Saturday, 8 March 2014

स्त्री शक्तीचा जागर

महिला सक्षम आहेत हे पटवून देण्यासाठी   नेहमीच घराबाहेर पडूनच काम  केलं असं  मुळीच नाही बरं . आपलं घर, घरातील सदस्य, आपल्या आजूबाजूचा समाज ,त्या समाजातील घटक ह्यांना अनेक   प्रकारे मदत लागते,  लागत असते. तर, खंबीरपणे त्यांच्या पाठीशी  राहूनत्यांना अशी मदत  करणाऱ्या महिला देखील सक्षमच  असतात!

आपल्या  शारीरिक , मानसिक, बौद्धिक, भावनिक सामर्थ्याने  आणि क्वचित प्रसंगी आपल्यातील आध्यात्मिक सामर्थ्याने आपण दुर्बल आणि असहाय घटकांची मदत केली तरी ते देखील आपल्या सक्षम असण्याचाच पुरावा नाहीका ?

स्त्रीचे नैसर्गिक गुण म्हणजे प्रेम, स्नेह, वात्सल्य, सर्वांना जोडून ठेवण्याचे कौशल्य… हे आणि असे अनेक गुण. त्यांचा वापर करून आपल्या अवतीभवती प्रगती आणि उन्नत्ती घडवून आणणारी स्त्री ही सक्षमच!

आपल्यातील कला गुणांनी लोकांचे मनोरंजन करणारी महिला सक्षम आहे, तसेच दुसऱ्याच्या सुप्त कला गुणांना फुलवणारी स्त्री देखील सक्षमच आहे. एखाद्या सामान्य उत्पन्न असणाऱ्या घरातील स्त्री अनेक प्रकारे  पैशांची बचत करीत करीत आपल्या  घराला घरपण आणि भौतिक सौंदर्य आणण्यासाठी झटते तेंव्हा ती पैसा तर वाचवतेच, पण स्वतः सक्षम असल्याची ग्वाही पण देते,  हो ना?

मजुरी करणाऱ्या स्त्रीचे तान्हे मूल ती करीत असलेल्या कामाच्या ठिकाणीच एखाद्या झाडाच्या फांदीचा झोका करून, झोळीत झोपते, आणि त्याच्यावर एक नजर ठेऊन ही स्त्री आपले काम करीत राहते.   म्हणजे पैसे   कमवून घरही चालवते आणि मुलाबाळांची काळजी पण घेते. ही महिला नाही का सक्षम? आहेच मुळी .

घरी राहून घरच्यांसाठी काम करणाऱ्या महिलांना आपल्या लोकांची   तृप्त झालेली भूक, घरातील सुव्यवस्था, सर्वांची निकोप वाढ , आणि घरातील आनंद आणि त्यामुळे झालेले त्यांचे प्रसन्न चेहरे बघणे म्हणजे पण तिच्याच सुद्दृढ आणि सक्षम असण्याचा पुरावा आहे.

तेंव्हा आपल्यातील शक्ती ओळखून, आपल्यातील  बलस्थान आणि कमजोरी ओळखून त्यांचा योग्य मेळ घालीत स्वतः प्रगती करणे आणि दुसऱ्यांना मदतीचा हात देणे , व त्यांना प्रगतीपथावर नेणेहाच  हाच स्त्रीशक्तीचा जागर होय .

    

WOMAN'S DAY

''HAPPY  WOMAN'S  DAY'

आज खूप  गाजा वाजा  होतो आहे महिला सक्षमीकरणाचा, परंतु महिला पूर्वी पासून सक्षमच आहेत  राहणार आहेत. कस असतं  ना, सक्षम  आहोत हे दाखवण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, पण  सरते शेवटी सक्षम राहून बाजी मारली की   आपोआपच सिद्ध होऊन जातं!

कुणी संसाराचे तुटलेले धागे गोळा करण्यासाठी सक्षम बनतात, कुणी उपेक्षितांचे दुःख  करण्यासाठी सक्षम बनतात.   काही जणी समाजाला दान देण्यासाठी सक्षम होतात,  किंवा   दान देत देत सक्षम होतात…  मग ते दान कोणतंही असेल, शिक्षण, पैसा, प्रापंचिक गरजा, योग्य सल्ला, योग्य माहिती, मार्गदर्शन इत्यादी. उत्तेजन देण्यासाठी प्रेमाचा हात पाठीवर फिरवणे, किंवा निराशेला आशेचा किरण दाखवणे,  वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणे हे देखील सक्षम असल्याची   प्रतीकंच आहेत की!

