Friday, 22 November 2013

DIWALICHYA DIVASANCHE MAHATV

 दिवाळीची धूम सुरु होते शुक्ल पक्षातल्या द्वादशी पासून. द्वादशीला   म्हणतात 'गोवत्स द्वादशी' किंवा 'वसू बारस.'  वसू बारस म्हणजे गाई_वासराची पूजा करणे.  गाय आणि वासराला कुंकू लावतात, फुलांनी सजवतात, त्यांची ओवाळणी करतात, आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.
वात्सल्याचे प्रतीक असते गाय आणि बालपणाची निरागसता दिसते वासरामध्ये, त्या वात्सल्याचे आणि निरागसतेची ही आराधना!

दुसरा दिवस 'धनत्रयोदशी' चा. धनत्रयोदशीला  आरोग्याची देवता म्हणजे धन्वंतरीची पूजा करण्याचा दिवस.
धन्वंतरी
आरोग्य सेवा आणि संबंधित सेवा पुरविणारे किंवा त्यात सहभागी असणारे लोक धन्वंतरीची पूजा करतात. डॉक्टर्स, medical practitioners या सर्वांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आणि भक्तीसाठी अगदी खास दिवस.  .भगवान धन्वंतरी म्हणजे सर्व देव देवतांचे वैद्य  मानले जातात, आणि ते आयुर्वेदाचे जनक म्हणून त्यांची पूजा करून आपण दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याची त्यांच्या पाशी प्रार्थना करायची.

 ह्याच दिवशी संध्याकाळी यम दीप दान करतात, म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक पणती लावायची जिची ज्योत दक्षिणेला असेल अशी ठेवायची, पणतीला हळदी कुंकू वाहायच, फुल वाहायच, आणि दक्षिण  दिशा ही यमाची   दिशा असल्यामुळे,तिकडे हात जोडून, अपमृत्यू पासून अभय मागायचे, घरात सुख शांती मागायची.

तिसऱ्या दिवशी असते 'नरक चतुर्दशी'.  ह्या दिवशी  उठून उटणे लाऊन स्नान करून, सर्वांनी मिळून दिवाळीचा फराळ करायचा, फटाके उडवायचे, आणि घरात, भोवतीने भरपूर पणत्या लावायच्या.   नरकासुराचा वध झाला तो हा दिवस म्हणून आनंद साजरा करतात.

नंतरचा दिवस 'लक्ष्मीपूजा' म्हणजे कार्तिकातली अमावस्या. ह्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतात.  व्यापारी मंडळी त्यांच्या हिशोबाच्या चोपड्यांचे पूजन करतात.
लक्ष्मी माता
 
लक्ष्मीच्या प्रतिमेची, किंवा लक्ष्मीच्या चांदीच्या टाकाची पूजा केली जाते, लाह्या बत्तासे नैवेद्य म्हणून दिला जातो. लक्ष्मी बरोबरच धनाची देवता' म्हणून कुबेर'  ह्याचेही पूजन होते.
कुबेर _धनाची देवता
  सोबतच सोन्याच्या दागिन्यांची, आणि पैशांची पूजा केली जाते.

त्यानंतरचा दिवस मात्र खास बर का! कारण 'बळी प्रतिपदा' ह्या दिवशी पाडवा म्हणजे बायकोने नवऱ्याला ओवाळण्याचा आणि नवऱ्याने बायकोला छानशी ओवाळणी देण्याचा दिवस!!   

आणि द्वितीयेला सर्व बहिणींचा आवडता दिवस___ भाऊबीज!!
भाऊबीज
भावाने बहिणीला ओवाळणी देण्याचा हा दिवस. बहिण पण भावाला प्रेमाने घरी बोलावते, त्याला ओवाळते, आणि मग मनासारखी वस्तू ओवाळणी म्हणून घेते!

.
त्यानंतर एकादशीला तुळशीचे लग्न लागले की दिवाळी संपन्न होते!

तुळशी विवाह
 
 

Monday, 28 October 2013

DIWALICHI MAJA AANI MASTI!!!!

दिन दिन दिवाळी!
'दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी.
गाई म्हशी कुणाच्या?
लक्ष्मणाच्या .
लक्ष्मण कुणाचा?
आई बाबांचा!'
असं  म्हणत, फटाके, फराळ आणि पाहुण्यांच्या बरोबर धमाल मस्ती करत दिवाळी  साजरी झाली!

