Saturday, 12 July 2014

गुरु पौर्णिमा

।।जय जय रघुवीर समर्थ ।।


 'गुरु ब्रह्मा गुरु विष्णू। गुरु देवो महेश्वरः ।
गुरु साक्षात परब्रह्म। तस्मै श्री गुरुवे नमः' ।।'

आज 'गुरु पोर्णिमा ' ,आपल्या गुरुजनांना   आठवावे, त्यांना वंदन करावे, प्रत्यक्ष जाऊन भेटता आले तर त्यांना नमस्कार  करून, फोन वरून संपर्क करून , त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, त्यांनी दिलेली शिकवणीची शिदोरी पुन्हा एकदा उघडावी, आणखीन काही नवीन सापडते  काय ते पाहावे.  मंडळी, नक्की नवीन काहीतरी सापडेतेच  बर का !

समर्थांनी दासबोधात   गुरूंचे सतरा प्रकार  सांगितले आहेत. मंत्रगुरु, तंत्रागुरू , उस्तादगुरु, राजगुरू , कुळगुरु , विद्यागुरु, , कुविद्यागुरु , असदगुरू , यातीगुरू, मातागुरु, पितागुरु, देवगुरु , जगद् गुरु, असे सतरा प्रकारचे गुरु आहेत
पण ह्या शिवाय असे गुरु पण असतात जे आपल्याला आपल्या  व्यवसायात,जीवनात  मार्गदर्शन करतात, आपल्या  प्रगतीत त्यांचे मोलाचे स्थान असते. मुल जन्मल्या पासून आई  पहिली गुरु असते असे म्हणतात. तिथून आयुष्भर अनेक गुरु लाभतात, पण कुणाला   गुरुस्थानी मानण्या साठी, आधी  आपण उपकृत झालो आहोत ह्याची जाणीव असायला हवी, किंवा तेवढे आपण संवेदन शील असायला हवे.

आपल्यांला  गुरु कोठेही मिळू  शकतो. त्याला वयाचे, ज्ञानाचे, अनुभवाचे कुठलेच बंधन असत नाही. जो आपल्याला एखाद्या विद्येचे ज्ञान देईल, एखाद्या अडचणीतून मार्ग दाखवेल,  असा एखादा बोल बोलेल ज्यामुळे आपल्याला मदत होईल असा तो गुरूच जाणावा, आणि त्याचा योग्य तो आदर ठेवावा. आदर ठेवायचा  म्हणजे दर वेळी नमस्कार वगैरे केला पाहिजे असे नाही, पण आभार मानले, किंवा आपल्या मुखाने त्याचे कौतुक केले, दोन शब्दांनी कृतज्ञता व्यक्त केली, तरी चालते. पण मुख्य गोष्ट म्हणजे कधीही ह्या गुरूचा विसर न पडावा हे ध्यानात असू द्यावे .अशा सर्व गुरुंचे  स्मरण करण्याचा आजचा हा दिवस.

समर्थ पुढे म्हणतात की एवढे गुरु असूनही सदगुरू शिवाय मोक्ष प्राप्ती नाही, तेंव्हा सदगुरूच श्रेष्ठ गुरु.
'असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारू \
परी जो मोक्षदाता सदगुरू ।तो वेगळाचि  असे ।'

माझ्या आईनी  शिकवलेले चिरोटे म्हणजे बेस्ट ! आज तेच चिरोटे जेंव्हा जेंव्हा करते तेंव्हा तेंव्हा तिची आठवण काढते, आणि असे चिरोटे शिकवल्या बद्दल मनातल्या मनात तिला वंदन करते.शिवाय बोलून शुभेच्छा देते ते वेगळेच! आजच चिरोटे केले, गुरु पोर्णिमे साठी ….

खुसखुशीत चिरोटे
१ वाटी मैदा, १/४ वाटी एकदम बारीक रवा, १ टीस्पून कॉर्नफ्लोर आणि २ टेबलस्पून तूप गरम करून  घट्ट कणिक  मळून,२ तास ठेवावी .
थोडे कॉर्नफ्लोर आणि तूप नीट   घोटून गुलगुलीत करून ठेवावे.
कणकेचे छोटे गोळे करावेत. एक एक पोळी लाटून, त्यावर घोटलेले तूप नीट पसरावे. वरती दुसरी पोळी ठेवावी. अशा ५ पोळ्या त्यावर तूप लावून एकमेकावर ठेवून, त्याची घट्ट  गुंडाळी करावी. आडवे कापून छोट्या लाट्या करून हलक्या हाताने रेषा वरती येतील असे लाटून, हे चिरोटे तुपात तळून घ्यावेत. शेवटी   पिठी साखर भुरभुरावी , आणि सर्व्ह करावेत.

माझ्या सर्व गुरुजनांना वंदन! त्रिवार वंदन!!

No comments:

Post a Comment