Thursday, 19 October 2017

8) CANBERRA...


ऑस्ट्रेलियाची राजधानी Canberra ला गेले होते मामासोबत. मामाचे एक मित्र पण बरोबर होते. ते पण इंडियाहून आपल्या मुलाकडे आले होते. खूप मस्त ड्राईव्ह होता हा सिडनी ते कॅनबेरा! ३ तास ड्राइव्हिंग केले मामानी आणि परत यायचे ३ तास! त्याला चांगलेच दमायला झाले , पण काय करता? तर, कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी असल्यामुळे त्या शहराचा बाजच वेगळा!
Parliament House,  Canberra
! आम्ही तिकडे Parliament House  बघायला गेलो. किती सुंदर, शानदार इमारत,वाह! एका ठिकाणी सम्पूर्ण सेक्युरिटी चेक झाला, आणि आम्ही त्या  भव्य वास्तूत प्रवेश  करते झालो. बिल्डिंग मध्ये शिरल्यावर, अनेक जुन्या नव्या नेत्यांच्या फोटोंचे दर्शन झाले. काही नावं  वाचलेली असतात, काही बघितलेले चेहरे असतात तर  काही नव्याने माहित पडतात.  थोडक्यात, ऑस्ट्रलियाचा इतिहास समोर आला. ते सर्व बघत, तिथली व्यवस्था बघत, जिन्याने वरच्या मजल्यावर गेलो. तिथे एका काउंटरवर जवळच्या  सर्व वस्तू जमा केल्या, टोकन घेतलं, आणि त्यांच्या लोकसभेच्या gallery मध्ये बसलो. अनेक मंडळी बसलेली  होती.  काही टुरिस्ट वाटतं होते, काही पत्रकार, काही स्थानिक आणि ऑस्ट्रेलियाचे बाहेरून आलेले नागरिक. सर्वांसाठी वेगवेगळे नियम. असो. तिथे  जाऊन बसलो, तेंव्हा त्यांचे सेशन सुरु झालेले होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आपापली बाजू मांडत होते, चर्चा करीत होते, विरोध देखील दर्शवत होते..रोजगाराच्या प्रश्नावर चर्चा चालू होती. . पण आश्चर्य म्हणजे, सगळे इतक्या हळू आवाजात बोलत होते, असं  वाटावं कि गप्पा तर नाही मारत आहेत? कुठे आदळआपट नाही, जोरजोरात शिव्या नाहीत, टेबल आपटणे, खुर्च्या  मोडणे, माईक हातातून फेकून देणे, स्पीकरच्या टेबलापाशी गोंधळ घालणे, ह्यातले काहीच काहीच नाही!(हशा!)visitor  gallery  उंचावर असल्यामुळे, खाली बघतांना एखादे Shakespeare चे नाटकच बघतोय की काय असे वाटतं होते! एक यादगार चीज होती ही भेट! १ तासाभराने आम्ही उठून बाहेर आलो. मग, त्यांच्या तिथे असलेल्या souvenir shop मध्ये जाऊन काही खरेदी केली, आणि पुढे निघालो.शहरातून जात असतांना लक्षात आले की इकडे election आहे. पण सगळीकडे शुकशुकाट....???? ट्रक भरून माणसं इकडनं तिकडे नाहीत, भोपु वरती मोठ्या आवाजात प्रचार, 'ताई, माई, अक्का...विचार करा पक्का..!' असलं काहीच नाही! प्रचार सभा नाहीत, एकमेकांवर गलिच्छ आरोप नाहीत, घोषणा नाहीत, कूच नाही! रेडिओ, टीव्ही आणि प्रसार माध्यमातून जो प्रचार करता येईल तो करायचा. किती शांततापूर्ण निवडनुका... छे.. छे... आपल्याला नाही बुआ  करमलं (हशा)


Blue mountains म्हणून एक पर्यटन स्थळ आहे. तिकडे गेलो आम्ही तिघे. अरेबापरे! जबरदस्त थंडी! कापरं भरलं हो! 'वऱ्हाड  निघालंय लंडनला' मधल्या डायलॉगची आठवण झाली ना...' हिवं भरलं, कांबळं काढा ! 'गार झोंबणारं वारं होतं सगळीकडे! अंगात कोट, टोपी सगळं होतं तरी  थंडी वाटत होती, पण मजा येत होती! माझी तर थंडीची सर्व हौस फिटली बाप्पा!
तर तिथे 'थ्री सिस्टिर्स' नावाचे स्थान आहे. तिथे एका शेजारी एक असे तीन पर्वत आहेत. तर आख्यायिका अशी आहे की, अनेक युगांपूर्वी, इथे तीन बहिणी एकाच राजपुत्रावर प्रेम करू लागल्याने राजपुत्राला प्रश्न पडला की कुणासोबत लग्न करावे? म्हणून त्याने त्या तिघी बहिणींना तिथेच उभे राहायला सांगितले आणि मी येतो म्हणून निघून गेला,तो  अद्याप  परत न आल्यामुळे ह्या तिघीजणी त्याची आजही वाट  पहात  उभ्या आहेत. ह्या पॉइंटला 'Echo Point' म्हणतात. 

Cockington Green  House म्हणून एक पर्यटन स्थळ  आहे. आतमध्ये गेल्यावरती सुंदर सुंदर छोटेखानी वास्तू दिसायला लागतात. म्हणजे आपल्याकडे कसा किल्ला करतात, तिथे छोट्या छोट्या इमारती, माणसं, देखावे बनवतो ना, अगदी तसंच!
COCKINGTON GREEN HOUSE
आता इथे दिसतात अनेक पुरातन  वास्तू, आणि त्याचसोबत नव्या युगातल्या वास्तू. म्हणजे  वेगवेगळ्या देशातल्या घरांचे, तिथल्या प्रमुख आणि प्रसिद्ध वास्तूंचे miniatures  इथे बघायला मिळतात.


