Monday, 16 October 2017

01) माझी पहिली परदेश वारी !!!!!





मला वाटतं प्रत्येकाच्या मनात परदेशगमनाची  इच्छा असतेच, नाही? माझ्या पण मनात  होती ,परंतु ती इच्छा इतकीशी प्रबळ नव्हती त्याला अनेक कारणे आहेत. एकतर आर्मीची फिरतीची नोकरी, लष्करच्या भाकऱ्या भाजण्यात ३० वर्ष कशी गेली कळलेच नाही. त्यासोबत तेवढी समज पण नाही आणि आर्थिक तरतुदीचा पण प्रश्न असतोच ना? आणि तेवढी विचारांची पण उसंत नाही मिळाली. पण मनात मात्र असतं  बरं का!

आणि ध्यानीमनी नसतांना अचानक ह्यावर्षी जानेवारी मध्ये  एखाद्या टूर सोबत परदेशवारी करायची असा घाट मनात शिजला आणि विचारांची चक्र वेगाने हलू लागली. मग  माझ्या मनात घर   केलेल्या दोन मुक्कामांचा स्वित्झर्लंड की ऑस्ट्रेलिया असा प्रश्न  होता ,तो ऑस्ट्रेलियावर येऊन थांबला. आता डेस्टिनेशन पक्के झाले होते .... ऑस्ट्रेलिया!!! पण काही कारणाने टूर कंपनी सोबत टूर जमली नाही, आणि अचानक एक विचार मनात येऊन  गेला! ऑस्ट्रेलियाला जायचं, तर मग मामा कडे का जाऊ नये?  झालं, नवीन आयडिया  गवसल्याचा  आनंद झाला, आणि मग त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. पहिले तर मामाला  फोन केला, त्याला सविस्तर माहिती विचारली , तर ते दोघेही एक्दम खुश झाले! आणि खूप वर्षांचे दूर गेलेले नाते अचानक जवळ आले! काही क्षणातच अनेक  वर्षांचा दुरावा मिटला!

वैजू मामी  पूर्वी पण मला आवडायची,आणि तिच्या बरोबरचे माझे ट्युनिंग मस्त होते!आम्ही पुण्यात वाड्यात एकत्र राहत होतो तेंव्हाची गोष्ट आहे, साधारण १९७० च्या जवळपास  ती मोनेंच्या घरात लग्न करून आली तेंव्हा ती किर्लोस्कर मध्ये टेलिफोन ऑपरेटर होती, तेंव्हा तिच्या ऑफिस मध्ये पण मी गेलेली आहे. ती तो मोठा टेलिफोन बोर्ड ऑपरेट करायची ते मी  उत्सुकतेने पहिले आहे, आणि माझ्या मनात त्या आठवणी क्षणात जाग्या झाल्या, अगदी  काल परवा  झाल्या सारख्या ! मामीचे विचार त्याकाळी फार पुरोगामी होते, माझ्या सारखेच! आणि आत्ता  देखील तीच मामी मला  भेटली, तशाच कणखर विचारांची, आणि त्याहूनही कणखर  व्यक्तिमत्वाची! ! ह्या मामीच्या दोन बहिणी , भाऊ सगळे वाड्यात यायचे तेंव्हा आमच्या खूप गप्पा व्हायच्या. शिवाय स्मिता  पाटीलचे  वगैरे off  beat सिनेमे खूप  बघायचो ,त्यावर खूप चर्चा करायचो ,मजा यायची! त्यामुळे, we just started off from where we left ! असे काहीसे झाले!  ह्या मामीसोबत मी वाड्यात एक दोन वर्ष सोबत राहिलेली आहे. मामाला तर लहानपणापासून  ओळखतो. परिणिता झाली तेंव्हा मी  तिच्या सोबत खूप वेळ घालवलाय. मामी तिला अंघोळ घालायची, तयार करायची तेंव्हा मी खूप उत्सुकतेने सर्व  बघायची! मला  आठवतंय, मामी त्याकाळी तिला nivea   क्रीम लावायची, जे खूप महाग होतं ! ती आठवण माझ्या पक्की मनात बसली होती!  त्यानंतर  बाबांसोबत १९७५ ते १९८०  महाराष्ट्रा बाहेर फिरतीवर राहिलो, पण  सुट्टीवर यायचो, तेंव्हा  गप्पा व्हायच्या! मग नंतर ते १९८६ मध्ये ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले, आणि संपर्क तुटला. पण परिणिताच्या  पुण्यात झालेल्या लग्नात सर्व  मंडळी भेटली पण त्यानंतर पुन्हा काही संपर्क  झाला नाही. पण सर्व  खुशाली समजतच होती .त्यामुळे  फार काही फरक नाही पडला .माझे १९८७ मध्ये  लग्न झाले,आणि मग मी पण बाहेर  राहिले, संपर्क राहिला नाही.