कुणी कुणी छुप्या अन्यायाला तोंड देण्यासाठी ,त्या अन्यायाच्या समोरच उभे राहून त्याच   अन्यायाला प्रतिकार करीत  राहतात, ते देखील सक्षमच असतात म्हणूनच ना?

तेंव्हा महिला सक्षम आहेत हे दाखवण्या साठी घराच्या बाहेरच पडलं  पाहिजे असं  काही गरजेचं नाही.

पण प्रश्न कुठे येतो माहिताय का? महिला सक्षम आहेत हे मान्य करता न येणे, किंवा मान्य करण्याचे टाळणे, किंवा आपला ego जोम्बाळत बसण्या साठी महिलांच्या प्रयत्नांवर पाणी फेरणे  ह्या गोष्टी मुळे प्रश्न निर्माण होतात.

पण महिलांनी ह्या गोष्टीं कडे दुर्लक्ष करावं आणि आपलं काम चोखपणे बजावीत पुढे जात राहावं! मग वेगळा महिला दिन साजरा कशाला करावा लागेल?

सो, आपल्या   मनाचे ऐका, मन सांगेल तेच सत्य असतं हे लक्षात ठेवा आणि चांगल्या मनाने सर्वांसाठी चांगलेच करीत रहा! पुन्हा एकदा सर्व महिलांना आजच्या जागतिक महिला दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा !

Thursday, 6 March 2014

महिलां साठी ब्रेकफास्ट रेसिपीज

माझ्या हे बऱ्याच वेळा पाहण्यात  आले आहे, की महिला वर्ग  हा सकाळी न्याहारी किंवा ब्रेकफास्ट घेत नाही. सबब काय? तर म्हणे 'वेळच  होत नाही', 'ह्यांची डब्याची घाई असते', मुलाचं करण्यात लक्षातच येत नाही ', देवपूजा झाल्या शिवाय काही खात नाही', (आणि  देवपूजा कधी होते हे विचारा, की सांगतात दुपारी १२ ते १ च्या  दरम्यान!, कठीणच आहे बाबा!) ह्या महिलांना पटत की ब्रेकफास्ट केला पाहिजे, रात्रीच्या ११ ते १२ तासांच्या विश्रांती नंतर पोटाला अन्न मिळालच पाहिजे नाहीतर   त्रास होतो वगैरे वगैरे…. पण …. हे असे स्वतः कडे दुर्लक्ष करून ह्यांना काय वाटत घरातले लोक ह्यांचा उदो उदो करतील? कौतुक करतील? नाही, असं  काहीही होतांना दिसत नाही. माझं  तर म्हणण आहे की त्यांच्या कुणाच्या हे लक्षात सुध्दा येत नसेल , म्हणजे नाहीच येत   लक्षात. मग तुम्ही कशाला   हुतात्मा बनता? मस्त खा, प्या, खुश रहा की!

 असो,तर  महिलां साठी काही झटपट ब्रेकफास्ट रेसिपीज …

मसाला रवा इडली

रवा इडली करण्या साठी १ वाटी  बारीक रवा घेऊन त्यात १ वाटी  घट्ट  दही, मीठ,कोथिंबीर,मिरची  पेस्ट,आलं पेस्ट घालून  इडली साठी पीठ भिजवावं, लागलं तर थोडं  पाणी किंवा दही घालावं. आणि लगेच इडल्या   बनवाव्यात. इडली बनायला १० मिनिटे लागतात. ह्याला चटणी वगैरे काही नको.  खायची बस!

 तिखट मिठाच्या पुऱ्या: कणिक घेऊन त्यात तिखट, मीठ, ओवा, जिरे, कोथिंबीर, पुदिना चिरून,हवी  असल्यास अगदी थोडी लसूण घालून पीठ घट्ट माळून पुऱ्या तळून घ्याव्यात . शेंगदाण्याच्या चटणी सोबत किंवा भाजी सोबत खाव्यात. नाहीतर नुसत्या चहा बरोबर सुध्दा मस्त तोंडाला चव आणतात.
ह्यात पालक प्युरी किंवा पाने कापून घाला. टोमेटो च्या रसात कणिक भिजवलीत तर टोमेटोच्या पुऱ्या होतील. चीज किंवा पनीर किसून टाका, गाजर, फ्लोवर,  मटार , बटाटा थोडा शिजवून mash करून घाला ! कितीतरी options असतात , फक्त मनात इच्छा हवी  की ब्रेकफास्ट करायचा म्हणजे करायचा!

