Tuesday, 9 August 2016

सुंदर क्षणांची मालिका.... आमच्या भानुप्रियाच्या लग्नाचा दिवस!


आणि लग्नाच्या दिवशी, तर अनेक सुंदर सुंदर क्षणांची मालिकाच लागली होती! ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने विवाह विधी पार पडला. सुटसुटीत, आटोपशीर,अत्यंत पद्धतशीर असा लग्न विधी. आणि मुख्य म्हणजे श्लोकांचे अर्थ सांगितले जातात, वधु वरांना अत्यंत शांत आणि सुगम्य भाषेत विधी समजावून त्यांच्या कडून करून घेतले जातात  घाई नाही, गडबड नाही, सगळं कस नेटकं आणि छान!

संकल्प, देवता पूजन, पुण्याह वाचन, कन्यादान,अक्षता रोपण ,मंगलसूत्र बंधन, पाणिग्रहण, विवाह होम, प्रधान होम, लाजाहोम, अग्नीला प्रदक्षिणा,अश्मारोहण, सप्तपदी, वधू वरांना आशीर्वाद म्हणून सर्व  ज्येष्ठ मंडळींनी त्यांच्या मस्तकावर  पवित्र जलाचा केलेला अभिषेक,आणि शेवटी मंगलाष्टकांनी होणारी सांगता! किंवा मी म्हणते तसं एका मंगल  पर्वाची सुरुवात! असा  हा दीड  दोन तासांचा सुमंगल  सोहळा!

लग्न विधींना  सुरुवात झाली तेंव्हा मी खूप आनंदात होते.  पण कन्यादान करतांना मात्र गंभीर  व्हायला झालं. मनात अनेक  भावना तरंगून जात होत्या. सिनेमात दाखवतात तसं मन फ्लॅशबॅक मध्ये सर्व  काही बघून  आलं...भानूचं बालपण,  मोठी होतानाचे तिचे मोरपंखी दिवस,नोकरीचे दिवस,आणि आता लग्न!

सर्व विधी मी डोळे भरून पहात होते. माझ्याकडच्या मंडळीं कडून छोट्या छोट्या गोष्टींची पूर्तता करण्याची लगबग करत होते, एकीकडे थोडे व्याही मंडळीं कडे लक्ष देत होते. असं सर्व चाललं होतं! त्या धावपळीत देखील मजा होती.

 होमहवन झालं  आणि ऋषिकेशला भाऊ म्हणून कानपिळीचा मान मिळाला! हा एक गमतीशीर पण  धार्मिक विधी नसूनही परंपरेनं चालत आलेला फार महत्वाचा विधी आहे. भाऊ कान पिळून सांगून देतो, आमच्या बहिणीला त्रास द्याल तर मी तुमचे कान असे उपटीन बरं का!

 मंगल अभिषेक झाला, सर्वांनी तोंड भरूनआशीर्वाद दिले, आणि मंगलाष्टकांना दोन्ही मामा उत्साहाने,आनंदाने अंतरपाट धरून उभे राहिले ! सचिन आणि नितीनची ह्या बाबतची एक गम्मत आहे! गेल्या दोन तीन वर्षांपासून ते सारखे भानुप्रियाला म्हणायचे की लग्न लौकर कर म्हणजे आम्हाला आमचे  ठेवणीतले सूट घालता येतील! जेंव्हा ते दोघे अंतरपाट धरून उभे राहिले मला एकदम  तो किस्सा आठवला आणि हसू आलं! त्यांना आता संध्याकाळी सूट घालायला मिळणार तर!