आपल्या देशाची कोणती प्रातिनिधिक वास्तू बघायला मिळते आहे ह्याची जाम उत्सुकता होती... आणि मग मला आपला   झेंडा दिसला, आणि पाठोपाठ भारताचे नाव झळकले, आणि माझ्या समोर छोटेखानी लाल किल्ला उभा राहिला !छान वाटलं!
मी सगळं बघत होते आणि अचंबित होत होते हो! इतकं detailing, इतके सुबक आणि रेखीव काम, वाह! मजा आली! फोटो  काढले,पण ते सौंदर्य कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ शकत  नाही ह्याची खात्री पटली! हा अनुभव मला ऑस्ट्रेलिया मध्ये प्रत्येक वेळी आलाय बरं ! आपण डोळ्याने जे सौंदर्य बघतोय ते आपल्या कॅमेऱ्याच्या डोळ्याने कितपत टिपले जाईल ह्याची नेहमी शंका यावी इतके सर्व सुंदर होते!

कॅनबेरा मध्ये War Memorial आहे, पण वेळेअभावी आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही ह्याची थोडी रुखरुख वाटली, पण मनाने त्या सर्व शहीद जवानांना मानवंदना देऊन पुढे निघालो, कारण  देश कोणताही असो, त्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा वीर योद्धा हा कुठेही मानवंदनेचा अधिकारी असतो!

आणि अशा तऱ्हेने एका सुंदर दिवसाला आठवणींच्या शिदोरीत घेऊन घरी आले!       

Wednesday, 18 October 2017

03) शिष्टाचार आणि बांधिलकी

 मामीने छान गरम गरम जेवण तयार ठेवले होते. गवारीची भाजी होती. मस्त गप्पा मारत मारत जेवण केले. प्रत्येकाला काय बोलू काय विचारू असे झाले होते. खूप गम्मत  येत होती !दोघांना वाटलं मला जेटलॅग होईल, मी दमले  असेन  वगैरे, पण मी अगदी छान होते! नो जेटलॅग अँड ऑल ! मला पण हे नवलच वाटलं असो. नंतर मध्य रात्रीपर्यंत दोघी गप्पा मारत होतो. शेवटी मामीला सकाळी ६ वाजता कामाला निघायचं असल्यामुळे झोपलो दोघी.

माझी रूम खूप छान होती. थंडी होती त्यामुळे हीटर होता, आणि जाडजूड रजई होती! मग काय महाराजा! अशी झोप लागली! वाह!

सकाळी लवकर जाग आली, आणि मामाला  आश्चर्य वाटलं. पण मी उठले, आणि मामानी मला मस्तपैकी चहा करून दिला! उकळत, आणि गरमगरम!इंडियन श्टाईल !  त्यानंतर फ्रेश होऊन, पुढच्या itienary साठी बोलले . तर मामा म्हणला  आज मी तुला सिडनी च्या फेमस ऑपेरा हाऊसला नेणार आणि हार्बर ब्रिज  बघायचे!

ब्रेकफास्ट करून ९ वाजता बाहेर पडलो. कारनी रेल्वे स्टेशनवर गेलो. रेल्वेस्टेशन म्हणजे काय महाराजा! स्वच्छ, टापटीप... शिस्तबद्ध  काम सर्व...  छोटे स्टेशन, पण व्यवस्था चोख! इथे रेल्वे, बस साठी एक कार्ड आहे opal card. ते माझ्यासाठी विकत घेतलं. नो formalities ... नुसते कार्ड घ्यायचे, त्यात डॉलर टॉपअप करायचे आणि झाले! ते प्रत्येक स्टेशनवर किंवा बस स्टॅन्ड वर आत जायच्या आधीच स्वाईप करायचे, ट्रेन/बस मध्ये बसायचे. उतरून स्टेशनच्या बाहेर आले की  परत तिथे स्वाईप करायचे, झाले !म्हणजे तुमच्या प्रवासाचे पैसे त्यातून वजा झाले!

मी एकटीने  संपूर्ण सिडनी रेल्वेने फिरले पुढचा दीड महिना. मेलबर्नला पण माझ्या ४ दिवसांच्या मुक्कामात बसने, रेल्वेने फिरले एकटी. तिथली रेल्वेची  यंत्रणा,व्यवस्था, काय वर्णन करायचे? बघितल्या शिवाय कळायचे नाही मी जे सांगत्ये ते, अशी परिस्थिती आहे. स्टेशन छोटे, पण सगळीकडे स्वच्छ. सुव्यवस्था. टॉयलेट स्वच्छ. टॉयलेट हे वासाने नाही तर पाटीने कळते. (हसू येईल, पण तिथली वस्तुस्थिती आहे ती)बसायला बेंचेस ती पण स्वच्छ! लोक येतात, कुणी काही खात असतात, कॉफी पीत  असतात, पण सगळा  कचरा पेटीत टाकणार. पण कचरापेटीचा, कचऱ्याचा कुठेही कधीही वास आला नाही, की येत नाही! त्यामुळे कचरापेटी ही वासाने नाही, तर दिसणाऱ्या मोठ्या डस्टबीनमुळे कळते.! ट्रेनचे टाईमटेबल स्क्रीनवर दिसत असते. सिडनीमध्ये अनेक स्टेशन आहेत, suburbs म्हणतात तसे. प्रत्येक suburb ला  एक स्टेशन. जास्तीत जास्त ३ प्लॅटफॉर्म. फक्त townhall  किंवा central अशा मोठा वर्दळीच्या suburbs मध्ये ६ प्लॅटफॉर्म. कारण ह्या दोन ठिकाणी मुंबईसारखे वातावरण असते.आणि इथून सम्पूर्ण सिडनीच्या  कनेक्टेड ट्रेन्स जातात. सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस, सरकारी ऑफिसेस, खाजगी कम्पनीचे ऑफिसेस असे व्यावसायिक वातावरण तिकडे असते. सगळी लोकं  घाईघाईने कुठेतरी जात असतात नाहीतर कुठूनतरी येत असतात. आणि ट्रेन पकडायची घाई  असते.पण  मुंबईसारखे वातावरण असले, तरी मुंबईसारखे बकालपण, ट्रेनला लटकणे , घाम, घाण वास, उबग आणणारे भिकारी, स्टेशनवर झोपलेली माणसे, टॉयलेटचा मंद(!) सुगंध... yuk ,उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते,ह्यातले काहीकाही नाही.. त्यामुळे पण चुकल्यासारखे होते.(हसू येतेच ) असो. इतर सर्व suburbs मध्ये   ३ प्लॅटफॉर्म . तर सांगत काय होते, येणाऱ्या गाडीची मिनिटे दाखववलेली असतात, त्या आणि तेव्हढ्या मिनिटातच ट्रेन स्टेशनमध्ये दाखल होते. खूप नवल आहे हे  आपल्यासाठी. म्हणजे ३ मिनिटांनी ट्रेन येणार असेल तर, दीड  मिनिट असतांना ट्रेन स्टेशनमध्ये येऊन थांबते, लोकांना चढण्या उतरण्यासाठी उरलेला वेळ. आणि गाडी हलते. क्या precision! वंडरफुल!

