Monday, 16 October 2017

01) माझी पहिली परदेश वारी !!!!!





मला वाटतं प्रत्येकाच्या मनात परदेशगमनाची  इच्छा असतेच, नाही? माझ्या पण मनात  होती ,परंतु ती इच्छा इतकीशी प्रबळ नव्हती त्याला अनेक कारणे आहेत. एकतर आर्मीची फिरतीची नोकरी, लष्करच्या भाकऱ्या भाजण्यात ३० वर्ष कशी गेली कळलेच नाही. त्यासोबत तेवढी समज पण नाही आणि आर्थिक तरतुदीचा पण प्रश्न असतोच ना? आणि तेवढी विचारांची पण उसंत नाही मिळाली. पण मनात मात्र असतं  बरं का!

आणि ध्यानीमनी नसतांना अचानक ह्यावर्षी जानेवारी मध्ये  एखाद्या टूर सोबत परदेशवारी करायची असा घाट मनात शिजला आणि विचारांची चक्र वेगाने हलू लागली. मग  माझ्या मनात घर   केलेल्या दोन मुक्कामांचा स्वित्झर्लंड की ऑस्ट्रेलिया असा प्रश्न  होता ,तो ऑस्ट्रेलियावर येऊन थांबला. आता डेस्टिनेशन पक्के झाले होते .... ऑस्ट्रेलिया!!! पण काही कारणाने टूर कंपनी सोबत टूर जमली नाही, आणि अचानक एक विचार मनात येऊन  गेला! ऑस्ट्रेलियाला जायचं, तर मग मामा कडे का जाऊ नये?  झालं, नवीन आयडिया  गवसल्याचा  आनंद झाला, आणि मग त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली. पहिले तर मामाला  फोन केला, त्याला सविस्तर माहिती विचारली , तर ते दोघेही एक्दम खुश झाले! आणि खूप वर्षांचे दूर गेलेले नाते अचानक जवळ आले! काही क्षणातच अनेक  वर्षांचा दुरावा मिटला!

वैजू मामी  पूर्वी पण मला आवडायची,आणि तिच्या बरोबरचे माझे ट्युनिंग मस्त होते!आम्ही पुण्यात वाड्यात एकत्र राहत होतो तेंव्हाची गोष्ट आहे, साधारण १९७० च्या जवळपास  ती मोनेंच्या घरात लग्न करून आली तेंव्हा ती किर्लोस्कर मध्ये टेलिफोन ऑपरेटर होती, तेंव्हा तिच्या ऑफिस मध्ये पण मी गेलेली आहे. ती तो मोठा टेलिफोन बोर्ड ऑपरेट करायची ते मी  उत्सुकतेने पहिले आहे, आणि माझ्या मनात त्या आठवणी क्षणात जाग्या झाल्या, अगदी  काल परवा  झाल्या सारख्या ! मामीचे विचार त्याकाळी फार पुरोगामी होते, माझ्या सारखेच! आणि आत्ता  देखील तीच मामी मला  भेटली, तशाच कणखर विचारांची, आणि त्याहूनही कणखर  व्यक्तिमत्वाची! ! ह्या मामीच्या दोन बहिणी , भाऊ सगळे वाड्यात यायचे तेंव्हा आमच्या खूप गप्पा व्हायच्या. शिवाय स्मिता  पाटीलचे  वगैरे off  beat सिनेमे खूप  बघायचो ,त्यावर खूप चर्चा करायचो ,मजा यायची! त्यामुळे, we just started off from where we left ! असे काहीसे झाले!  ह्या मामीसोबत मी वाड्यात एक दोन वर्ष सोबत राहिलेली आहे. मामाला तर लहानपणापासून  ओळखतो. परिणिता झाली तेंव्हा मी  तिच्या सोबत खूप वेळ घालवलाय. मामी तिला अंघोळ घालायची, तयार करायची तेंव्हा मी खूप उत्सुकतेने सर्व  बघायची! मला  आठवतंय, मामी त्याकाळी तिला nivea   क्रीम लावायची, जे खूप महाग होतं ! ती आठवण माझ्या पक्की मनात बसली होती!  त्यानंतर  बाबांसोबत १९७५ ते १९८०  महाराष्ट्रा बाहेर फिरतीवर राहिलो, पण  सुट्टीवर यायचो, तेंव्हा  गप्पा व्हायच्या! मग नंतर ते १९८६ मध्ये ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले, आणि संपर्क तुटला. पण परिणिताच्या  पुण्यात झालेल्या लग्नात सर्व  मंडळी भेटली पण त्यानंतर पुन्हा काही संपर्क  झाला नाही. पण सर्व  खुशाली समजतच होती .त्यामुळे  फार काही फरक नाही पडला .माझे १९८७ मध्ये  लग्न झाले,आणि मग मी पण बाहेर  राहिले, संपर्क राहिला नाही.

तर, त्यादिवशीच्या फोनवरच्या गप्पा म्हणजे  उत्सुकतेने भरलेले क्षण! फोनवर  माझा आवाज ऐकून दोघे  खूप खुश झाले !  खूप वर्षांची गॅप  भरून काढण्यासाठी, अनेक प्राथमिक प्रश्नांची  उत्तरे  मिळवायची होती. त्यामुळे फोनवर चढाओढ होत होती, की तू प्रश्न विचारणार का मी! अशी घाई झाली होती, मामीला, मामाला तिकडे, आणि मला इकडे! मामी तर पहिल्या संभाषणातच मी येणार  आहे असे  धरूनच  उत्सुकतेने बोलत होती. तिच्या उत्सुकतेला आणि बोलण्याला आवर घालणं मला एकदम जड जात होतं , कारण मलाही  तितकीच उत्सुकता होती!  अशा तीन चार कॉल्स नंतर  नॉर्मल बोलायला लागलो, फायनली ! मग अनेक गोष्टींची माहिती करून  घेतली, अनेक  प्रश्नांची उत्तरे घेतली. अनेक formalities , प्रवासासाठी लागणाऱ्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता करून, व्हिसा  अप्लाय करून तो मिळाल्यानंतर मी माझे तिकीट  काढले,आणि ७ मे रोजी मध्यरात्री  मुंबई हुन सिडनी साठी Singapore  Airlines  ने   प्रस्थान केले! आणि ८ तारखेला संध्याकाळी८. ००  वाजता सिडनी एअरपोर्ट वर land!माझा फोन लागत नव्हता, त्यामुळे बराच वेळ टेन्शन होतं,  पण अखेर  मामा  भेटला, आणि  जीवात जीव आला!       


   

No comments:

Post a Comment