Wednesday, 12 June 2013

BHANUPRIYA AANI TICHYA MAITRINI

भनुप्रियाच्या एका मैत्रिणीची गोष्ट मला आठवत्ये. पुण्यात ही मैत्रीण होती,तन्वी !दोघींची  छान  मैत्री होती. एकदा तन्वी आमच्या कडे  दिवसांसाठी रहायला आली होती. भानुप्रियाला तर  काहीतरी खाण्यासाठी  सारखं  सारखं सांगायला लागायचं, तेंव्हाच ती काही तरी खायची!  ह्या सवयी मुळे तिच्या ह्या मैत्रीणीला  सारखी सारखी  खाण्या साठी विचारायचे माझ्या लक्षातच यायचे नाही! पण तन्वीला सतत काही तरी snacks  लागायचे! मग ती सारखी मला येवून म्हणायची, काकू, काही तरी खायला घेवू ?मग मीच थोड लक्षात ठेवून तिला विचारायला लागले ! पण दोघींनी खूप मजा केली! आणि मला पण काही न काही snacks  बनवण्याचे काम पण मिळाले!

माझी खास मैत्रीण तन्वी आणि मी!

हा आमचा नाटकातला कॉस्च्युम !
पुण्यात होतो तेंव्हा आम्ही दोघी मोटरसायकल वर खूप भटकायचो!मला आठवतंय, भानुप्रियाला एमज़ी. रोड वर फिरायला फार आवडायचं. तिथे नाझ केफे म्हणून बेकरी होती. खूप छान  छान  केक आणि पेस्ट्रीज मिळायच्या. तिथे बसून खाण्याची सोय होती. तिला तिथे बसूनच केक खायला आवडायच! ती हळू हळू खायची त्यामुळे वेळ लागायचा! तिथले स्टाफ चे लोक पण तिला ओळखायला लागले होते. किती तरी लोक येवून निघून जायचे, तरी आम्ही दोघी आपल्या तिथेच ! तर अशी  मजा होती!

पुण्यात जेंव्हा CROSSWORD  हे पुस्तकांचे दुकान सुरू झाले, तेंव्हा आम्ही दोघी तिकडे गेलो होतो. कारण तिला पुस्तकांचे फार वेड होत! त्या नंतर बऱ्याच  वेळा आम्ही तिकडे गेलो!तिथे पुस्तकं  चाळायची, पुस्तकं  विकत घ्यायची, आणि सर्वात आवडीचं  काम म्हणजे, तिथल्या कॉर्नर मध्ये असलेल्या छोट्याश्या कॅफे मधे  बसून कॉफी  आणि sandwiches खायचे!अल्टीमेट आनंद होता तो तिच्या साठी! आणि तिच्या साठी तो  आनंद तर मग तो माझ्या साठी पण आनंदच!

 अर्थात, इकडे जेवढी  रमायची , तेव्ढीच लक्ष्मी रोड च्या गर्दीत पण रमायची!

आता झाली छानशी रेसिपीची वेळ:

इंडो_अमेरिकन डोसा : गाजर, कोबी, सिमला मिरची, कांदा, कांदा पात, सर्व बारीक कापून घ्यावे. मीठ,मिरेपूड, कोथिंबीर, टोमेटो सॉस, मेयोनेस, क्रीम  घालून फिलिंग तयार करावे.  डोश्याच्या पिठाचा डोसा तयार करून, त्यावर मिश्रण पसरून, डोसा रोल करून,  किंवा घडी घालून गरम सर्व्ह करावा.
खरतर, ह्या फिलिंग चे sandwiches  बनतात हे मला माहित होत.   पण मी ही डिश  एका हॉटेल मध्ये खाल्ली आणि त्याच नाव इंडो अमेरिकन डोसा असं  होत. तर sandwich चा झाला डोसा!
            

