Wednesday, 11 September 2013

GAURI AVAHAN, PUJAN, AANI HALDIKUNKVACHA ANAND!

डॉलर:  'सून राहा है ना तू?'

रुपया : 'रो रहा हूँ मैं''

 रुपयाची घसरण अजुन चालूच आहे!  गणपती बाप्पा, एवढी  घसरण थांबव रे बाबा! अणि किती घसरणार?  अवमूल्यन होणार? अणि किती ढासळणार पत? थांबवा हे सगळं.

 असो,आल्या आल्या त्या बाप्पाला गाऱ्हाणी तरी किती सांगणार आहोत? गेल्या दोन दिवसात इतकी गाऱ्हाणी सांगून झालीत, की शेवटी बाप्पा भक्तांना म्हणतायत, 'अरे, दर  वर्षी तेच तेच गाऱ्हाणं काय  सांगतोस? पेट्रोल दरवाढ, महागाई, भ्रष्टाचार, खराब रस्ते  वगैरे वगैरे?'

आता ह्या मागण्यांबाबत बाप्पांच्या हातात काही आहे असं वाटत नाही.  तो तरी काय करणार? मला तरी वाटतय की  तो म्हणतोय, तुम्हीच  निस्तरा हा घोळ!

आज गौरींचे, महालक्ष्मीचे आगमन! गृहिणींची लगबग चालू असते गौरींच्या  आगमनाची,पुजेची, नैवेद्याची, गौरींचे सजावटीची! गौरी म्हणजे माहेरवाशिणी असे मानले जाते. त्या तीन दिवस राहतात. त्यांच्या बरोबर त्यांची बाळे पण असतात, म्हणजे लेकुरवाळ्या माहेरवाशिणी … आज त्यांचे आगमन, म्हणजे गौरी आवाहन, उद्या त्यांचे साग्रसंगीत  पूजन आणि पंचपक्वान्न नैवेद्य. आणि  त्यांना निरोप देणे म्हणजे विसर्जन.

राजस पुरी (पाकातल्या पुऱ्या )
सकाळी गौरी आवाहनाला मी गणपतीला पाकातल्या पुऱ्या, किंवा राजसपुरी चा नैवेद्य केला होता. माहेरवाशीण  घरी  आली,की त्या दिवशी  प्रवासाने शिणलेली असते, म्हणून तिला साधसच  जेवण, म्हणजे पालेभाजी,  भाकरी, चटणी, असा नैवेद्य असतो.
 
भाजी भाकरी चटणी
 
दुसऱ्या दिवशी पुरणाची आरती करतात, पंचपक्वान्नांचे  जेवणाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सवाष्णींना हळदी कुंकवाला बोलावले जाते, माहेरवाशिणींची ओटी भरली जाते, आणि गप्पा गोष्टी करून, आनंदाने एकमेकींचा निरोप घेतला जातो.
    ह्या गौरी पूजनाच्या दिवशी सजवलेल्या उभ्याच्या गौरी ज्यांनी बघितल्या असतील, त्यांना हा अनुभव आला असेल, की त्या संध्याकाळी गौरींच्या मुखावर खूप तेज चढलेलं वाटतं,आणि ते जाणवतं!त्या संध्याकाळी खरचं  त्याचं रूप न्याहाळण्याचा मोह होतो! इतक्या त्या लोभस दिसतात!

आणि माहेरचा दोन घटकेचा पाहुणचार घेऊन, तृप्त होऊन, ह्या माहेरवाशिणी पुन्हा सासरला जायला सज्ज होतात. खूप उदास  वाटतं  अशा निरोपाच्या  वेळी , मन  भरून येतं. ह्या दिवशी गौरींना कान्होला (पुरणाची विशिष्ट पद्धतीने मुडपून  केलेली कारंजी) , दहीभात असा नैवेद्य असतो. ह्या मागे कारण असं  की, प्रवास करणार तर भोजन हलकं हवं.

सर्व गोष्टीं मध्ये आपल्याच रोजच्या वागण्या,  बोलण्या, खाण्याचे पडसाद उमटतात असे नाही वाटतं?उद्या गौरी विसर्जना बरोबरच  विसर्जन होणार. तोपर्यंत बाप्पाचा, गौरींचा भरपूर पाहुणचार करायचा आहे!

          

No comments:

Post a Comment