Saturday, 22 July 2017

आभार प्रदर्शन...प्रदर्शन?

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेगवेगळ्या वेळी 'धन्यवाद!', 'thank you!', 'शुक्रिया!' हे आभार प्रदर्शन करणारे शब्द वापरतांना आढळतात. पण बहुतेकवेळा तो एक निर्विकार सोपस्कार झालेला दिसतो. ह्या शब्दांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उच्चारामुळे त्याचा गर्भित अर्थ कुठेतरी हरवून जाऊन फक्त यांत्रिकपणा उरलेला वाटतो. हृदयापासून आलेल्या कृतज्ञतेला 'धन्यवाद' ह्या शब्दातून साकार करणे हे मूळ ध्येयच हरवल्यासारखे झाले आहे, अशी मनातून व्यक्त  झालेली कृतज्ञता क्वचितच अनुभवायला मिळते. अशी कृतज्ञता व्यक्त करण्याची ना आज कुणाला गरज भासते, ना कोणी असा विचार देखील करतो.

खरतर कृतज्ञता ही काही इतर भावनांसारखीच भावना नाहीये, तर त्याहूनही काही जास्त आहे. कृतज्ञता हा एक मुलभूत दृष्टीकोन आहे आणि त्यापेक्षाही जीवन जगण्याची शैलीच मानता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे, सुखी, समृध्द, सकारात्मक आणि निरामय जीवनाची सूत्रीच म्हणता येईल. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या एका अनुभूतीमध्ये प्रेम, जिव्हाळा,दिलासा, आशा, करूणा, विनय, आनंद आणि विश्वास ह्यासारख्या सकारात्मक भावनांचा साक्षात्कार करण्याची शक्ति आहे.  खऱ्या आभार प्रदर्शनातून देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही निर्मळ आणि अपार आनंदाची अनुभूती होते. अगदी पैशांच्या मोबदल्यात होणाऱ्या सेवांच्य देवाण घेवाणीत देखील, मनापासून दिलेले धन्यवाद हे काही क्षण आनंद आणि उत्साह देऊन जातात, हे अनुभव घेण्याजोगे आहे,
कृतज्ञतेचा दृष्टीकोन ठेवल्याने आपल्याला ह्या भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन जीवनाचा खरा अर्थ गवसायला मदतच होते.

ज्यांचा विचार सुध्दा केला जात नाही, किंवा ज्यांना नेहमी गृहीत धरले जाते, अशा अनेक छोट्या छोटया अशीर्वादांचा साक्षात्कार होतो, तेंव्हा ह्या सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची मनाची तयारी होते. तेंव्हा लक्षात येते की, प्रेमळ जोडीदार, माया करणारे आई_वडील, गुणी अपत्ये, साथ देणारे सोबती , एक यशस्वी आणि समाधानी कारकीर्द अशी वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टीने आशीर्वादांची वेगवेगळी रूपे असतात. पण बहुतेक लोकांना ह्या आशीर्वादांच्या अस्तित्वाचेच भान नसते. ह्यांचे महत्व तेंव्हा कळते जेंव्हा त्याचं लोप होतो, नाश होतो . आणि तेंव्हा खरतर वेळ निघून गेलेली असते, आणि मग खंत उरते ती आपल्या विचारांच्या कोतेपणाची......

तेंव्हा, चांगल्या किंवा वाईट  काळात देखील कुक्ठ्ल्यातरी चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता मनात ठेवली, म्हणजे जीवनात वर्तमानात सुख मिळतेच, शिवाय भूतकाळाचा पश्चात्ताप करावा लागत नाही आणि भविष्याची अनिश्चितता भेडसावत नाही.

मानवी जीवनाचे वरदान मिळाले ह्या भावनेला एक चमत्कार म्हणावा कि त्या निराकार निर्मात्याने ह्या अद् भूत  निर्मितीला दिलेली स्वीकृती म्हणावी, कि त्या अफाट शक्तीला, त्या ब्रह्माला स्मरून तिला शरण  जावे, अशा अनेक भावना व्यक्त करण्यासाठी 'धन्यवाद' हा शब्द गहिरे रंग भरून जातो हे निश्चित!

तेंव्हा आपल्याला मिळालेल्या ह्या जीवनाच्या देणगीबाबत कृतज्ञता व्यक्त करून आयुष्याची परिमाणे बदलतांना पहा आणि आनंद व उत्साह द्विगुणीत करा! 

आम्ही किल्लेदार!

