Sunday, 8 September 2013

HARITALIKA PUJAN AANI.. VEDH GANAPATI BAPPA CHYA AGAMANACHE!


गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

 उद्या पासून १० दिवस गणेशोत्सवाची धूम राहणार! आज 'हरितालिका पूजन' म्हणजे  महिलांसाठी  खास श्रद्धेचा आणि पूजेचा दिवस! हिमालयाची पुत्री पार्वती. वडिलांनी  विष्णुंशी ठरवलेला विवाह मान्य नाही, म्हणून पार्वतीला तिची सखी पळवून अरण्यात नेते, आणि तिथे पार्वती  महादेवा साठी तप करते., त्यांना प्रसन्न करते, त्यांच्यासारखे तपस्वी आणि विरागी जीवन जगावे ह्यासाठी त्यांच्याशीच लग्न व्हावे ही इच्छा व्यक्त करते.  महादेव 'तथास्तु' म्हणून आशीर्वाद देतात. त्यानंतर हिमालय पार्वतीच्या चिंतेत तिला शोधत अरण्यात येतात, तिची शिवांशी  लग्नाची इच्छा ऐकतात, मान्य करतात, आणि शिव पार्वतीचा विवाह संपन्न होतो. तर 'हरिता' म्हणजे जिला पळवून नेली ती, आणि 'आली' म्हणजे सखी. शिवांना प्राप्त करण्यासाठी पार्वतीला तिची सखी घेवून गेली, म्हणून पार्वतीला 'हरितालिका' म्हणतात.

हरितालिका आणि शिवपूजन
इच्छित वरप्राप्तीसाठी कुमारिका हे व्रत पाच वर्ष करतात, आणि पाचव्या वर्षी उद्यापन करतात. ह्या आदिशक्तीच्या  रूपांचे पूजन , त्यासोबतच महादेवाचे पूजन करणे म्हणजेच हरितालिका पूजन. स्त्रिया, मुली संपूर्ण दिवस उपवास करतात, आणि सकाळी पार्वतीला नैवेद्य दाखवून, आरती करून उपवास सोडतात.

शिव पार्वती हे समस्त जगताचे माता आणि पिता आहेत. त्यांचा गृहस्थाश्रम हा आदर्श मानला जातो. त्यांचे वैराग्य अति उच्च कोटीचे आहे. म्हणजेच सुखी आणि संपन्न गृहस्थाश्रम हा सुखी आणि संपन्न समाजाचा आधार आहे, आणि आपण त्यांच्या गोष्टीमधून   काही बोध घेतला पाहिजे हे खरे.
  
"आपुले शक्तीनुसार।   पुजावा परमेश्वर।
परंतु पुजू नये हा विचार।   कोठेची नाही ।।"

ह्या ओवीतून समर्थांनी एकंदरच देव आणि भक्ती ह्याबाबत सोपी मीमांसा केली आहे. 'भाव तिथे देव' म्हणतात ना!  पण बहुतेक वेळा माणसं  नुसतं म्हणतात असं, आणि त्याच वेळी देव शोधत सर्वदूर भटकत राहतात!  म्हणून समर्थ सांगतात की, आपल्या मनातील भावभक्तीनुसार, आपल्या शक्तीनुसार देव पुजावा, पण देव पुजुच नये , असा विचार कुठेच आढळत नाही. आपल्या शक्तीनुसार, आपल्याला भावणाऱ्या मार्गाने भक्ती करावी. समर्थांनी नवविधा भक्ती सांगितलेलीच आहे (ह्यात भक्तीचे नऊ मार्ग सांगितलेले आहेत.)  दुसरा कुणी काय वा कशी भक्ती करतो, ह्यावर  आपला मार्ग ठरवू नये.

आता उपवासाला सारखी खिचडी करून  कंटाळा आला असेल तर, ही उपवासाची मिसळ ('मिसळ' म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटलं  ना? पण ही ती मिसळ  नव्हे बर का!) करून खाऊन बघाच!

उपवासाची मिसळ:  बटाटे उकडून छोटे छोटे  हातानीच करावेत , म्हणजे ओबडधोबड होतात. तूप गरम करून,  ठेचा, किंवा हिरवी मिरचीचे तुकडे घालावेत,, बटाट्याचे तुकडे घालून  परतावेत. भरपूर पाणी घालून उकळून घ्यावे. तिखट, मीठ, जिरेपूड,दाणेकूट, कोथिंबीर, खोबरं घालून दाट  करावे. सर्व्ह करतांना, डिश मध्ये उपवासाचा चिवडा ठेवून, त्यावर हा रस्सा ओतावा. वरून दाणे, वेफर्स, कोथिंबीर, आणि लिंबू पिळून द्यावे.

काही गोड खावेसे वाटले तर, हा वरईचा शिरा (भगर पण म्हणतात) करून पहा …।

वरईचा शिरा:  तूप गरम करून, त्यावर १ वाटी  वरई परतून छान  भाजून घ्यावी. वरई परतली, की २ वाट्या गरम पाणी घालावे, आणि नीट ढवळून, झाकण ठेवावे. ३ ते ५ मिनिटांनी त्यात १/२ वाटी गूळ किंवा साखर घालावी. झाकून नीट शिजू द्यावे. शेवटी वेलचीपूड, २ चमचे दुधात मिसळून पिवळा किंवा केशरी रंग, ड्राय  फ्रुट्स, थोडेसे तूप, आणि चारोळ्या घालून   सर्व्ह करावा.

आता 'गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!'  म्हणत बाप्पाचे स्वागत करायचे!      

No comments:

Post a Comment