BHANUPRIYACHE SAINT HELENA'S MADHLE MAKHMALI DIVAS

सेंट हेलेनाज स्कूल, पुणे
सेंट हेलेनाज मध्ये भानुप्रीयाला एक वेगळच विश्व अनुभवायला, पहायला मिळालं. ह्या शाळेत क्रिश्चन संस्कृतीचे अगदी जवळून दर्शन झाले. शाळा क्रिश्चन लोकांचीच होती ,त्यामुळे क्रिसमसची अगदी २१ दिवस सुट्टी असायची! आणि दिवाळीची मात्र फक्त ३ दिवस! पण त्या २१ दिवसांच्या सुट्टीत त्यांच्या शाळेत   छान  छान  कार्यक्रम व्हायचे. एक तर स्कूल फेस्टीव्हल व्हायचे, ज्यात मुलं स्वतः च stall  लावायचे, तिथे वेगवेगळे खेळ ठेवायचे, खायला छान  छान  पदार्थ ठेवायचे, १ दिवस पूर्ण एन्जॉय करायला मिळायचं. दर वर्षी भानुला मी फेस्टीव्हललां न्यायची, आणि खूप मजा करायचो !

क्रिसमस च्या सुट्टी आधीच, शाळेत मुल  santaclaus, रेनडीअर, स्नोमन, मिशेलटो, वगैरे वस्तू बनवायचे, आणि त्यातल्या उत्तम कलाकृती ला बक्षीस पण मिळायचं! शिवाय, रिझल्टच्या आधी हे सगळ व्हायचं, त्यामुळे रिझल्ट च्या दिवशी क्लास मध्ये सर्व वस्तू पालकांना बघायला मिळायच्या. भानुप्रियाला बक्षीस नक्की मिळायचं, आणि टीचर तिचं  कौतुक करायच्या ते वेगळच! कारण, ती नेहमी पहिली किंवा दुसरी यायची वर्गात! पण टीचरची एक तक्रार नेहमी असायची की ही क्लास मध्ये अजिबातच  बोलत नाही! म्हणजे अबोल आहे! पण त्याला इलाज नव्हता! भानुला फार कौतुक आहे त्या शाळेच! शिवाय, annual  day च्या दिवशी देखील कार्यक्रमात ती भाग घ्यायचीच! नाच, नाटक, कॅरोल सिंगिंग सगळीकडे ती अगदी उत्साहानी असायची! नंतर बक्षीस समारंभ व्हायचा! त्यात पण तिला बक्षीस असायचं!

माझं  बाई बक्षीस ठरलेलच बर!

कॅरोल सिंगिंग मला फार आवडायचं!
मला सवय आहे बक्षिसाची! पण आनंद होतो, हो की नाही?















मी कुठे आहे, ओळखा पाहू ?














भानुप्रियाला मी कधी कधी शाळेतून आणायला जायची, तेंव्हा फार गम्मत व्हायची! म्हणजे व्हायचं काय की, जिन्याकडे बघत उभी रहायची,की मला ती आलेली दिसेल म्हणून. पण सगळ्या मुली सारख्याच दिसायच्या मला! तेच युनिफोर्म, तीच उंची, त्याच दोन वेण्या!(पुरावा हवा असेल तर वारचा फोटो बघा,म्हणजे कळेल!) आणि एव्हढ्यात ती पुढे येवून उभी रहाते, आणि विचारते, आई , तुला मी दिसत नाही का? फार हसू यायचं तेंव्हा!  



आमची आई पण  कमाल आहे! कशी  ओळखत नाही मला, कुणास ठाऊक!

 भानूच्या क्लास फोटोच पण असच आहे. मी अजून सुद्धा कधी फोटो बघते तरी मला भानूला ओळखण  मुश्किल होत ! हा वरचा फोटो त्याचच उदाहरण आहे की नाही?


 आणि त्या नंतर बंगलोर च्या शाळेत गेल्यावर थोडी सुधारणा झाली, आणि नंतर  इतकी सुधारणा  की सांबा (जम्मू _काश्मीर)च्या शाळेत तिला अगदी बडबडी म्हणायचे! मला आठवतंय,त्या आधी लखनौ च्या शाळेत मी तिच्या क्लास मध्ये मुलींना विचारल,'ये भानुप्रिया बात वात करती है  के नही? तर तिच्या मैत्रिणी म्हणाल्या,'आंटी ,इसको तो चूप कराना पडता है!'

तर  आत्ता एक अशीच चूप बसवणारी छान टेस्टी डिश:

शाही  ब्रेड: ब्रेडचे मोठे तुकडे करून तुपात तळून घ्यावेत. नारळाचे काप, काजू , बदाम तुकडे तुपात तळून घ्यावेत. गुळाचा पातळ पाक करून ठेवावा. नारळाचे दूध काढून ठेवावे.