तर मंगलाष्टकांना सुरुवात झाली, वधूला त्या मंगलमय ओळींमधून दिलेला संदेश ऐकला आणि ऐकता ऐकता माझं मन एकदम  एकाग्र झालं.  आत्ता पर्यंत लग्नाच्या घाईगडबडीत असलेल्या माझ्या  मनात मोठी उलघाल झाली, आणि डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहायला सुरुवात झाली, ते प्रत्येक अष्टकांना वाढतच चालले होते !सर्व बांध फुटले आणि निःसंकोच रडू येत होते! पण आतून आनंदही  होत होता! पण मग ही वेळच अशी असते! भानूची आजी, मावशी  मामी, मैत्रिणी तर रडत होत्याच, पण त्या क्षणी तिच्या आजोबांनाही अश्रू आवरले नाहीत. आजी आजोबा तर फारच सद्गतीत झाले होते! माझ्या आई  बाबांना असे भावविवश होतांना फारच  थोड्या प्रसंगी पहिले आहे. पण ह्यावेळी मात्र त्यांच्या सर्वात लाडक्या आणि त्यांना फार अभिमान असलेल्या नातीच्या  लग्नातला हा सर्वात हळवा  क्षण होता!  पूर्वीच्या काळी आई लग्नाच्या ह्या मंगलाष्टकां प्रसंगी तुळशीला पाणी घालायची, त्या प्रथे मागे हे अश्रुंचे बांध आवरता यावेत आणि ते अश्रू कुणालाही दिसू नयेत हीच भावना असावी. आज तर हे लिहितांना देखील मला रडू येईल की  काय असे वाटत असतांनाच थोडे रडायला आलेच. सर्व आयांचे असेच होते! पण आम्ही ठरलो प्रगत विचारांच्या महिला! माझी वाहिनी पण म्हणाली काही नाही हेमाताई,तुम्ही इथेच थांबायच मंगलाष्टकांना आणि सर्व विधी पाहायचा. तुम्ही नाही पाहणार तर मग कोण पाहणार?अगदी बरोबर! कारण मग तो सोहळा मी miss केला असता आणि म्हणून तिथेच राहिले झालं!

आता विवाह विधींची समाप्ती झाली आणि फोटोंची लगबग सुरु झाली! लग्नात वधूवरांपेक्षा नातेवाइकांनाच  जास्त घाई  असते फोटोची  ! खूप हसू येतं! अर्थात त्यांचा स्नेह आणि मुलांवरच प्रेमच ह्याला कारण!असो . त्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला, भानुप्रिया आणि  रविशंकरसाठी खास सुशोभित केलेल्या चांदीच्या ताटां भोवती सुंदरशी फुलांची मखर  सजवली होती, आणि सर्व  मंडळींना ते दोघे आग्रह करून आले आणि जेवायला बसले. दोघांनी छानसे उखाणे घेत एकमेकांना घास भरवले! खूप मजा आली! आता ते दोघे पण थोडे थोडे रिलॅक्स झाले होते. सकाळचं  नाही म्हटलं तरी  थोडं  दडपण होतंच. आणि हो, भानुप्रिया आणि रविशंकर दोघांनी संध्याकाळी पण छान उखाणे घेतले !खूप मजा आली. आजकाल मुलींना उखाणे येतही नाहीत, आणि लाजतात का attitude दाखवतात माहित नाही, पण जावयांनी वरचढ उखाणे घेतले आणि सर्व काही मजेत झालं!


आता संध्याकाळच्या रिसेप्शच्या तयारीला लागायचं होतं! त्यातच थोडे सर्व पाहुण्यांना भेटले, गप्पा झाल्या, बरं वाटलं! आणि पुन्हा लगबग, मेकअप,साड्या..... सुरु!



 
  

Sunday, 7 August 2016

आता लगीन घाई झाली हो!!!

 तर लग्नाची गोष्ट पुढे.....
८ एप्रिल रोजी आमच्या घरी ग्राहमखाचं पूजन झालं, देवांना लग्नासाठी शुभाशिर्वाद देण्याचं आमंत्रण दिलं आणि दारी  लग्नाचा मंडप पडला! व्याही आले, सोबतच घरातील सर्व मंडळी आली आणि पूजेत सहभागी होऊन, प्रसादाचे भोजन करून गेले.  त्या दिवशी सर्वांची थोडी जुजबी तोंड ओळख झाली. रेणू सचिन आणि मृणाल विक्रम मुलां सोबत आले होते. रेणू सचिन आणि मुले तर ऑस्ट्रलिया होऊन आले होते त्यांच्या भावाच्या लग्नाला. खूप ;छान वाटलं त्या दिवशी. सर्वांनी हौसेने   बांगड्या भरल्या,मेंदी लावून घेतली, खूप धमाल आली! पण विशेष म्हणजे मला काहीच दडपण नाही आलं! कारण आपण कुणाला आपल्याहून वेगळं समजलं, की त्याच्या सरबराईचे दडपण  येते. पण एकदा ही सर्व मंडळी आपलीच आहेत, एक्सटेंडेड फॅमिली आहेत असे मानले की मग आपल्या घरचेच होतात ते.

