९ सप्टेंबर! त्या दिवसानंतर आज ब्लॉग लिहिते आहे! इतका आनंद होतो आहे, काय सांगू! झालं होतं काय, की ब्लॉग चा लँग्वेज ऑप्शन काम करेनासा झाला, आणि सगळं कामच थांबलं की! मग काय, सुरु झाली धावाधाव आणि पळापळ! भगीरथ प्रयत्नांना सुरुवात झाली. (माझ्या साठी भगीरथ प्रयत्नच हो!) मोहीमच हाती घ्यावी लागली. मग मित्रमैत्रिणींना फोन, ईमेल, ब्लॉगवर मदतीसाठी कमेंट टाकली, प्लीज हेल्प म्हणून फेसबुक वर स्टेट्स अपडेट केलं , म्हणजे थोडक्यात जे जे शक्य होतं ते ते केलं. शेवटी, एका स्नेह्यांच्या मुलाने हा प्रॉब्लेम सोडवून दिला, आणि मी माझा ब्लॉग लिहिण्यास पुन्हा सुरुवात केली आजच!
म्हणतात ना, की संकट आलं, तरी न डगमगता, संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे लागते. प्रसंग कठीण, संकटातून बाहेर पडण्याचा नक्की मार्ग माहित नाही, वाट अवघड, आणि कुठून सुरुवात करायची हेही माहित नाही! अशा वेळी, आपले ध्येय खूपच असाध्य आणि दूर वाटायला लागते, आणि सर्व अवसान गळून जाते, निराश व्हायला होतं आणि अशात हार मानण्याची शक्यता बरीच असते. पण अशा वेळी, निर्धाराने आपल्या ध्येयाकडे फक्त एक पाउल उचलावे, मग बघा, किती तरी पाउले पडत जातात, पडत जातात! आणि ध्येयपूर्ती होतेच होते! मोठ्या संकटाचे छोटे छोटे भाग पाडावेत, आणि एकेका भागाला सोडवण्याचा प्रयत्न सुरु करावा. तर,' केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' ह्या समर्थांच्या ब्रहमआणि त्यांचे वाक्याची प्रचिती येते! I strongly believe in the adage, 'God helps those who help themselves' . असो, All is Well, that ends well!, rather, ह्या ब्लॉग संदर्भात म्हणायचं तर, Begins well once again!
मध्यंतरी, महालयम पर्व झालं. ह्या पंधरा दिवसात आपण आपल्या पितरांचे स्मरण करतो, त्यांना पिंड दान करतो, त्यांच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करतो, आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतो.
त्यानंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरु झालं. नऊ दिवस देवीची आराधना, उपासना, पूजा अर्चा करून, दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून, ज्येष्ठ मंडळींना सोनं म्हणून आपट्याची पानं देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात. 'दसरा सणमोठा, नाही आनंदा तोटा' असं म्हणतात. देवीचे नवरात्र उठले, की लहान थोर सर्वांना वेध लागतात ते दिवाळीचे!
आनंदाची दिवाळी, फटाक्यांची दिवाळी, फराळाची दिवाळी, मौज मस्तीची दिवाळी, सुट्टीची दिवाळी, अभ्यंग स्नानाची दिवाळी, पाहुण्यांची दिवाळी, किल्ल्याची दिवाळी , दिवाळी अंकांची दिवाळी! कितीतरी रंग आहेत दिवाळीचे! ज्याला जो रंग आवडेल, तो त्यात रमतो. महिला वर्ग फराळात रंगतो, बच्चे कंपनी फटके, आकाश कंदील, किल्ले करण्यात रमतो, पाहुण्यांसाठी स्वागताची तयारी करण्यात कुणी रमतो, आणि ज्येष्ठ मंडळी सर्वांवर बारीक लक्ष ठेवण्यात, आणि सर्व सुचना देऊन, काम करून घेण्यात रमतात! (हा! हा!) आणि हो, नवरे आपल्या बायको साठी गिफ्ट आणण्यासाठी धडपडत जातात! (हो, पण त्याआधी त्यांना हळूच ह्याची आठवण करून द्यावी लागते! दुसरं कोण आठवण करून देणार? बायकोच की!) आणि भाऊ बहिणीसाठी तिच्या आवडीची भाऊबीज घेण्यासाठी धडपडतो!
तर दिवाळीच्या तयारीला लागायचं आहेच, पण त्याआधी माझ्या मैत्रिणीनी मूग डाळीच्या रेसिपीज विचारल्या होत्या, त्या देते.
मुगडाळ ओट्स डोसा: १ वाटी मुगडाळ ३ तास भिजवून नंतर शिजवावी , किंवा मोड आलेले मूग शिजवून घ्यावेत. डोसे बनवायच्या १/ २ तास आधी २ वाट्या ओट्स पाण्यात भिजवावेत. आता ओट्स आणि मूगडाळ एकत्र वाटून घ्यावे. त्यात लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर,बारीक चिरून कांदा, आणि २ चमचे तांदुळाचे पीठ, थोडे पाणी घालून डोसा पीठ बनवावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर डोसे बनवावेत. हे डोसे थोडे जाडच ठेवावेत. लसुन चटणी, लाट मिरची चटणी, कोथिंबीर पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर गरम सर्व्ह करावे.
मुगडाळ भाकरी : १ वाटी मुगडाळ भिजवून, शिजवावी, किंवा मोड आलेले मूग शिजवावे. तेल गरम करून त्यात मोहरी,जिरे, बडीशोप, हिंग, हळद, तिखट, कोथिंबीर चिरून घालावी, आणि परतून घ्यावे. लगेच त्यात मुगडाळ घालावी आणि नीट शिजू द्यावी. शेवटी मीठ,तिखट, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून करावी. ह्यात १ ते १/२ वाटी ज्वारीचे पीठ घालून (approx_ १ १/२ वाटी सांगितले आहे.) हाताने भाकरी थापून तव्यावर भाजावी आणि नंतर तेल घालून दोन्हीकडे खरपूस भाजावी. लोणी, चटणी, ठेचा बरोबर छान टेस्टी लागते ही भाकरी.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना ही दिवाळी आनंदाची, आणि येणारे नवीन वर्ष सुखाचे, भरभराटीचे, समाधानाचे जावो!!!!!