Monday, 3 October 2016

नवरात्रोत्सव... नवरंगांचा!!!



' या देवी सर्वभूतेषु,शक्तिरूपेण संस्थिता।
शांतिरूपेण संस्थिता| बुद्धिरूपेण संस्थिता|
श्रद्धारूपेण संस्थिता| मातृरुपेण  संस्थिता||
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै  नमः ||'
 
नवरात्रीची धामधूम  ,तिसरी माळआजची... देवीचा जागर, गोंधळ, विविध रूपांनी नटलेल्या देवीची, आदिमायेची पूजा होते , रास गरबा खेळून रात्र जागवली जाते,  उत्तरेत अनेक  ठिकाणी' जगराता'  म्हणजे  देवीचा गोंधळ, भजन, कीर्तन असा  रात्रभर जागर होतो.  नऊ दिवसांचे, उठता बसतानाचे असे उपवास करून देवीला प्रसन्न केले जाते. देवीच्या अनेक रूपांत कुणाला कुठले रूप आवडते  कुणाला कुठले! प्रत्येकजण आपल्याला  भावलेल्या  रूपाची यथोचित, यथासांग, यथामति पूजन अर्चन करीत असतो.
रास गरबा

ह्या भक्तीच्या उधळणीत खरे रंग भरले जातात ते गरब्याच्या रंगांनी! रात्र रंगते तसा  गरबा फुलतो! ढोलाच्या तालावर टिपऱ्यांचे ठेके धरीत फेर धरून सुंदर नृत्य करणारी मंडळी बघितली की मन प्रसन्न होतं ! मला मुळीच नाचत येत नाही त्यामुळे मी नेहमीच प्रेक्षक! आर्मी मध्ये देखील इतकी  वर्षे काढली, प्रत्येक कामात पुढे पडणारी माझी पाऊले, डान्स फ्लोर वर जायची वेळ झाली की मात्र मागे  पडायची,आजही तेच आहे! पार्टी मध्ये सगळीकडे गप्पा मारीत फिरणार, ,तंबोला खेळणार, गेम्समध्ये हिरीरीने भाग घेणार, बक्षीसही जिंकणार, पण....  डान्सची वेळ झाली की,हळूहळू व्हेन्यूच्या मागच्या भागाकडे सटकणार!  आपल्याला बघू नये असे बसणार!!!! कशालाही न घाबरणारी, कुठल्याही आव्हानाला न डगमगता सामोरी जाणारी मी.... डान्स म्हटला की अगदी 'भिगी बिल्ली' होते! भानुप्रियानी मला डान्स शिकवण्याचे अनेक असफल प्रयत्न केले, आणि मग नाद सोडून दिला! हसू येत माझं मलाच कधी कधी. पण छान, बहारदार नृत्य सादर झालेलं मला  आवडतं! नाचातल्या खाचाखोचा चांगल्या उमगतात, पण नाच मात्र करू शकत नाही! (इतरांच्या तालावर नाचायला तर मला मुळीच येतही नाही, जमतही नाही, आणि पटत तर मुळीच नाही!) मला ताल, सूर, लयीची ओळख आहे, गाणं ,मला  आवडतं! मी स्वतः पण विरंगुळा म्हणून सतत गाणी म्हणत असतेच, पण कोणत्याही भाषेत एखादे सुमधुर गाणे ऐकायला मिळाले, तर मनाला खूप प्रसन्न वाटतं! पण कोणत्याही कलेचा अवमान केलेला मला रुचत नाही. उगीच आपलं करायचं म्हणून.. हे मला रुचत नाही.

मी आता आमच्या घराजवळ जो  नवरात्रीसाठी मांडव टाकलाय, तिथे बघते ना... दोन  मोठे  गोल फेर असतात.. एका फेरातली माणसं  उजवीकडून डावीकडे आणि दुसऱ्या गोलातली डावीकडून उजवीकडे ... , मुलं , माणसं , बायका येतात, अगदी नटून थटून, सुंदर सुंदर कपडे, मेकअप वगैरे वगैरे.... पण, गरबा कसा खेळायचा?  लोकांनी एकमेकांना टिपऱयांवर ठेका द्यायचा, पुढे जायचं, पुढच्याला टिपरीचा ठेका द्यायचा, पुढे जायचं! गाणी एक्दम ढिनच्यॅक लागलेली असतात, पण ही सर्व मंडळी अगदी हळूहळू, स्लो मोशन मध्ये फिरत असतात... म्हणजे ठेका हा शरीराच्या हालचालीत कुठेच नाही! एकदम संथ! इतकं बोअर होतं  की  काय सांगू! असं तासांच्या  चालतं...  मस्त,ठसकेबाज गरबा कुठेच दिसत नाही. म्हणूनच मघाशी म्हटलं तसं , उगीच आपलं खेळायचं म्हणून खेळायचं, झालं. असो, तर  नवरात्रोत्सव,भक्तीने, आनंदाने जल्लोषाने साजरा करूया...  चला!!!     

No comments:

Post a Comment