मग ९ तारखेला सकाळी  हळदीच्या  आणि लग्नाच्या बारीक सारीक जमवाजमवीला , तयारीला वेग आला . आई  बाबा ,प्रमोदिनी, अश्विनी   घरी होते. मग संध्याकाळी...
'पिवळ्या पिवळ्या हळदीने ... खुलवा गोऱ्या रंगला!'
हळद लावा अंगाला बाई हळद लावा अंगाला"
असे  म्हणत,कौतुकाने,मायेने आणि डोळ्यांच्या ओल्या कडा पुसत  भानुप्रियाला हळद लावून, सुवासिक तेल आणि उटणं लावून न्हाऊ माखू घातली, आणि नवरी पिवळी पिवळी झाली, लग्नाला सज्ज झाली!   मनात अनेक गाणी तरळून गेली!
"नवराई माझी लाडाची लाडाची ग..
अप्सरा जणू इंद्राची इंद्राची ग!" आणि अशी अनेक!

आता लेक  लाडकी ह्या घरची होणार होती सून त्या घरची! अनेक वर्षां पासून  संस्कारांची, विचारांची, आनंदाची, आणि जीवन जगण्याबाबतच्या कले  विषयी जे काही मला सांगता आलं ती विचारांची शिदोरी तिला सोबत दिली होती ह्या विश्वासाने कि ह्यातील थोडे थोडे लागेल तसे ती  आपल्या आयुष्यात वापरेल, आणि आयुष्य समृद्ध करेल,स्वतःचे आणि घरातील सर्वांचे.

रात्र गप्पा मारण्यात घालवली आणि पहाटे उठून, आवरून, देवांना नमस्कार करून, लग्नासाठी वऱ्हाड  गाडीत बसलं, शुभ संकेताचा नारळ फोडला, आणि हॉटेल कडे प्रस्थान ठेवलं!      


Saturday, 6 August 2016

मैत्री .... भावना आणि अविष्कार

HAPPY FRIENDSHIP DAY !!!

आज जागतिक  मैत्री दिवस! आजच्या दिवशी सर्व   मंडळी आपापल्या मित्र मंडळींना   शुभेच्छा देण्यासाठी सरसावले असतील. कुणी मोबाईल  वरून,कुणी प्रत्यक्ष भेटून.  कुणी सहलीला  भेटतील, कुणी घरीच एन्जॉय करतील, माणसं तितक्या ओकेशन सेलिब्रेट करायच्या कल्पना!  थोडक्यात काय तर  कोणताही आनंद व्यक्त करण्यासाठी मैत्री   हवीच ना ? पण  माझ्या मते मैत्री साठी हा डे   कशाला हवा? मित्र तर आपले नेहमीच असतात, आपण नेहमीच एकमेकांशी संपर्कात  असतो. मग रोजच मैत्रीचा दिवस आहे की! पण काय  आहे ना, आजकाल हे  फॅड  ना  डे सेलीब्रेट करायचं! तर असो.
पण  मैत्री म्हटलं की लोकांच्या मनात येतात ते स्त्री आणि पुरुष असे मित्र मैत्रिणी किंवा आपल्या  नातेवाईकांच्या व्यतिरिक्त बाहेरचे लोक! पण असं  काही नसतं,  असं आपलं मला वाटतं.मैत्री कुणाशीही जमू शकते.

मैत्री म्हणजे नक्की कोणत्या भावना असतात? किंवा कोणत्या भावना असल्या म्हणजे मैत्री आहे असे समजते? मैत्री मध्ये एकमेकांच्यात  बाबतीत तुलना ,असूया, द्वेष, राग,लोभ, मोह, मत्सर  थोडक्यात" षडरिपू "नसावेत. (काम, क्रोध,लोभ,,मद, मोह आणि मत्सर हे   सहा  नकारात्मक भाव आहेत,ज्यांच्या अयोग्य  वापराने माणसाची अधोगती निश्चितअसते ).

