Sunday, 20 July 2014

पावसाळ्यातले चमचमीत खाणे

आषाढ महिना संपता संपता आता श्रावणाचे वेध  लागायला लागलेले आहेत. पाउस  दाखल झाला  आहे, सगळीकडे  मस्त हिरवेगार झालेले आहे आणि   पानाफुलांनी डवरलेले  वृक्ष  बघितले   की मूड पण मस्त होतो नाही का?

'मनीं धरावें तें होतें | विघ्न अवघेचि नासोन जातें |
कृपा केलिया रघुनाथे | प्रचित  येते ||'

हे समर्थांचे वचन अगदी खरे आहे, प्रचीती घेण्या सारखे आहे. म्हणजे भगवंताचे अधिष्ठान  ठेऊन कोणतेही कार्य केले तर   कार्यातील विघ्ने नष्ट होतात आणि सफलता मिळते, हे नक्की.  थोडक्यात, भगवंताची कृपा झाल्याची प्रचीती येते!  आयुष्यात इतर  अनेक प्रसंगी देखील  भगवंताची कृपा आपल्यावर कशी असते ह्याची  प्रचीती येते...
 
माझ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगते. मी लखनौला असतांना, एकदा मोटरसायकल चालवीत असतांना,    मागून   वेस्पाने  धडक दिली. चालवणारे दोघे 10 वीचे विद्यार्थी होते,त्यांच्याकडे  लायसेन्स देखील नव्हते., आणि गाडीचे ब्रेक फेल होते!(हे त्यांनी नंतर काबुल केले ) तर माझ्या   गाडीने  एकदम वेग पकडला, आणि डावीकडे वळली, आणि रस्त्याच्या कडेला जे नाले असतात, त्या नाल्याकडे निघाली! तिथेच दोन माणसं  मोटरसायकल पार्क करून गप्पा मारीत होते. मी गाडी सोडून दिली, आणि त्यातल्या एकाला घट्ट  पकडले. आम्ही दोघे पडलो, पण मी वाचले, कारण पुढे नाल्यात बघितले, तर फक्त मोठे मोठे दगड होते, आणि मी जर  तिथे पडले असते तर काय झाले असते ह्याची कल्पना न केलेलीच बरी! तर मला नंतर असं  वाटलं, की मला गाडी सोडून देण्याची बुद्धी त्या भगवंतानेच दिली, आणि ते दोन गृहस्थ देखील  तिथे बहुधा मला वाचवण्यासाठीच उभे होते! भगवंताची कृपा म्हणते ती हीच!
मला आजही हा प्रसंग आठवला तर मी लगेच हात जोडून भगवंताचे आभार मानते!

 असो, आता महत्वाचा मुद्दा असा की पाउस पडत असतो तेंव्हा आपल्याला काहीतरी चटपटीत खावेसे वाटते, आणि तयारी पण जास्त असू नये असे वाटते नाही का? आजकाल बऱ्याच बसिक वस्तू रेडीमेड मिळतात त्यामुळे काहीतरी झटपट बनवणे सोपे झाले आहे,

रेडीमेड शेझवान चटणी चे नूडल्स
मी परवा  ' शेझवान चटणी ' चे रेडीमेड पाकीट आणले, आणि नूडल्स शिजवून त्यात  ही पेस्ट घालून फटाफट   नूडल्स बनवले होते. आणि गरम गरम खायला काय मजा येते, वाह! , हेच नूडल्स घरी  मसाला करून बनवायचे ठरवलं तर किती काम असतं मला माहिताय ना. म्हणून हे रेडीमेड पाकीट आणून केल्या नूडल्स . जुन्याच गोष्टीं मध्ये अडकून न पडता बदलणाऱ्या  जमान्या बरोबर आपण चालायला शिकलं पाहिजे . 

पालकाची मोठी जुडी स्वस्त मिळाली म्हणून  आणली,पण एवढ्या पालकाचे करायचे काय?
पालकाच्या पुऱ्या
मग आठवलं , पालकच्या पुऱ्या ! पुऱ्या करून लोणचं आणि दह्या सोबत खाऊन फस्त केल्या!


