ऑस्ट्रेलियाची राजधानी Canberra ला गेले होते मामासोबत. मामाचे एक मित्र पण बरोबर होते. ते पण इंडियाहून आपल्या मुलाकडे आले होते. खूप मस्त ड्राईव्ह होता हा सिडनी ते कॅनबेरा! ३ तास ड्राइव्हिंग केले मामानी आणि परत यायचे ३ तास! त्याला चांगलेच दमायला झाले , पण काय करता? तर, कॅनबेरा ही ऑस्ट्रेलियाची राजधानी असल्यामुळे त्या शहराचा बाजच वेगळा!
 |
| Parliament House, Canberra |
! आम्ही तिकडे Parliament House बघायला गेलो. किती सुंदर, शानदार इमारत,वाह! एका ठिकाणी सम्पूर्ण सेक्युरिटी चेक झाला, आणि आम्ही त्या भव्य वास्तूत प्रवेश करते झालो. बिल्डिंग मध्ये शिरल्यावर, अनेक जुन्या नव्या नेत्यांच्या फोटोंचे दर्शन झाले. काही नावं वाचलेली असतात, काही बघितलेले चेहरे असतात तर काही नव्याने माहित पडतात. थोडक्यात, ऑस्ट्रलियाचा इतिहास समोर आला. ते सर्व बघत, तिथली व्यवस्था बघत, जिन्याने वरच्या मजल्यावर गेलो. तिथे एका काउंटरवर जवळच्या सर्व वस्तू जमा केल्या, टोकन घेतलं, आणि त्यांच्या लोकसभेच्या gallery मध्ये बसलो. अनेक मंडळी बसलेली होती. काही टुरिस्ट वाटतं होते, काही पत्रकार, काही स्थानिक आणि ऑस्ट्रेलियाचे बाहेरून आलेले नागरिक. सर्वांसाठी वेगवेगळे नियम. असो. तिथे जाऊन बसलो, तेंव्हा त्यांचे सेशन सुरु झालेले होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आपापली बाजू मांडत होते, चर्चा करीत होते, विरोध देखील दर्शवत होते..रोजगाराच्या प्रश्नावर चर्चा चालू होती. . पण आश्चर्य म्हणजे, सगळे इतक्या हळू आवाजात बोलत होते, असं वाटावं कि गप्पा तर नाही मारत आहेत? कुठे आदळआपट नाही, जोरजोरात शिव्या नाहीत, टेबल आपटणे, खुर्च्या मोडणे, माईक हातातून फेकून देणे, स्पीकरच्या टेबलापाशी गोंधळ घालणे, ह्यातले काहीच काहीच नाही!(हशा!)visitor gallery उंचावर असल्यामुळे, खाली बघतांना एखादे Shakespeare चे नाटकच बघतोय की काय असे वाटतं होते! एक यादगार चीज होती ही भेट! १ तासाभराने आम्ही उठून बाहेर आलो. मग, त्यांच्या तिथे असलेल्या souvenir shop मध्ये जाऊन काही खरेदी केली, आणि पुढे निघालो.शहरातून जात असतांना लक्षात आले की इकडे election आहे. पण सगळीकडे शुकशुकाट....???? ट्रक भरून माणसं इकडनं तिकडे नाहीत, भोपु वरती मोठ्या आवाजात प्रचार, 'ताई, माई, अक्का...विचार करा पक्का..!' असलं काहीच नाही! प्रचार सभा नाहीत, एकमेकांवर गलिच्छ आरोप नाहीत, घोषणा नाहीत, कूच नाही! रेडिओ, टीव्ही आणि प्रसार माध्यमातून जो प्रचार करता येईल तो करायचा. किती शांततापूर्ण निवडनुका... छे.. छे... आपल्याला नाही बुआ करमलं (हशा)
Blue mountains म्हणून एक पर्यटन स्थळ आहे. तिकडे गेलो आम्ही तिघे.
अरेबापरे! जबरदस्त थंडी! कापरं भरलं हो! 'वऱ्हाड निघालंय लंडनला' मधल्या
डायलॉगची आठवण झाली ना...' हिवं भरलं, कांबळं काढा ! 'गार झोंबणारं वारं
होतं सगळीकडे! अंगात कोट, टोपी सगळं होतं तरी थंडी वाटत होती, पण मजा येत
होती! माझी तर थंडीची सर्व हौस फिटली बाप्पा!
तर तिथे 'थ्री सिस्टिर्स'
नावाचे स्थान आहे. तिथे एका शेजारी एक असे तीन पर्वत आहेत. तर आख्यायिका
अशी आहे की, अनेक युगांपूर्वी, इथे तीन बहिणी एकाच राजपुत्रावर प्रेम करू
लागल्याने राजपुत्राला प्रश्न पडला की कुणासोबत लग्न करावे? म्हणून त्याने
त्या तिघी बहिणींना तिथेच उभे राहायला सांगितले आणि मी येतो म्हणून निघून
गेला,तो अद्याप परत न आल्यामुळे ह्या तिघीजणी त्याची आजही वाट पहात
उभ्या आहेत. ह्या पॉइंटला 'Echo Point' म्हणतात.
Cockington Green House म्हणून एक पर्यटन स्थळ आहे. आतमध्ये गेल्यावरती सुंदर सुंदर छोटेखानी वास्तू दिसायला लागतात. म्हणजे आपल्याकडे कसा किल्ला करतात, तिथे छोट्या छोट्या इमारती, माणसं, देखावे बनवतो ना, अगदी तसंच!
 |
| COCKINGTON GREEN HOUSE |
आता इथे दिसतात अनेक पुरातन वास्तू, आणि त्याचसोबत नव्या युगातल्या वास्तू. म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या घरांचे, तिथल्या प्रमुख आणि प्रसिद्ध वास्तूंचे miniatures इथे बघायला मिळतात.
आपल्या देशाची कोणती प्रातिनिधिक वास्तू बघायला मिळते आहे ह्याची जाम उत्सुकता होती... आणि मग मला आपला झेंडा दिसला, आणि पाठोपाठ भारताचे नाव झळकले, आणि माझ्या समोर छोटेखानी लाल किल्ला उभा राहिला !छान वाटलं!
मी सगळं बघत होते आणि अचंबित होत होते हो! इतकं detailing, इतके सुबक आणि रेखीव काम, वाह! मजा आली! फोटो काढले,पण ते सौंदर्य कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ शकत नाही ह्याची खात्री पटली! हा अनुभव मला ऑस्ट्रेलिया मध्ये प्रत्येक वेळी आलाय बरं ! आपण डोळ्याने जे सौंदर्य बघतोय ते आपल्या कॅमेऱ्याच्या डोळ्याने कितपत टिपले जाईल ह्याची नेहमी शंका यावी इतके सर्व सुंदर होते!
कॅनबेरा मध्ये War Memorial आहे, पण वेळेअभावी आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही ह्याची थोडी रुखरुख वाटली, पण मनाने त्या सर्व शहीद जवानांना मानवंदना देऊन पुढे निघालो, कारण देश कोणताही असो, त्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारा वीर योद्धा हा कुठेही मानवंदनेचा अधिकारी असतो!
आणि अशा तऱ्हेने एका सुंदर दिवसाला आठवणींच्या शिदोरीत घेऊन घरी आले!
No comments:
Post a Comment