Wednesday, 18 October 2017

03) शिष्टाचार आणि बांधिलकी

 मामीने छान गरम गरम जेवण तयार ठेवले होते. गवारीची भाजी होती. मस्त गप्पा मारत मारत जेवण केले. प्रत्येकाला काय बोलू काय विचारू असे झाले होते. खूप गम्मत  येत होती !दोघांना वाटलं मला जेटलॅग होईल, मी दमले  असेन  वगैरे, पण मी अगदी छान होते! नो जेटलॅग अँड ऑल ! मला पण हे नवलच वाटलं असो. नंतर मध्य रात्रीपर्यंत दोघी गप्पा मारत होतो. शेवटी मामीला सकाळी ६ वाजता कामाला निघायचं असल्यामुळे झोपलो दोघी.

माझी रूम खूप छान होती. थंडी होती त्यामुळे हीटर होता, आणि जाडजूड रजई होती! मग काय महाराजा! अशी झोप लागली! वाह!

सकाळी लवकर जाग आली, आणि मामाला  आश्चर्य वाटलं. पण मी उठले, आणि मामानी मला मस्तपैकी चहा करून दिला! उकळत, आणि गरमगरम!इंडियन श्टाईल !  त्यानंतर फ्रेश होऊन, पुढच्या itienary साठी बोलले . तर मामा म्हणला  आज मी तुला सिडनी च्या फेमस ऑपेरा हाऊसला नेणार आणि हार्बर ब्रिज  बघायचे!

ब्रेकफास्ट करून ९ वाजता बाहेर पडलो. कारनी रेल्वे स्टेशनवर गेलो. रेल्वेस्टेशन म्हणजे काय महाराजा! स्वच्छ, टापटीप... शिस्तबद्ध  काम सर्व...  छोटे स्टेशन, पण व्यवस्था चोख! इथे रेल्वे, बस साठी एक कार्ड आहे opal card. ते माझ्यासाठी विकत घेतलं. नो formalities ... नुसते कार्ड घ्यायचे, त्यात डॉलर टॉपअप करायचे आणि झाले! ते प्रत्येक स्टेशनवर किंवा बस स्टॅन्ड वर आत जायच्या आधीच स्वाईप करायचे, ट्रेन/बस मध्ये बसायचे. उतरून स्टेशनच्या बाहेर आले की  परत तिथे स्वाईप करायचे, झाले !म्हणजे तुमच्या प्रवासाचे पैसे त्यातून वजा झाले!

मी एकटीने  संपूर्ण सिडनी रेल्वेने फिरले पुढचा दीड महिना. मेलबर्नला पण माझ्या ४ दिवसांच्या मुक्कामात बसने, रेल्वेने फिरले एकटी. तिथली रेल्वेची  यंत्रणा,व्यवस्था, काय वर्णन करायचे? बघितल्या शिवाय कळायचे नाही मी जे सांगत्ये ते, अशी परिस्थिती आहे. स्टेशन छोटे, पण सगळीकडे स्वच्छ. सुव्यवस्था. टॉयलेट स्वच्छ. टॉयलेट हे वासाने नाही तर पाटीने कळते. (हसू येईल, पण तिथली वस्तुस्थिती आहे ती)बसायला बेंचेस ती पण स्वच्छ! लोक येतात, कुणी काही खात असतात, कॉफी पीत  असतात, पण सगळा  कचरा पेटीत टाकणार. पण कचरापेटीचा, कचऱ्याचा कुठेही कधीही वास आला नाही, की येत नाही! त्यामुळे कचरापेटी ही वासाने नाही, तर दिसणाऱ्या मोठ्या डस्टबीनमुळे कळते.! ट्रेनचे टाईमटेबल स्क्रीनवर दिसत असते. सिडनीमध्ये अनेक स्टेशन आहेत, suburbs म्हणतात तसे. प्रत्येक suburb ला  एक स्टेशन. जास्तीत जास्त ३ प्लॅटफॉर्म. फक्त townhall  किंवा central अशा मोठा वर्दळीच्या suburbs मध्ये ६ प्लॅटफॉर्म. कारण ह्या दोन ठिकाणी मुंबईसारखे वातावरण असते.आणि इथून सम्पूर्ण सिडनीच्या  कनेक्टेड ट्रेन्स जातात. सगळे कॉर्पोरेट ऑफिसेस, सरकारी ऑफिसेस, खाजगी कम्पनीचे ऑफिसेस असे व्यावसायिक वातावरण तिकडे असते. सगळी लोकं  घाईघाईने कुठेतरी जात असतात नाहीतर कुठूनतरी येत असतात. आणि ट्रेन पकडायची घाई  असते.पण  मुंबईसारखे वातावरण असले, तरी मुंबईसारखे बकालपण, ट्रेनला लटकणे , घाम, घाण वास, उबग आणणारे भिकारी, स्टेशनवर झोपलेली माणसे, टॉयलेटचा मंद(!) सुगंध... yuk ,उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते,ह्यातले काहीकाही नाही.. त्यामुळे पण चुकल्यासारखे होते.(हसू येतेच ) असो. इतर सर्व suburbs मध्ये   ३ प्लॅटफॉर्म . तर सांगत काय होते, येणाऱ्या गाडीची मिनिटे दाखववलेली असतात, त्या आणि तेव्हढ्या मिनिटातच ट्रेन स्टेशनमध्ये दाखल होते. खूप नवल आहे हे  आपल्यासाठी. म्हणजे ३ मिनिटांनी ट्रेन येणार असेल तर, दीड  मिनिट असतांना ट्रेन स्टेशनमध्ये येऊन थांबते, लोकांना चढण्या उतरण्यासाठी उरलेला वेळ. आणि गाडी हलते. क्या precision! वंडरफुल!

