Thursday, 5 September 2013

ASHI PITHI SUREKH BAI KARANJYA KARAVYA!

'पसेवरी वैरण घातले।  तांतडीने जाते वोडिले।।
तेणे पीठ बारिक आले।  हे तो घडेना।। '

समर्थांनी ह्या ओवीतुन आपल्याला  महत्वाचा संदेश दिला आहे. 'पसाभर' म्हणजे 'मूठभर ' पेक्षा जास्त धान्य जात्यात घातले,  जात्याचा  खूंटा जोराने ओढला, तर त्यातून बारीक़ पीठ येणार नाही, तर भरडच येईल.म्हणजे असे, की, हळूहळू, एका लयीत, जातं ओढून, प्रमाणात, म्हणजे एका वेळी फक्त मूठभरच धान्य त्यात  घातले, तर, पीठ बारीक  निघते, आणि  भाकरी देखील मऊसूत होते! 

 म्हणजे, कोणतीही गोष्ट, कोणतीही कला, कौशल्य, कशाचेही ज्ञान, हे त्या गोष्टीचा पाठपुरावा योग्य प्रमाणात, धीराने, चिकाटीने, सातत्याने आणि  प्रामाणिक प्रयत्नांनी केला, तरच ते ज्ञान आपल्याला आत्मसात करता येते. आणि असे लाभलेले ज्ञान हे चिरंतन राहते, पक्के असते.  ह्या ज्ञानाच्या बळावर केलेले कार्य देखील उत्तम होते. त्यातून प्रसिद्धी, मानमरातब मिळतोच,  पण त्यापलीकडे एक उत्तम व्यक्तिमत्व घडते!

जातं
आता ह्या जात्यावर पीठ काढायचं म्हणजे फार धीराच, चिकाटीच , आणि वेळखाऊ  काम आहे बर! पण पूर्वीच्या काळी बायकांना करायला तर लागायचं! मग त्या कामात  जीव कसा रमवायचा? तर, ओव्या म्हणत म्हणत जात्यावर हात  चालवत राहायचं!

'अरे संसार संसार।  जसा तवा चुल्यावर।।
आधी हाताले चटके। तेंव्हा मिळते भाकर।।'

 अशा, संथ लयीत, मधुर आवाजात, सहज सोप्या शब्दात आयुष्याचा गाभा, सार  उलगडून सांगणाऱ्या ओव्या म्हणत म्हणत, जात्यावर पीठ काढायचं, म्हणजे मग ओव्यांच्या संथ लयी प्रमाणेच, जात्याचा खुंटा देखील संथ लयीतच ओढला जातो, आणि बारीक पीठ तर मिळतचं , पण एक सुंदर, सुरेल संगीतही तयार होतं! (हे दृश्य ज्यांनी बघितलय, अनुभवलय, त्यांना डोळ्यासमोर चित्र आल्याशिवाय  राहणार नाही!)

'पहिली माझी ओवी गं!
जात्यावर दोघीजणी असतात, तेंव्हा कष्टामुळे शरीराला व्यायाम होतो, गप्पा मारीत काम होते, म्हणजे मनाला विरंगुळा मिळतो. शिवाय,ओव्यांतून,  गाण्यातून,मनोरंजन करणारे,   जीवन जगण्याचे, काही शहाणपणाचे, काही बोध करून देणारे संदेश  देखील मिळतात, एकमेकींचा सहवास मिळतो, चार एकांताचे क्षण सुद्धा  विनासायास  मिळतात, त्यातून मनं  जुळतात!

पहिली माझी ओवी ग।   वाहिली एकाला। ।
पार्वतीच्या लेकाला।  गणेश  देवाला। ।

म्हणजे, मी  नेहमी ह्या ब्लॉग मध्ये म्हणते तसं,शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक   स्तरावर आरोग्य जपले जाते,  कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागतो, शिवाय, बऱ्याच  जणी  हे काम करीत असल्या, तर सामाजिक बांधिलकीही जपली जाणार! आणि महत्वाचं म्हणजे, पिठावर लक्ष केंद्रित झाल्यामुळे, उत्तम दर्जाचं पीठ मिळतं, ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळला जाऊन आर्थिक बाजू   भक्कम राहते ते वेगळच!

असं पीठ मिळाल्यावर, एखाद्या सुवासिनीच्या तोंडी आपोआपच शब्द येतील,
'असं जातं  सुरेख बाई, सपीठी काढावी! 
अशी पीठी सुरेख बाई ,करंज्या कराव्या !
अशा करंज्या सुरेख बाई, माहेरी धाडाव्या! '

करंजी
 असो, तर जात्यावारचे पीठ नाही तर नाही, पण उत्तम दर्जाचे रवा  आणि मैदा मिळाले, तर नारळाचे सारण घालून, करंज्या बनवून माहेरी नाही धाडता आल्या, तरी खायला कराव्यात!
    

No comments:

Post a Comment