पोहे नेहमीच केले जातात, पण  ह्याच  भिजवलेल्या पोह्यात थोडा उकडलेला बटाटा,  कांदा,मिरची कोथिंबीर, मीठ घालून छोटे वडे करून तळून घ्यावेत, sauce सोबत खावे. 

इतरांना खाऊ घालतो तर आपणही चांगला भरपेट नाश्ता करावा हेच मला सांगायचं आहे.

आणि हो, देवपूजे नंतर खायचं म्हणाल, तर कुणीतरी म्हटलेलंच आहे…आधी  पोटोबा मग विठोबा…. मग हाच आदेश शिरसावंद्य मानून चालायला काय हरकत आहे? विचार करा


Wednesday, 5 March 2014

100 TH POST!FEELS NICE!

आज १०० वा पोस्ट!!! मस्त वाटतय! आजच माझा birthday पण आहे !!
 म्हणून थोड्या वेळापूर्वी केक बनवला, आणि मस्त डिश  मध्ये घेऊन  खायला बसले! Divine ! bliss! आरामात केकचा आस्वाद  घेत ब्लॉग लिहायला घेतला .

chocolate fondue cake
CHOCOLATE FONDUE CAKE ;हा केक बनवण्यासाठी …
३/४ measuring cup मैदा,२ टेबलस्पून कोको पावडर, १/२ cup पिठी साखर , १ cup बटर/मलई/ तेल,१ टीस्पून  बेकिंग पावडर , १/२ टीस्पून सोडा  सर्व साहित्य एकत्र करून whisk करून, त्यात २ अंडी घालून फेटून बेकिंग डिश  मध्ये  ओतावे.
एकीकडे १/२ cup पाणी, १/२ cup साखर, आणि २ टेबलस्पून कोको पावडर एकत्र करून gas  गरम करावे. boil झाले, की वरील  batter वर ओतून केक microwave मध्ये १००% वर ७ मिनिटे बेक करावा. chocolate sauce घालून   गरम गरम  सर्व्ह करावा.

Tuesday, 4 March 2014

थंडीतील पौष्टिक जेवण

खारीक खोबऱ्याचे लाडू
 फ्रेंड्स, थंडी  काही कमी होत नाही, हो ना? त्यामुळे, थंडीतले म्हणून खास खारीक खोबऱ्याचे लाडू  आज केले आणि त्याची ह्या फोटो द्वारे तुम्हा सर्वांना मेजवानी!

थंडीमध्ये डिंक,,खारीक, खोबरं, बदाम, काजू ,  ड्राय फ्रुट्स, तीळ , खसखस, मेथी  दाण् याचे लाडू खास थंडीत केले जातात . पौष्टिकता,  शरीरातील स्निग्धता, आणि थंडीतील शरीराची  रोग  प्रतिकारक   शक्ती आणि उष्मांक वाढविण्यासाठी  ह्या  सर्व वस्तूंचा उपयोग  होतो.

थंडीत पंजाबी स्टाईल ने भरवाँ  भिन्डी, भरवाँ करेला,  मजा येते,  कारण बाजारात भाज्या  पण  विविध प्रकारच्या आलेल्या असतात, आणि रंगसंगती साधायला भरपूर  वाव असतो.

 भरलेली भेंडी पंजाबी स्टाईल
कोवळी अख्खी गवारीची भाजी  मराठी पध्दतीने केली, मस्त झाली होती!
अख्खी गवारीची  भाजी मराठी स्टाईल
काल सकाळी कोवळ्या  उन्हात ब्रेकफास्ट केला….
मसुराची उसळ आणि गरमागरम पुऱ्या
मसुराची उसळ आणि पुऱ्या …. गरम गरम … सोबत आंब्याचं लोणचं … वाह!

तेंव्हा थंडीला नावं  न ठेवता, छान छान पदार्थ करून खा आणि खिलवा!