बरं,  ट्रेन चा दरवाजा प्रशस्त, मोठा! त्यातून महिला आपल्या बाळाला घेऊन pram सकट ट्रेन किंवा बसमध्ये   चढतात, उतरतात. बसमध्ये पण एक जागा pram साठी मोकळी असते. ह्या महिलां व्यतिरिक्त  विकलांग, अंध, ज्येष्ठ नागरिक, pregnant महिला इत्यादी मंडळींसाठी समोरच्या ९ राखीव सीट्स.बसमध्ये पण पुढच्या सीट राखीव असतात. त्यावर शक्यतो कुणी बसत नाही. आणि कुणी ह्यापैकी आले, तर सीट खाली करून देतात! हुज्जत नाही घालत, कारण तिथे कायदाच इतका कडक आणि शिक्षा इतकी जबरी, की तेवढेच पुरेसे आहे. आणि  त्यामुळे सर्व लोकांमध्ये अपनेआपच एक जागरूक नागरिक वसलेला आहे.
सुजाण नागरिक काय करतो हे तिथे आजूबाजूला  बघितले  की कळते.एक किस्सा सांगते...

मी मेलबर्न मधल्या २ दिवसांच्या 'hop on , hop  off ' बस टूर दरम्यान एकदा बसच्या मागच्या दरवाज्याने चढले..(आपल्या भारतातली सवय हो...काय करता...झाली चूक!) तसं , ड्रायव्हरने मला बोलावले," yes  lady , why did you get in from that  door ? मी त्यांना लगेच सॉरी म्हटलं, पण त्याची नाराजी स्पष्ट होती.  कारण कुणी नियमाचे उल्लंघन केले तर  कर्मचाऱ्याला जाब विचारला जातो,  त्याला जबाबदार धरले जाते  ,passenger ला नाही! तर नियम म्हणजे नियम, त्यात compromise नाही! बिशाद आहे, पुन्हा अशी चूक माझ्याकडून झाली!

 एकदा एक महिला कर्मचारी होत्या,ट्रेनमध्ये चढल्या. अंध होत्या त्यामुळे त्यांच्या सोबत एक लॅब्रॅडॉर guide डॉग होता. त्या चढल्या, बसल्या. त्यांचा लॅब तिथे पायाशी बसून राहिला. गडबड नाही, उगाचच इकडे तिकडे वास घे, कुणाला चाव, काही नाही. जसे त्यांचे स्टेशन आले, त्यांनी त्याची साखळी थोडी ओढली, come on  म्हणल्या, तसा  तो डॉग उठला, आणि त्यांच्या पुढे निघाला. त्या त्याला फॉलो करून उतरल्या, पुढे गेल्या. झालं ! मी तर दंग  झाले  हे बघून!

 तिथे म्हातारी किंवा वयस्क माणसं , महिला असो की पुरुष, सोबत एक strolley घेऊन फिरतांना दिसतात. म्हणजे छोटीशी ट्रॉली, त्याला एक शॉपिंग बॅग attach असते. ही स्ट्रॉली ते  मॉल,किंवा कुठेही नेतात. आरामात सामान  ठेवता येते, चढ़ता उतरतांना सोपे जाते.


 बसमध्ये चढतांना हेच opal कार्ड स्वाईप करायचे, उतरतांना स्वाईप करायचे, तुमचे भाडे त्यातून वजा झाले!  किती सुटसुटीत काम! कंडक्टर  नको,सुट्या पैशांचे वाद नकोत, भांडणतंटे, हाणामाऱ्या नकोत काही नको. छान, आरामदायी, शांतपणाने  प्रवास. पुन्हा ड्राइव्हर किती विनम्र! आपण जर प्रश्न विचारला, तर आपल्याला नीट गोड बोलून उत्तर देणार,गडबड   नाही, घाई नाही," ओ , चला ना, कशाला वेळ घालवताय?" "आम्हाला उशीर होतोय ना डाइव्हर" असले कोणतेही dialogue ऐकू येणार नाहीत. passenger अतिशय शांत असतात. बस थांबल्यावरच उतरता येते. पुढच्या दरवाज्याने चढायचे, मागच्या दरवाज्याने उतरायचे! आणि हो, उतरतांना  सगळे लोकं , शाळकरी मूलं , कॉलेजची मुलं, म्हातारी माणसं, इतर मंडळी सर्व जण ड्रायव्हरला सराईतपणे  "थँक यु " म्हणत खाली उतरतात.आणि सगळे लोक उतरेपर्यंत ड्राइव्हर शांतपणे बसून असतो. कुठे कटकट नाही,   ',अहो, उतरा न पटपट ' असले असभय बोलणे नाही. ह्याला आणखीन एक कारण असे की, जर कर्मचाऱ्या विरुध्द्व कोणतीही तक्रार आली, तर त्याची योग्य ती दाखल घेतली जाते. 'कन्झ्युमर इज किंग' हे तिथले व्यापारी तत्व आहे .दुसरे तत्व म्हणजे' सर्व्हिस विथ अ स्माईल' तर राजा असलेल्या ग्राहकाला विनम्रभावाने आणि स्मितवदानाने सेवा पुरवायची तरच तो पुन्हा आपल्याकडे येईल , आणि तो आलाच पाहिजे हा त्यामागचा कार्यकारण भाव.