किल्ला करणे हा अनेक जणांचा दिवाळीतला सगळ्यात मजेदार आणि माझा देखील आवडता कार्यक्रम आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण मिळून किल्ला बनवतात. त्यासाठी दगड, माती, विटा आणि इतर साहित्य गोळा करणे, त्यातून किल्याला आकार देणे, मातीचे लेप देऊन, अहळीव किंवा धन्य पेरून किल्ला सज्ज करणे ह्या सर्वांतून खरेतर काम करणाऱ्यांच्यात एकोपा, समन्वय, तन्मयता साधणे  आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेतून आनंद मिळवणे हा ह्या केलेल्या सर्व परिश्रमाचा मानबिंदूच! ह्यानंतर सर्वांनी केलेले कौतुक म्हणजे श्रमसाफल्यच आणि नव्या उमेदीने पुढे  जाण्याचे जणू इंधनच.

किल्ला करतांना किल्याचे बुरुज, तटबंदी, दिंडीदरवाजे, किल्ल्या  भोवतीची  मोट आणि किल्याची सर्व बाजूंनी केलेली सुरक्षा व्यवस्था हे सर्व महत्वाचे पैलू. ह्यानंतर किल्यावरील मंदिरे, तोफखाना, बारुदखाना, नगारखाना, पाण्याचे साठे, धान्यकोठारे अशा अनेक महत्वाच्या जागा योग्य सजावटीतून तयार करणे हे येते. किल्ल्याच्या  पायथ्याशी वसलेले गाव दाखवणे हा देखील महत्वाचे पैलू आहे. गावात त्यावेळच्या गोष्टी म्हणजे मंदिर, बाजार, उद्यान, घरे, शेती, शिवाय गावात अनेक प्रकारची कामे करणारे म्हणजे बारा बलुतेदार दाखवणे , गाय, बैल इतर जनावरे, प्राणी, पक्षी हे सर्व कल्पकतेने सजवणे हे खुप  आव्हानात्मक ठरते.

ह्या किल्याची शोभा वाढवतात ते मावळे , शेतकरी, भिल्ल आणि जंगलातील हिस्त्र श्वापदे. ढोल, ताशे, नगरे वाजवणारे, बाजारातील लोक, गावातील वस्ती व उद्योग दाखवणारी माणसे. आणि ह्या सर्व सजावटीचा मानबिंदू म्हणजे शिवाजी महाराजांची सिंहासनावरची  अतिशय रेखीव मूर्ती आणि त्यांच्या आजुबाजूला तैनात दरबारी मंडळी! ह्या उच्चासनावर बसून किल्ला व गावाचे निरीक्षण करणारे महाराज हा देखावा पहाता पाहता किल्ल्यासमोर चार पाच तास असेच तल्लीन होऊन निघून जातात. संध्याकाळी किल्ला सजवून, रोषणाई करून असं एकटक पाहण्यातला आनंद सांगून नाही समजणार. त्यासाठी ह्या सर्वांतून जायला हवे, ते सर्व अनुभवायला हवे!

कालमानानुसार किल्यावरील सजावट बदलली. खेडी जाऊन तिथे शहरी व्यवस्थेचे दर्शन घडायला लागले. दिवे, रेल्वे, गाड्या, विमाने, विमानतळ, इत्यादी दाखवली जाऊ लागली. रिमोटकंट्रोलने त्यांना चालना देऊन एक वेगळेच विश्व निर्माण केले जाऊ लागले. थोडक्यात,, जुन्या_नव्या संकल्पनांचा संगम घडवून, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून किल्याला एक आधुनिक झगमगाटाचे स्वरूप देण्यात  येत आहे. तेही तितकेच लोभस व मनमोहक आहे ह्यात शंका नाही.

माझ्या लहानपणी वाड्यात रहात असतांना किल्ला बनवण्याच्या कामात सहभाग असल्याने ती गोडी मनात उत्पन्न झाली. वाड्यातून fla मध्ये t स्थलांतर झाले आणि बराचसा काळ  किल्ला मनाच्या कोपऱ्यातच राहिला. जेंव्हा  अनेक वर्षांनी पुन्हा स्वतःच्या मुलीसाठी किल्ला करायला सुरुवात केली तेंव्हा जुने सर्व काही आठवले आणि प्रत्येक वर्षी अधिक चांगला किल्ला करता येऊ लागला.

दरवेळी किल्याची नवीन संकल्पना ठरवणे, एकसमान सूत्र ठरवून मातीच्या व लाकडाच्या खेळण्यांची रचना करणे व या खेळण्यांसाठी पुण्याच्या कुंभार बाजारात पायपीट करणे... ... सर्व काही कालच घडल्यासारखे वाटते आहे. ही खेळणी अजूनही मनाला भुरळ घालतात. त्यामुळे खेळण्यांची हौस तशी भागलीच नाहीये, कारण किल्ला करण्यातला आनंदच अवर्णनीय आहे.

किल्ला करून दमणूक होते हे खरे. दिवाळीच्या शेवटी असे वाटते, आता पुन्हा किल्ला करणे नको! पण, दिवाळीची चाहूल लागली की लगेच मनात उत्साहाची एक लकेर दौडून जाते, आणि पुन्हा नव्या कल्पना लढविण्यासाठी डोक्यात विचारचक्रे सुरु होतात!