हे भाव  सकारात्मक पण आहेत बरं का  बघा हं.. योग्य प्रमाणात राग यावा, योग्य प्रमाणात लोभ हवा पण दुसऱ्याच्या हक्काच्या वस्तूंवर नाही, थोडा मद म्हणजे अहंकार हवा,कारण  त्याने आपण सुखावतो आणि पुढे प्रगती करण्यासाठी प्रेरणा मिळते. मोह तर प्रत्येकालाच असतो   कशाचातरी , पण लोभ दुसऱ्याच्या   अधिकारातल्या वस्तूंचा नसावा.. पण  मत्सर मात्र कधीच करू  नये

तर मग मैत्री  मध्ये असावं काय? मैत्रीमध्ये असावा निखळ प्रेमाचा गंध! मैत्री म्हणजे विश्वास, आधार,मदतीसाठी सदैव असलेली तत्परता.
मैत्री मध्ये असावी निर्व्याज्य प्रेमाची देवाण घेवाण, असं प्रेम, जे काही मागत नाही पण देण्यास तत्पर असतं आणि जे   काही  मिळालं तर  त्याचा प्रेमानं, विना तक्रार स्वीकार करणारं!

माझी तर अगदी लहान मुलांशी देखील मैत्री जुळते ! वयस्कर लोकांशी देखील मी बोलू शकते. teenagers आणि मोठी माणसं  मला कुणीही चालतं बोलायला, मैत्री करायला.. मैत्री होण्या साठी किंवा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होण्यासाठी  लागतो मनाचा  सच्चेपणा, दिलखुलासपण. आपली पायरी न ओलांडता, आपली विषयांची मर्यादा न सोडता मोकळेपणाने एकमेकांशी अनेक विषयांवर, अनेक मुद्द्यांवर, बोलता यायला हवं . एकमेकांचा योग्य आदर ठेवून, एकमेकांच्या  खाजगी  आयुष्यात अती खोलात जाऊन चौकशी  करण्याचे टाळून गप्पा मारता यायला हव्यात किंवा संवाद साधता यायला हवा.

मी माझ्या भाच्चे मंडळींशी पण एक मित्रा सारखी वागते. मैत्री होण्यासाठी त्यांच्या आवडीच्या विषयांवर   बोलते ते त्यांना भावतं. मग त्यासाठी आपल्याला पण त्यांच्या विश्वातील   चालू घडामोडी, त्यांच्या विश्वातल्या नवीन गोष्टी,त्यांच्या वयाच्या समस्या, इतर अडीअडचणी ह्याबाबत   आपलं ज्ञान वाढवलं पाहिजे. त्यांच्याशी सूत जमवता आलं पाहिजे. मग ते पण आपल्या मनातल्या गोष्टी सांगतात विश्वासानं, आणि मैत्रीचं नातं जुळतं, थोडक्यात up to date रहावं लागतं . वयस्कर माणसांचं पण तसंच आहे त्यांच्या आवडीचा विषय घेतला कि ते खूप बोलतात. मग त्यांना आपण सारखं  त्यांच्याशी बोलावं असं  वाटतं  आणि मैत्री होते.

आता आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तर माझे आई आणि वडील हे देखील मित्रां प्रमाणेच आहेत! एकमेकांना एकमेकांच्या मनातले पूर्णपणे समजते काही न सांगताच! किती तरी वेळा फोनवरच्या" हॅलो"तून देखील समोरच्याचा मूड, तिथली आजूबाजूची परिस्थिती, ओळखता येते. समोरची व्यक्ती आनंदात आहे, कि काही टेन्शन मध्ये आहे, का दुःखात आहेत की अतिशय  सुखात आहे हे समजतं  ! पण त्या साठी हवी तदात्म्यता एकमेकांशी!  संवाद! हे म्हटलं तर सहज शक्य आहे, म्हटलं तर खूप अवघड आहे. पण अशक्य मात्र नाही बरं का!

