आणि लग्नाच्या दिवशी, तर अनेक सुंदर सुंदर क्षणांची मालिकाच लागली होती! ज्ञान प्रबोधिनीच्या पद्धतीने विवाह विधी पार पडला. सुटसुटीत, आटोपशीर,अत्यंत पद्धतशीर असा लग्न विधी. आणि मुख्य म्हणजे श्लोकांचे अर्थ सांगितले जातात, वधु वरांना अत्यंत शांत आणि सुगम्य भाषेत विधी समजावून त्यांच्या कडून करून घेतले जातात घाई नाही, गडबड नाही, सगळं कस नेटकं आणि छान!
संकल्प, देवता पूजन, पुण्याह वाचन, कन्यादान,अक्षता रोपण ,मंगलसूत्र बंधन, पाणिग्रहण, विवाह होम, प्रधान होम, लाजाहोम, अग्नीला प्रदक्षिणा,अश्मारोहण, सप्तपदी, वधू वरांना आशीर्वाद म्हणून सर्व ज्येष्ठ मंडळींनी त्यांच्या मस्तकावर पवित्र जलाचा केलेला अभिषेक,आणि शेवटी मंगलाष्टकांनी होणारी सांगता! किंवा मी म्हणते तसं एका मंगल पर्वाची सुरुवात! असा हा दीड दोन तासांचा सुमंगल सोहळा!
लग्न विधींना सुरुवात झाली तेंव्हा मी खूप आनंदात होते. पण कन्यादान करतांना मात्र गंभीर व्हायला झालं. मनात अनेक भावना तरंगून जात होत्या. सिनेमात दाखवतात तसं मन फ्लॅशबॅक मध्ये सर्व काही बघून आलं...भानूचं बालपण, मोठी होतानाचे तिचे मोरपंखी दिवस,नोकरीचे दिवस,आणि आता लग्न!
सर्व विधी मी डोळे भरून पहात होते. माझ्याकडच्या मंडळीं कडून छोट्या छोट्या गोष्टींची पूर्तता करण्याची लगबग करत होते, एकीकडे थोडे व्याही मंडळीं कडे लक्ष देत होते. असं सर्व चाललं होतं! त्या धावपळीत देखील मजा होती.
होमहवन झालं आणि ऋषिकेशला भाऊ म्हणून कानपिळीचा मान मिळाला! हा एक गमतीशीर पण धार्मिक विधी नसूनही परंपरेनं चालत आलेला फार महत्वाचा विधी आहे. भाऊ कान पिळून सांगून देतो, आमच्या बहिणीला त्रास द्याल तर मी तुमचे कान असे उपटीन बरं का!
मंगल अभिषेक झाला, सर्वांनी तोंड भरूनआशीर्वाद दिले, आणि मंगलाष्टकांना दोन्ही मामा उत्साहाने,आनंदाने अंतरपाट धरून उभे राहिले ! सचिन आणि नितीनची ह्या बाबतची एक गम्मत आहे! गेल्या दोन तीन वर्षांपासून ते सारखे भानुप्रियाला म्हणायचे की लग्न लौकर कर म्हणजे आम्हाला आमचे ठेवणीतले सूट घालता येतील! जेंव्हा ते दोघे अंतरपाट धरून उभे राहिले मला एकदम तो किस्सा आठवला आणि हसू आलं! त्यांना आता संध्याकाळी सूट घालायला मिळणार तर!
तर मंगलाष्टकांना सुरुवात झाली, वधूला त्या मंगलमय ओळींमधून दिलेला संदेश ऐकला आणि ऐकता ऐकता माझं मन एकदम एकाग्र झालं. आत्ता पर्यंत लग्नाच्या घाईगडबडीत असलेल्या माझ्या मनात मोठी उलघाल झाली, आणि डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहायला सुरुवात झाली, ते प्रत्येक अष्टकांना वाढतच चालले होते !सर्व बांध फुटले आणि निःसंकोच रडू येत होते! पण आतून आनंदही होत होता! पण मग ही वेळच अशी असते! भानूची आजी, मावशी मामी, मैत्रिणी तर रडत होत्याच, पण त्या क्षणी तिच्या आजोबांनाही अश्रू आवरले नाहीत. आजी आजोबा तर फारच सद्गतीत झाले होते! माझ्या आई बाबांना असे भावविवश होतांना फारच थोड्या प्रसंगी पहिले आहे. पण ह्यावेळी मात्र त्यांच्या सर्वात लाडक्या आणि त्यांना फार अभिमान असलेल्या नातीच्या लग्नातला हा सर्वात हळवा क्षण होता! पूर्वीच्या काळी आई लग्नाच्या ह्या मंगलाष्टकां प्रसंगी तुळशीला पाणी घालायची, त्या प्रथे मागे हे अश्रुंचे बांध आवरता यावेत आणि ते अश्रू कुणालाही दिसू नयेत हीच भावना असावी. आज तर हे लिहितांना देखील मला रडू येईल की काय असे वाटत असतांनाच थोडे रडायला आलेच. सर्व आयांचे असेच होते! पण आम्ही ठरलो प्रगत विचारांच्या महिला! माझी वाहिनी पण म्हणाली काही नाही हेमाताई,तुम्ही इथेच थांबायच मंगलाष्टकांना आणि सर्व विधी पाहायचा. तुम्ही नाही पाहणार तर मग कोण पाहणार?अगदी बरोबर! कारण मग तो सोहळा मी miss केला असता आणि म्हणून तिथेच राहिले झालं!
आता विवाह विधींची समाप्ती झाली आणि फोटोंची लगबग सुरु झाली! लग्नात वधूवरांपेक्षा नातेवाइकांनाच जास्त घाई असते फोटोची ! खूप हसू येतं! अर्थात त्यांचा स्नेह आणि मुलांवरच प्रेमच ह्याला कारण!असो . त्यानंतर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला, भानुप्रिया आणि रविशंकरसाठी खास सुशोभित केलेल्या चांदीच्या ताटां भोवती सुंदरशी फुलांची मखर सजवली होती, आणि सर्व मंडळींना ते दोघे आग्रह करून आले आणि जेवायला बसले. दोघांनी छानसे उखाणे घेत एकमेकांना घास भरवले! खूप मजा आली! आता ते दोघे पण थोडे थोडे रिलॅक्स झाले होते. सकाळचं नाही म्हटलं तरी थोडं दडपण होतंच. आणि हो, भानुप्रिया आणि रविशंकर दोघांनी संध्याकाळी पण छान उखाणे घेतले !खूप मजा आली. आजकाल मुलींना उखाणे येतही नाहीत, आणि लाजतात का attitude दाखवतात माहित नाही, पण जावयांनी वरचढ उखाणे घेतले आणि सर्व काही मजेत झालं!
आता संध्याकाळच्या रिसेप्शच्या तयारीला लागायचं होतं! त्यातच थोडे सर्व पाहुण्यांना भेटले, गप्पा झाल्या, बरं वाटलं! आणि पुन्हा लगबग, मेकअप,साड्या..... सुरु!
No comments:
Post a Comment