Wednesday, 31 August 2016

बैलपोळा...बळीराजाच्या बैलजोडीचा मानाचा दिवस!

बैल पोळा

बैल पोळा च्या सणाचे महत्व शहरातल्या मंडळींना फारसे कळणार नाही, कारण तिथे शेतकरी नाही. मलाही काही वर्षां पूर्वी पर्यंत ह्या सणाचे खरे रूप कळले नव्हते. पण इथे अवतीभवती अशी वस्ती आहे की जे शेतकरी वर्गाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या शेतात प्राणी भरपूर! बैल, गाई, म्हशी, डुकरं, कोंबड्या, कुत्री मांजरी, कधी कधी गाढव, घोडे देखील! ह्या मंडळींच्या घरी बैलपोळा सण साजरा होतांना दिसतो आणि त्याचे महत्व पण कळते.

कधी कधी आपण पालक म्हणून मुलांना एक्दम म्हणून जातो बघा , 'बैल आहेस नुसता' म्हणजे थोडक्यात मठ्ठ, उनाड, बिनकामाचा, बेअक्कल वगैरे वगैरे... पण ज्याने बैल आणि त्याचे योगदान जवळून बघितले किंवा माहित करून घेतले तर तो मात्र असे म्हणणार नाही. म्हणजे मुळात आपल्या मुलाला बैल किंवा कोणताही अपशब्द वापरणे म्हणजे त्याच्या ह्या गुणांची अंशतः जबाबदारी आपलीच असल्याचे मान्य  करण्यासारखे आहे ना? हे  कळलं तर मग कधीही आपण अपशब्द बोलणार नाही  हे नक्की!

तर सांगायचं मुद्दा हा की बैल हा फार मेहनती,  न डगमगता तासांच्या तास कष्ट करणारा प्राणी आहे. कधी आजारी पडला तर शेतकऱ्याच्या जीवाची दैना होते, जीव थोडा थोडा होतो,काम थांबून जाते, पण जेंव्हा बैल  तंदुरुस्त असतो तेंव्हा शेतकऱ्याच्या गळ्यातला ताईत असतो! ह्याच्यावर सर्व शेतीची कामे अवलंबून असतात. त्यामुळेच तो शेतकऱ्याचा मित्र असतो.लाडाने  ढवळ्या पवळ्या, सरजू बिरजू काळू  बाळू, शिरप्या हणम्या आणि आणखीन अशाच छान नावांनी संबोधल्या जाणाऱ्या अशा बहुमोल मित्राचे आभार मानायचा दिवस म्हणजे बैलपोळा!

मग ह्या मित्रासाठी काय करतात? सकाळी बैलाच्या जोडीची पूजा  करतात,त्यांना  ओवाळतात,  पुरणपोळीचा नैवेद्य देतात. त्याला  आराम असतो  ह्या  दिवशी...त्याचा मनाचा दिवस असतो तो! मग संध्याकाळी त्याला छान सजवून मिरवणूक काढतात...रंगबिरंगी  झूल, गळ्यात रंगीत माळा, शिंगांना रंगरंगोटी करून पायात घुंगरू, रंगीत धाग्याचे तोडे, आणि कपाळी  कुंकवाचा टिळा अशी ही बैलांची जोडी ढोल ताशांच्या गजरात गावात फिरून येते, आणि विश्रांतीनंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने, हा शेतकऱ्याचा मित्र कामाला लागतो!





       

No comments:

Post a Comment