Saturday, 12 July 2014

गुरु पौर्णिमा

।।जय जय रघुवीर समर्थ ।।


 'गुरु ब्रह्मा गुरु विष्णू। गुरु देवो महेश्वरः ।
गुरु साक्षात परब्रह्म। तस्मै श्री गुरुवे नमः' ।।'

आज 'गुरु पोर्णिमा ' ,आपल्या गुरुजनांना   आठवावे, त्यांना वंदन करावे, प्रत्यक्ष जाऊन भेटता आले तर त्यांना नमस्कार  करून, फोन वरून संपर्क करून , त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, त्यांनी दिलेली शिकवणीची शिदोरी पुन्हा एकदा उघडावी, आणखीन काही नवीन सापडते  काय ते पाहावे.  मंडळी, नक्की नवीन काहीतरी सापडेतेच  बर का !

समर्थांनी दासबोधात   गुरूंचे सतरा प्रकार  सांगितले आहेत. मंत्रगुरु, तंत्रागुरू , उस्तादगुरु, राजगुरू , कुळगुरु , विद्यागुरु, , कुविद्यागुरु , असदगुरू , यातीगुरू, मातागुरु, पितागुरु, देवगुरु , जगद् गुरु, असे सतरा प्रकारचे गुरु आहेत
पण ह्या शिवाय असे गुरु पण असतात जे आपल्याला आपल्या  व्यवसायात,जीवनात  मार्गदर्शन करतात, आपल्या  प्रगतीत त्यांचे मोलाचे स्थान असते. मुल जन्मल्या पासून आई  पहिली गुरु असते असे म्हणतात. तिथून आयुष्भर अनेक गुरु लाभतात, पण कुणाला   गुरुस्थानी मानण्या साठी, आधी  आपण उपकृत झालो आहोत ह्याची जाणीव असायला हवी, किंवा तेवढे आपण संवेदन शील असायला हवे.

आपल्यांला  गुरु कोठेही मिळू  शकतो. त्याला वयाचे, ज्ञानाचे, अनुभवाचे कुठलेच बंधन असत नाही. जो आपल्याला एखाद्या विद्येचे ज्ञान देईल, एखाद्या अडचणीतून मार्ग दाखवेल,  असा एखादा बोल बोलेल ज्यामुळे आपल्याला मदत होईल असा तो गुरूच जाणावा, आणि त्याचा योग्य तो आदर ठेवावा. आदर ठेवायचा  म्हणजे दर वेळी नमस्कार वगैरे केला पाहिजे असे नाही, पण आभार मानले, किंवा आपल्या मुखाने त्याचे कौतुक केले, दोन शब्दांनी कृतज्ञता व्यक्त केली, तरी चालते. पण मुख्य गोष्ट म्हणजे कधीही ह्या गुरूचा विसर न पडावा हे ध्यानात असू द्यावे .अशा सर्व गुरुंचे  स्मरण करण्याचा आजचा हा दिवस.

समर्थ पुढे म्हणतात की एवढे गुरु असूनही सदगुरू शिवाय मोक्ष प्राप्ती नाही, तेंव्हा सदगुरूच श्रेष्ठ गुरु.
'असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारू \
परी जो मोक्षदाता सदगुरू ।तो वेगळाचि  असे ।'

माझ्या आईनी  शिकवलेले चिरोटे म्हणजे बेस्ट ! आज तेच चिरोटे जेंव्हा जेंव्हा करते तेंव्हा तेंव्हा तिची आठवण काढते, आणि असे चिरोटे शिकवल्या बद्दल मनातल्या मनात तिला वंदन करते.शिवाय बोलून शुभेच्छा देते ते वेगळेच! आजच चिरोटे केले, गुरु पोर्णिमे साठी ….

खुसखुशीत चिरोटे
१ वाटी मैदा, १/४ वाटी एकदम बारीक रवा, १ टीस्पून कॉर्नफ्लोर आणि २ टेबलस्पून तूप गरम करून  घट्ट कणिक  मळून,२ तास ठेवावी .
थोडे कॉर्नफ्लोर आणि तूप नीट   घोटून गुलगुलीत करून ठेवावे.
कणकेचे छोटे गोळे करावेत. एक एक पोळी लाटून, त्यावर घोटलेले तूप नीट पसरावे. वरती दुसरी पोळी ठेवावी. अशा ५ पोळ्या त्यावर तूप लावून एकमेकावर ठेवून, त्याची घट्ट  गुंडाळी करावी. आडवे कापून छोट्या लाट्या करून हलक्या हाताने रेषा वरती येतील असे लाटून, हे चिरोटे तुपात तळून घ्यावेत. शेवटी   पिठी साखर भुरभुरावी , आणि सर्व्ह करावेत.

माझ्या सर्व गुरुजनांना वंदन! त्रिवार वंदन!!