बरं,  ट्रेन चा दरवाजा प्रशस्त, मोठा! त्यातून महिला आपल्या बाळाला घेऊन pram सकट ट्रेन किंवा बसमध्ये   चढतात, उतरतात. बसमध्ये पण एक जागा pram साठी मोकळी असते. ह्या महिलां व्यतिरिक्त  विकलांग, अंध, ज्येष्ठ नागरिक, pregnant महिला इत्यादी मंडळींसाठी समोरच्या ९ राखीव सीट्स.बसमध्ये पण पुढच्या सीट राखीव असतात. त्यावर शक्यतो कुणी बसत नाही. आणि कुणी ह्यापैकी आले, तर सीट खाली करून देतात! हुज्जत नाही घालत, कारण तिथे कायदाच इतका कडक आणि शिक्षा इतकी जबरी, की तेवढेच पुरेसे आहे. आणि  त्यामुळे सर्व लोकांमध्ये अपनेआपच एक जागरूक नागरिक वसलेला आहे.
सुजाण नागरिक काय करतो हे तिथे आजूबाजूला  बघितले  की कळते.एक किस्सा सांगते...

मी मेलबर्न मधल्या २ दिवसांच्या 'hop on , hop  off ' बस टूर दरम्यान एकदा बसच्या मागच्या दरवाज्याने चढले..(आपल्या भारतातली सवय हो...काय करता...झाली चूक!) तसं , ड्रायव्हरने मला बोलावले," yes  lady , why did you get in from that  door ? मी त्यांना लगेच सॉरी म्हटलं, पण त्याची नाराजी स्पष्ट होती.  कारण कुणी नियमाचे उल्लंघन केले तर  कर्मचाऱ्याला जाब विचारला जातो,  त्याला जबाबदार धरले जाते  ,passenger ला नाही! तर नियम म्हणजे नियम, त्यात compromise नाही! बिशाद आहे, पुन्हा अशी चूक माझ्याकडून झाली!

 एकदा एक महिला कर्मचारी होत्या,ट्रेनमध्ये चढल्या. अंध होत्या त्यामुळे त्यांच्या सोबत एक लॅब्रॅडॉर guide डॉग होता. त्या चढल्या, बसल्या. त्यांचा लॅब तिथे पायाशी बसून राहिला. गडबड नाही, उगाचच इकडे तिकडे वास घे, कुणाला चाव, काही नाही. जसे त्यांचे स्टेशन आले, त्यांनी त्याची साखळी थोडी ओढली, come on  म्हणल्या, तसा  तो डॉग उठला, आणि त्यांच्या पुढे निघाला. त्या त्याला फॉलो करून उतरल्या, पुढे गेल्या. झालं ! मी तर दंग  झाले  हे बघून!

 तिथे म्हातारी किंवा वयस्क माणसं , महिला असो की पुरुष, सोबत एक strolley घेऊन फिरतांना दिसतात. म्हणजे छोटीशी ट्रॉली, त्याला एक शॉपिंग बॅग attach असते. ही स्ट्रॉली ते  मॉल,किंवा कुठेही नेतात. आरामात सामान  ठेवता येते, चढ़ता उतरतांना सोपे जाते.