आणखीन एक गोष्ट मी अनुभवली ती म्हणजे लोकंआवाजाच्या  अतिशय कमी पट्टीत बोलतात. म्हणजे ट्रेन किंवा बसमध्ये लोक भरपूर असतात, बोलत पण असतात, हास्यविनोद पण करीत असतात, मुलं शाळा कॉलेजची गडबड करतात, बोलतात, पण  बहुतेकांचीआवाजाची पट्टी कमी असते. एक दोनदा मी ट्रेनमध्ये बघितलं, जे मोठ्यांदा फोनवर बोलतात, लांबलांब गप्पा हाकताना ऐकू येतं , ते इंडियन असतात! इथले लोक देखील कायम फोनवर बोलत असतात पण आवाज कमी! अर्थात काही अपवाद असतातच...म्हणजे काही महिला एकदम  gregarious किंवा मोठ्यांदा हसणाऱ्या असतात, पुरुष देखील एक्दम दिलखुलास असतात ते पण मोठ्यांदा बोलतात, हसतात. किंवा बोलघेवड्या मंडळींचा ग्रुप असतो, त्यांचे पण आवाज येतात. तसं मजा वाटते. पण एकूण हळूच बोलतात बहुतेक. त्यामुळे आवाजाचे प्रदूषण नाही, गाड्या उत्तम ठेवतात त्यामुळे हवेचे प्रदूषण नाही. ट्रेन, बसचे आवाज नाहीत, मेंटेनन्स उत्तम त्यामुळे खडखडाट नाही, सारे कसे बिनबोभाट चाललेले असते. बरं , सिडनी शहर एक्दम टुरिस्ट स्पॉट. त्यात कमर्शियल कॅपिटल. तरीसुद्धा सारे कसे लख्ख!

कुठल्याही दुकानात गेलात तर तिथले कर्मचारी तत्परतेने आपल्याला भेटतात. म्हणजे दुकानात शिरतानांच एक छोटीशी बेल सारखी बीप वाजते. दुकानातले गृहस्थ किंवा दुकानदार महिला तुमच्याकडे  बघणार,हसून तुम्हाला wish करणार.. hello ,how  are you ?  what can I  do for you ? किंवा hello ,good morning ! नंतर तुम्ही खरेदी केली की, बिल भरून रिसीट देतांना पुन्हा हसून, thank you , have a  good day ! किंवा have a nice weekend , किंवा enjoy your afternoon असे काहीतरी समर्पक म्हणणार! किती छान वाटतं हा अनुभव घेतांना! आणि असं एकदा नाही, दोनदा नाही, तर रोज आणि येणाऱ्या प्रत्येक कस्टमरसाठी !मी विचार करून बघितलं, स्वतःला त्या काउंटरवरच्या व्यक्तीच्या जागी बसून पाहिलं, आणि लक्षात आलं, किती अवघड आहे हे करणं ... तेच करू जाणोत... बरं , सगळीकडे कार्ड पेमेंट अगदी १ डॉलर बिल झाले  कुरकुर नाही, सुटे  नाहीत वगैरे काही नाही. १०० डॉलरची नोट द्या आणि १ डॉलर बिल असेल, तरी ९९ डॉलर न कुरकुरता परत देणारा हा कर्मचारीवर्ग ..धन्य आहे त्यांची! पुन्हा वरतून म्हणणार thank you , welcome '! अशी आहे सामाजिक बांधिलकी आणि सोबत शिष्टाचार !      

07 ) My 'Mother's Day' Gift!

परिणिता कडे  पहिल्यांदा गेले, तेंव्हा उत्सुकता खूप होती, कारण मी परिणिताला new born baby पाहिलं होतं! त्यावेळी वाड्यात मामी तिला घेऊन वरच्या त्यांच्या खोलीत तिला तयार करायची ते सगळं मी बघायची, मजा यायची! मला चांगलंच आठवतंय त्या काळी  मामी तिला nivea cream लावायची!. आणि मजा म्हणजे भानुप्रियाला पण मी nivea च वापरत होते त्यामुळे nivea बघितलं की आजही तीच आठवण होते, तेंव्हा पण हीच आठवण व्हायची! म्हणजे ही   मामा_ मामी ची जोडी माझ्या आठवणीत कायम आहे असे म्हटले तरी  चालेल! मामा बटाटेवड्यासाठी आठवणीत राहिला, आणि मामीचे माझे ट्युनिंग काही वेगळेच आणि मस्त होते. आणि आजही ऑस्ट्रेलियाला जायचा निर्णय घेतांना  तेच जुने, पण  थोडे काळाचे  पडलेले अंतर विसरून जाण्याची क्षमता असलेले नाते मला उपयोगी ठरले हे नक्की! मला हा महत्वाचा निर्णय   घेतांना, तिला contact करतांना एकदाही कोणताही संकोच वाटला  नाही, किंवा , शंका, धाकधूक वाटली नाही. We started from where left off! ह्या उक्तीप्रमाणेच!

तर, परिणिताकडे गेलो,दारातच राज आमचे स्वागत करण्यासाठी  उभे होते!त्यांना भेटून आनंद वाटला !अतिशय मनमिळाऊआणि शांत स्वभावाचे वाटले राज. त्यांना भेटून आनंद झाला.,राज नामांकित कंपनीत वरिष्ठ हुद्द्यावर काम करतात, खूप आंतरराष्ट्रीय फिरतीवर असतात. मग घरात येऊन परिणिता भेटली, गळाभेट घेतली,आणि   न राहवल्यामुळे तिला ही आठवण सांगितली. १९८५ तो २०१७... एवढा कालावधी एका सेकंदात दूर झाला! विरघळून गेला!,मग तिच्या दोघी मुलींना भेटले... Reyva आणि Lara! मोठी रेवा हुशार, पण  थोडी अबोल. पण नंतर  बोलली माझ्याशी. धाकटी लारा खूपच वेगळी. गप्पिष्ट, गोड, लाघवी आणि अगदी बालसुलभ निरागसतेने भरलेली! पण एकदम चुणचुणीत बरं का... आधी परिणितानी मला तिचं संपूर्ण घर दाखवलं...खूप  छान,सुंदर,अद्यावत , प्रशस्त घर, पुढे बगीचा! नंतर लारा आली आणि मला  म्हणाली,"Come, I will show you my house " मग रेवाची रूम  दाखवली,म्हणाली 'this is Reyva's room . She does all boring stuff '(????) त्याचं कारण रेवा वाचन वगैरे करते जे हिला अजिबात आवडत नाही! म्हणून तिची रूम बोरिंग!(हा..हा) मग पुढे गेली आणि म्हणाली,. 'This is my mom and dad's room. Thats also boring' आणि नाक मुरडलं. मला खूप हसायला आलं. मग स्वतःच्या रूम मध्ये घेऊन गेली, आणि म्हणते कशी.. 'See., this is MY room!  Isn't it nice?  मग मी पण  तिला म्हणाले, 'Yes off course, Your room is the BEST!' त्यानंतर तिला विशेष आवडणारी अशी आजी आजोबांची बेसमेंटमधली रूम  दाखवली.
  त्यानंतर वरती तिची एक play area आहे तिथे आम्ही बसलो. तिनं  सगळी खेळणी दाखवली, सर्व barbie dolls ची नावं सांगितली, मग आम्ही दोघी खूप खेळलो.

