डॉक्टर्स, medical practitioners या सर्वांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आणि भक्तीसाठी अगदी खास दिवस.  .भगवान धन्वंतरी म्हणजे सर्व देव देवतांचे वैद्य  मानले जातात, आणि ते आयुर्वेदाचे जनक म्हणून त्यांची पूजा करून आपण दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याची त्यांच्या पाशी प्रार्थना करायची.

 ह्याच दिवशी संध्याकाळी यम दीप दान करतात, म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक पणती लावायची जिची ज्योत दक्षिणेला असेल अशी ठेवायची, पणतीला हळदी कुंकू वाहायच, फुल वाहायच, आणि दक्षिण  दिशा ही यमाची   दिशा असल्यामुळे,तिकडे हात जोडून, अपमृत्यू पासून अभय मागायचे, घरात सुख शांती मागायची.

तिसऱ्या दिवशी असते 'नरक चतुर्दशी'.  ह्या दिवशी  उठून उटणे लाऊन स्नान करून, सर्वांनी मिळून दिवाळीचा फराळ करायचा, फटाके उडवायचे, आणि घरात, भोवतीने भरपूर पणत्या लावायच्या.   नरकासुराचा वध झाला तो हा दिवस म्हणून आनंद साजरा करतात.

नंतरचा दिवस 'लक्ष्मीपूजा' म्हणजे कार्तिकातली अमावस्या. ह्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतात.  व्यापारी मंडळी त्यांच्या हिशोबाच्या चोपड्यांचे पूजन करतात.
लक्ष्मी माता
 
लक्ष्मीच्या प्रतिमेची, किंवा लक्ष्मीच्या चांदीच्या टाकाची पूजा केली जाते, लाह्या बत्तासे नैवेद्य म्हणून दिला जातो. लक्ष्मी बरोबरच धनाची देवता' म्हणून कुबेर'  ह्याचेही पूजन होते.
कुबेर _धनाची देवता
  सोबतच सोन्याच्या दागिन्यांची, आणि पैशांची पूजा केली जाते.

त्यानंतरचा दिवस मात्र खास बर का! कारण 'बळी प्रतिपदा' ह्या दिवशी पाडवा म्हणजे बायकोने नवऱ्याला ओवाळण्याचा आणि नवऱ्याने बायकोला छानशी ओवाळणी देण्याचा दिवस!!   

आणि द्वितीयेला सर्व बहिणींचा आवडता दिवस___ भाऊबीज!!
भाऊबीज
भावाने बहिणीला ओवाळणी देण्याचा हा दिवस. बहिण पण भावाला प्रेमाने घरी बोलावते, त्याला ओवाळते, आणि मग मनासारखी वस्तू ओवाळणी म्हणून घेते!

.
त्यानंतर एकादशीला तुळशीचे लग्न लागले की दिवाळी संपन्न होते!

तुळशी विवाह