बऱ्याच दिवसांच्या खण्डानंतर लिहायला मिळाले.' आंतरजाल ' अहो म्हणजे इंटरनेट सेवेत मध्यंतरी खंड पडला होता, त्यामुळे काही लिहिता आले नाही. पण मग ते ५ ते ६ दिवस फार मजेत गेले हो! मला आधी वाटलं की अरे बापरे आता काय करायचं? पण म्हणतात ना, necessity is the mother of invention तसंच काहीसं झालं बघा!मोबाईलवरती गेम नाही, गूगल नाही,, टॅबलेट, लॅपटॉप, मोबाईल अशी सारी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आवाज न करता, स्वस्थ पडून होती! नाही म्हटलं तरी अधून मधून नजर टाकायचे...वेड्या आशेवर की झालं असेल नेट सुरु तर? एक दोन दिवस खूप बेचैन होते, भानुप्रिया आणि घरात सर्वांनीच आनंद व्यक्त केला! माझा गेम खेळण्याचा वेळ वाचला म्हणून! असो.. करू द्या त्यांना टिंगलटवाळी... पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं म्हणतात ते उगीच नाही!!! पण मग नंतर नंतर नादच सोडून एन्जॉय करायचं ठरवलं! मग काय... मनसोक्त गप्पा मारल्या, मैत्रिणीं सोबत मॉल मध्ये भटकंती केली,खाओपियो... मजा करो! पुस्तकं धूळ खात पडली होती, त्यांवरची धूळ झटकून पुस्तकं वाचून काढली! पण seriously, खूप छान वाटलं काही दिवस इंटरनेट शिवाय काढले ते!
ह्याच दरम्यान हेही लक्षात आले की आपण टेक्नॉलॉजीचा वापर करता करता, त्या टेक्नॉलॉजीच्या किती आहारी गेलो आहोत ते... आत्ता आत्ता मोबाईल आले, ह्या दशकात इतर अनेक संदेशाची साधने आली, दूर गेलेली नाती जवळ येऊ लागली... जवळची नाती आणखीन जवळ आणि घट्ट व्हायला लागली! टपाल कार्ड, चिट्ठी, सर्व काही कालबाह्य झालं, आणि वाट पाहणं संपलं! क्षणात एखादा निरोप, संदेश, फोटो,व्हिडीओ, एखादी मनीची व्यथा, आनंद किंवा मधेच विरंगुळा म्हणून एखादा खुसखुशीत विनोद सर्व काही दुसऱ्या पर्यंत पोहोचतं!
आता प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे, आणि आता तर बोलण्यासाठी पैसे पडणार नाहीत अशी सेवा उपलब्ध होत आहे, मग काय? माणसाला आणखीन काय हवे? आपल्याकडे म्हणजे भारतीयांना तसंही बोलायला आवडतं! म्हणजे माणूस मागतो एक डोळा, देव देतो दोन! तसेच काहीसे झाले आहे! असो, अशी सेवा देणारे खूप प्रगती करोत, सम्पन्न होवोत, आम्हालाही सम्पन्नता येवो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना!
अर्थात अशा व्यत्ययामुळे आर्थिक किंवा इतर काही नुकसान होते, पण ह्या टेक्नॉलॉजीच्या जाळ्यातून सुटका मात्र नाही... जायचा मार्ग आहे, न परतीचा मार्ग तितकासा सुगम्य नाही. पण कधीतरी, थोडा वेळ, काही तास, काही दिवस ह्या उपकरणां पासून मुक्त राहून बघावं हे मात्र नक्की! खूप मजा येते! मन शांत, स्थिर, प्रसन्न करायचा रामबाण उपाय तर आहेच, पण थोडा वेळ स्वतःला शोधण्याची, अंतर्मनाशी संवाद घडण्याची पण सुवर्णसंधी असते!