जिथे विचारांची मोकळीक नाही,अहंकार  आहे   आणि तिथे मैत्री  होऊ शकत नाही .. पण एकदा का सूर जुळले, मग ती  मैत्रीची  वीण एकदम घट्ट बसते,आयुष्यभरासाठी सुद्धा!                  

Friday, 5 August 2016

लग्नाच्या तयारीची धामधूम!


 आता आम्ही तिघे जोमाने कामाला लागलो. कामांची यादी करून रोजच्या रोज बाजाराकडे पाऊले वळायला लागली. आता लग्न म्हटलं की साड्या आणि दागिने आलेच! त्यात  लाडक्या लेकीचं लग्न! आणि साड्या दागिने म्हणजे मुलीच्याच नाही तर समस्त स्त्रीवर्गाचा जिव्हाळ्याचा आणि कुतूहलाचा विषय! आणि पुरुषही काही मागे नाहीत कारण त्यांना हा एक चेष्टेचा आणि मस्करीच्या विषय असतो!

लग्नात घालवायचा आणि सोबत पॅक करायच्या कपड्यांचे, वस्तूंचे व्यवस्थित नियोजन केले होते  त्याप्रमाणेच खरेदी होणार होती. लग्नात घालायच्या साड्या बाबत आमचे ठोकताळे नक्की होते. नाशिक मधल्या नामवंत पेढीं मधून दागिने आणि सर्वोत्तम दुकानांतून साड्या खरेदी झाली

जशी मजा अंगठ्या खरेदी करतांना आली, तशीच मजा साड्या खरेदी आणि दागिने घेतांना  आली! साडी बघायची, ट्राय करायची, ह्यात वेगळीच मजा होती.बनारसी शालू, पैठणी नऊवारी, रिसेप्शन साठी छानशी जॉर्जेट,किंवा शिफॉन असे ठोकताळे  होते . त्यामुळे कुठे कंफ्युजन  नाही, गोंधळ नाही. एकदम झटपट आणि मनासारखी खरेदी होत होती. अरे हो, साडी वरून आठवलं ... आम्ही अंगठी खरेदीला गेलो तेंव्हा कपडे पण घेतले होते. तेंव्हा मला रविशंकरनी एक सुंदर साडी घेऊन दिली! तशी मी खूप  साड्या  वापरते,पण हि साडी  अमूल्य आहे! जावयाचा  महिमा दुसरं काय? आणि आपलं कुणीतरी केलेलं कौतुक!! ते फार महत्वाचं असतं! मी पण त्यांचे नेहमीच कौतुक करते. आणि मुलासारखे कौतुक करावेसे वाटते. आता तर तिच्या पेक्षा त्यांचेच कौतुक जास्त करते मी!

मग दागिने खरेदी!नामवंत सोनारां कडून दागिने खरेदी झाली कारण लग्नाचे दागिने म्हणजे सगळं कसं  व्यवस्थित व्हायला हवं ना ...  शुधदता, चोखपणा , योग्य  वजन, किंमत आणि मुख्य म्हणजे सोनाराच्या नाव लौकिक हे सगळं बघावं लागतं. मग जुन्या पेढीच्या  सराफां कडून मंगळसूत्र,हार, बांगड्या असे पारंपरिक दागिने खरेदी केले, आणि काही डेलीयूज साठी ट्रेंडी ज्वेलर्स कडून नवीन घडणीचे नाजूक दागिने घेतले. दागिने  बघतांना तर  डोळ्यांचे पारणे फिटत होते. वेगवेगळे  अलंकार,त्यांची नावे, घडणावळ, डिझाइन्स, पॅटर्न्स..  बाप रे! हौस हौस म्हणजे किती करायची?. पण साड्या काय आणि दागिने काय, आम्हाला पसंतीला अजिबात वेळ लागत नव्हता... कारण आम्ही  दोघी चोखंदळ आणि कोणतीही पसंती पटकन करण्याचा फार जुना अनुभव आहे ना!!(हे आपलं स्वतःच स्वतःचं कौतुक करून घेणं झालं बरं  का!!) उगीचच आपलं!! असो,  हे सर्व क्षण हृदयात साठवून  ठेवले आहेत , कारण फक्त ते क्षणच माझे आहेत.

