Wednesday, 20 August 2014

श्रवणाची सार्थकता प्रत्यंतर घेण्यातच असते!

श्रावण मासी हर्ष मानसी!!!!
'जें जें काहीं श्रवणी पडिलें । तितुकें समजोन विवरलें ।
तरी च कांहीं सार्थक जालें । निरूपणी  ।।'

समर्थ म्हणतात की  आपण जे काही चांगले श्रवण करतो, चांगले ऐकतो,  ते सर्व आपण नीट  समजून घेतले पाहिजे.  आणि फक्त समजूनच  घ्यायचं नाही,  तर त्याचे आपल्या आयुष्यात प्रत्यंतर  करावे, शिकून घ्यावे, आत्मसात करावे. तेंव्हाच त्या निरुपणाचे सार्थक झाले असे होईल.
म्हणजे कुणी काही चांगले सांगितले, तर  ते फक्त ऐकले आणि सोडून दिले  असे केल्याने  त्या सांगण्याचा काहीच उपयोग होत नाही. तेंव्हा उत्तम गोष्टींचे किंवा तुम्हाला उपयोग होईल असे ज्ञान जर कुणी तुम्हाला दिले, तर त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या  कल्याणासाठी करून घेतला म्हणजे सांगितल्याचे सार्थक होते .

पावसाळा आला, श्रावण सुरु   झाला आहे, आणि  चातुर्मास सुरु झाला आहे . अनेकविध  सण वार, व्रतवैकल्य  आहेत. त्या निमित्ताने गोड धोड पदार्थ होतात,  भाज्या, फळ  वापरून अनेक पदार्थ करून देवाला नैवेद्य   दाखवला जातो.  मला परवाच माझ्या काही मैत्रिणी म्हणाल्या की तु केलेल्या  केळ्याच्या पुऱ्या छान झाल्या  होत्या, तर आम्हाला त्याची रेसिपी दे. म्हणून त्या सर्व मैत्रिणीं साठी ही केळ्याच्या पुऱ्यांची रेसिपी…
केळ्याच्या  पुऱ्या


पिकलेली केळी  घेऊन,कुस्करून  घ्यावीत.  १ वाटी गर असेल तर १/२ वाटी  साखर,किंवा गूळ जे आवडेल ते  घालून, शिजवून घ्यावे. gas  वर तर करता  येतेच,पण  microwave मध्ये १०० % वर ३ ते ४ मिनिटे शिजवले की मिश्रण तयार होते. हे मिश्रण थंड करून , त्यात  मावेल एवढी कणिक आणि तांदूळ पिठी निम्मी निम्मी घ्यावी, (अंदाजाने १ वाटी पीठ लागेल.) त्यात थोडे मीठ, थोडे गरम तूप घालून पीठ हलक्या हाताने मऊसर भिजवून ,लगेच  पुऱ्या  करून त्या तळून घ्याव्यात. पुऱ्या थोड्या तुपाच्या हाताने प्लास्टिक पेपर वर थापाव्यात.
 ह्या पुऱ्या  नैवेद्याला पण करता येतात.

 असो, असेच सणवार येत राहतील, आणि छान  छान  पदार्थ बनत राहतील!

Sunday, 20 July 2014

पावसाळ्यातले चमचमीत खाणे

आषाढ महिना संपता संपता आता श्रावणाचे वेध  लागायला लागलेले आहेत. पाउस  दाखल झाला  आहे, सगळीकडे  मस्त हिरवेगार झालेले आहे आणि   पानाफुलांनी डवरलेले  वृक्ष  बघितले   की मूड पण मस्त होतो नाही का?

'मनीं धरावें तें होतें | विघ्न अवघेचि नासोन जातें |
कृपा केलिया रघुनाथे | प्रचित  येते ||'

हे समर्थांचे वचन अगदी खरे आहे, प्रचीती घेण्या सारखे आहे. म्हणजे भगवंताचे अधिष्ठान  ठेऊन कोणतेही कार्य केले तर   कार्यातील विघ्ने नष्ट होतात आणि सफलता मिळते, हे नक्की.  थोडक्यात, भगवंताची कृपा झाल्याची प्रचीती येते!  आयुष्यात इतर  अनेक प्रसंगी देखील  भगवंताची कृपा आपल्यावर कशी असते ह्याची  प्रचीती येते...
 