आता, तूप गरम  करून gas  स्लो ठेवून त्यात पाक ओतावा. हळू हळू नारळाचे दूध घालावे.gas बंद करावा. तळलेले ब्रेडचे तुकडे, काजू, बदाम, मिक्स करावेत. थंड सर्व्ह करावे.

वेरिएशन म्हणून _ ट्रे मध्ये ब्रेडचे तुकडे अरेंज करून त्यावर नारळाचे दूध व  पाकाचे मिश्रण , ड्राय फ्रुट्स घालून थंड सर्व्ह करावे.

एन्जॉय  करा!  


   

Monday, 10 June 2013

भानुप्रियाची LKG  आणि UKG  देवळालीत झाले. त्या  वेळी माझ्याकडे पुण्याहून,नाशिकहून  नेहमीच पाहुणे यायचे, सगळ्यांना माझ्या कडे सूप, आणि पंजाबी जेवण फार आवडायचं ,  पण वेगवेगळी ड्रिंक्स सर्व्ह करायला मला आवडायचं. छान  छान  क्रोकरी बघून त्यांना त्यातून जेवण करायला आवडायचं. म्हणजे, ड्रिंक्स, स्नेक्स, मग सूप, त्यानंतर जेवण, आणि शेवटी छानस  पुडिंग असा प्रॉपर  मेनू सगळ्यांना फार आवडायचा.  आमच क्वार्टर पण खूप मोठ होत, त्यामुळे सगळे चेष्टेने विचारायचे की तुम्ही दोघी काय लपंडाव खेळता का काय  घरात?

भानुप्रियाला  पहिल्या पासून शाळेत जायला फार आवडायचं. तिन कधीच कंटाळा केल्याच आठवत नाही. मी तिला २ २/१ वर्षाची झाली तेंव्हा प्लेग्रुप मध्ये घातली होती. तेंव्हा पासूनच शाळेत जाण्या साठी वेळेत उठणे,डबा  नेणे, तो पूर्ण खाणे, घरी आल की थोडी झोप,मग  खेळ, थोडा अभ्यास, गाणी, नाच, अशी मजा, शिवाय मोटर सायकल वर रोज फिरायला  जायचं तर ठरलेलंच !
आपण दोघी  फिरायला जायचं आहे आई बरोबर! 
मी तर बाई आईचेच मग्झीन वाचते!
जेवण व्यवस्थित बसून कराव !आइनॆच शिकवलंय बर का!
  हसत खेळत रुटीन लावून दिल की काही प्रोब्लेम येत नाही आणि त्यांनाही सवय होते. मला भानुप्रियाला शिकवायला फार आनंद वाटायचा,म्हणजे आत्ता आत्ता पर्यंत तिचा CS आणि लॉ  साठी देखील मी  अभ्यास घेत होते, तिची मदत करीत होते.   मुळात ती हुशार होती त्यामुळे ग्रास्पिंग चांगल होत, काही सांगीतल की लगेच कळायचं आणि मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे सांगितलेलं करायची. खर सांगायचं तर सगळे कष्ट तिचेच आहेत, मी आपली उगीच एक माध्यम, बाकी माझ काही नाही. बोटाला धरून चालवायचं, आणि अडखळली, किंवा पडली तर सावरून  घ्यायचं, एवढच मी केलं. एक सोप्प तंत्र मी लक्षात ठेवलं  होत, ते म्हणजे  वाहत पाणी जसं खड्डा आला की तो खड्डा भरून टाकत आणि पुढे जात, तसं  जिथे तिला अडचण आली, तिथे तिची मदत करायची आणि तिला पुढे चालू द्यायचं.   

मुलांच्या कलाने घ्यावे, थोडे समजुतीने,थोडे रागवून, हसत_ खेळत, गप्पा मारत,गोष्टीं   सारख्या प्रभावी माध्यमातून मुलांना बरेच काही शिकवता येते. आणि त्यांना प्रत्येक कृती मागची कारण मीमांसा पटवून दिली की त्यांना पटत. पण ती कारण मीमांसा सत्य असली, तर मग बुद्धीची कुवत  नसली तरी त्यांच्या मनाला ती गोष्ट नक्की पटते!
 

