तिसरी पातळी म्हणजे समाजात मान्यता, प्रतिष्ठा मिळणे. जसजसा मानसन्मान वाढतो तसतसा तो माणूस जास्त प्रतिष्ठित बनत जातो. ह्या सर्व पातळ्यांवर जेंव्हा यश मिळवतो, तेंव्हाच पुढच्या पातळीवर त्याची कसोटी लागते. अध्यात्मिक किंवा पारमार्थिक कल्याण करून घेणे ही चौथी पातळी होय. अशा वेळी मनुष्याची जिज्ञासूवृत्ती जागी होते आणि तो नवनवीन क्षेत्रांची, ज्ञानाची दालने उघडून आपल्या समाधानासाठी रस घेतो तो यशस्वी म्हणता येईल. . अनेक वर्षांच्या सहवासातून जोडलेले ऋणानुबंध जपायचे,नवीन जोडायचे, स्वतःसाठी म्हणून काही गोष्टी करायच्या आणि न वापरलेल्या क्षमतांना पंख देऊन नवीन भरारी घ्यायची . अध्यात्मिक समाधान म्हणजे कित्येकदा वैराग्य स्वीकारून दूर डोंगरावर निघून जाणे वगैरे समजले जाते. पण हे पूर्णपणे सत्य नव्हे. आपले आयुष्य यथार्थपणे जगल्यानंतर कुणावर भार होण्यापेक्षा लहानांना किंवा प्रज्ञावंतांना ओळखून त्यांना ह्याच दुनियेतल्या प्रापंचिक, आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी योग्य मार्गदर्शन करून स्वतः अलिप्तपणे त्यांची भरारी बघणे आणि समाधान मिळवणे ही अध्यात्मिक पातळीवरची यशाची खरी ओळख आहे. असे जो करतो तो यशस्वी होतो. इथेच आपल्या अंतर्मनाचीदेखील ओळख माणसाला होते हे नक्कीच. ह्यातूनच वैराग्यभाव उदयास येतो.
स्वतःशी प्रामाणिक रहाणे, निर्भयतेने निर्णय घेणे व अमलात आणणे आणि माणुसकीचा झरा सदैव मनात वाहता ठेवणे हे महत्वाचे आहे. ह्या सर्वातूनच एक यशस्वी व्यक्तिमत्व उदयाला येते. संवेदनशील मनाने नवनवीन विकल्प शोधून समाधान मिळविणे हीच स्वतःच्या सुखाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.
प्रत्येक पातळीवर आपल्या वाट्याला येत असलेल्या असंख्य संधींमधून योग्य मार्गाने, योग्य संधीचा फायदा घेऊन त्या पातळीवरच्या गरजा भागविण्यासाठी क्षमता असली पाहिजे. प्रापंचिक गरजांपासून अध्यात्मिक गरजांपर्यंत सर्व गरजांना योग्य वेळी, योग्य तेवढेच प्राधान्य देऊन भागवल्या, तर कमीत कमी वेळ आणि कमीत कमी श्रम खर्ची पडतील, आणि इतर काही गोष्टी करायला, काही छंद जोपासायला वेळ मिळेल.
परंतु,जीवनातल्या कोणत्याही पातळीवर जो भगवंताला विसरत नाही, त्याला कधीच अपयश येणार नाही. परंतु, एरवी कधीच भगवंताचे समरण केले नाही आणि मग आयुष्याच्या संध्याकाळी, यातनांमध्ये त्याचे समरण केले तर काय उपयोग? "सौ चुहे खाकर बिल्ली हजको चली", किंवा "करून सवरून दमले, आणि देवपूजेला लागले"असे होऊ नये,ह्यासाठी विवेक हवा आणि तारतम्य हवे.
तेंव्हा, ह्या चारही पातळ्यांवर ज्याने समाधान मिळवले व दिले, सुखाची देवाण_घेवाण पण केली त्यालाच एक 'यशस्वी व्यक्तिमत्व' म्हणता येईल.
। समाप्त।
.

No comments:
Post a Comment