काही दिवसांपूर्वी देव  दिवाळी साजरी झाली, तुळशीचे लग्न लागले, आणि लगेचच पाठोपाठ  घरातली लग्नकार्य हाती घेण्याची लगबग सुरु  झाली! पुढील काही महिने भरपूर मुहूर्त  आहेत, त्यामुळे आता घरात निमंत्रण पत्रिकांचा ओघ वाढणार,(दोन already येउन पडल्या सुध्दा!) आणि सतत लग्नाला जावे लागणार, तिथले जड जेवण जेवावे लागणार! मग काय, acidity वगैरे त्रास उदभवणारच! 

अर्थात, त्रास होतो म्हणून काही कोणी खायचं थांबत नाही ना! आतां चातुर्मास संपला, त्यामुळे strictly non   vegetarian असणाऱ्या मंडळींनी सुटकेचा निःश्वास सोडला   असणार! chicken, mutton वगैरे भरपूर ताव मारून खाल्लं असणार!

अर्थात  मी पण चिकन केलंच  की! ते पण थाई स्टाईल! पण थोड fusion! दही,  मीठ,तिखट, चिकन मसाला, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण,लांब कापलेला कांदा, थोडे तेल आणि हवा असल्यास लाल रंग घालून ३ ते ४ तास चिकन marinate  करून, नंतर तेलावर छान परतून   घेतली. शेवटी, थाई रेड चिली पेस्ट पातळ करून घातली, आणि नीट शिजवून घेतले. कोथिंबीर आणि पुदिना घालून गरम गरम सर्व्ह केलं! मुलीनं ताव मारून खाल्लं की!

नंतर मूगडाळीचा शिरा खाल्ला! खाल्ला म्हणजे काय, फस्त केला!!!!
मूग डाळीचा शिरा
  

DIPAWALI ANANDACHI KARUYAA!

परवा बाजारात गेले होते. बाजाराचे रुपडे पाहून आनंदून गेले! अर्थात प्रत्येक सणाच्या प्रसंगी बाजार असाच  नटलेला असतो म्हणा! दिवाळी निमित्त बाजारपेठ नुसती फुलली होती, शृंगारली होती! रोषणाई, सजावट, आकर्षकपणे मांडलेल्या वस्तू, ग्राहकांना प्रलोभन दाखविणाऱ्या   खरेदीच्या नव्या नव्या आकर्षक योजना, भेटवस्तू, scratch card ,  काय नि काय! अशा वेळी  , 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी!' ह्या म्हणीच्या धरतीवर 'विकणाऱ्याच्या  वस्तू हजारो रे, परी, रिकामे माझे पाकीट रे!'असा  दुबळा विचार मनात येतो, पण क्षणभरच, की पुन्हा आपली shopping  सुरु! असो.

पण ह्या खरेदीच्या धुमश्चक्रीत दीपावली खऱ्या अर्थाने साजरी व्हायची तर राहून जात नाही ना,ह्याचे भान  मात्र ठेवायला हवे आपण सर्वांनी.दीपावलीच्या पाच दिवसांचे आपापले महत्व आहे, त्याप्रमाणे त्या दिवशी आचरण करावे.,थोडी का होईना  काही पूजा अर्चा करावी, आणि मग मजामस्ती! ह्यातूनच आपण आपले संस्कार पुढच्या पिढीला देणार आहोत, ह्याचे भान राहू द्यावे, अन्यथा, संस्कारांच्या रूपाने फक्त 'shop till you drop' एवढेच राहील!

दिवाळीच्या आपल्या घरातील झगमगाटात,   रोषणाईत, फराळाच्या सुगंधात, पाहुण्यांच्या सरबराईत, एकमेकांना शुभेच्छा देण्यात, आणि फटाक्यांच्या आतषबाजीत, आणि ह्या सर्व धामधुमीत, थोडा वेळ काढून एखाध्या उपेक्षित तान्हुल्याला काही खेळणं, खाऊ देवून, त्याच्या चेहऱ्यावरचे निर्व्याज्य हसू पहा, किंवा एखाद्या दुःखी जीवाला त्याच्या दुःखद प्रसंगी देखील दोन घटका गोड करून द्या, एखाद्या मुक्या प्राण्याला ताज्या पोळीचा घास घालून पहा,   त्याची आनंदाने गोलगोल फिरणारी शेपटी तुम्हाला किती आनंद देऊन जाईल! ह्यामुळे तुमची दिवाळी  आनंदमय होईलच, आणि त्यांच्या आशीर्वादाने भरभराटीची पण होईल हे नक्की!