पूर्वी जाहिरातींतून,चित्रांतून, गोष्टींतून, गाण्यांतून लग्नाबद्दल ऐकायचे, वाचायचे, बघायचे तेंव्हा ते सगळं मनात साठवून ठेवायचे. लग्नात करायचे सर्व विधी मी मनात नोंदवून ठेवल्या सारखेच होते.आणि त्याला अंशतः जबाबदार आहे माझ्या स्वतःच्या लग्नाचा व्हिडीओ बरं का!(गम्मत नाही खरंच  आहे ते!!) आणि मग  तयारी पुढे सरकली! आणि बघता बघता ८ तारीख आली की!दारात मांडव पडला आणि लग्न घडी जवळ येऊन ठेपली!




  

शुभ मंगल सावधान!!!!


 दीड वर्षा पूर्वी १० एप्रिल २०१५ ला भानुप्रियाचे लग्न झाले, आणि एक वर्ष खूप मजेत आणि अर्थात पटकन गेले. एप्रिल मध्ये लग्न झाले, आणि त्यानंतर प्रत्येक सण वार साजरे करण्यात, मुलीचे आणि जावयांचे कौतुक करण्यात वर्ष झटपट गेले. कळले देखील नाही, आणि वर्षसण सुद्धा साजरा केला!  लग्नाच्या आठवणी अजून कालच लग्न झाल्या सारख्या आहेत. पुन्हा पुन्हा आठवावेत असे क्षण! आणि एकीकडे थोडं भावनाविवश व्हायला होतं पण सगळं व्यवस्थित पार पडलं ह्याचे समाधान आहे.

लग्न इतक्या झटपट ठरलं कि काय सांगू? चांगलंच आठवतंय मला कि ८ मार्च २०१६ ला मुलाकडच्यांचा फोन आला आणि लगेच बंगलोरला यायचे असा बेत झाला .आम्ही  गेलो, एकमेकांची प्राथमिक  पसंती झाली. आणि  आम्ही घरी नाशिकला परत येई  पर्यंत त्यांनी नाशिकला  येणार म्हणून कळवले देखील! मग काय? नुसती घाई झाली! आणि १३ तारखेला रविशंकर आणि त्यांचे वडील  आले,घर पाहिलं, पुन्हा एकवार भेटणं बोलणं झालं, आणि साखरपुडाच करायचा ठरलं! इतक्या झटपट!! तर मग घरची मंडळी जमली, भानूचे आजी आजोबा, काकू अशा महत्वाच्या लोकां समक्ष १४ तारखेला  साखरपुडा झाला!





 ।।  शुभम भवतु।।

 साखरपुड्यासाठी अंगठी खरेदी त्याच दिवशी संध्याकाळी झाली. आम्ही तिघे गेलो होतो अंगठी खरेदीला. खूप मजा आली. मला तर काही वेगळंच वाटतं होतं. म्हणजे भानूचं लग्न ठरलं? किती छान भावना होती ती!

 नवीन नवीन लग्न ठरलेली मुलगा आणि मुलगी एकत्र बघायला फार मजा वाटते! आपल्याला पण एकदम तरुण झाल्या सारखं वाटतं! खरंच ! मंत्रमुग्ध वातावरण होतं तेंव्हा! ते दोघे तर भारावलेले होतेच, माझी पण मनाची अवस्था वेगळीच होती!  थोडी हुरहूर, काळजी, आणि डोळ्या समोर एक्दम लग्न दिसायला लागलं ! म्हणजे घाई गडबड, तयारी, आमंत्रणं , लग्नाची तयारी, कपडे, दागिने, हॉल, काही विचारू नका!

पण  सगळ्यात सुंदर भावना होती ती म्हणजे जेंव्हा रविशंकरनी मला आई म्हणून संबोधलं तेंव्हा! मनात एक वेगळीच आनंदाची, ममतेची लहर तरंगून गेली ! कारण अभिषेकच्या  तोंडून मला आई हाक ऐकायला मिळाली नव्हतं. भानूची 'आई' हि हाक कानी होती. त्यामुळे त्या दिवशी मनाच्या एका खोल कप्प्यातली इच्छा पूर्ण झाली ! मला खूप आनंद झाला! आनंदाने डोळ्यात आलेले अश्रू मी हिमतीने मागे ढकलले आणि येणाऱ्या नवीन वाटचालीसाठी  सज्ज झाले!

