Saturday, 22 July 2017

आम्ही किल्लेदार!

किल्ला करणे हा अनेक जणांचा दिवाळीतला सगळ्यात मजेदार आणि माझा देखील आवडता कार्यक्रम आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण मिळून किल्ला बनवतात. त्यासाठी दगड, माती, विटा आणि इतर साहित्य गोळा करणे, त्यातून किल्याला आकार देणे, मातीचे लेप देऊन, अहळीव किंवा धन्य पेरून किल्ला सज्ज करणे ह्या सर्वांतून खरेतर काम करणाऱ्यांच्यात एकोपा, समन्वय, तन्मयता साधणे  आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेतून आनंद मिळवणे हा ह्या केलेल्या सर्व परिश्रमाचा मानबिंदूच! ह्यानंतर सर्वांनी केलेले कौतुक म्हणजे श्रमसाफल्यच आणि नव्या उमेदीने पुढे  जाण्याचे जणू इंधनच.

किल्ला करतांना किल्याचे बुरुज, तटबंदी, दिंडीदरवाजे, किल्ल्या  भोवतीची  मोट आणि किल्याची सर्व बाजूंनी केलेली सुरक्षा व्यवस्था हे सर्व महत्वाचे पैलू. ह्यानंतर किल्यावरील मंदिरे, तोफखाना, बारुदखाना, नगारखाना, पाण्याचे साठे, धान्यकोठारे अशा अनेक महत्वाच्या जागा योग्य सजावटीतून तयार करणे हे येते. किल्ल्याच्या  पायथ्याशी वसलेले गाव दाखवणे हा देखील महत्वाचे पैलू आहे. गावात त्यावेळच्या गोष्टी म्हणजे मंदिर, बाजार, उद्यान, घरे, शेती, शिवाय गावात अनेक प्रकारची कामे करणारे म्हणजे बारा बलुतेदार दाखवणे , गाय, बैल इतर जनावरे, प्राणी, पक्षी हे सर्व कल्पकतेने सजवणे हे खुप  आव्हानात्मक ठरते.

ह्या किल्याची शोभा वाढवतात ते मावळे , शेतकरी, भिल्ल आणि जंगलातील हिस्त्र श्वापदे. ढोल, ताशे, नगरे वाजवणारे, बाजारातील लोक, गावातील वस्ती व उद्योग दाखवणारी माणसे. आणि ह्या सर्व सजावटीचा मानबिंदू म्हणजे शिवाजी महाराजांची सिंहासनावरची  अतिशय रेखीव मूर्ती आणि त्यांच्या आजुबाजूला तैनात दरबारी मंडळी! ह्या उच्चासनावर बसून किल्ला व गावाचे निरीक्षण करणारे महाराज हा देखावा पहाता पाहता किल्ल्यासमोर चार पाच तास असेच तल्लीन होऊन निघून जातात. संध्याकाळी किल्ला सजवून, रोषणाई करून असं एकटक पाहण्यातला आनंद सांगून नाही समजणार. त्यासाठी ह्या सर्वांतून जायला हवे, ते सर्व अनुभवायला हवे!

कालमानानुसार किल्यावरील सजावट बदलली. खेडी जाऊन तिथे शहरी व्यवस्थेचे दर्शन घडायला लागले. दिवे, रेल्वे, गाड्या, विमाने, विमानतळ, इत्यादी दाखवली जाऊ लागली. रिमोटकंट्रोलने त्यांना चालना देऊन एक वेगळेच विश्व निर्माण केले जाऊ लागले. थोडक्यात,, जुन्या_नव्या संकल्पनांचा संगम घडवून, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून किल्याला एक आधुनिक झगमगाटाचे स्वरूप देण्यात  येत आहे. तेही तितकेच लोभस व मनमोहक आहे ह्यात शंका नाही.

माझ्या लहानपणी वाड्यात रहात असतांना किल्ला बनवण्याच्या कामात सहभाग असल्याने ती गोडी मनात उत्पन्न झाली. वाड्यातून fla मध्ये t स्थलांतर झाले आणि बराचसा काळ  किल्ला मनाच्या कोपऱ्यातच राहिला. जेंव्हा  अनेक वर्षांनी पुन्हा स्वतःच्या मुलीसाठी किल्ला करायला सुरुवात केली तेंव्हा जुने सर्व काही आठवले आणि प्रत्येक वर्षी अधिक चांगला किल्ला करता येऊ लागला.

दरवेळी किल्याची नवीन संकल्पना ठरवणे, एकसमान सूत्र ठरवून मातीच्या व लाकडाच्या खेळण्यांची रचना करणे व या खेळण्यांसाठी पुण्याच्या कुंभार बाजारात पायपीट करणे... ... सर्व काही कालच घडल्यासारखे वाटते आहे. ही खेळणी अजूनही मनाला भुरळ घालतात. त्यामुळे खेळण्यांची हौस तशी भागलीच नाहीये, कारण किल्ला करण्यातला आनंदच अवर्णनीय आहे.

किल्ला करून दमणूक होते हे खरे. दिवाळीच्या शेवटी असे वाटते, आता पुन्हा किल्ला करणे नको! पण, दिवाळीची चाहूल लागली की लगेच मनात उत्साहाची एक लकेर दौडून जाते, आणि पुन्हा नव्या कल्पना लढविण्यासाठी डोक्यात विचारचक्रे सुरु होतात!

अनेक वर्ष महाराष्ट्राच्या बाहेर राहून  सुध्दा प्रयेक सण जसा पारंपारिक पध्दतीने साजरा केला, इतर प्रांतीय लोकांनाही तो आनंद दिला, सणांची महती दिली आणि कौतुक मिळवले, तसेच किल्ला केल्यानंतर प्रत्येक  दिवशी येणाऱ्या पाहुण्यांना फराळापेक्षा जास्त उत्सुकता असलेला किल्ला दाखवणे, त्यातले बारकावे सांगून समजावणे, फराळापेक्षाही गोड वाटायचे!आणि शिवाजी महाराजांबद्दल माहिती सांगतांना मन अभिमानाने भरून यायचे!

पुष्कळदा मराठी माणसेच आपली संस्कृती, सण , उत्सव साजरे  करायला व इतर प्रांतीयांना सहभागी करून घ्यायला थोडे संकोचतातच, पण मी मात्र ह्या सर्व गोष्टी आवर्जून दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आणि ह्यामुळेच आम्हाला पुन्हा आपल्या प्रदेशात वास्तव्याला आल्यानंतर इथल्या वातावरणात लगेच सामील होता आलं.. हे पहिले की वाटते, "ह्याचसाठी केला होता अट्टाहास!"

दिवाळीच्या फराळ आणि फटाक्यांबरोबरच संपते ती किल्ल्याची साथ...... शेवटी शिवाजी राजांच्या  स्मृतीला अभिवादन करून शेवटचे दिवशी किल्ला उतरवतो तेंव्हा खरच गणपती बाप्पाचे विसर्जन करतांना वाटते तशी हुरहूर लागते! 

No comments:

Post a Comment