दिवाळी अशीच गोड करण्यासाठी एक खास   वडी तुमच्या साठी……

काजूवडी: १ कप मिल्क पावडर, १ कप काजुपुड, ११/२ ते १३/४ कप पिठी साखर, गुलाबी रंग,१/२ कप  बटर,१/२ कप  दूध 

मिल्क पावडर, काजुपुड, पिठी साखर, रंग,बटर  आणि अंदाजाने दूध मिक्स करून pan मध्ये low heat वर शिजत ठेवावे. घटत गोळा झाला, की थापून वड्या कापाव्यात.

हवा असल्यास खवा घालता येतो. १/२ कप मिल्क पावडर कमी करून १/२ कप खवा गुठळ्या मोडून, थोडा भाजून घ्यावा.  

चला, फराळ बनवायचा आहे, तेंव्हा घाई  करायला हवी, नाही का? 


Friday, 25 October 2013

केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!

९ सप्टेंबर! त्या दिवसानंतर आज ब्लॉग लिहिते आहे!  इतका आनंद होतो आहे, काय सांगू! झालं होतं काय, की ब्लॉग चा  लँग्वेज ऑप्शन काम करेनासा झाला, आणि सगळं कामच थांबलं की! मग काय, सुरु झाली धावाधाव आणि पळापळ! भगीरथ प्रयत्नांना सुरुवात झाली.  (माझ्या साठी भगीरथ प्रयत्नच हो!) मोहीमच हाती घ्यावी लागली. मग मित्रमैत्रिणींना फोन, ईमेल, ब्लॉगवर मदतीसाठी कमेंट टाकली, प्लीज हेल्प म्हणून फेसबुक वर स्टेट्स अपडेट केलं , म्हणजे थोडक्यात जे जे शक्य होतं ते ते केलं. शेवटी, एका स्नेह्यांच्या मुलाने हा प्रॉब्लेम सोडवून दिला,  आणि मी  माझा ब्लॉग  लिहिण्यास पुन्हा सुरुवात केली आजच!

म्हणतात ना, की संकट आलं, तरी न डगमगता, संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे लागते. प्रसंग कठीण, संकटातून बाहेर पडण्याचा नक्की मार्ग माहित नाही, वाट अवघड, आणि कुठून सुरुवात करायची हेही माहित नाही! अशा वेळी, आपले ध्येय खूपच असाध्य आणि दूर वाटायला लागते, आणि सर्व अवसान गळून जाते, निराश व्हायला होतं आणि अशात  हार मानण्याची शक्यता बरीच असते. पण अशा वेळी, निर्धाराने आपल्या ध्येयाकडे फक्त एक पाउल उचलावे, मग बघा, किती तरी पाउले पडत जातात, पडत जातात! आणि ध्येयपूर्ती होतेच होते! मोठ्या संकटाचे छोटे छोटे भाग पाडावेत, आणि एकेका भागाला सोडवण्याचा प्रयत्न सुरु करावा. तर,' केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' ह्या समर्थांच्या ब्रहमआणि त्यांचे  वाक्याची प्रचिती येते! I strongly believe in the adage, 'God helps those who help themselves' . असो, All is Well, that ends well!, rather, ह्या ब्लॉग संदर्भात म्हणायचं तर, Begins well once again!

मध्यंतरी, महालयम पर्व झालं. ह्या पंधरा दिवसात आपण आपल्या   पितरांचे स्मरण करतो, त्यांना पिंड दान करतो, त्यांच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करतो,  आणि   पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतो.

त्यानंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरु झालं. नऊ दिवस देवीची आराधना, उपासना, पूजा अर्चा करून, दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून, ज्येष्ठ मंडळींना सोनं म्हणून आपट्याची पानं  देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात. 'दसरा सणमोठा, नाही आनंदा तोटा' असं म्हणतात. देवीचे नवरात्र उठले, की लहान थोर सर्वांना वेध लागतात ते दिवाळीचे!