घरी परत आलो, पुरणपोळीचा बेत होता. सगळ्यांची जेवणं झाली, ते दोघे हॉटेल वर परत गेले आणि मग थोडी उसंत मिळाली!  घडलं ते पूर्णपणे पुन्हा मनाशी उजळणी केली आणि मग...... आम्ही तिघे  एकदम  सरसावलो  आणि  लग्नाच्या तयारीचा आढावा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे झोप येणारच नव्हती! आनंदामुळे!

आणि लग्नाची तारीख ठरली १० एप्रिल! म्हणजे बरोबर ३ आठवडे होते फक्त! तर मग घेतलं पेन आणि डायरी आणि दुसऱ्या दिवशी पासूनचे नियोजन सुरु झाले!





Thursday, 4 August 2016

मध्यांतरा नंतर........


'समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।"        ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
 

 आज बरोबर दोन वर्षांनी पुन्हा ब्लॉग लिहायला घेतला आहे.  मध्यंतरी काही तब्येतीच्या तक्रारीं मुळे ब्लॉग लिहायला जमले नाही.आयुष्याच्या मध्यावर काही तब्येतीच्या तक्रारी झाल्या आणि त्यांचा धीराने, नेटाने आणि मुख्य म्हणजे योग्य औषधोपचाराने सामना करून त्या त्रासाला  पळवून लावण्यात यश आले. पण ह्या २ वर्षाच्या अवघड आणि नाजूक वळणावर मला अनेकांची साथ मिळाली... माझी मैत्रीण, माझ्या बहिणी, माझे आई वडील, आणि आणखी  बरेच जण. सर्वांनी हिम्मत दिली, बळ दिलं, साथ सोबत दिली. पण ह्या सर्वां बरोबर किंबहुना ह्या सर्वां पेक्षा जास्त साथ सोबत आणि खंबीर मदत मिळाली भानुप्रियाची !तिच्या मदती शिवाय आणि तिने दिलेल्या मानसिक बळा शिवाय हा प्रवास सुकर झाला नसता हे नक्की. जशी मी तिला हिमतीने लहानाची मोठी केली, कष्ट घेतले, कधी रागावून, कधी समजावून, कधी खेळीमेळीने तिला योग्य वळण लावण्याचा प्रयत्न केला, तिला हिमतीने जगायला   शिकवले तसेच काहीसे ह्या वेळी झाले, फक्त आता मी तिची मुलगी झाले होते! त्यामुळे तेच सगळे खेळ तिने मला लागू केले आणि मला आजारातून बाहेर पडायला मदत केली. नोकरी पण करीत  होती,पुन्हा घरातील काम पण बघत होती, कधी छान पदार्थ करून घालीत होती! तिच्या मैत्रिणीची अवंतिकाची पण खूप छान सोबत झाली ह्या दरम्यान मला. दोघी मिळून माझ्या कडे लक्ष द्यायच्या. डिप्रेशन मधून बाहेर यायला डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन होतेच. शिवाय रेकी,ऍक्यूप्रेशर योगोपचार  ह्या सर्वांच्या माध्यमातून  असलेल्या पॉसिटीव्ह एनर्जी मुळे मी बरी झाले. पण सर्वात करता करविता तो परमेश्वर, त्याचे आभार किती मानावेत?

