आजकाल माणसं फार असंवेदनशील व्हायला लागली आहेत खरी... आजच पेपरमध्ये बातमी वाचली... तीर्थक्षेत्री पितरांना दिलेल्या नैवेद्याला काकस्पर्श व्हावा ह्यासाठी लोक काय काय करतील ह्याचा नेम नाही! एका ठिकाणी काकस्पर्श व्हावा ह्यासाठी बराच वेळ मंडळी ताटकळत बसली होती. आणि तिथेच थोड्या अंतरावर एका झाडावरून एक अडकलेला कावळा खाली काढला गेला होता, तो जखमी आणि निष्प्राण अवस्थेत होता. तर हीच मंडळी ते नैवेद्याचे ताट घेऊन तिकडे धावली, कि उपाशी कावळा अन्नाला खाईल तर काकस्पर्श होईल... पण तो कावळा त्या मनःस्थितीतच नव्हता, आणि तेवढी ताकदही त्याच्यात नव्हती. मग मंडळींनी काय शक्कल लढवली बघा हं... कावळ्याची चोच पकडून त्यांनी अन्नाला लावली... काकस्पर्श झाला... मंडळी खुश!
पण कुणी त्या कावळ्याला पाणी दिले नाही, त्याची काळजी केली नाही, फक्त आपला स्वार्थ बघितला...
ह्याच संदर्भातला दुसरा किस्सा असाच... विचार करायला लावणारा..
आजकाल वृक्ष तोडीमुळे आणि नवीन वृक्ष लागवड न झाल्यामुळे, पक्ष्यांची आणि पर्यायाने कावळ्यांची संख्या कमी झाली त्यामुळे काकस्पर्श करून घेण्यासाठी लोकांना अक्षरशः अथक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे काही लोकांनी तोडगा असा काढला काढला की, कावळ्या ऐवजी गाईलाच नैवेद्य दिला!
मग असं वाटतं की आधीच्या बेरहम लोकांपेक्षा ही मंडळी बरीच म्हणायला हवी! निदान कुणाच्या मुखी अन्न लागले तरी...
तर परंपरांचा अवास्तव अट्टाहास सोडून द्यायला हवा ,नवीन विचार हवेत, नवीन कल्पनेतून देखील पितृदान करता येते हे बघितले पाहिजे. साधनांच्या पूर्ती मध्ये न अडकता' साध्य' साधले पाहिजे!
आपल्याला पूर्वजांची आठवण राहिली पाहिजे ह्यासाठी हा संस्कार आहे तर मग काही क्षण स्वस्थ बसून आपल्या आईवडिलांची, इतरेजनांची आठवण काढा, चांगल्या गोष्टी आठवा, त्यांचे जगणे कसे तुमच्या आयुष्यात सुख देऊन गेले हे त्यांच्या पाशी व्यक्त करा, आणि मग बघा, इतर कोणत्याच साधनांची आवश्यकता पडणार नाही... आणि ह्या दिवशी कोणतेही सोपस्कार न करता, पितरांच्या शांतीसाठी दान करावे म्हणजे सर्व काही साध्य होते.. दान म्हणाल, तर दान हे प्रेमळ अंतःकरणाने, पितरांच्या मायेची, त्यांच्या ऋणाची आठवण ठेवून व्हावे आणि मुख्य म्हणजे दान हे सत्पात्री व्हावे ह्याची दक्षता घेतली, तर दान हे पुण्यकारक ठरते.