 आनंदाची दिवाळी, फटाक्यांची दिवाळी, फराळाची दिवाळी, मौज मस्तीची दिवाळी, सुट्टीची दिवाळी, अभ्यंग स्नानाची दिवाळी, पाहुण्यांची दिवाळी, किल्ल्याची दिवाळी ,  दिवाळी अंकांची दिवाळी! कितीतरी रंग आहेत दिवाळीचे! ज्याला जो रंग आवडेल, तो त्यात रमतो. महिला वर्ग फराळात रंगतो, बच्चे कंपनी फटके, आकाश कंदील, किल्ले करण्यात रमतो, पाहुण्यांसाठी स्वागताची तयारी करण्यात कुणी रमतो,  आणि ज्येष्ठ मंडळी सर्वांवर बारीक लक्ष ठेवण्यात, आणि सर्व सुचना देऊन, काम करून घेण्यात रमतात! (हा! हा!)  आणि हो, नवरे आपल्या बायको साठी गिफ्ट आणण्यासाठी धडपडत जातात! (हो, पण त्याआधी त्यांना हळूच ह्याची आठवण करून   द्यावी लागते! दुसरं  कोण आठवण करून देणार?  बायकोच की!)   आणि भाऊ बहिणीसाठी तिच्या आवडीची भाऊबीज घेण्यासाठी धडपडतो!

तर दिवाळीच्या तयारीला लागायचं  आहेच, पण त्याआधी माझ्या मैत्रिणीनी मूग डाळीच्या रेसिपीज विचारल्या  होत्या, त्या देते.

मुगडाळ ओट्स डोसा:  १ वाटी मुगडाळ ३ तास   भिजवून नंतर शिजवावी , किंवा मोड आलेले मूग शिजवून घ्यावेत. डोसे बनवायच्या १/ २   तास आधी २ वाट्या ओट्स पाण्यात भिजवावेत. आता ओट्स आणि मूगडाळ एकत्र वाटून घ्यावे. त्यात लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर,बारीक चिरून कांदा,  आणि २ चमचे तांदुळाचे पीठ, थोडे पाणी घालून डोसा पीठ बनवावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर डोसे बनवावेत. हे डोसे थोडे जाडच  ठेवावेत. लसुन चटणी, लाट मिरची चटणी, कोथिंबीर पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर  गरम सर्व्ह करावे.

मुगडाळ भाकरी  : १ वाटी मुगडाळ भिजवून, शिजवावी, किंवा मोड आलेले मूग  शिजवावे. तेल गरम करून त्यात  मोहरी,जिरे, बडीशोप, हिंग, हळद, तिखट, कोथिंबीर चिरून घालावी, आणि परतून  घ्यावे. लगेच त्यात मुगडाळ घालावी आणि नीट   शिजू द्यावी. शेवटी  मीठ,तिखट, गरम मसाला,  बारीक चिरलेली कोथिंबीर घालून  करावी. ह्यात १ ते १/२ वाटी ज्वारीचे पीठ घालून (approx_ १ १/२ वाटी सांगितले आहे.) हाताने भाकरी थापून तव्यावर भाजावी आणि नंतर  तेल घालून दोन्हीकडे खरपूस भाजावी. लोणी, चटणी, ठेचा बरोबर छान  टेस्टी लागते ही भाकरी.

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना ही दिवाळी  आनंदाची,  आणि येणारे   नवीन वर्ष सुखाचे, भरभराटीचे, समाधानाचे जावो!!!!!  

                

Thursday, 19 September 2013

BAPPALA NIROP AANI LAVKAR YENYACHI PRARTHANA!

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!
'गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!' किंवा 'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला!' असे म्हणत भक्तांनी त्यांच्या लाडक्या   बाप्पाला साश्रू नयनांनी, प्रेमाने निरोप  दिला, आणि  काल काही घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जना बरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता झाली,

गेल्या आठ दहा दिवसांपासूनची   धावपळ संपली, आणि  routine सुरु झाले! दहा दिवसांचा गणेशोत्सव पार पडला, त्यामुळे खूप  मोठे  काम   झाल्यासारखे वाटते आहे. त्याचे  खूप समाधान भरून राहिले आहे  हे नक्की.
गेले तीन चार  दिवस मंडळी गणपती देखावे बघण्यासाठी बाहेर पडत होती. पाउस असून देखील उत्साह दांडगा होता. मोठ्या प्रमाणात गर्दी होते, आणि लोकं गणपतींची आरास, देखावे   बघत बघत हिंडताना दिसत होते. आणि रात्र रात्र गणपती बघायचे म्हणजे खाणे पिणे ओघानेच आले! मग चणे, फुटणे, पॉपकॉर्न, आईस्क्रीम, भेळ, नुडल्स, असे अनेक पदार्थांचा आस्वाद घेत घेत, मुलांचे फुगे, पिपाणी, चॉकलेटचे हट्ट पुरवत पाहटे पहाटे घरी जायचं! पूर्वीचे दिवस आठवले, ग्रुपनी केलेली धमाल मस्ती मजा वेगळीच होती.  आता मात्र ह्या गोंधळाचा कंटाळा येतो, गर्दी नकोशी   वाटते. त्यापेक्षा, घरी बसून TV वर गणपतींचे देखावे, मिरवणूक, विसर्जन सोहळा बघणे सोयींचे आणि आनंदाचे   वाटते!

