Wednesday, 4 September 2013

RANJAK KAHANI 'BAILPOLYACHI'



एका दैनिकात आलेली ही कथा माझ्या वाचनात आली, म्हणून  ती  आपल्या सर्वांबरोबर   share करते आहे.

एकदा देवांचा दरबार भरला होता, आणी त्यांची वाहने, म्हणजे गणपतीचा उंदीर, सरस्वतीचे वाहन मोर, विष्णूचे गरुड, आणि महादेवाचा नंदी, असे सगळे बाहेर देवांची प्रतीक्षा करीत होते. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या, आणि प्रत्येक जण आपल्या मालकाची स्तुती करीत होता.

महादेवाचा नंदी
नंदी म्हणाला, 'माझे मालक तापट आहेत, त्यांची सर्वांना भिती  वाटते, पण मी त्यांचा लाडका आहे,  म्हणून मग काही काम असले की,  सगळे जण मलाच विचारतात. माझे विशेष महत्व आहे.' नारदमुनी सर्व काही ऐकत होते, आणि त्यांना कळले  की, नंदीला अतिशय गर्व झाला आहे, आणि त्याच्या गर्वाचे हरण  हे केलेच पाहिजे.

ऋषी नारदमुनी
काही  दिवसांनी नारद महादेवाला भेटायला गेले. तेंव्हा महादेव ध्यानस्थ बसले होते. हे पाहून नारद नंदीला  म्हणाले, 'महादेव तर ध्यानाला बसलेत. त्यांची समाधी भंगली, तर ते कोपतील. तेंव्हा तूच माझे काम करू शकतोस.' हे ऐकून नंदी गर्वाने फुलला. त्याने नारदांना काम विचारले. तशी नारद म्हणाले, मी महादेवांना भेटायला आलो  होतो, आणि हे पांढरे फुल आणले होते त्यांच्यासाठी. पण ह्याचा वास मला तरी थोडा उग्र वाटला. तेंव्हा तूच एकदा वास घेऊन सांग, हे फुल महादेवांना द्यावे का ते.' नंदी  गर्वाने आणखीनच फुगला. त्याने फुलाचा वास घेतला मात्र, त्याच्या नाकात हुळहुळले, आणि त्याला जोरात शिंक आली. शिंकेच्या जोरामुळे त्याची शेपूट जोरात हलली, आणि त्याचा फटका महादेवांना बसला! महादेवाची समाधी भंगली, म्हणून ते कोपले, नंदीवर रागावले! त्यांनी नंदीला शाप  दिला, 'आयुष्यभर पृथ्वीवरच्या लोकांकडून तुला असेच फटके खायला लागतील, आणि तुझ्या नाकात कायम वेसण घातले जाईल.'

हे ऐकून नंदी  घाबरला, आणि त्याने देवांची माफी मागितली, पण महादेव काही ऐकेनात. तेंव्हा मग  नारद मध्ये  पडले, आणि  त्यांनी सांगितले की, ' नंदीचे गर्वहरण करण्यासाठीच मी ही चाल खेळली होती. तेंव्हा त्याला उःशाप द्यावा. ' महादेवांनी त्याला सांगितले, ' माझ्या देवळात माझे दर्शन घेण्याआधी भक्त तुझे दर्शन घेतील आणि मगच आत येतील. तसेच, वर्षातून एकदा लोक तुझी पूजा करतील, त्या दिवशी तुला फटके मारणार नाहीत, तर,  तुला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतील. ' तेंव्हा पासून, श्रावणी अमावास्येला 'बैलपोळा' सण  साजरा करतात.  त्या दिवशी बैलांना नटवून, सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते, त्यांना कामाला जुंपले जात नाही, फटके मारले जात नाहीत., आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हा  सण  शेतकरी वर्गासाठी खास महत्वाचा आहे.
बैलपोळा


पुरणपोळी करतांना १०० ग्रॅम  चण्याची डाळ शिजवून घ्यावी.नंतर त्यात ७५ ग्रॅम गूळ किंवा   साखर घालून नीट शिजवावे. पुरणयंत्रातून किंवा स्टीलच्या बारीक जाळीच्या गाळणीतून गाळून  घ्यावे. थंड करून, त्यात वेलचीपूड, जायफळपूड  घालून मिक्स करावे.
१ कप कणिक  आणि १/४ कप मैदा,  थोडेसे मीठ, तेल घालून सैलसर मळून घेवून थोड्या वेळ ठेवावी.  नंतर छोटी गोळी बनवून, त्यात पुरण भरून, पोळी लाटावी, आणि तव्यावर  भाजून घ्यावी.तूप घालून सर्व्ह करावी.

दुसरी पद्धत अशी की,  वरील कणकीच्या  दोन लाट्या घेवून, दोन छोट्या पोळ्या लाटाव्यात. एकावर थोडे तेल आणि कोरडी कणिक भुरभुरावी, पुरणाचा गोळा नीट पसरावा, दुसरी पोळी वरून ठेवून,  कडा बंद कराव्यात. पोळी लाटून, भाजावी.

पुरणपोळी
तिसऱ्या पद्धतीत, फक्त मैदा,मीठ आणि तेल घालून सैलसर मळून पोळी करावी.
  



No comments:

Post a Comment