माझ्या आयुष्यातील एक प्रसंग सांगते. मी लखनौला असतांना, एकदा मोटरसायकल चालवीत असतांना,    मागून   वेस्पाने  धडक दिली. चालवणारे दोघे 10 वीचे विद्यार्थी होते,त्यांच्याकडे  लायसेन्स देखील नव्हते., आणि गाडीचे ब्रेक फेल होते!(हे त्यांनी नंतर काबुल केले ) तर माझ्या   गाडीने  एकदम वेग पकडला, आणि डावीकडे वळली, आणि रस्त्याच्या कडेला जे नाले असतात, त्या नाल्याकडे निघाली! तिथेच दोन माणसं  मोटरसायकल पार्क करून गप्पा मारीत होते. मी गाडी सोडून दिली, आणि त्यातल्या एकाला घट्ट  पकडले. आम्ही दोघे पडलो, पण मी वाचले, कारण पुढे नाल्यात बघितले, तर फक्त मोठे मोठे दगड होते, आणि मी जर  तिथे पडले असते तर काय झाले असते ह्याची कल्पना न केलेलीच बरी! तर मला नंतर असं  वाटलं, की मला गाडी सोडून देण्याची बुद्धी त्या भगवंतानेच दिली, आणि ते दोन गृहस्थ देखील  तिथे बहुधा मला वाचवण्यासाठीच उभे होते! भगवंताची कृपा म्हणते ती हीच!
मला आजही हा प्रसंग आठवला तर मी लगेच हात जोडून भगवंताचे आभार मानते!

 असो, आता महत्वाचा मुद्दा असा की पाउस पडत असतो तेंव्हा आपल्याला काहीतरी चटपटीत खावेसे वाटते, आणि तयारी पण जास्त असू नये असे वाटते नाही का? आजकाल बऱ्याच बसिक वस्तू रेडीमेड मिळतात त्यामुळे काहीतरी झटपट बनवणे सोपे झाले आहे,

रेडीमेड शेझवान चटणी चे नूडल्स
मी परवा  ' शेझवान चटणी ' चे रेडीमेड पाकीट आणले, आणि नूडल्स शिजवून त्यात  ही पेस्ट घालून फटाफट   नूडल्स बनवले होते. आणि गरम गरम खायला काय मजा येते, वाह! , हेच नूडल्स घरी  मसाला करून बनवायचे ठरवलं तर किती काम असतं मला माहिताय ना. म्हणून हे रेडीमेड पाकीट आणून केल्या नूडल्स . जुन्याच गोष्टीं मध्ये अडकून न पडता बदलणाऱ्या  जमान्या बरोबर आपण चालायला शिकलं पाहिजे . 

पालकाची मोठी जुडी स्वस्त मिळाली म्हणून  आणली,पण एवढ्या पालकाचे करायचे काय?
पालकाच्या पुऱ्या
मग आठवलं , पालकच्या पुऱ्या ! पुऱ्या करून लोणचं आणि दह्या सोबत खाऊन फस्त केल्या!


Saturday, 12 July 2014

गुरु पौर्णिमा

।।जय जय रघुवीर समर्थ ।।


 'गुरु ब्रह्मा गुरु विष्णू। गुरु देवो महेश्वरः ।
गुरु साक्षात परब्रह्म। तस्मै श्री गुरुवे नमः' ।।'

आज 'गुरु पोर्णिमा ' ,आपल्या गुरुजनांना   आठवावे, त्यांना वंदन करावे, प्रत्यक्ष जाऊन भेटता आले तर त्यांना नमस्कार  करून, फोन वरून संपर्क करून , त्यांचे आशीर्वाद घ्यावेत, त्यांनी दिलेली शिकवणीची शिदोरी पुन्हा एकदा उघडावी, आणखीन काही नवीन सापडते  काय ते पाहावे.  मंडळी, नक्की नवीन काहीतरी सापडेतेच  बर का !

समर्थांनी दासबोधात   गुरूंचे सतरा प्रकार  सांगितले आहेत. मंत्रगुरु, तंत्रागुरू , उस्तादगुरु, राजगुरू , कुळगुरु , विद्यागुरु, , कुविद्यागुरु , असदगुरू , यातीगुरू, मातागुरु, पितागुरु, देवगुरु , जगद् गुरु, असे सतरा प्रकारचे गुरु आहेत
पण ह्या शिवाय असे गुरु पण असतात जे आपल्याला आपल्या  व्यवसायात,जीवनात  मार्गदर्शन करतात, आपल्या  प्रगतीत त्यांचे मोलाचे स्थान असते. मुल जन्मल्या पासून आई  पहिली गुरु असते असे म्हणतात. तिथून आयुष्भर अनेक गुरु लाभतात, पण कुणाला   गुरुस्थानी मानण्या साठी, आधी  आपण उपकृत झालो आहोत ह्याची जाणीव असायला हवी, किंवा तेवढे आपण संवेदन शील असायला हवे.