 खव्याची पोळी
 परवा खव्याच्या पोळ्या केल्या होत्या,  टेस्टी झाल्या होत्या!

खव्याच्या पोळ्या करण्यासाठी, १ वाटी खवा परतून घ्यावा. थंड करून त्यात ३/४ वाटी पिठी साखर,१ टीस्पून  इलायची पावडर, आणि थोडा (२ छोटे चमचे) मैदा/तांदुळाचे पीठ मिक्स  करावी. साधी पोळीची कणिक माळून घ्यावी. त्याची छोटी पोळी करून, त्यात फिलिंग भरून उंडा बंद करावा. पोळी लाटून तव्यावर भाजावी. सर्व्ह करतांना, पोळी  तूप घालून खरपूस भाजून द्यावी.
दुसरी पद्धत म्हणजे दोन छोट्या पोळ्या करून, एका पोळीवरतूप लावून, फिलिंग पसरून , दुसरी पोळी  ठेवावी, कडेने बंद करावे, आणि पोळी लाटून घ्यावी.

बऱ्याच पोळ्या करून ठेवल्यास बिनतुपाच्या भाजून foil मध्ये ठेवाव्यात. सर्व्ह करतांना तूप  लावावे .

Saturday, 14 September 2013

GANAPATI BAPPA MORYA! PUDHCHYA VARSHI LAVAKAR YAA!

काल दुपारी गौरींना, आणि बाप्पाला दहीभात, भाजीपोळीचा साधासाच नैवेद्य दाखवून, संध्याकाळी घरच्या  गणपती बाप्पाचे विसाजन केले. बाप्पाला निरोप देतांना, ' गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!' किंवा 'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला!' असं  म्हणत म्हणत संपूर्ण घरातून बाप्पाला फिरवून, घरा भोवती फेरी मारून, नंतर बादलीत बाप्पाचे विसर्जन केले, तेंव्हा खरच डोळ्यात पाणी येतं, आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणतांना तोंडातून शब्द फुटत  नाहीसे होतात.

 बाप्पाची शाडू मातीची मूर्ती आणली, आणि घरीच बादलीत विसर्जन केले. ह्याचे बरेच फायदे आहेत….  एक तर, शहर हद्दीत गर्दीत जाण्याचा त्रास वाचतो, दुसरं  म्हणजे, नदीच्या काठी जाऊन , प्रदूषित पाण्यातले प्रदूषण वाढवण्याचे पाप होत नाही,  तिसरं म्हणजे,  शाडूच्या मातीमुळे पर्यावरणाला पूरक असे विसर्जन होते. चौथा फायदा हा की, बादलीत विसर्जन करून दोन चार दिवसांनी ही माती बागेत खत आणि बाप्पाचा आशीर्वाद म्हणून पसरून देवून, बागेची देखभाल पण Eco _ friendly पद्धतीने करता येते.
 बाप्पाला शिधा म्हणून दहीपोहे आणि कान्होले होते.
बाप्पाचा शिधा_ कान्होले आणि दहीपोहे

विसर्जनानंतर अनेक ठिकाणी पाण्याच्या स्रोतां जवळ, खडकांवर, गणपतीच्या प्लास्टर ऑफ पेरिसच्या छोट्यामोठ्या मूर्ती भंगलेल्या अवस्थेत इतस्तः  पडलेल्या आढळतात, त्यांच्या भोवती निर्माल्य, कचरा, आणि अनेक प्रदूषित वस्तू अडकलेल्या आढळतात, तेंव्हा अत्यंत दुःख होतं, मनाला क्लेश होतो. एक विचारावेसे वाटते, आपण  इतक्या श्रद्धेने, प्रेमाने ज्या बाप्पाची  प्राणप्रतिष्ठा केली, दहा दिवस त्याच्या आरती, पूजनात लीन होतो , त्याच बाप्पाला असे विसर्जन करून हालत केलेली आपल्याला पटते? मनाला रुचते?  पाहूयात की असे वेडेवाकडे पडलेल्या त्या बाप्पाला काय वाटत असेल? आपल्याला कुणी असे वरून नदीत फेकून दिले, लोटून दिले, नदीच्या किनारी कचऱ्यात फेकले तर आपल्याला कसे वाटेल? मग विचार  करा,त्या \विघ्नहर्त्याला  किती क्लेश, किती दुःख होत असेल ते. हा 'विनायक' असा 'विदारक' अवस्थेत पडलेला  अनेकांना वाईट वाटतं, पण ह्यात आपण एकटे  फारसं  काही करू  शकणार नाही, हे प्रत्येकाला माहित असतं, आणि ही लाचारीची भावना, त्या विदारक दृश्यापेक्षा अनेक पटींनी जास्त क्लेशकारक असते .