अनेक वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर राहून  सुध्दा प्रयेक सण जसा पारंपारिक पध्दतीने साजरा केला, इतर प्रांतीय लोकांनाही तो आनंद दिला, सणांची महती दिली आणि कौतुक मिळवले, तसेच किल्ला केल्यानंतर प्रत्येक  दिवशी येणाऱ्या पाहुण्यांना फराळापेक्षा जास्त उत्सुकता असलेला किल्ला दाखवणे, त्यातले बारकावे सांगून समजावणे, फराळापेक्षाही गोड वाटायचे!आणि शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगतांना मन अभिमानाने भरून यायचे!

पुष्कळदा मराठी माणसेच आपली संस्कृती, सण , उत्सव साजरे  करायला व इतर प्रांतीयांना सहभागी करून घ्यायला थोडे संकोचतातच, पण मी मात्र ह्या सर्व गोष्टी आवर्जून दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आणि ह्यामुळेच आम्हाला पुन्हा आपल्या प्रदेशात वास्तव्याला आल्यानंतर इथल्या वातावरणात लगेच सामील होता आलं.. हे पहिले की वाटते, "ह्याचसाठी केला होता अट्टाहास!"

दिवाळीच्या फराळ आणि फटाक्यांबरोबरच संपते ती किल्ल्याची साथ...... शेवटी शिवाजी राजांच्या  स्मृतीला अभिवादन करून शेवटचे दिवशी किल्ला उतरवतो तेंव्हा खरच गणपती बाप्पाचे विसर्जन करतांना वाटते तशी हुरहूर लागते! 

Friday, 21 July 2017

ध्यान धारणा मंत्रोच्चार.... आणि स्वत्वाचा शोध!

सर्वसाधारणपणाने ध्यानसाधनेने साधक आपले ह्या विश्वातले त्याचे स्थान अथवा अस्तित्व शोधण्याचा  करीत  असतो. चिंतनातून माणूस आपले ईश्वररूपी विश्वाशी नाते जोडण्याचा प्रयत्न करतांना दिसतो. आपल्या भोवतालच्या परिचित व्यक्ती नेहमी एक गोष्ट सांगतात, ती म्हणजे ध्यान साधना कशी  करायची,का करायची... 

ध्यान साधना खालील  प्रमाणे  करावी....

१)  शिथिल होणे म्हणजे relaxation.
 आपल्या  शारीरिक हालचालींवर  लक्ष ठेवणे. सोबतच  श्वासावर लक्ष केंद्रित करणे.शरीराला शिथिल करावे, तसेच श्वास नियंत्रित करून ध्यानासाठी सज्ज व्हावे.

२) मंत्रांचा उच्चार करणे.
एखाद्या मंत्राचा पुनरुच्चार  करीत राहणे. सोबतच मंत्राचा कालावधी निश्चित करणे. म्हणजे  मंत्राचे एक आवर्तन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या मंत्रोच्चारामध्ये  एक शिस्तबद्ध शांतता राखणे.  आणि  मंत्रोच्चारण किती  वेळासाठी करायचे हेही निश्चित करायचे.

३)मंत्राचा अर्थ  समजून घेणे.
आपण म्हणत असलेल्या मंत्राचा पूर्ण आणि सम्पूर्ण अर्थ, त्यातला गर्भित अर्थ, आणि त्या मंत्राने गाठायचे उद्दिष्ट ह्या सर्वांचा विचार आपण मंत्र म्हणतांना करायचा असतो.

४)सद्सद्  विवेकबुद्धी जागृत करणे.
ह्या विश्वातील प्रत्येक जीव वा वस्तू ही अणू पासून तयार झाली आहे. ह्या श्रुंखलेत  मी कुठे व  कुठल्या स्थानावर आहे हे माहित करून घेणे, म्हणजेच विवेक. आपल्या यःकिंचित स्थानाची  झाली की माणसात विवेकबुद्धी जागृत होते. अशा प्रकारच्या विचारांची साखळी तयार होते, आणि मग मनुष्य  राग,लोभ,मद, द्वेष, दुःख, मत्सर ह्या षड्रिपूंवर नियंत्रण ठेवण्यास शिकतो. आपल्या अस्तित्वाचे कारण, आणि आपले योगदान ह्याचे ज्ञान प्राप्त होताच त्या व्यक्तीमध्ये मानसिक  वृद्धी होते.

५) स्वत्वाचा शोध घेणे...
आपल्याला काय माहित आहे ह्यापेक्षा काय माहित नाही ह्याची जाणीव होणे फार महत्वाचे आहे.  आणि मग  पुढची पायरी म्हणजे जे माहित नाही त्याचा शोध घेणे!.म्हणजेच 'स्वत्वाचा' शोध घेणे!