तर अशी आमची ही भानुप्रिया! आत्ताला एव्हड पुरे!
 मी तर बाई पहिल्या पासून अगदी brand conscious !






















































 












 





 


  

Saturday, 8 June 2013

आता देवलालीला पोस्टिंग झाली, आणि हे श्रीनगरला गेले.    भानुप्रियाला  शाळेत घातले.  आर्मी स्कूल होती. घरी आम्ही दोघीच असायचो, पण आर्मी मध्ये एकट  अस रहायल  तरी काही प्रोब्लेम नसतो. कारण  घर cantt  एरियात असते, आणि बहुतेक करून flat system  मध्ये घर मिळत. त्यामुळे सगळ्या शेजार च्या ऑफिसर्स बरोबर चांगले सम्बन्ध होतात. त्यामुळे बर्थडे , लग्नाचा वाढदिवस, सहज म्हणून चहा प्यायला असे काही न काही बहाण्याने एकत्र   जमणे होतच असते. कधी कुणाच्या गार्डन मध्ये ;पॉटलक' चा कार्यक्रम होतो, कधी पिकनिक, कधी नुसती मस्ती आणि गप्पा!   मग त्या निमित्ताने आपली कला कुसर दाखवायला वाव मिळतो, पाककलेला वाव मिळतो, आणि संपर्क वाढतो, शिवाय वेळ चांगला जातो!

ऑफिसर स्टेशनमधेच पोस्टेड असेल तरी आम्ही बिझी असतोच.  आर्मी मध्ये' लेडीज क्लब,' हा  आम्हा बायकांसाठी एक मोठाच विरंगुळा असतो अस म्हटल तर वावग  ठरणार नाही. पण त्याच बरोबर शिकायला मिळते हे ही खरेच. अर्थात, तसा हा प्रोग्राम फार सिरीयसली घेतला जातो. प्रत्येका युनिटला  एक प्रोग्राम करायला मिळतो, आणि त्यात कधी नृत्य, संगीत, एखादा डेमो देणे, मनोरंजनपर कार्यक्रम सादर करणे,आसन व्यवस्था , कार्यक्रमांचे सूत्र संचालन करणे, काही स्पर्धा असतील तर योग्य प्रकारची बक्षिसे देणे, जेवण किंवा अल्पोपहार असेल त्याचे नियोजन करणे,  त्यात विविध आणि रुचकर पदार्थ सादर करणे,नवीन आलेल्या ऑफिसरच्या बायकांची रीतसर ओळख करून देणे, पोस्टिंग वर निघालेल्या ऑफिसर्स च्या बायकांना योग्य मेमेंटो  देणे, पाहुण्यांची उठ बस ह्याकडे प्रामुख्याने लक्ष देणे,सर्वांचे स्वागत करणे  आणि निरोप देणे,अशा अनेक जबाबदाऱ्या सर्व लेडीजना   दिल्या जातात, आणि त्या चोखपणे पार पाडाव्या लागतात. ह्या कार्यक्रमा साठी विशेष परिश्रम घेतले जातात. ह्या कार्यक्रमातून देखील आपल्या कला गुणांना वाव मिळतो. कधी कधी बाहेरहून सिनियर ऑफिसर्स आणि  पत्नी येतात तेंव्हा त्यांच्या स्वागता प्रित्यर्थ  विशेष कार्यक्रम आखले जातात .

.

जवानांच्या बायकांसाठी देखील 'वेल्फेअर  प्रोग्राम' केले जातात. त्यात त्यांच्या साठी शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि मनोरंजनाचे कार्यक्रम केले जातात. त्या बायका पण खूप talented  असतात. शिवणकाम, विणकाम, हस्तकला, पाककला, हे सर्व पारंपारिक तर करतातच, पण हल्ली तर त्या computer शिकतात, नवीन नवीन उपक्रम त्यांच्या साठी हाती घेतले जातात.  ह्यात ऑफिसर्स, त्यांच्या बायका, आणि त्यांच्या मुलांचे देखील बरेचसे योगदान असते. ह्यात विधवा महीलांसाठी  पण काही योजना राबवल्या जातात, आणि त्यांना पण वेळोवेळी कार्यक्रमाला  बोलावले जाते, त्यांची खबर ठेवली जाते, काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जातात. ह्या द्वारे त्यांच्याशी आपुलकीचे नाते राखले जाते.
   