पण मी नेहमीच त्या परमेश्वरावर  विश्वास ठेवीत आले आहे. अनेक बाँक्या प्रसंगांतून त्यानेच सहीसलामत सोडवलं आहे, अनेक कसोटीच्या क्षणी तोच मला उचलून घेतो आणि स्वतः अडचणीतून चालून माझी सुटका करतो असे मला नेहमी प्रत्यंतर येते.
समर्थांनी म्हटले आहे त्याप्रमाणे...
" जाणजाणो  देह रक्षी ।
आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी  ।
पदार्थ मात्रास परीक्षी
   जाणपणे ।।"
तो सतत आपली परीक्षा घेत असतो. कधी सोप्पा पेपर पाठवतो , कधी अवघड प्रश्नावली देतो. कधी प्रश्नातच उत्तर दडवून आपली विचारांची योग्यता आणि परिपक्वता जोखतो. परंतु आपल्या  जाणतेपणी अजाणतेपणी तो आत्माच आपले  रक्षण करतो.तो अंतरात्मा साक्षी असतो आपल्या सर्व भावनांचा आणि म्हणूनच आपली परीक्षा  घेतो. आणि ह्या परीक्षेत यशस्वी  झालो तर आपण आपले माणूसपण सिधद करू शकतो. तेंव्हा कुठलाही पेपर असो, घाबरायचे  नाही,डगमगायचे नाही,आपला अभ्यास १०० टक्के करायचा, आपले १०० टक्के प्रयत्न करायचे आणि  जे फळ मिळाले ते पुण्य समजायचे, आणि आभार मानायचे त्याचे!असो


Wednesday, 20 August 2014

श्रवणाची सार्थकता प्रत्यंतर घेण्यातच असते!

श्रावण मासी हर्ष मानसी!!!!
'जें जें काहीं श्रवणी पडिलें । तितुकें समजोन विवरलें ।
तरी च कांहीं सार्थक जालें । निरूपणी  ।।'

समर्थ म्हणतात की  आपण जे काही चांगले श्रवण करतो, चांगले ऐकतो,  ते सर्व आपण नीट  समजून घेतले पाहिजे.  आणि फक्त समजूनच  घ्यायचं नाही,  तर त्याचे आपल्या आयुष्यात प्रत्यंतर  करावे, शिकून घ्यावे, आत्मसात करावे. तेंव्हाच त्या निरुपणाचे सार्थक झाले असे होईल.
म्हणजे कुणी काही चांगले सांगितले, तर  ते फक्त ऐकले आणि सोडून दिले  असे केल्याने  त्या सांगण्याचा काहीच उपयोग होत नाही. तेंव्हा उत्तम गोष्टींचे किंवा तुम्हाला उपयोग होईल असे ज्ञान जर कुणी तुम्हाला दिले, तर त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या  कल्याणासाठी करून घेतला म्हणजे सांगितल्याचे सार्थक होते .

पावसाळा आला, श्रावण सुरु   झाला आहे, आणि  चातुर्मास सुरु झाला आहे . अनेकविध  सण वार, व्रतवैकल्य  आहेत. त्या निमित्ताने गोड धोड पदार्थ होतात,  भाज्या, फळ  वापरून अनेक पदार्थ करून देवाला नैवेद्य   दाखवला जातो.  मला परवाच माझ्या काही मैत्रिणी म्हणाल्या की तु केलेल्या  केळ्याच्या पुऱ्या छान झाल्या  होत्या, तर आम्हाला त्याची रेसिपी दे. म्हणून त्या सर्व मैत्रिणीं साठी ही केळ्याच्या पुऱ्यांची रेसिपी…
केळ्याच्या  पुऱ्या


पिकलेली केळी  घेऊन,कुस्करून  घ्यावीत.  १ वाटी गर असेल तर १/२ वाटी  साखर,किंवा गूळ जे आवडेल ते  घालून, शिजवून घ्यावे. gas  वर तर करता  येतेच,पण  microwave मध्ये १०० % वर ३ ते ४ मिनिटे शिजवले की मिश्रण तयार होते. हे मिश्रण थंड करून , त्यात  मावेल एवढी कणिक आणि तांदूळ पिठी निम्मी निम्मी घ्यावी, (अंदाजाने १ वाटी पीठ लागेल.) त्यात थोडे मीठ, थोडे गरम तूप घालून पीठ हलक्या हाताने मऊसर भिजवून ,लगेच  पुऱ्या  करून त्या तळून घ्याव्यात. पुऱ्या थोड्या तुपाच्या हाताने प्लास्टिक पेपर वर थापाव्यात.
 ह्या पुऱ्या  नैवेद्याला पण करता येतात.

 असो, असेच सणवार येत राहतील, आणि छान  छान  पदार्थ बनत राहतील!