आपल्यांला  गुरु कोठेही मिळू  शकतो. त्याला वयाचे, ज्ञानाचे, अनुभवाचे कुठलेच बंधन असत नाही. जो आपल्याला एखाद्या विद्येचे ज्ञान देईल, एखाद्या अडचणीतून मार्ग दाखवेल,  असा एखादा बोल बोलेल ज्यामुळे आपल्याला मदत होईल असा तो गुरूच जाणावा, आणि त्याचा योग्य तो आदर ठेवावा. आदर ठेवायचा  म्हणजे दर वेळी नमस्कार वगैरे केला पाहिजे असे नाही, पण आभार मानले, किंवा आपल्या मुखाने त्याचे कौतुक केले, दोन शब्दांनी कृतज्ञता व्यक्त केली, तरी चालते. पण मुख्य गोष्ट म्हणजे कधीही ह्या गुरूचा विसर न पडावा हे ध्यानात असू द्यावे .अशा सर्व गुरुंचे  स्मरण करण्याचा आजचा हा दिवस.

समर्थ पुढे म्हणतात की एवढे गुरु असूनही सदगुरू शिवाय मोक्ष प्राप्ती नाही, तेंव्हा सदगुरूच श्रेष्ठ गुरु.
'असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारू \
परी जो मोक्षदाता सदगुरू ।तो वेगळाचि  असे ।'

माझ्या आईनी  शिकवलेले चिरोटे म्हणजे बेस्ट ! आज तेच चिरोटे जेंव्हा जेंव्हा करते तेंव्हा तेंव्हा तिची आठवण काढते, आणि असे चिरोटे शिकवल्या बद्दल मनातल्या मनात तिला वंदन करते.शिवाय बोलून शुभेच्छा देते ते वेगळेच! आजच चिरोटे केले, गुरु पोर्णिमे साठी ….

खुसखुशीत चिरोटे
१ वाटी मैदा, १/४ वाटी एकदम बारीक रवा, १ टीस्पून कॉर्नफ्लोर आणि २ टेबलस्पून तूप गरम करून  घट्ट कणिक  मळून,२ तास ठेवावी .
थोडे कॉर्नफ्लोर आणि तूप नीट   घोटून गुलगुलीत करून ठेवावे.
कणकेचे छोटे गोळे करावेत. एक एक पोळी लाटून, त्यावर घोटलेले तूप नीट पसरावे. वरती दुसरी पोळी ठेवावी. अशा ५ पोळ्या त्यावर तूप लावून एकमेकावर ठेवून, त्याची घट्ट  गुंडाळी करावी. आडवे कापून छोट्या लाट्या करून हलक्या हाताने रेषा वरती येतील असे लाटून, हे चिरोटे तुपात तळून घ्यावेत. शेवटी   पिठी साखर भुरभुरावी , आणि सर्व्ह करावेत.

माझ्या सर्व गुरुजनांना वंदन! त्रिवार वंदन!!

Tuesday, 17 June 2014

आंब्याचा सरता सीजन

माझ्या ब्लॉगचे १११ पोस्ट्स झाले,  उत्साह पण  वाढतो आहे. लोणचे घालून झाले , आणि आंबे पण संपत आले. तेंव्हा म्हटलं, आत्ता आणखीन काही पदार्थ करायचे असले तर करून घ्यावेत. मग आंब्याच्या पुऱ्या केल्या .
आंब्याच्या पुऱ्या
१ वाटी आंब्याच्या  रसात १ १/२ वाटी साखर घालून रस आटवून घ्यावा.  थंड झाल्यावर त्यात मावेल एवढी कणिक आणि  तांदूळ पिठी घालावी, थोडे मीठ घालून, त्यात वेलची  पूड,घालून पीठ मऊसर मळून घ्यावे. प्लास्टिक शीटवर छोट्या पुऱ्या हाताने   थापून तळून घ्याव्यात. तूप घालून सर्व्ह कराव्यात.