आर्मी मध्ये दिवाळीत 'दिवाली मेला ' हा मोठा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी घेतला जातो. ह्यात 'आनंद मेळा'  जसा भरतो, तसा हा मेळा  असतो, पण ह्याची खासियत अशी की प्रत्येक युनिटचा आपला एक stall  असतो, आणि  त्यात विविध वस्तू विक्रीसाठी ठेवतात, ज्यात बऱ्याच  वस्तू   जवानांच्या बायकांनी बनवलेल्या असतात.  शिवाय, एका दिवशी खास सर्वासाठी म्हणून फटाक्यांची आतषबाजी असते, ही  मात्र अगदी बघण्या सारखे असते .

एखादा नवीन ऑफिसर स्टेशन मध्ये पोस्टिंग वर आला, की त्याला घरी जेवायला किंवा चहाला बोलावले जाते, एखादा सिनियर ऑफिसर असेल तर ऑफिसर्स मेस मध्ये पार्टी दिली जाते. क्वचित प्रसंगी एखाद्याला ब्रेकफास्टला देखील बोलावले जाते. हेच सर्व आपण नवीन स्टेशन मध्ये पोस्टिंग वर गेल की पण  होत. तर  जेवणाची वेळ, येणारी माणसे त्यांची संख्या, त्यांची सिनियरटी, वगैरे बाबी लक्षात ठेवूनच मेनू तयार करावा लागतो. त्या प्रमाणे घरात कधी कधी सजावट पण बदलावी लागते! म्हणजे थोडक्यात काय की, तुम्ही सतत बिझी असता! तेंव्हा डिप्रेस  व्हायला, दुखी  व्हायला, बोअर  व्हायला  वेळही  नसतो, आणि वावही नसतो!  नेहमी रेडी असाव लागत, कोणत्याही प्रसंगाला सामोर जायला!  शिवाय घरच्या इतर जबाबदाऱ्या, मुलांच्या शाळा, जेवण, डबे, ह्या गोष्टी तर आहेतच.

पोस्टिंग आले, की पण धमाल असते! म्हणजे काय की निघायच्या साधारण आठ दिवस आधी पासून packing ला सुरुवात होते. तेंव्हा जेवण बनवायचे काम जरा जडच वाटते. पण चिंता नसते. कारण, आपल्या सोबतच्या  ऑफिसर्स कडून आपल्याला अगदी ब्रेकफास्ट पासून डिनर  पर्यंत आमंत्रण असते. कारण जेंव्हा दुसरा कुणी  पोस्टिंग वर जातो, तेंव्हा आपण त्याला बोलावतोच ! तर अशी एकूण  मजा असते.आणि ह्या सर्व मेजवानी प्रसंगी खूप फॉर्मल  वातावरण असत. म्हणजे क्रोकरी, मेनू, गप्पांचा ओघ सर्व अगदी व्यवस्थित असावे लागते, वगैरे. पण कधी कधी सम्बन्ध फार चांगले  असतील तर थोडे वागणे बोलणे शिथील आणि मनमोकळे रहाते, हे नक्की.

ऑफिसर्स साठी पण वेगळे कार्यक्रम होतात. त्यांना वेलकम स्पीच किंवा फेअरवेल  स्पीच द्यावे लागते. 
 त्यानंतर महत्वाचा कार्यक्रम _मेजवानी!
  मेजवानी नंतर ऑफिसर तिथल्या रेकोर्ड बुक मध्ये सही करतो.
  त्या नंतर त्या ऑफिसरला खुर्चीत बसवून तसेच उचलून दरवाज्या पर्यंत नेले जाते आणि सर्व  ऑफिसर्स एक कोरस मध्ये म्हणतात 'ही इज अ जॉली  गुड फेलो, ही इज अ जॉली  गुड फेलो!' सो से ऑल  ऑफ अस!     


      आणि त्या ऑफिसरला मग सीओफ केले जाते.

   आता पार्टी मध्ये खास करून बनवले जाणारे snacks खाली देत अहे.

चिकन टिक्का:     चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्यांना मीठ, तिखट, आलं _लसूण  पेस्ट, गरम मसाला, दही , लाल मिरची पेस्ट, लाल रंग, लावून ३ ते ४ तास  मुरवत  ठेवावे.  सर्व्ह करण्या साठी टिक्का तंदूर मध्ये भाजावेत, किंवा तळून घ्यावेत.  कांदा, लिंबु सोबत सर्व्ह करावे.
वेजिटेरियन्स  साठी __ हीच  डिश  पनीर, बटाटा तुकडे घेवून करता येते.

