खानदेशात मोठ्या प्रमाणावर बैलपोळा साजरा केला जातो. तिथे बैल देव म्हणून त्यांना 'नंदी' म्हणतात. नंदीची पूजा करून त्यांच्याविषयीचा कृतज्ञतापूर्वक असा श्रद्धाभाव व्यक्त केला जातो. या दैवताचे ऋण मान्य केले जाते.
काही अहिराणी भाषेतील ओव्या आहेत, त्या आताच एका लेखात वाचल्या...खूप सुंदर आणि पोळ्याचे नेमके दर्शन घडवणाऱ्या आहेत ह्या ओव्या...
'फूटनं तांबडं तांबडं, ऊन पडनं पिवय पिवय
आज पोया भागना , नंदीस्ले घाल आंघोय' ,... नंदीला पहाटे अंघोळ घालायची
'धवया पिवया वाघ डकारे गल्लीत
भाऊ तुन्ह धवय धन, गोठानं घरात
भाऊ धवय धन तुन्ह, असामानना तारा,
या दैवतेस्नी नही, लागू दिन्हा ऊनवारा'... नंदीच्या ढवळ्या पिवळ्या रंगावरून नावं पडलेले हे नंदी गल्लीत मात्र वाघासारखे असतात. बहीण म्हणते भाऊराया, तुझ्या गोठ्यातले हे' धवल धन' असेच आसमंतातला तारा राहो, ह्या दैवताला कधीही ऊन, वारा, पाऊस न लागो, म्हणजे त्याची तब्येत उत्तम राहो!
'मन्हा धवया पवया, शमी शिंगडे पितयनी
संगे रेशमन दोर, बाशिंग मोरखी आरसानी'..... पोळ्याच्या दिवशी गावाच्या वेशीवर नारळाचे तोरण, आणि नोटांचे तोरण बांधतात. 'पोयना बाजार' भरतो, त्यात बैलांना सजवायची वस्तू मिळतात.. रंग, भिंगाच्या कलाकृती, भरतकाम केलेल्या झूल, नथी, दोर, गोंडे, घुंगुरमाळा, घाट्या , शाम्या अशा वस्तू असतात. त्याचे हे मायमाउलीने केलेले वर्णन!
ह्या दिवशी बैलांची शर्यत पण होते, ज्यात गावच्या पाटलांच्या बैलांचा मान मोठा असतो. पाटलांनी मारुती समोर नारळ वाढवला की 'पोळा फुटला' असे म्हणतात आणि मग मिरवणुकीला सुरुवात होते. पाटलांची बैल पहिले दरवाज्याचे तोरण भेदून पुढे जाणार! 'दरवाजानं तोडतस' असे अहिराणी भाषेत माउली म्हणते''
'सनमान सन, शिजे पोयानं पुरनं,
भाऊना नंदी, फ़ंदी तोडी उना, दरवाजानं तोरन'... पाटलाची लेक कौतुकाने सांगते की हा मानाचा सण, त्यासाठी शिजवले पुरण ... माझ्या भावाचा नंदी भेदिलं तोरण!
पाटलाच्या बैलांचे कोण कौतुक !.. लेक म्हणते..
. 'आयबा पोलीसपाटील, दोधान्ना मौजना,
आठ हजारनी जोडी, साज तिले सोनाचांदीना'...बाप पोलीसपाटील, घरात दूध, अन्नाची काही मोजदाद नाही! आठ हजाराची जोडी त्याला सोन्याचांदीचे दागिने!
बागलाणातील खापरावर शिजवलेल्या सुवासिक खान्देशी पुरणपोळी बैलांना खायला देतात, अंगण सजलेले, बैल सजलेले, गृहलक्ष्मी सजलेली ... अप्रतिम ;अशा ह्या देखण्या सोहळ्याचे वर्णन करतांना माउली म्हणते...
'जोडी उभी आंगन मा, आंगन त्यास्लेच वडे,
लावू कपायी तांदूय, आरतीमा तेज पडे'.... अंगणात उभ्या बैलजोडीला कपाळाला तांदूळ लावते तेंव्हा आरतीचे तेजच वाढते!
गावात जतिभेद न बाळगता बैलांना प्रत्येक घरात ओवाळले जाते, पुरणपोळी दिली जाते. अहिराणी संस्कृतीने ही एकात्मता आजही सांभाळली आहे. मुक्या प्राण्यांसाठी उदात्तता आणि उत्कटता दिसते ती अशी'''
'आज पोयाना सन, खाऊ पोटाले काहीमाही
धवया पवया देव मन्हा, तुम्हले देस पुरणपोयी'
बैलजोडीवर पुत्रवत माया करणारी माउली पुढे म्हणते..
. 'वाज वाज रे मांग भाऊ, नाचू दे रे धवया पवया,
तुन्हा डफडाना जोडले, खुय खुय करे घुंघुरमाया'... ढवळ्या पवळ्याला डफ तुतारीचंता तालावर नाचू दे, तेंव्हा त्यांच्या गळ्यातल्या घुंघुरमाळा खूळ खूळ आवाज करतील, ते कानाला किती गोड वाटते!
आणि शेवटी...
'पोया पोया करू, पोया कुणबीना आसरा
नंदिले ववायाले, सन नही ना दुसरा
देशी देवराया धनसम्पत्ती थोडी थोडी
पायनामा हरी, अंगनी नंदीस्नी जोडी'.... कुणबी लोकांचा खरा आधार असलेल्या ह्या नंदीला ओवाळायचे , आणि देवाकडे मागणे मागायचे, की देवा, धनसम्पत्ती थोडी थोडी दे, पण अंगणी माझ्या बैलजोडी नांदू दे!


No comments:
Post a Comment