एकीकडे  राज आमच्यासाठी चहा करीत होते, तर लारानी मला विचारलं,  'Shall I make something for you to eat ?' मला खूप आश्चर्य वाटलं..  खूप हसू पण आलं, आणि कौतुक पण वाटलं. तिनं तिच्या वडिलांच्या मदतीनं टोस्ट बनवला, त्यावर सॉस, बटर लावलं, आणि डिशमध्ये आणून टेबलवर मला आणून दिलं!
आणि हो, त्या दिवशी Mother's Day होता! आणि मी तिला मनापासून, आनंदाने 'थँक्स!' म्हटलं. आणि परिणिताला म्हणाले,'Lara has made this Mother 's day very special for me !'
Sweet little LARA!

त्यानंतर एकदोनदा परिणिताकडे गेले. लाराच्या play school मध्ये पण गेले होते, तिथे पण अनीशच्या शाळेत   आली तशी मजा आली! खुप सारी मुलं मुली, खेळणी, सुसज्ज क्लासरूम, प्रशिक्षित, हसतमुख टीचर्स! मुलांचे बालपण सुखी आणि समृद्ध करण्यासाठी शाळेत हे सर्व असायलाच  हवे,नाही का?

परिणिता पण नवनवीन पदार्थ  बनवते,त्यामुळे तिच्याशी ह्याबाबत पण टिप्सची  देवाणघेवाण झाली, मजा आली तिनं chicken pie बनवलं होतं ..अप्रतिम!. एका ट्रिप मध्ये परिणिता  सोबत लंच साठी एका Pub मध्ये गेलो..मी,.मामा आणि  परिणिता. मी पहिल्यांदाच pub मध्ये गेले होते, त्यामुळे खूप उत्सुकता होती. .पण खूप छान retro feel होता. जुन्या हॉललीवूडच्या सिनेमातला फील येत होता. एकदम मस्त! टेबलावर विराजमान झाल्यावर अवतीभवती नजर फिरवली...समोर मोठ्या स्क्रीनवर रेसेस चालू होत्या त्याचा लोकं आपल्या ड्रिंक्स आणि जेवणासोबत आनंद घेत होते. सुसज्ज bar, सुंदर,टापटीप महिला waitress  बघून,,,मुझे तो बिन पियेही नशा चढ गया था! !मग एका उत्तम ड्रिंक सोबत saffron risotto , crispy squids असा चविष्ट पदार्थांचा समाचार घेऊन,आणखीन एक बहारदार आठवण घेऊन घरी परत आले! शेवटचे दोन दिवस परिणिता मामीकडे राहायला आली होती, तिथे पण गप्पा झाल्या.

ह्याच दिवशी मी नंतर Paddy's Market  मध्ये गेले होते. सर्व चायनीज वस्तूंचे मार्केट.  वस्तू...स्वस्त आणि मस्त! मोबाईल, accessories, shoes, कपडे, ड्रायफ्रूट्स, knick  knacks, mementos, souveniers, सर्वकाही स्वस्त! तिथे passion fruit pulp घातलेला उसाचा रस प्यायले!
sugarcane juice with passion fruit
खूपच टेस्टी! उसाच्या रसात आलं लिंबू घालून आपण सगळीकडे पितोच... नाही म्हणायला पंजाब चंडीगढ मध्ये पुदिना आणि लिंबू घालून उसाचा रस प्यायले होते. पण तिथे इतकी  variation होती, काय सांगू? सर्व बाजार ह्या मंडळींनी गजबजलेला आहे.  सगळीकडे हे असतात, आणि त्यांच्याच वस्तू लोकांना आवडतात, परवडतात, आणि म्हणून त्यांची विक्री पण भरपूर होते... असो.

 एकदा मॉल मध्ये फिरत होते, तेंव्हा तिथे राजमा सारख्या धान्याचं बनलेलं Miso soup 'विकायला होतं .. २ डॉलरला एक बाऊल. मी घेतलं, प्यायले, इतकं टेस्टी, वाह! त्यांनी त्याच दिवशी ते सूप introduce केलं होतं असं तिथल्या salesgirl नी  सांगितले!  तर सांगत  काय होते, भरपूर शॉपिंग केली आणि खाऊन पिऊन घरी आले!

सिडनी फिश मार्केट मध्ये गेले होते.मोठी प्रशस्त एरिया आहे. तिथे छोट्या बोटींतून फिश येते आणि बाहेर पण जाते. तर हे डॉकयार्ड वेगळं. दुसरीकडे सिडनी मधेच होलसेलने फिश जाते  ते वेगळे मार्केट तिथेच.

आणि आणखीन एक एरिया जिथे छोटी छोटी restaurants होती तिथे  फक्त तयार सीफूडच्या डिशेस खायला लोकं येतात. तिथे पण ताजे फिश ठेवलेले होते.... my God ! इथेही अप्रतिम फिश, प्रॉन्स, squids, crab, lobster, scallops आणि अशा असंख्य व्हरायटी! अरे बापरे... काय खाऊ आणि काय नको असं झालं होतं!
scallops
तिथे  शक्य होतं तेवढं खाऊन, डोळ्यांचं, पोटाचं आणि मनाचं समाधान करून बाहेर पडले. सर्व आठवणींना  मनात कैद केले आहे, पाहिजे तेंव्हा आठवून फ्रेश होता येईल!