एग ऑन टोस्ट : ब्रेडचे छोटे चौकोनी तुकडे करून तळून घ्यावेत. तेल गरम करून त्यावर अंडे फोडूनशिजवावे. त्यात मीठ, मिरची तुकडे, मिरे पूड घालावी आणि  भुर्जी बनवावी.  आता सर्व्ह करण्या साठी, प्लेट मध्ये टोस्ट ठेवावेत, त्यावर भुर्जी घालावी, कोथिंबीर,आणि हवे असल्यास पनीर, चीझ, चेरीने सजवून सॉस  सोबत द्यावे.

व्हेजीटेबल्स   विथ मेयोनेस:  बटाटा, काकडी, गाजर, मुळा, पनीर, फ्लॉवर, ब्रोकोली, ह्या भाज्यांचे लांब तुकडे करून थंड करून घ्यावेत.  प्लेट मध्ये भाज्या ठेवून  मेयोनेस  सोबत सर्व्ह  करावे. हा  snacks चा प्रकार खास करून उन्हाळ्यात दिला जातो.  



 असेच पदार्थ पुढे ही आहेत, आणि गमती  सूध्दा!

                   

Friday, 24 May 2013

1992 च्या ऑगस्टमध्ये हैदराबादला पोस्टिंग झाली, आणि तिथे फक्त ६ महिने राहिलो होतो. पण हैदराबादच्या मुक्कामात खूप मजा आली. आम्ही सिकंदराबाद मध्ये एका भाड्याच्या घरात रहाणार होतो, कारण quarter  मिळाले नव्हते. हैदराबाद आणि सिक्न्द्राबाद  ह्या ट्विनसिटीज  आहेत .  आता मजा अशी झाली की, ज्या दिवशी सकाळी  आम्ही हैदराबादला पोहोचलो,त्याच दिवशी दुपारी ह्यांना ऑफिस मधून टेलिग्राम  मिळाला म्हणून  लगेचच तिरुचिरापल्ली (तामिळनाडू ) इथे १ महिन्या साठी जावे लागणार होते. आणि त्याच दिवशी  संध्याकाळी निघावे लागणार होते. अजून आमचे ट्रक मधून सामान देखील आले नव्हते! पण इलाज नव्हता.   तर  जेवण झाल्यावर सन्ध्याकाळी लगेच आम्ही बाहेर पडून जवळचा बाजार वगैरे पाहून आलो. आणि हे लगेच रात्रीच्या गाडीने निघून गेले. आमच्या घराच्या मालकीणबाई आणि वरच्या मजल्या वरचे २ भाडेकरू कुणालाच इंग्लिश किंवा हिंदी विशेष येत नव्हत आणि समजतही नव्हत! पण तरी त्यांनी आमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, आणि आम्ही त्यांच्याशी! तेंव्हा 'रोजा' पिक्चर लागला होता, आणि त्या शेजारणीने मला विचारले तुम्ही येणार का?  म्हणून! (आणि तिथे तेलगु सिनेमा लागलेला बर का!, हिंदी नाही !) आणि वर म्हणल्या "i  tell you no, in english!(अरे देवा!) कठीणच आहे! मी काय म्हणणार? पण नंतर नंतर त्या बायका आणि त्यांच्या मुली आमच्याशी जमेल तस कधी  इंग्लिश मध्ये ,कधी खुणेच्या भाषेत, कधी कधी समोर वस्तू दाखवून बोलायला लागल्या ना, तेंव्हा पटलं, की संवाद साधायला भाषाच पाहिजे अस नाही! फक्त एकमेकाचे विचार एकमेकाला पोहोचवता आले पाहिजेत!  एक महिन्यात अस झालं  की मी आणि त्या बायका सकाळी _ सन्ध्याकाळी एकमेकींशी बोलायचो! आपोआप एक नात  निर्माण होत! खूप छान  अनुभव होता तो!