आता  शाळा सुरु झाल्या आहेत, आणि सर्व आयांची पण धडपड पुन्हा सुरु झाली आहे. आता पुन्हा शाळेची तयारी, डबा , डब्याचे पदार्थ रोज काय करायचे हा प्रश्न रोजच  राहणार !! असो, मला ह्यातली कोणतीच चिंता  नाही,त्यामुळे मी आपली वेगवेगळे पदार्थ   करायला मोकळी आहे न!!

म्हणजे बघा हं , पर्वा सुरणाचे कटलेट्स बनवले …
सुरण शिजवून   mash करून त्यात मीठ,  तिखट,हिरवी मिरची तुकडे, गरम मसाला , कोथिंबीर आणि त्यात मावेल  एवढे बेसन घालून, कटलेट्स बनवून डीप   फ्राय करून sauce बरोबर सर्व्ह करावेत.

 

Tuesday, 10 June 2014

आंबा, आंबा, ....आणि आणखीन आंबा

हापूस आंबे आणले की   काय काय करता येईल त्याचे विचार चालू होतात. माझी एक आवडती रेसिपी म्हणजे आंब्याचा सुधारस …. इतर वेळी  पटकन साखरेचा पाक करून केळीचे तुकडे टाकून सुधारस करतेच, पण आंबा असला की मात्र आंब्याचाच सुधारस …
आंब्याचा सुधारस

साखरेचा पातळसा  पाक  करून ,  त्यात वेलची पूड, केशर, काजू तुकडे, , बेदाणे, आणि हापूस आंब्याचे तुकडे घालून वरून साजूक तूप घालून पोळी  सोबत  द्यावे.

साखरांबा
आंब्याचा जसा गुळांबा, तसा साखरांबा केला आणि भार छान जमून गेला !

१ वाटी कैरीचा कीस थोडा परतून शिजवून घ्यावा , ३ ते ४ मिनिटे लागतात. नंतर १ १/२ वाटी साखर घालून, मंद आचेवर ढवळून साखर आळे पर्यंत   ठेवून उतरवावे.  ४ मिनिटे सरासरी लागतील .  सोडियम बेन्झोएट  चिमुटभर घालून ठेवावे.

  तसा आता आंब्याचा  सीझन संपत येईल, आणि त्या आधी आंब्याचे वर्षभराचे लोणचे घालायचे आहे !

Wednesday, 14 May 2014

निसर्गाचे अनेक चमत्कार !


आज सकाळी आंब्याच्या झाडाकडे बघता बघता, मला अचानक एक घरट दिसलं!! इतकं  छान वाटलं ते घरट पाहून ! आणि जवळ जाऊन डोकावून पहिल तर त्यात पक्षाने अंड पण दिलं होतं !! लगेच फोटो काढला आणि माझ्या ब्लॉग वर टाकला! बघा किती कुशलतेनं घरट बांधतात पक्षी !!

साधं गवताच्या काड्या पण गोल सुरक्षित घरट , आणि त्यात उबेसाठी कापूस, पंखांचे तुकडे ! वाह ! मानलं ह्या पक्ष्याला!!

असाच चिमणीच्या घरट्याचा आभास निर्माण करणारी चाटची रेसिपी …. 

बटाटे किसून घ्यावेत, १ वाटी बटाटा कीस  असेल,तर १ टेबलस्पून कॉर्नफ्लोर आणि थोडे मीठ घालून, घट्ट  मळून घ्यावे. चहाच्या स्टील च्या गाळणीला आतून हा लगदा गोल  लावून,दाबून बसवावा. तसाच गरम तेलात  सोडून,खरपूस तळून घ्यावा. ही घरटी थंड   झाली, की त्यात भेळ, किंवा मिक्स्ड बॉईल्ड भाज्या, कॉर्न भेळ , असे कोणतेही फिलिंग भरून द्यावे. उन्हाळ्यासाठी उत्तम डिश आहे.

आज दुपारी ठीक १२ वाजून ३० मिनिटांनी बाहेर सुर्य उजेडात उ भे राहिले असता, आपली सावली आपल्या पायाच्या खाली दिसणार होती . म्हणून उठून  गेले,पहिलं  आणि खरच तसचं दिसलं ! हा खगोलशास्त्रीय चमत्कार! हे लहानपणी देखील आमच्या वडिलांनी दाखवल्याचं चांगलं आठवतंय! 

