 |
| गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया! |
काल गणेशचतुर्थीच्या शुभ दिवशी श्री गजाननाचे 'गणपती बाप्पा मोरया!' च्या घोषात, ढोल ताशांच्या तालावर , लेशीम, झांजांच्या गजरात, नाचत नाचत आगमन झाले! खूप आनंद होतो बाप्पा आले की! मी तर अगदी भारावून जाते!
 |
| वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी सम प्रभ! निविघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा! |
गणेशाची प्रतिष्ठापना झाली, की मग धूम उडते ती नैवेद्याची! सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री अशा चारही वेळा वेगळा वेगळा नैवेद्य दाखवायचा, म्हणजे नैवेद्याची मालिकाच लागते! मी गौरी विसर्जना पर्यंत ह्या नैवेद्यासाठी मेनू plan करते, म्हणजे मग तयारी जय्यत, आणि स्वयंपाक झटपट होतो! सार्वजनिक गणपती मंडळाच्या आरतीला पण जायचे असते , त्यामुळे सगळा दिवस धावपळीत, आणि मजेत जातो!
काल विधिवत पूजा झाल्या नंतर, बाप्पाला पंचखाद्य आणि फळांचा नैवेद्य होता. दुपारच्या जेवणात बटाटा भाजी, आमटी, पोळी,कोशिंबीर, आणि तळलेले मोदक.
 |
| तळलेले ओल्या नारळाचे मोदक |
 |
| बेसन लाडू आणि चण्याच्या डाळीचे वडे |
संध्याकाळच्या आरतीला चण्याच्या डाळीचे वडे आणि बेसनाचे लाडू. आणि रात्री जेवणाच्या नैवेद्याला फ्लावरची भाजी, पोळी आणि उकडीचे मोदक.
 |
| ओल्या नारळाच्या करंज्या |
आज ऋषी पंचमी आहे. आज सकाळी करंजीचा नैवेद्य होता. ह्या दिवशी हमखास केली जाते ती भाजी आणि हातसडीच्या तांदुळाचा भात. (हातसडीचा म्हणजे unpolished rice, तो नाही मिळाला, तर brown rice वापरावा.)
ऋषीपंचमीचा भात: तुपावर १ छोटा चमचा जिरे, २ ते ३ हिरवी मिरची घालून, नंतर लाल भोपळा, दुधी भोपळा, आणि अंबाडीची भाजी मिळून १ वाटी भाजी घालून परतावी. नंतर धुवून, निथळत ठेवलेला १ वाटी हातसडीचा तांदूळ घालून परतावा. २ ते २ १/२ वाट्या गरम पाणी घालून भात मऊ शिजवावा.शेवटी १/२ वाटी टोमेटोच्या फोडी, मीठ घालून, लिंबू रस, कोथिंबीर घालून, दह्या सोबत सर्व्ह करावे.
ऋषिपंचमीची भाजी: पडवळ, दोडका, सुरण, बटाटा, रताळी, लाल भोपळा, दुधी भोपळा, कच्ची केळी अशा सर्व भाज्या मिळून १ वाटी घेवून, शिजवून घ्याव्यात. मीठ, हिरवी मिरची ठेचा, चिंच, गूळ, घालून नीट हलवून घ्यावे. ,तुपात जिरे, हिंग घालून वरून फोडणी ओतावी. नारळाचा चव, कोथिंबीर घालून वाढावे.
उद्या ज्येष्ठा गौरींचे आवाहन, परवा गौरी पूजन, आणि मग गौरी गणपतीचे विसर्जन! अजून भरपूर नैवेद्य आहेत, सवाष्णींना जेवण आहे, त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद आहे! हा आनंद असाच राहावा, हीच बाप्पाला प्रार्थना!
No comments:
Post a Comment