    

06) Party ..... Sharty! Dance! Dance!!!

 एक दिवस मामीच्या भिशी पार्टीला जायला मिळालं! अरे बापरे, इकडे आल्यावर तर विसरूनच गेले ऑस्ट्रेलिया आहे हे! सगळ्या मैत्रिणी भारी! अगदी पुण्यात, मुंबईत आल्यासारखा भास झाला..एकतर मराठीत बोलत होत्या सगळ्या.. .त्याच दिलखुलास गप्पा,catching up with news , gossip et all सगळ्याजणी मस्त मजेत हास्यविनोदात दंग होत्या! खूप छान वाटलं मला!  snacks, eatables सर्वकाही झकास बेत!
शिवाय मला एक गाणं पण म्हणायला लावलं मामीनं !' जरा हॉले हॉले चलो मोरे साजना' म्हटलं, आणि सगळ्यांना आवडलं! मला पण आनंद झालाच की! त्याचं झालं असं की, कारमध्ये  मला मामीने गाणं म्हणतांना ऐकलं, तिला खूप कौतुक वाटलं. तिला माझं गाणं आवडलं, म्हणून तिथे मला गायला सांगितलं! तर, मी छान गाणं म्हणते हे इकडे कुणाला फारसं माहित नसलं, तरी तिकडे मात्र, थोडक्या वेळात माणसांच्या हुनरची कदर करणारी मंडळी भेटली! असो...


असंच  मामीच्या एका मैत्रिणीच्या जुळ्या मुलींच्या बर्थडे पार्टीला पण जाण्याचा योग्य आला.संध्याकाळची पार्टी होती. venue वर पोहोचलो. छान सेट अप होता. हळू हळू पार्टी रंगात आली...
.DJ म्युझिक, लहानग्यांचे  खेळ,गाणी, मनोरंजनाचे सर्व सामान होते,  बच्चे कम्पनी खुश! बर्थडे गर्ल्स नटून, थटून मस्त गोड दिसत होत्या. त्यांना   wish करून, टेबलवर बसलो, आणि एक एक मस्त मस्त पदार्थ येऊ  लागले. खूप स्वादिष्ट जेवण होते. मटण, चिकन, फिश, पनीर, सगळं काही होतं. तिथेच बसलो असतांना समोरच बसलेल्या Miss  tracy ह्यांच्याशी ओळख झाली. त्या ballet dance शिकवतात, आणि ह्या दोन्ही मुली त्यांच्याकडे डान्स शिकायला  येतात  असे म्हणाल्या. मला खूप उत्सुकता होती ballet बद्दल म्हणून  त्यांना मी विचारलं, तर त्यांनी मला त्यांच्या क्लासमध्ये यायला सांगितलं, आणि मला  फार आनंद झाला! त्यांच्या क्लासमध्ये अडीच  वर्षांच्या मुलीं पासून तर मोठ्या मुलीं  पर्यंत प्रत्येक  age group साठी वेगळा क्लास चालतो. मी तिथे गेले, आणि एक एक करून batches च्या मुली येत होत्या,डान्स करीत   होत्या.. किती सुंदर वाटतं होतं ते सगळं!
Miss Tracy's Ballet Class
छोट्या मुलींच्या सेशनमध्ये तर फार मजा आली,कारण त्यांचा   निरागसपणा असतो ना, तो त्यांच्या पदन्यासात उतरतो. खूप मजा आली! तिथे मी बघितलं,मुलींच्या आई फार उत्साही असतातच , पण पुरुष मंडळी पण काही कमी उत्साही  नसतात! तिथे येतात तेच मुळी एक बच्चा pram मध्ये आणि दुसरी मोठी मुलगी क्लासला... मग आधी हाय! हॅलो! होतं, आणि त्या Miss Tracy वयाने मोठ्या आणि इतक्या गोड, लाघवी आणि अतिशय मन मिळाऊ... म्हणजे ballet dancer आणि teacher   जशी असावी तशाच  होत्या! तर मग प्रत्येकाला जसं येणार तसे wish करणार, मग त्या मुलींच्या आई  त्यांना स्पेशल ballet dance साठीचे असणारे विशेष  कपडे  घालून तयार करणार, की त्या मुली पुढे जाऊन ready! मग म्युझिक सुरु व्हायचं, सर्वांचा डान्स सुरु व्हायचा! ballet dance म्हणजे शरीराच्या  लयबद्ध, सुबक, आणि नाजूक हालचालींनी व्यक्त होणे! अनेक नृत्य प्रकार पहिले होते, पण बॅले नव्हता पाहिला.  खूप गोडवा आणि Grace आहे ह्या डान्स फॉर्म मध्ये!

तिथे पण मी काही महिलांशी बोलले, मजा आली. म्हणजे एक जाणवलं, कि आईची आपल्या मुलांबाबतीतली उत्सुकता, अधीरता, काळजी, आणि त्यांच्यासाठी धडपड सगळीकडे सारखीच असते!
 प्रत्येक आईला वाटतं असतं आपल्या मुलाने चांगले काही शिकावे, त्याच्या कला गुणांना वाव मिळावा, तो उत्तम  
 नागरिक, आणि एक चांगला माणूस आणि आधी म्हटल्या प्रमाणे पुरुषांचे देखील तसेच काहीसे असते, फक्त  महिला जास्त शब्दात बोलून दाखवतात, तर पुरुष मंडळी आपल्या भावना फारशा व्यक्त करीत नाहीत. पण एकदोन बाबा लोकांशी पण बोलले. त्यांनी पण माझी चौकशी केली, आणि इंडियाहून आले आहे, एकटी सगळीकडे फिरते आहे ह्याचे त्यांना  फार कौतुक वाटले. ऑस्ट्रेलिया कसे वाटले असेही  ते  विचारात होते. इंडियाबद्दल पण विचारात होते. असे सगळे चालले दिवसभर! मी सकाळी ९ वाजता तिथे गेलेली, संध्याकाळी ६ वाजता बाहेर पडले, कारण त्यांचे क्लास संपले म्हणून! (हशा) निघतांना माझ्या नवीन मैत्रिणीचे, tracy चे आभार   मानले त्या संपूर्ण अनुभवासाठी! त्यांच्याकडे मिळालेला आनंद बहुमोल होता!


