Tuesday, 20 September 2016

डाएट आणि मी?????




आजकाल डाएटचे इतके फॅड झाले आहे, आणि इतके स्तोम माजवले जाते, की काही विचारू नका! रकानेच्या रकाने भरून लिहिलं जातं, तेवढंच ते वाचलं जातं, पण प्रत्यक्ष कृती? काहीच नाही... हसू नका , हे सत्य आहे.अनेक   जातात पण किती पाळले जातात ते त्या मंडळींनीच माहित!

पण एक मुद्दा मात्र मला नेहमी पटतो, तो हा की आपल्या पूर्वजांनी जे अन्न खाल्ले, तेच आपल्याला पण पोषक नक्कीच आहे. साधं, सकस, पौष्टिक आणि चौरस आहार हाच  शरीराला, मनाला, बुद्धीला, आत्म्याला, आणि पर्यायाने आपल्या संपूर्ण  जीवनाला तृप्तता देतो.

पण जीभ हा अवयव असा आहे की ज्यामुळे ह्या भूतलावर खवैय्ये कालही  होते,आजही आहेत, आणि येणाऱ्या काळात पण असणार! मी पण त्यातलीच एक खवैय्या! माझ्या मनात सतत खाण्यापिण्याचे विचार, नवीन रेसिपी, असे  फिरत असतात. म्हणजे हे नका समजू की मला दुसरे काही उद्योग नाहीत.. पण खवैय्येगिरी करणं हे माझं  अत्यंत आवडीचं काम आहे. मी कुठेही काही खाल्लं, आणि तो पदार्थ नवीन असो वा जुना, पारंपरिक किंवा इतर प्रांतातला, मला तो नेहमी भुरळ पडतो, आणि त्याचे विश्लेषण करते, जमल्यास रेसिपी विचारून घरी ट्राय करण्याचा प्रयत्न करते जो कधी जमतो कधी फस्तो ... तरी पण माझ्या ज्ञानात भर नक्कीच पडते!

माझं सांगू का काय होतं ? मी घरी जेंव्हा एखादा पदार्थ करते, आणि तो  उत्तम होतो, तेंव्हा मी खुश होते! पण फसला तर मी कधी कधी डिप्रेस होते, नाही असे नाही, पण मग चुकीचे  विश्लेषण आणि पुन्हा कधीतरी तो प्रयत्न करायचा, तेंव्हा हमखास यश मिळते! खास करून केक बनवते तेंव्हा असे होते की केक जर उत्तम, म्हणजे स्पॉंजी, आणि सुंदरसा बेक होऊन बाहेर आला, त्याचे  मनासारखे काप झाले, तर मी त्याकडे समाधानाने बघते, आणि केक डब्यात भरून ठेवते! मला मग तो खायची इच्छाच होत नाही! तो दुसऱ्यांना  खिलवण्यात जाम मजा येते, खरं सांगते! अजबच आहे ना असे होणे? पण माझे असेच होते खरे... हेच केक बिघडला, तर पुढे बरेच दिवस तो माझ्या समोर फिरत राहतो, डिवचत राहतो.. मग पुन्हा विश्लेषण, पुन्हा प्रयत्न.... पण त्या आधी बिघडलेल्या केक मधून नवीन काहीतरी पुडिंग तयार करते! मग हीच नवीन डिश माझ्या रेसिपी बुक मध्ये घाईघाईने लिहून ठेवली जाते. मग एखादे दिवशी, चांगल्या जमलेल्या केकचे हेच पुडिंग बनवून खातो आम्ही दोघी! भानू आणि मी!

 

No comments:

Post a Comment