नुकतीच रामनवमी आणि पाठोपाठ हनुमान जयंती देखील साजरी केली गेली, तेंव्हा त्या निमित्ताने समर्थ रामदासांची एक कथा वाचनात आली ती सांगावीशी वाटते ….
एक ब्राह्मण समर्थाचा शिष्य होता , आणि समर्थां बरोबरच रहात असे. त्याला वाटले होते,शिष्य झाले,म्हणजे मठात आरामात राहायला मिळेल, आणि काम पण करायला लागणार नाही! पण समर्थांना माणसांची पारख होतीच, पण ते अंतर्ज्ञानी होते, त्यांनी ब्राह्मणाची चाल ओळखली. आळशी आणि निरुद्योगी माणसांचा समर्थांना राग यायचा.
मग, समर्थ त्याला आपल्या बरोबर नेऊ लागले, आणि मग हा ब्राह्मण कंटाळला. गुरूबद्दलची आस्था कमी झाली,आणि तो तिथून निघून प. पु. निगडीकर स्वामींकडे आला आणि अनुग्रह द्या असे म्हणून मागे लागला. स्वामींनी विचारले, 'तू ह्या पूर्वी कुणाचा अनुग्रह घेतला होतास का ?' तेंव्हा ब्राह्मण म्हणाला , 'होय,मी समर्थ रामदासांचा अनुग्रह घेतला होता , पण मला तिथे बरे वाटले नाही, म्हणून निघून आलो. '
स्वामी त्याला म्हणाले की,तू समर्थांकडे जा, आणि तुझा अनुग्रह परत करून ये. ब्राह्मण समर्थांकडे गेला, आणि अनुग्रह परत घ्या असे म्हणाला . समर्थ म्हणाले, 'पाण्याची एक चूळ भर,आणि त्या समोरच्या खडकावर टाक म्हणजे अनुग्रह परत घेतल्या सारखे होईल.'
ब्राह्मणाने चूळ खडकावर टाकली, त्याच क्षणी त्याच ठिकाणी रामाच्या त्रयोदशाक्षरी मंत्राची, म्हणजेच 'श्री राम जय राम जय जय राम ' ही अक्षरे उमटली, आणि त्याच क्षणी ब्राह्मणाची वाचा देखील गेली ! त्याची ही दयनीय अवस्था पाहून निगडीकर स्वामी पुन्हा त्याला घेऊन समर्थांकडे गेले,आणि त्याची वाचा परत येऊ द्या म्हणून विनंती केली. समर्थांनी ब्राह्मणाला त्या ख्द्कावरची उमटलेली अक्षरे जिभेने चाटायला सांगितली . आणि काय आश्चर्य… ब्राह्मणाची गेलेली वाचा त्याला परत मिळाली !!!
ही कहाणी उंब्रजच्या मारुती मठातील घडलेली आहे, आणि ह्या मारुतीला गेले, तर हा खडक पहायला मिळेल.
असो, माझाही किस्सा सांगण्यासारखा आहे. मी पूर्वी म्हणजे साधारण २५ वर्षां पूर्वी पर्यंत वांग्याची भाजी अजिबात खायची नाही. एकदा माझ्या आजोबा आणि आजी बरोबर सज्जनगडावर जाण्याचा आला. त्या दिवशी दर्शन झाल्या नंतर,आम्ही प्रसादाचे जेवण घेण्यासाठी बसलो, तर काय ? जेवणात भात, वांग्याची भाजी आणि पोळी !! आली का पंचाईत ? माझ्या एका बाजूला आजोबा आणि एका बाजूला आजी बसले होते, आणि पानात काही टाकायचं नाही हा दंडक अंगवळणी पडलेला ! मग काय, खाल्ली भाजी आणि खर सांगते, तेंव्हा पासून वांग्याची भाजी खायला लागले!!
सांगायचं कारण हे की आज वांग्याची रसभाजी केली, छान जमली म्हणून तुमच्या सोबत शेअर केला हा किस्सा. सांगलीची फेमस वांगी मिळाली त्याची भाजी कशी केली तर ही रेसिपी …
३ छोटी वांगी, २ छोटे बटाटे देठ न तोडता, +असे कापे मारून पाण्यात ठेवा.
मसाला करण्यासाठी: १ मोठा कांदा तेलावर brown करून घ्या ,लगेच त्यातच ५ ते ६ लसूण पाकळ्या परतून घ्या , २ सुक्या मिरच्या पण परतून घ्या, १/४ वाटी सुकं खोबरं भाजून घ्या, २ टेबलस्पून तीळ भाजून घ्या, हे सर्व वाटून पेस्ट बनवून, वांग्यात भरून घ्या.
तेल गरम करून,थोडा हिंग, मोहरी, थोडे मेथी दाणे आणि लाल तिखट घाला. त्यात ही वांगी आणि बटाटे सोडून,परतून, घ्या. नंतर पाणी घालून शिजू द्या. थोडी मसाला पेस्ट घाला, पूर्ण शिजले, की त्यात,१ टेबलस्पून गोडा मसाला, किंवा काळा मसाला, २ चमचे तिखट , २ टेबलस्पून गूळ , १ टीस्पून चिंच कोळ ,२ टेबलस्पून दाण्याचे कूट , कोथिंबीर घालुन सर्व्ह करा भाकरी किंवा पोळी सोबत.
ह्यात ओलं खोबरं देखील घालता येते.
आता मस्त वांग्याच्या भाजी पोळीवर ….तोपर्यन्त भेटूयात !!!