 बसमध्ये चढतांना हेच opal कार्ड स्वाईप करायचे, उतरतांना स्वाईप करायचे, तुमचे भाडे त्यातून वजा झाले!  किती सुटसुटीत काम! कंडक्टर  नको,सुट्या पैशांचे वाद नकोत, भांडणतंटे, हाणामाऱ्या नकोत काही नको. छान, आरामदायी, शांतपणाने  प्रवास. पुन्हा ड्राइव्हर किती विनम्र! आपण जर प्रश्न विचारला, तर आपल्याला नीट गोड बोलून उत्तर देणार,गडबड   नाही, घाई नाही," ओ , चला ना, कशाला वेळ घालवताय?" "आम्हाला उशीर होतोय ना डाइव्हर" असले कोणतेही dialogue ऐकू येणार नाहीत. passenger अतिशय शांत असतात. बस थांबल्यावरच उतरता येते. पुढच्या दरवाज्याने चढायचे, मागच्या दरवाज्याने उतरायचे! आणि हो, उतरतांना  सगळे लोकं , शाळकरी मूलं , कॉलेजची मुलं, म्हातारी माणसं, इतर मंडळी सर्व जण ड्रायव्हरला सराईतपणे  "थँक यु " म्हणत खाली उतरतात.आणि सगळे लोक उतरेपर्यंत ड्राइव्हर शांतपणे बसून असतो. कुठे कटकट नाही,   ',अहो, उतरा न पटपट ' असले असभय बोलणे नाही. ह्याला आणखीन एक कारण असे की, जर कर्मचाऱ्या विरुध्द्व कोणतीही तक्रार आली, तर त्याची योग्य ती दाखल घेतली जाते. 'कन्झ्युमर इज किंग' हे तिथले व्यापारी तत्व आहे .दुसरे तत्व म्हणजे' सर्व्हिस विथ अ स्माईल' तर राजा असलेल्या ग्राहकाला विनम्रभावाने आणि स्मितवदानाने सेवा पुरवायची तरच तो पुन्हा आपल्याकडे येईल , आणि तो आलाच पाहिजे हा त्यामागचा कार्यकारण भाव.

आणखीन एक गोष्ट मी अनुभवली ती म्हणजे लोकंआवाजाच्या  अतिशय कमी पट्टीत बोलतात. म्हणजे ट्रेन किंवा बसमध्ये लोक भरपूर असतात, बोलत पण असतात, हास्यविनोद पण करीत असतात, मुलं शाळा कॉलेजची गडबड करतात, बोलतात, पण  बहुतेकांचीआवाजाची पट्टी कमी असते. एक दोनदा मी ट्रेनमध्ये बघितलं, जे मोठ्यांदा फोनवर बोलतात, लांबलांब गप्पा हाकताना ऐकू येतं , ते इंडियन असतात! इथले लोक देखील कायम फोनवर बोलत असतात पण आवाज कमी! अर्थात काही अपवाद असतातच...म्हणजे काही महिला एकदम  gregarious किंवा मोठ्यांदा हसणाऱ्या असतात, पुरुष देखील एक्दम दिलखुलास असतात ते पण मोठ्यांदा बोलतात, हसतात. किंवा बोलघेवड्या मंडळींचा ग्रुप असतो, त्यांचे पण आवाज येतात. तसं मजा वाटते. पण एकूण हळूच बोलतात बहुतेक. त्यामुळे आवाजाचे प्रदूषण नाही, गाड्या उत्तम ठेवतात त्यामुळे हवेचे प्रदूषण नाही. ट्रेन, बसचे आवाज नाहीत, मेंटेनन्स उत्तम त्यामुळे खडखडाट नाही, सारे कसे बिनबोभाट चाललेले असते. बरं , सिडनी शहर एक्दम टुरिस्ट स्पॉट. त्यात कमर्शियल कॅपिटल. तरीसुद्धा सारे कसे लख्ख!

कुठल्याही दुकानात गेलात तर तिथले कर्मचारी तत्परतेने आपल्याला भेटतात. म्हणजे दुकानात शिरतानांच एक छोटीशी बेल सारखी बीप वाजते. दुकानातले गृहस्थ किंवा दुकानदार महिला तुमच्याकडे  बघणार,हसून तुम्हाला wish करणार.. hello ,how  are you ?  what can I  do for you ? किंवा hello ,good morning ! नंतर तुम्ही खरेदी केली की, बिल भरून रिसीट देतांना पुन्हा हसून, thank you , have a  good day ! किंवा have a nice weekend , किंवा enjoy your afternoon असे काहीतरी समर्पक म्हणणार! किती छान वाटतं हा अनुभव घेतांना! आणि असं एकदा नाही, दोनदा नाही, तर रोज आणि येणाऱ्या प्रत्येक कस्टमरसाठी !मी विचार करून बघितलं, स्वतःला त्या काउंटरवरच्या व्यक्तीच्या जागी बसून पाहिलं, आणि लक्षात आलं, किती अवघड आहे हे करणं ... तेच करू जाणोत... बरं , सगळीकडे कार्ड पेमेंट अगदी १ डॉलर बिल झाले  कुरकुर नाही, सुटे  नाहीत वगैरे काही नाही. १०० डॉलरची नोट द्या आणि १ डॉलर बिल असेल, तरी ९९ डॉलर न कुरकुरता परत देणारा हा कर्मचारीवर्ग ..धन्य आहे त्यांची! पुन्हा वरतून म्हणणार thank you , welcome '! अशी आहे सामाजिक बांधिलकी आणि सोबत शिष्टाचार !      

No comments:

Post a Comment