    

05) भजन, पूजन...आणि भोजन!

मामा आणि मामीनी सिडनी मधल्या वेंकटेश्वर मंदिरात  पूजा  केली त्या दिवशी मंदिर बघीतलं. छान सोयी केलेल्या आहेत .खाली  एक मंगल  कार्यालय आहे, मीटिंग  हॉल आहे, आणि वरती पायऱ्या चढून गेलं की देवीचं सुंदर मंदिर आहे. छान,सुंदर, प्रशस्त परिसर आहे. अगदी मन प्रसन्न होतं!

आजूबाजूला अनेक मंडळींची  लगबग चालू होती. कुणी लग्नासाठी आले होते, कुणी देवदर्शनासाठी.महिलांचे, पुरुषांचे, लहानग्यांचे  पोषाख बघितले, दागदागिने आणि एकूणच ambience बघून  ऑस्ट्रेलियात आहे हेच क्षणभर विसरून गेले. सगळीकडे अगदी पारंपारिकतेचे दर्शन! कुणी नवीन गाडी  पूजेसाठी आणली होती, कुणी नव्या सूनबाईंसोबत देवीच्या दर्शनाला जय्य्त तयारीनिशी आले होते!
इकडे मंदिरात वाद्यवृंद बसून भजन, अभंग म्हणत होते.... अतिशय   प्रसन्न वातावरण !इकडे आमच्या पूजेची जय्य्त तयारी होती. होमाची तयारी जय्य्त! भटजी  तयार!
मग पूजा, होम असे सर्व विधी झाले, पूजा छान झाली. त्यानंतर प्रसाद  घेऊन, शेजारी असलेल्या फूड कोर्ट मध्ये गेलो. डोसा सांबर असा पोटभर ब्रेकफास्ट कम जेवण करून घरी गेलो.

इकडे   मामीच्या कामाच्या ठिकाणी bondai beach ह्या suburb मध्ये Nalini's म्हणून एक रेस्टॉरंट आहे जे साऊथ इंडियन फूडसाठी प्रसिद्ध आहे. तिथे dosa wraps खाल्ले! म्हणजे डोसा आपलाच, त्यामधले fillings इटालियन, इंग्लिश वगैरे.डोसा wrap सारखा प्रेसेंट करायचा!   fusion dosa. शिवाय त्यांच्याकडे आयुर्वेदिक herbs वापरून काही पदार्थ तयार केले   जातात, जे तिथली लोकं आवडीने खातात! एक आयटम होता Turmeric Latte  आपण जे हळदीचं दूध पितो तेच दूध !आणि त्याची किंमत अव्वा च्या सव्वा हो!असो, तर खूप कौतुकानं खाल्लं, आणि निघालो.

Parametta  suburb  मध्ये  एक दिवशी मामा मला घेऊन गेला होता पावभाजी खायला.. ऑस्ट्रेलियात जाऊन पावभाजी? गुड, मग दोघं  निघालो. तिथली एक संपूर्ण स्ट्रीट इंडियन फूडच्या दुकानांनी सज्ज आहे. काके दा ढाबा, ताज स्वीट्स, इंडियन स्टोअर्स, इंडियन ड्रेसेस वगैरे सर्वकाही विकणारे आहेत. तिथे इंडियन फूड पण मिळते.पावभाजी खाल्ली, त्यानंतर मी सर्व दुकानांतून फिरले, बघितलं, मजा वाटली. कारण तिथे बरेच भारतीय लोकं फिरत  होते,खास करून ज्येष्ठ नागरिक. एकदम  विसरून जायला झालं आपण ऑस्ट्रेलियात आहोत  ते! किराणाच्या दुकानात गेले, आणि तिथे इंडियन लोकं अगदी इंडियात जसं वागतात, तसंच वागतांना पहिले आणि समाधान(?) वाटलं ...   आणखीन पण एक दोनदा इंडियन स्टोर्स मध्ये गेले होते.  सगळे सामान मिळते, त्यामुळे आपल्याकडचे पदार्थ करायला  प्रॉब्लेम नाहीये. अगदी तोंडली, पडवळ, गवारी वगैरे भाज्या फ्रोझन का होईना, पण मिळतात!     
  

04) My first Outing in Sydney!

सेंट्रल रेल्वे स्टेशनवर उतरल्याबरोबर समोर काचेतून ऑपेरा हाऊस दिसले!
हार्बर ब्रिज दिसला! wonderful sight !  तिथे जाऊन समोर ऑपेरा हाऊसची सुंदर वास्तू दिसली! आणि बाजूला हार्बर ब्रिज! सगळ्यात पहिले काय आठवले माहितंय ? शाळेच्या पुस्तकातले ऑपेरा हाऊस चे चित्र!
ते आज प्रत्यक्षात पहाते आहे! खूप खुश झाले! समोर एक मोठी बोट डॉक केलेली होती... इतक्या जवळून एवढी मोठी बोट कधीच बघितली नव्हती. सूर्यप्रकाशाने चमकणारे स्वच्छ, नितळ पाणी, पाण्यात अनेक छोट्या मोठ्या बोटी, लाँच आणि सगळीकडे माणसं! दिल खुश हो गया! हार्बर ब्रिजवर सगळ्यात वरती चढून जाता  येते,हार्नेस लावावे लागते,सगळ्या सिक्युरिटी अरेंजमेंट्स नीट असतात. २५० डॉलर्स मध्ये a sight of sydney from the top!  Highrises, skyscapers and clear blue sky!

सेल्फी काढून झाली,फोटो काढून झाला, ऑपेरा हाऊस  पाहून झाले, आणि मोहरा खाण्याकडे वळवला! TLC चॅनेलवर खूप साऱ्या गोष्टी पहिल्या होत्या, अनेक देश, अनेक खाद्यपदार्थ पहिले होते. मनातून होतं  की कधीतरी हे सगळं  अनुभवायला,खायला मिळेल! तर हिच ती वेळ, आणि हाच तो क्षण! kiosk सगळे स्वच्छ, टापटीप! तिथले कर्मचारी हसतमुख! सेवा तत्पर! आणखीन काय पाहिजे माणसाला? म्हणून टुरिस्ट खुश असतात  देशांमध्ये फिरायला.कारण,  लूटमार नाही, दगाबाजी नाही. सर्व व्यवहार रोखठोक! no  ambiguity of any sort. तर तिथे माझ्या नजरेला पहिले नाव दिसले ते fish n chips! नंतर Seafood Salad खाल्लं ! मला माझ्या Hay Day च्या गेममधल्या प्रतिमा आठवायला लागल्या! त्यातले पण खूप सारे पदार्थ इकडे खाल्ले!  आणि पोट भरून Fish n chips खाल्ले! तृप्त झाले! I was delighted will be an understatement!

