Tuesday, 6 May 2014

आला रे आला ---फळांचा राजा ! आंबा महोत्सव सुरु झाला !

'[आंबा पिकतो, रस गळतो,
कोकणचा राजा बाई   झिम्मा खेळतो !!!'

उन्हाळा सुरु झाल्या झाल्या आठवण होते कैऱ्या , आंबा, फणस, ह्या वस्तूंची! मस्त हिरवी गार कैरीची फोड  तिखट, मीठ लावून खायची…… वाह तोंडाला पाणी सुटतच की नाही ?
आणि आंबा  कोणताही चालतो,…   म्हणजे चोखून खायला रायावळा , आमरस करायला पायरी , किंवा  फोडी करून खायला, आणि राजाधिराज,  खरी रसनेची तृप्ती करणारा हापूस आंबा!   वाह वा ! मला स्वतःला हापूस आणि फक्त हापूसच आवडतो  बर का ,  काय असेल ते असो.

पूर्ण मोसमात एकदाच पोटभर हापूस आंबा ,खाल्ला, की मी परत आंब्याकडे बघणार देखील नाही!  ही आपली गम्मत बर का,  कारण पुन्हा दुकानात हापूस आंबा  दिसणार,तो मला खुणावणार, आणि मग मी जादू केल्या सारखी दुकानातून आंबा विकत घेणार , आणि पुन्हा ताव मारून खाणार!!

परवाच गुळांबा  केला आणि दर वर्षी  प्रमाणे, माझ्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या!
आंब्याचा राजा _ हापूस
मामाकडे सुट्टीत रहायला जायचो, तेंव्हा मोठ्या  मामाने आंब्यांची भली मोठी अढी रचलेली असायची ! आणि धाकटा मामा म्हणायचा , ' खा लेको, किती आंबे खाता ते खां!' तेंव्हा ह्या वाक्याचं  खूप हसू यायचं, पण आता उरल्यात फक्त आठवणी!  पण ती आठवण  जरी झाली, तरी मी मनाने त्या वाड्यातल्या  पोहोचते, आणि ती रचलेली अढी मनाने  पाहते, वास  घेते, आणि खाते सुद्धा!! म्हणून असेल कदाचित मला फक्त हापूसच मनापासून आवडतो !

आणि पाठोपाठ आठवतो तो मामीच्या हातचा गुळांबा ! वाह! असा गुळांबा पुन्हा  होणे नाही, खरच !

कच्च्या कैरीचा गुळांबा
 म्हणजे पोहून वगैरे यायचं , आणि मग जेवायला बसायचं… मस्तपैकी गुळांबा  घ्यायचा,वरती भरपूर साजूक तूप ओतायचं,( हो,हो, ओतायचं म्हणजे चक्क ओतायचं  बर !) आणि पोळी बरोबर खायचा हा गुळांबा! म्हणजे पोळीसाठी गुळांबा, का गुळांब्या साठी पोळी, का तुपासाठी गुळांबा, का गुळांब्यासाठी तूप हेच समजेनासं होत!!

 दर वर्षी प्रमाणे ह्याही वर्षी गुळांबा केला,  आणि तो मस्त झाला !   असो, तर ह्या गुळांब्याची ही गोड रेसिपी …

गुळांबा :

१ वाटी कैरीचा कीस पातेलीत घेवून,झाकण न ठेवता ३ ते ४ मिनिटे शिजू द्यायचा ,  नंतर कीस हाताला मऊ  लागला, की त्यात १ १/२ ते २ वाट्या गूळ  घालायचा, नीट  ढवळून पातळ  पाक बनेपर्यंत बारीक gas वर शिजू द्यायचा. ३ ते ४ मिनिटे लागतात. शेवटी २ लवंगा टाकायच्या . पाक भरपूर हवा, घट्टसर पण पळीने वाढता येण्यासारखा  झाला पाहिजे.

कैरीची एक खास चटणी उत्तर भारतात प्रसिद्ध  आहे.

कैरीची चटणी

 ही कैरी चटणी    करण्या साठी, १ वाटी पाणी कढईत  उकळत ठेवावे . त्यात १ टीस्पून आलं   पेस्ट,१ टीस्पून लसूण  पेस्ट, २ सुक्या मिरचीचे  तुकडे,आणि १ वाटी किसलेला कांदा घालावा. थोडे आटल्यावर १ वाटी कैरीचा कीस  शिजू घावे. शेवटी १ tsp  तिखट, १/२ tsp मीठ, २  tsp साखर, १ tsp भाजलेल्या बडीशेपेची पूड, १/२ tsp तळलेल्या मेथी दाण्याची पूड, आणि १/२ tsp विनेगर  घालून gas  बंद करावा . नंतर १/२ tsp  acetic  acid  घालून, नीट  मिक्स करून, प्लेट टेस्ट करून नंतर बाटलीत भरून ठेवावी.
हा आंबा महोत्सव असाच  आणखीन बरेच दिवस चालणार आहे, त्यामुळे नवीन नवीन रेसिपीज येतच राहतील … Enjoy  the mangoes  to your heart's  content !!

No comments:

Post a Comment