'समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।
जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ।।" ।। जय जय रघुवीर समर्थ ।।
आज बरोबर दोन वर्षांनी पुन्हा ब्लॉग लिहायला घेतला आहे. मध्यंतरी काही तब्येतीच्या तक्रारीं मुळे ब्लॉग लिहायला जमले नाही.आयुष्याच्या मध्यावर काही तब्येतीच्या तक्रारी झाल्या आणि त्यांचा धीराने, नेटाने आणि मुख्य म्हणजे योग्य औषधोपचाराने सामना करून त्या त्रासाला पळवून लावण्यात यश आले. पण ह्या २ वर्षाच्या अवघड आणि नाजूक वळणावर मला अनेकांची साथ मिळाली... माझी मैत्रीण, माझ्या बहिणी, माझे आई वडील, आणि आणखी बरेच जण. सर्वांनी हिम्मत दिली, बळ दिलं, साथ सोबत दिली. पण ह्या सर्वां बरोबर किंबहुना ह्या सर्वां पेक्षा जास्त साथ सोबत आणि खंबीर मदत मिळाली भानुप्रियाची !तिच्या मदती शिवाय आणि तिने दिलेल्या मानसिक बळा शिवाय हा प्रवास सुकर झाला नसता हे नक्की. जशी मी तिला हिमतीने लहानाची मोठी केली, कष्ट घेतले, कधी रागावून, कधी समजावून, कधी खेळीमेळीने तिला योग्य वळण लावण्याचा प्रयत्न केला, तिला हिमतीने जगायला शिकवले तसेच काहीसे ह्या वेळी झाले, फक्त आता मी तिची मुलगी झाले होते! त्यामुळे तेच सगळे खेळ तिने मला लागू केले आणि मला आजारातून बाहेर पडायला मदत केली. नोकरी पण करीत होती,पुन्हा घरातील काम पण बघत होती, कधी छान पदार्थ करून घालीत होती! तिच्या मैत्रिणीची अवंतिकाची पण खूप छान सोबत झाली ह्या दरम्यान मला. दोघी मिळून माझ्या कडे लक्ष द्यायच्या. डिप्रेशन मधून बाहेर यायला डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन होतेच. शिवाय रेकी,ऍक्यूप्रेशर योगोपचार ह्या सर्वांच्या माध्यमातून असलेल्या पॉसिटीव्ह एनर्जी मुळे मी बरी झाले. पण सर्वात करता करविता तो परमेश्वर, त्याचे आभार किती मानावेत?
पण मी नेहमीच त्या परमेश्वरावर विश्वास ठेवीत आले आहे. अनेक बाँक्या प्रसंगांतून त्यानेच सहीसलामत सोडवलं आहे, अनेक कसोटीच्या क्षणी तोच मला उचलून घेतो आणि स्वतः अडचणीतून चालून माझी सुटका करतो असे मला नेहमी प्रत्यंतर येते.
समर्थांनी म्हटले आहे त्याप्रमाणे...
" जाणजाणो देह रक्षी ।
आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी ।
पदार्थ मात्रास परीक्षी
जाणपणे ।।"
तो सतत आपली परीक्षा घेत असतो. कधी सोप्पा पेपर पाठवतो , कधी अवघड प्रश्नावली देतो. कधी प्रश्नातच उत्तर दडवून आपली विचारांची योग्यता आणि परिपक्वता जोखतो. परंतु आपल्या जाणतेपणी अजाणतेपणी तो आत्माच आपले रक्षण करतो.तो अंतरात्मा साक्षी असतो आपल्या सर्व भावनांचा आणि म्हणूनच आपली परीक्षा घेतो. आणि ह्या परीक्षेत यशस्वी झालो तर आपण आपले माणूसपण सिधद करू शकतो. तेंव्हा कुठलाही पेपर असो, घाबरायचे नाही,डगमगायचे नाही,आपला अभ्यास १०० टक्के करायचा, आपले १०० टक्के प्रयत्न करायचे आणि जे फळ मिळाले ते पुण्य समजायचे, आणि आभार मानायचे त्याचे!असो

No comments:
Post a Comment