आता आम्ही तिघे जोमाने कामाला लागलो. कामांची यादी करून रोजच्या रोज बाजाराकडे पाऊले वळायला लागली. आता लग्न म्हटलं की साड्या आणि दागिने आलेच! त्यात लाडक्या लेकीचं लग्न! आणि साड्या दागिने म्हणजे मुलीच्याच नाही तर समस्त स्त्रीवर्गाचा जिव्हाळ्याचा आणि कुतूहलाचा विषय! आणि पुरुषही काही मागे नाहीत कारण त्यांना हा एक चेष्टेचा आणि मस्करीच्या विषय असतो!
लग्नात घालवायचा आणि सोबत पॅक करायच्या कपड्यांचे, वस्तूंचे व्यवस्थित नियोजन केले होते त्याप्रमाणेच खरेदी होणार होती. लग्नात घालायच्या साड्या बाबत आमचे ठोकताळे नक्की होते. नाशिक मधल्या नामवंत पेढीं मधून दागिने आणि सर्वोत्तम दुकानांतून साड्या खरेदी झाली
जशी मजा अंगठ्या खरेदी करतांना आली, तशीच मजा साड्या खरेदी आणि दागिने घेतांना आली! साडी बघायची, ट्राय करायची, ह्यात वेगळीच मजा होती.बनारसी शालू, पैठणी नऊवारी, रिसेप्शन साठी छानशी जॉर्जेट,किंवा शिफॉन असे ठोकताळे होते . त्यामुळे कुठे कंफ्युजन नाही, गोंधळ नाही. एकदम झटपट आणि मनासारखी खरेदी होत होती. अरे हो, साडी वरून आठवलं ... आम्ही अंगठी खरेदीला गेलो तेंव्हा कपडे पण घेतले होते. तेंव्हा मला रविशंकरनी एक सुंदर साडी घेऊन दिली! तशी मी खूप साड्या वापरते,पण हि साडी अमूल्य आहे! जावयाचा महिमा दुसरं काय? आणि आपलं कुणीतरी केलेलं कौतुक!! ते फार महत्वाचं असतं! मी पण त्यांचे नेहमीच कौतुक करते. आणि मुलासारखे कौतुक करावेसे वाटते. आता तर तिच्या पेक्षा त्यांचेच कौतुक जास्त करते मी!
मग दागिने खरेदी!नामवंत सोनारां कडून दागिने खरेदी झाली कारण लग्नाचे दागिने म्हणजे सगळं कसं व्यवस्थित व्हायला हवं ना ... शुधदता, चोखपणा , योग्य वजन, किंमत आणि मुख्य म्हणजे सोनाराच्या नाव लौकिक हे सगळं बघावं लागतं. मग जुन्या पेढीच्या सराफां कडून मंगळसूत्र,हार, बांगड्या असे पारंपरिक दागिने खरेदी केले, आणि काही डेलीयूज साठी ट्रेंडी ज्वेलर्स कडून नवीन घडणीचे नाजूक दागिने घेतले. दागिने बघतांना तर डोळ्यांचे पारणे फिटत होते. वेगवेगळे अलंकार,त्यांची नावे, घडणावळ, डिझाइन्स, पॅटर्न्स.. बाप रे! हौस हौस म्हणजे किती करायची?. पण साड्या काय आणि दागिने काय, आम्हाला पसंतीला अजिबात वेळ लागत नव्हता... कारण आम्ही दोघी चोखंदळ आणि कोणतीही पसंती पटकन करण्याचा फार जुना अनुभव आहे ना!!(हे आपलं स्वतःच स्वतःचं कौतुक करून घेणं झालं बरं का!!) उगीचच आपलं!! असो, हे सर्व क्षण हृदयात साठवून ठेवले आहेत , कारण फक्त ते क्षणच माझे आहेत.
पूर्वी जाहिरातींतून,चित्रांतून, गोष्टींतून, गाण्यांतून लग्नाबद्दल ऐकायचे, वाचायचे, बघायचे तेंव्हा ते सगळं मनात साठवून ठेवायचे. लग्नात करायचे सर्व विधी मी मनात नोंदवून ठेवल्या सारखेच होते.आणि त्याला अंशतः जबाबदार आहे माझ्या स्वतःच्या लग्नाचा व्हिडीओ बरं का!(गम्मत नाही खरंच आहे ते!!) आणि मग तयारी पुढे सरकली! आणि बघता बघता ८ तारीख आली की!दारात मांडव पडला आणि लग्न घडी जवळ येऊन ठेपली!
No comments:
Post a Comment