There are people everywhere, in cafes, on roads, enjoying themselves with drinks and food,making merry, taking selfies, and photos to take back happy memories home! Each person is different from another, but still uou can see friendships, families, romance...everything here!No one is bothered about anything else.Everybody dresses to his own liking. No body is judgemental about the other. 'To each his own" that's the mantra of life. They all seemed to be a part of the larger universe! There are others who are out and about for work, rushing with their slingbags, talking hurriedly over their mobiles, may be fixing some appointments, or trying to catch up with one, on the way!  You can see that everybody is busy earning a living to lead a life of fulfillment, content and happiness!

घरी आले तर अनिरुद्ध आणि अनिश आलेले होते आणि त्याने मस्त, चमचमीत बटर चिकन आणले होते घरून करून! तो तर काय chef  आहे, त्यामुळे मला  फार आनंद झाला, त्याचे सर्वात महत्वाचे  कारण म्हणजे, मला काही रेसिपीज  शिकायच्या होत्या, त्या तो मला शिकवणार होता! मामानी इडली सांबारचा बेत केला होता, कारण मामा मामी व्हेजिटेरियन आहेत ना! अनिरुद्धनी चहा केला होता, तो पिणार, इतक्यात मामाने माझ्यासाठी रेड वाईन आणली ग्लासमध्ये... मग काय दोन्ही  आलटून पालटून  प्यायले. ( आर्मीतली सवय कामाला आली आणि काय?) Very funny , but enjoyed it all the same!इडली सांबर उत्तम झाले होते, चिकन तर लाजवाब!crossaint with  butter chicken अँड इडली सांबर... fussion food !


अनिश फार गोड आणि हुशार मुलगा! आधी हॅन्डशेक केला. अनिरुद्ध म्हणाला, She is hema आत्या  she has come from India ,wish her . तर अनीशने चक्क मला हात जोडून नमस्कार केला, आणि थोड्या accent ने नमस्ते! म्हणाला. खूप कौतुक वाटलं त्याचं! मग दोंघांशी गप्पा मारल्या, खूप,मजा  आली! चैत्राली भेटली. भरपूर खाणे  झाले,झाले, गप्पा झाल्या!झाल्या!  



Tuesday, 17 October 2017

02) इमिग्रेशन पार... मामाच्या गावा आगमन!!



'झुकुझुकू आगीनगाडी. धुरांच्या रेषा हवेत काढी....
पळती झाडे पाहूया..... मामाच्या गावाला जाऊया....!' तर झुकगाडीने नाही तर चक्क विमानाने मामाच्या गावाला आले! अगदी हीच कविता आठवली मला तिथे एअरपोर्टवर!
एअरपोर्टवर उतरल्यावर इमिग्रेशन साठी खूप चेकिंग वगैरे होते ह्याबाबत खुपसारे दडपण होते, पण सुदैवाने तीन फ्लाईट एकदम land झाल्यामुळे जवळपास  १५०० लोक एकदम आल्यामुळे लवकर चेकिंग झाले, आणि जुजबी प्रश्न विचारून, पटकन क्लीअर केले. पण जेंव्हा इमिग्रेशन ऑफिसरकडे उभी होते, तेंव्हा माझ्या फॉर्ममध्ये मामाचा पूर्ण पत्ता नव्ह्ता, त्यामुळे त्यांनी विचारले, तेंव्हा मी सांगितले की पत्ता तर पूर्ण नाहीये, पण तो revesby ह्या suburb मध्ये राहतो एवढे माहित आहे. तर त्यांनी मला क्लीअर करून पुढे पाठवले. मग पुढे प्रश्न हा आला की माझा फोन चालत नव्हता. मग मामाशी आता बोलायचं कस? कारण तो बाहेर माझी वाट पाहत असणार. मग मी त्याच ऑफिसरना हा प्रश्न विचारला. त्यांनी मला बाहेर टेलिफोन kiosk वर तुम्हाला मदत मिळू शकेल असे सांगितले आणि मला एकदम हायसे झाले! मग समान घेऊन बाहेर लॉबी मध्ये आले, तर लगेच kiosk दिसला. तिथे ज्या महिला कर्मचारी होत्या, त्यांनी तत्काळ मला मदत केली, माझे फोन नंबर लावून , माझा मामीशी संपर्क करून दिला! मला ह्या कर्तव्यतत्परतेचे फार नवल वाटले, आणि आनंदही झाला, कारण परक्या देशात, अडनाड वेळी, इतक्या टेन्शन मध्ये असतांना तत्परतेने मदत मिळण किती आवश्यक असत हे तिथे त्या परिस्थितीत अडकलेला माणूसच सांगू शकतो! तर माझा मामीशी फोनवर लगेच संपर्क झाला, आणि तिने तसे  मामाला एअर पोर्टवर फोन करून सांगितले.
आणि काही मिनिटातच मामा मला दिसला! जसा पूर्वी होता तसाच! फक्त थोडं वय दिसत होतं इतकच! त्याला काय आनंद झाला सांगू? मग काही वेळाने कॉफी पीत, थोड्या गप्पा मारल्या, जरा warmup झालो, थोडे tuning वर आलो, आणि मग त्याच्याबरोबर गाडीतून घरी गेले. आम्ही एक तासाच्या प्रवासानंतर  जवळजवळ ९.०० वाजता घरी पोहोचलो. मामी दारातच भेटली! तिला पण काय आनंद! दोघींनी गळाभेट घेतली, आनंद व्यक्त करत दारातच उभ्या! मग भानावर आलो, आणि घरात आलो सगळे.
मामी आणि मी!