३_४ दिवसां पूर्वी आकाशात मंगळ आणि शनि हे ग्रह दिसले. ह्यातला शनी उघड्या डोळ्याने सहसा दिसत नाही, आणि तो पृथ्वीच्या अगदी जवळ होता , म्हणून हा चमत्कार बघून आनंद वाटला . तसं धुमकेतू पण बघितला आहे, फार exciting moment असतो तो पण, कारण काही क्षणातच  धुमकेतू नाहीसा होतो !! 

आणखीन थोडे आंबा महात्म्य

चाणक्य, कौटिल्य , विष्णुगुप्त , ही सर्व नवे कुणाची ? अर्थात अर्थशास्त्रावर 'कौटिल्य अर्थशास्त्र ' ह्या महान ग्रंथाचे लेखक चाणक्य!  त्यांची ही कथा म्हणजे आजच्या लूटमारी करणाऱ्या मंडळींना कानउघडणी किंवा डोळे उघडणी म्हणता येईल. आजकाल दुसऱ्या च्या जीवावर आपले कल्याण करण्याकडे कल व वाढलेला दिसतो. म्हणजे फुकट जे जे घेत येईल, ते ते घ्यावे, आपल्या खिशाला चाट न  लावता, दुसऱ्याच्या खिशातून कसे लुटता येईल हे बघितले जाते. फार भयंकर परिस्थिती आहे ही फुकटेपणाची .

तर कौटिल्य जेंव्हा ह्या वरील ग्रंथाचे लेखन करीत  होते,त्या वेळची ही गोष्ट आहे. एक रात्री समईच्या उजेडात लिखाण करीत बसले असता, एक विद्वान त्यांच्या सोबत काही महत्वाच्या बाबींवर चर्चा करण्या साठी आले असता, चाणक्य यांनी त्यांस बसायला सांगितले. त्यांचे लेखन  झाले,तसे त्यांनी समोरची समई विझवली, आणि दुसरी  समई लावली . तेंव्हा त्या विद्वानांना  आश्चर्य वाटले आणि ते विचारते झाले  की, असे करण्याचे काय कारण ?

चाणक्य म्हणाले, 'मी अर्थशास्त्रावर ग्रंथ लिहितो आहे, तो मी  माझ्या राजा साठी लिहित आहे, आणि ह्या कामासाठी मला राजाने ही समई आणि तेल दिले आहे. हे सर्व हे राजकार्या साठीच वापरतो. तुम्ही माझ्या कडे दुसऱ्या कामासाठी आलेले आहात, जे राजकार्य नाही. म्हणून मी ही समई विझवली, आणि माझी समई लावली. ह्यातली वात आणि तेल माझ्या खर्चाने आणले आहे. '

विद्वान म्हणाले 'एवढ्याश्या खर्चाने राजाला काही नुकसान होणार का ? त्यांची समई तेल तुम्ही व्यक्तिगत कामासाठी वापरलेत हे त्यांना कळणार आहे का ? आणि कळले तरी ते तुम्हाला काही म्हणतील का ? मग हे सर्व कशा साठी ?'

तेंव्हा चाणक्य उत्तरले,' प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने असा विचार केला तर खर्च आकाशाला भिडायला वेळ नाही   लागणार. आणि राजाला जरी माझे वागणे कळले नाही तरी माझ्या मनाला कळणारच की ! माझ्या मनाला हा राजद्रोह वाटतो. मग मी असे का वागावे ?' विद्वान खजील झाले!

असो, खूप बोधामृत झाले आता जरा शांत बसून मस्त थंडगार पन्ह प्यावं,  हो ना ?

पन्ह्यासाठी कैरीचा   गर
हे पन्हे  करण्या साठी : मस्त हिरव्यागार कैऱ्या आणल्या, उकडून घेतल्या, गर काढला . १ वाटी   गराला २ वाट्या साखर  घालून,मिक्स करून रात्रभर ठेवून दिले.  सकाळी मिक्सर मधून  फिरवून घेतला, त्यामुळे त्यात रेषा किंवा गुठळ्या रहात नाहीत. शेवटी वेलची  पूड,केशर पूड घातली , आणि बॉटल मध्ये ठेवून दिले.

आंबा पन्हे
आता पाहिजे तेंव्हा हा गर, पाणी, आणि बर्फ घातला, की गारेगार पन्हे  तयार !बाजारात मिळणाऱ्या बाटलीबंद  पन्ह्याला ह्या घरी  केलेल्या पन्ह्याची सर नाहीच येणार !