आजपासून मी माझ्या ब्लॉगचे टायटल बदलून,'SPICE N SLICE OF LIFE ' ठेवले आहे. आयुष्यात रोज येणारे नवनवीन विचार, नवीन प्रेरणा, नवीन संकल्प घेऊन रोज काहीतरी लिहायचं असं ठरवलं आणि नवीन सुरुवात केली आहे.
२००४ साली बंगलोरला असतांना माझा एक लेख महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक अंकात छापूनही आला होता, आणि त्याला त्या विषयातलं पाहिलं पारितोषिकही मिळालं होतं. तो लेख मला स्वतःला पण फार आवडतो. आमच्या नाशिकच्या 'गावकरी' वृत्तपत्रात किल्ल्यांवर लिहिला होता तो लेख पण मला फार आवडतो. तर मला वाटलं म्हणून मी तो लेख पुन्हा ह्या ब्लॉगवर टाकत आहे. क्रमशः असेल..
विषय होता 'यशस्वी निकष कोणते?
जगातल्या अनेक सुप्रसिद्ध, ख्यातनाम आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने अनेक पटींनी ऐश्वर्यसम्पन्न अशा व्यक्तींना पहिले की त्यांच्याबद्दल मनात एक अप्रूप निर्माण होते. त्यांच्याबद्दल लिहिलेल्या ,बोललेल्या, व सांगितल्या जाणाऱ्या बातमीवर आपण कान टवकारतो, लक्षपूर्वक वाचतो व मनात साठवतो. ह्या अशा गुणसंपन्न, ऐश्वर्यसम्पन्न व्यक्ती एवढ्या यशस्वी कशा व का होतात? त्यांना पावलापावलावर मिळणारे यश, कौतुक पहिले की आपल्याला पण त्यांच्यासारखेच काही कार्य करून यशस्वी होण्याची इच्छा होते. पण शेवटी यशाचे मोजमाप काय? यशस्वी व्यक्तिमत्वाचे निकष कोणते? हे समजून घेणे आवश्यक आहे.
अनेक मोठ्या क्रांतींचे जनक जे क्रांतिवीर, मोठमोठे राजकीय नेते,प्रतिथयश उद्योजक, खेळाडू, सिने नाट्य जगातील दिग्गज कलावंत या सर्वांच्या आयुष्यात त्यांनी जे उत्तुंग यश मिळवलेले दिसते, ते इतर अनेक गोष्टींचे बलिदान देऊनच. परंतु या यशामागे त्या व्यक्तींनी सोसलेल्या हालअपेष्टा, त्यांनी उमेदवारीच्या काळात सोसलेले टक्केटोणपे, त्यांच्या शत्रूंच्या कटकारस्थानांचे किस्से या सर्वांचा आपल्याला अनेक वेळा विसर पडतो. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय ती गोष्ट प्राप्त होत नाही आणि असे मनोरथ सिद्ध होत असताना त्या व्यक्तींना कधी प्रापंचिक, सामाजिक तर कधी सांपत्तिक त्याग करावा लागतो. शारिरीक सुखविलासांवर देखील पाणी सोडावे लागते, तेंव्हा त्यांना हे मोहवून टाकणारे यश मिळते.
क्रमशः

No comments:
Post a Comment