तेंव्हा ही लाचारीची, अगतिकतेची बोच थोडी कमी करण्यासाठी, आम्ही आमच्या परीने शाडूची मूर्ती घरीच विसर्जित करून, त्याचे आशीर्वाद मागतो एवढेच! प्रत्येकाने एक छोटीशी सुरुवात केली, तरी बरच काही होऊ शकतं!            

Thursday, 12 September 2013

.VASASI VYAPAK RUPE TU STHUL SUKSHMI!

महालक्ष्मी
"जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
  वससी व्यापकरुपे तू स्थूल सूक्ष्मी द्य देवी जय देवी।।"

महालाक्ष्मींचे पूजन  झाले, गौरींना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला, पुरणाची आरती झाली, मन अगदी प्रसन्न झाले!
 
आजचा नैवेद्य खासच होता … कटाची आमटी, सोळा भाज्यांची मिक्स भाजी, पुरणपोळी,खव्याची पोळी, कारंजी, शेवयाची  खीर,खुरचंदवडी, तीन चटण्या, पोळी, पापड कुरडई, वरण, भात  मस्त तुपाची धार! बस! नैवेद्याचे ताट  बघूनच पोट भरलं!खरचं!

नैवेद्यासाठी  सर्व  पदार्थातील तिखट, मीठ, इतर जिन्नस  अंदाजानेच टाकायचे असतात , चव घेता येत नाही, त्यामुळे स्वयंपाक करताना खूप जागरूक राहावं  लागतं।  अर्थात,जितके जास्त पदार्थ तितके ताट खुलून दिसते!  आणि एवढा स्वयंपाक करून, जेंव्हा नैवेद्य दाखवून होतो, तेंव्हा अगदी समाधान वाटतं! सगळं  नीट  झाल्याचं  समाधान!

 सोळा भाज्यांची मिक्स भाजी करण्या साठी दोडका, भोपळा,भेंडी, फ्लोवर, गवारी, बटाटा, गिलका, दुधी , गाजर, वालपापडी, बीन्स, तोंडली, तुरा, पडवळ, कारले, कोबी, सुरण अशा सोळा भाज्या चिरून घ्याव्यात. तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, घालून नंतर भाज्या घालून  घ्याव्यात. पूर्ण शिजल्या नंतर, त्यात मीठ, गोडामसाला,  कोथिंबीर,नारळ चव आणि लिंबू पिळून सर्व्ह करावी.  हवे असल्यास, नारळाचे काप लावून सर्व्ह करावी.    

सोळा भाज्यांची मिक्स भाजी

आज बाप्पांकडे   बघत होते, तेंव्हा वाटलं  ते  खुश दिसत होते! आज गौरींची भेट झाल्यामुळे ते  आनंदात असणारच  ना! उद्या बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली, तसं  मन उदास व्हायला लागतं , पण पुढल्या वर्षी लवकर येणार ह्याचा आनंद मनात घेवूनच,  त्यांच्या  दहीपोहे, कान्होले  असलेल्या शिध्याची , निरोपाची तयारी करायची लगबग सुरु होईल!

आजच काही छोटी मुलं एक वाक्य म्हणतांना ऐकलं,
'Vodafone Samsung
गणपती  बाप्पा Handsome!'
वा! मुलांनी मुलांच्या परीने बाप्पाचे वर्णन केले! मला  हसायला आले ते वाक्य ऐकून. हे हसू असचं  सर्वांच्या ओठांवर राहो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना!  एका प्रसिद्ध गाण्याच्या ओळी आठवतायत,


'तुझ्या कृपेचा हात मस्तकी।  पायी तव, मम चिंता।  
प्रथम तुला वंदितो कृपाळा।  गजानना, गणराया।।'