Wednesday, 5 October 2016

यशस्वी व्यक्तिमत्वाचे निकष कोणते?... २




कित्येक वेळा आपण ज्याला यश म्हणत असतो ते इतरांच्या दृष्टीने अपयश असते. जे सत्ताधीश असतात ते सत्ता मिळवतात आपल्या सुखासाठी. परंतु ही सत्ता आल्यानंतर मात्र, ती हातातून कधी निसटून जाईल ह्या विवंचनेत त्यांची सुखशांती केंव्हाच भांग होते आणि मग शिल्लक राहते ती सत्ता टिकवण्यासाठीची अव्याहत आणि कित्येकदा केविलवाणी धडपड. ज्यांच्याकडे अतिजास्त प्रमाणात सम्पत्ती असते त्यांचे  पण अनेकदा असेच होते. ही सम्पत्ती टिकवण्यासाठी, वाढविण्यासाठी, सतत झटतात, सुखाची व चैनीची साधने निर्माण करतात, पण त्यांचा उपभोग घ्यायला वेळ मात्र मिळत नाही.

अर्थात, सगळायच यशस्वी लोकांच्या बाबतीत असे  होते असे मात्र मुळीच नाही. अनेक मंडळी कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारीचा समतोल राखताना दिसतात. त्याच बरोबर सामाजिक, आर्थिक आघाडीवर देखील यश सम्पादन करतात. वयाने, अनुभवाने सिद्ध झाल्यानंतर अध्यात्मिक दृष्टींनी देखील पुढील पिढीस मार्गदर्शन करतांना दिसतात.  कारण,अध्यात्मिक दृष्टीने यशस्वी होणे म्हणजे वैराग्य पत्करून निघून जाणे नव्हे, तर निःसंग वृत्तीने, विवेकाने, पुढच्यांना ह्याच जगातील त्यांच्या  प्रापंचिक,व्यावसायिक, सामाजिक, आर्थिक आघाड्या सांभाळण्याची शक्ती प्रदान करणे व अनेक नवीन कार्य सिद्धीस नेणे हे होय. यासाठी कालपरत्वे आलेल्या ज्ञानाने, कौशल्याने आणि वय व अनुभवाने जे ऋणानुबंध जोडलेले असतात त्यांचा वापर करून आपल्या स्वत्वाची नवीन ओळख करून आंतरिक समाधान मिळवता येते.

तेंव्हा, ह्या सर्वांचा उहापोह करतांना हे लक्षात येते की यशस्वी व्यक्तिमत्वाचे काही निकष आहेत आणि व्यक्तिमत्वाची पारख ह्या निकषांच्या आधारावर करावी लागेल. यशस्वी व्यक्तिमत्वासाठी त्या व्यक्तीच्या पूर्वायुष्यात घडलेल्या अनेक स्थित्यंतराचा अंदाज घेतल्यास असे दिसते की यशाची परिभाषा, यशाचे मोजमाप हे प्रत्येक वेळेस बदलत असते. मनुष्याच्या अनेक पातळ्यांवर अनेक गरजा असतात.

पहिल्या पातळीवर असतात प्राथमिक गरजा, म्हणजे पुरेसे अन्न, वस्त्र, निवारा आणि शारीरिक सुख. हे सर्व पुरेशा प्रमाणात व योग्य मार्गाने मिळाले की मनुष्य सुखी होतो. या सर्वांसाठी लागणारे आर्थिक बळ माणसाला लाभले की तो यशस्वी म्हणायचा.

नंतरची पातळी आहे ती मानसिक भूक. ही मानसिक भूक भागवली तर मनुष्य सुखी होत, यशस्वी होतो. प्रेम, वात्सल्यभाव, मैत्री इत्यादींची इच्छा पूर्ण होणे हे यशस्वी व्यक्तिमत्व घडणीत महत्वाचे आहे.

ह्या दोन्ही   पातळींवरील सुबत्तेमुळे तो आपली स्वतःची एक ओळख बनवतो आणि समाजात स्वतःचे स्थान बनवतो.


No comments:

Post a Comment