तर, त्यादिवशीच्या फोनवरच्या गप्पा म्हणजे  उत्सुकतेने भरलेले क्षण! फोनवर  माझा आवाज ऐकून दोघे  खूप खुश झाले !  खूप वर्षांची गॅप  भरून काढण्यासाठी, अनेक प्राथमिक प्रश्नांची  उत्तरे  मिळवायची होती. त्यामुळे फोनवर चढाओढ होत होती, की तू प्रश्न विचारणार का मी! अशी घाई झाली होती, मामीला, मामाला तिकडे, आणि मला इकडे! मामी तर पहिल्या संभाषणातच मी येणार  आहे असे  धरूनच  उत्सुकतेने बोलत होती. तिच्या उत्सुकतेला आणि बोलण्याला आवर घालणं मला एकदम जड जात होतं , कारण मलाही  तितकीच उत्सुकता होती!  अशा तीन चार कॉल्स नंतर  नॉर्मल बोलायला लागलो, फायनली ! मग अनेक गोष्टींची माहिती करून  घेतली, अनेक  प्रश्नांची उत्तरे घेतली. अनेक formalities , प्रवासासाठी लागणाऱ्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता करून, व्हिसा  अप्लाय करून तो मिळाल्यानंतर मी माझे तिकीट  काढले,आणि ७ मे रोजी मध्यरात्री  मुंबई हुन सिडनी साठी Singapore  Airlines  ने   प्रस्थान केले! आणि ८ तारखेला संध्याकाळी८. ००  वाजता सिडनी एअरपोर्ट वर land!माझा फोन लागत नव्हता, त्यामुळे बराच वेळ टेन्शन होतं,  पण अखेर  मामा  भेटला, आणि  जीवात जीव आला!       


   

Saturday, 22 July 2017

आभार प्रदर्शन...प्रदर्शन?

आजच्या धकाधकीच्या जीवनात वेगवेगळ्या वेळी 'धन्यवाद!', 'thank you!', 'शुक्रिया!' हे आभार प्रदर्शन करणारे शब्द वापरतांना आढळतात. पण बहुतेकवेळा तो एक निर्विकार सोपस्कार झालेला दिसतो. ह्या शब्दांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उच्चारामुळे त्याचा गर्भित अर्थ कुठेतरी हरवून जाऊन फक्त यांत्रिकपणा उरलेला वाटतो. हृदयापासून आलेल्या कृतज्ञतेला 'धन्यवाद' ह्या शब्दातून साकार करणे हे मूळ ध्येयच हरवल्यासारखे झाले आहे, अशी मनातून व्यक्त  झालेली कृतज्ञता क्वचितच अनुभवायला मिळते. अशी कृतज्ञता व्यक्त करण्याची ना आज कुणाला गरज भासते, ना कोणी असा विचार देखील करतो.

खरतर कृतज्ञता ही काही इतर भावनांसारखीच भावना नाहीये, तर त्याहूनही काही जास्त आहे. कृतज्ञता हा एक मुलभूत दृष्टीकोन आहे आणि त्यापेक्षाही जीवन जगण्याची शैलीच मानता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे, सुखी, समृध्द, सकारात्मक आणि निरामय जीवनाची सूत्रीच म्हणता येईल. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या एका अनुभूतीमध्ये प्रेम, जिव्हाळा,दिलासा, आशा, करूणा, विनय, आनंद आणि विश्वास ह्यासारख्या सकारात्मक भावनांचा साक्षात्कार करण्याची शक्ति आहे.  खऱ्या आभार प्रदर्शनातून देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला दोघांनाही निर्मळ आणि अपार आनंदाची अनुभूती होते. अगदी पैशांच्या मोबदल्यात होणाऱ्या सेवांच्य देवाण घेवाणीत देखील, मनापासून दिलेले धन्यवाद हे काही क्षण आनंद आणि उत्साह देऊन जातात, हे अनुभव घेण्याजोगे आहे,
कृतज्ञतेचा दृष्टीकोन ठेवल्याने आपल्याला ह्या भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन जीवनाचा खरा अर्थ गवसायला मदतच होते.

ज्यांचा विचार सुध्दा केला जात नाही, किंवा ज्यांना नेहमी गृहीत धरले जाते, अशा अनेक छोट्या छोटया अशीर्वादांचा साक्षात्कार होतो, तेंव्हा ह्या सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची मनाची तयारी होते. तेंव्हा लक्षात येते की, प्रेमळ जोडीदार, माया करणारे आई_वडील, गुणी अपत्ये, साथ देणारे सोबती , एक यशस्वी आणि समाधानी कारकीर्द अशी वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टीने आशीर्वादांची वेगवेगळी रूपे असतात. पण बहुतेक लोकांना ह्या आशीर्वादांच्या अस्तित्वाचेच भान नसते. ह्यांचे महत्व तेंव्हा कळते जेंव्हा त्याचं लोप होतो, नाश होतो . आणि तेंव्हा खरतर वेळ निघून गेलेली असते, आणि मग खंत उरते ती आपल्या विचारांच्या कोतेपणाची......

तेंव्हा, चांगल्या किंवा वाईट  काळात देखील कुक्ठ्ल्यातरी चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता मनात ठेवली, म्हणजे जीवनात वर्तमानात सुख मिळतेच, शिवाय भूतकाळाचा पश्चात्ताप करावा लागत नाही आणि भविष्याची अनिश्चितता भेडसावत नाही.

मानवी जीवनाचे वरदान मिळाले ह्या भावनेला एक चमत्कार म्हणावा कि त्या निराकार निर्मात्याने ह्या अद् भूत  निर्मितीला दिलेली स्वीकृती म्हणावी, कि त्या अफाट शक्तीला, त्या ब्रह्माला स्मरून तिला शरण  जावे, अशा अनेक भावना व्यक्त करण्यासाठी 'धन्यवाद' हा शब्द गहिरे रंग भरून जातो हे निश्चित!

तेंव्हा आपल्याला मिळालेल्या ह्या जीवनाच्या देणगीबाबत कृतज्ञता व्यक्त करून आयुष्याची परिमाणे बदलतांना पहा आणि आनंद व उत्साह द्विगुणीत करा!