'आळसे राहिला विचार , आळसे बुडाला आचार।
आळसे नव्हे पाठांतर, काही केल्या । '
खरच, कधी कधी इतका आळस येतो, काही करू नये असं वाटतं, पण लगेच डोळ्यां समोर दिवसभराची काम दिसायला लागतात, आपल्यावर अवलंबून असलेली इतर मंडळी दिसतात आणि एकदम मनातून आळस वगैरे पळून जातो आणि आपण कामाला लागतो!!
आज साधा पण आमचा सर्वांचा आवडता इडली डोसा सांभारचा बेत केला होता. सगळा बेत मस्त जमला आणि ताव मारून नंतर ब्लॉग लिहायला बसले.
इडली सांभार आणि मोलागापोडी चटणी |
पण गरम गरम डोसे खायची औरच असते बर का! म्हणजे दोन तीन डोसे बनवून, प्लेट मध्ये घ्यायचे,त्यावर गरम गरम सांभार ओतायचं ., वरून मोलगापोडी चटणी घालायची, मस्तपैकी तूप टाकायचं , आणि हाताने डोसा ओरपायचा! हे खर सुख!!
म्हणजे इडली चटणी सांभार थोडे साहेबी पद्धतीने म्हणजे काट्या चमच्याने वगैरे खावे, पण डोसा सांभार मात्र भारतीय पद्धतीनेच खावा, हे समीकरण माझ्या डोक्यात आहे बर का!
असो, प्रत्येकाची आपापली आवड निवड असतेच की. महत्वाचं काय असतं , की समोर आलेले अन्न हे पूर्ण ब्रम्ह समजून खावे, ताटात आवश्यकते पेक्षा जास्त अन्न वाढून घेऊ नये, आणि प्रसन्न चित्ताने भोजन करावे, म्हणजे मग अंगी लागते, आणि त्या अन्नदात्याला विसरू नये, उलट, जेवणा नंतर त्याचे आभार मानावेत म्हणून, ताटाला हाताने नमस्कार करायची पद्धत आहे ती पुन्हा रुजू द्या! जुने संस्कार पुन्हा नव्याने रुजणे गरजेचे झाले आहे. 'अन्नदाता सुखी भव ' असे देखील म्हणण्याची पद्धत आहे, त्याला कारण ज्यांनी हे अन्न बनवून वाढले,त्या सर्वांना सुखी ,ठेव अशी परमेश्वरापाशी प्रार्थना करणे हा उद्देश होय .
काल आणखीन एक आवडता पदार्थ केला होता, माझ्या आत्याचा हातखंडा असलेल्या गुळपापडीच्या वड्या! मला जाम आवडतात ह्या वड्या …
गूळ पापडी च्या वड्या |