पितृ पंधरवड्यात आपल्या पूर्वजांना आठवावे, त्यांच्यासाठी काही गोडधोड नैवेद्य अर्पण करावा, त्यांना तृप्त करावे. ह्यामुळे त्यांचे आशीर्वाद द्विगुणित होऊन आपल्या पाठीशी राहतात. त्यांचे ऋण मानावे, त्यांनी एकोप्याने, आनंदाने, एकमताने त्यांच्या लोकी राहावे, आणि आपल्याला इहलोकी समृद्धी, प्रगती, आणि यश द्यावे म्हणून त्यांच्याकडे मागणे मागावे. तसा हा फक्त एक संस्कार असला तरी त्यात फार मोठा अर्थ आहे, तो समजून घेतला तर मग ह्या संस्काराचं महत्व कळतं.
खरं तर आपण आपल्या आई वडिलांचे, पूर्वजांचेच काही काही गुणधर्म आत्मसात करून जन्माला येत असतो. मग त्यात गुण, अवगुण, सर्वकाही आले. पण आपण एक करू शकतो, की ह्या सर्व गोष्टींचे अवलोकन करून, आपल्यातले दुर्गुण थोडे कमी, किंवा नष्ट करून, थोडे सद् गुण अंगीकारण्याचा प्रयत्न तर करूच शकतो. त्यातून आपण आपल्या पुढच्या पिढीला काहीतरी नवीन,चांगले देऊ शकतो.
अनेक वेळा आपण काही काही अंधश्रद्धा बाळगून असतो. पण आता आपल्याला माहित झालंय की ह्या अंधश्रद्धा आहेत, तर मग त्याच पुढे मुलांना पाळायला न सांगता, त्यांना इथेच मोडून टाकू यात, खरं ना? खूप फरक पडतो...' मांजर आडवं गेलं तर...' ह्या शीर्षकाचं पुस्तक नुकतंच वाचण्यात आलंआणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. तसं मी पण बऱ्याच गोष्टी नाही पाळत... शनिवारी नखं कापू नयेत, शनिवारी तेल आणू नये वगैरे वगैरे... आणि एवढे कोण लक्षात ठेवतो हो? असं करीत बसलो,तर आयुष्य ह्यातच निघून जाईल, आणि मनातल्या गोष्टी मनातच राहून जातील.
तेंव्हा माणुसकी आणि नीतिधर्माला अनुसरून आपले काम करावे, आणि निश्चिन्त मनाने, मोकळेपणे जगावे, जगू द्यावे!
No comments:
Post a Comment