तर, सांगत काय होते, की लगेच दुसऱ्या दिवशी बाहेर पडले! अर्थात ह्यात नवल काय! मला तर शहर बघायची इच्छा होती, शिवाय भानूची  शाळा पण शोधायची होती. मग काय मोटर सायकल घेवून बाहेर पडले! इथे पण नवलाने बघत होतेच! कारण तिथे अजून महिला  पारंपारिकच होत्या! पण मजा यायची! २ दिवसात भानूची अडमिशन झाली, आणि तिला मी शाळेत मोटरसायकलवर घेवून  जायची, तर शाळेतल्या बायका, मुल पण कुतुहलाने बघायची!  ह्याच भानूच्या शाळेत मला एकदा रांगोळी, drawing  वगैरेच्या स्पर्धा होत्या, त्यासाठी जज म्हणून पण मला  बोलावल होत!


असो, पण गाडी ही माझी लाईफ लाईन होती! नंतर नंतर आम्ही दोघी हैदराबाद शहरात पण जायला लागलो, तिथे पण भरपूर फिरलो! मला हैदराबाद शहर इतक व्यवस्थित माहित झाल की, १ महिन्यानी हे  आल्यावर मीच ह्यांना फिरवून, सगळे रस्ते दाखवून दिले!


हैदराबादच्या काही खास रेसेपी खाली देत आहे,,,,

 हैदराबादी  पुलाव:  १ वाटी बासमती तांदूळ १/२ तास आधी धुवून निथळत ठेवावे. आलं ,लसूण, हिरवी मिरची. पुदिना, कोथिंबीर, सर्व एकत्र करून पेस्ट तयार करावी. तेल/तूप ३टेबलस्पून गरम  करून दालचिनी,लवंग, ,छोटी वेलची,तमालपत्र, मोठी वेलची, घालून परतावे. नंतर लांब पातळ चिरलेला कांदा घालून परतावा.  नंतर हिरवी सिमला मिरची लांब तुकडे, नंतर बीन्सचे लांब तुकडे , आणि मटार घालून परतावे. नंतर तांदूळ घालून परतावेत. वरील हिरवी पेस्ट घालून परतावी. गरम पाणी २ ते २ १/२ वाटी घालून भात मोकळा शिजवावा. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे . हा पुलाव मिर्च का सालन बरोबर सर्व्ह करावे.


मिर्च का सालन :१/४ वाटी तीळ आणि २ टेबल स्पून खसखस, आणि १/४ वाटी सुक खोबर वेगळ वेगळ थोड्या तेलावर परतू एकत्र पेस्ट करावी. तेल गरम करून मोहरी, मेथी दाणे, जिरे,हळद,  हिंग, आणि नंतर आलं _लसूण पेस्ट घलावे परतावे . नंतर पाणी घालुन उकळावे. वरील पेस्ट घालावी.मीठ, चिंच पेस्ट घालावी. शेवटी लांब जाड हिरव्या मिरच्या मध्ये चीर पाडून त्या मिरच्या सोडाव्यात. २  गरम करून कोथिंबीर घालून परोठा, आणि हैदराबादी पुलाव बरोबर सर्व्ह करावे.


शामी कबाब :   १ पाव मटन खिमा घ्यावा. १/२ वाटी हरबरा डाळ  भिजवून जाडसर वाटावी. तेल गरम करून त्यावर मिरे, जिरे, आलं _लसूण  पेस्ट आणि लाल मिरची पेस्ट घालून परतावे. त्यावर खिमा, डाळ  घालून ,  परतावे. कोरडे करावे. बारीक वाटावे. नंतर ही पेस्ट, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, मीठ, तिखट घालून कबाब तळून  घ्यावेत. किंवा shallow fry  करावेत.      


 जानेवारी ९३  मध्ये आम्ही पुन्हा देवलालीला पोस्टिंगवर आलो. आणि हे जम्मू काश्मीरला duty वर दीड वर्षा   साठी गेले.                  

Thursday, 23 May 2013

खूप दिवस नानाविध  विचारांमध्ये गेले. डोक्यात विचारांचं काहूर माजलं होत. प्रश्न भरपूर होते पण उत्तर एकाही प्रश्नाला नव्हत. अभिषेक १ १ /२  महिन्याचा होता तेंव्हा त्याला मी घरच्यांबरोबर देवदर्शनाला घेवून गेले होते. कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, सर्व करून आलो. गाडीतून जातांना त्याला पूर्ण वेळ हातात वरच्या वर धरून प्रवास केला, त्याला मानेला, पाठीला धक्का बसू नये म्हणून!   शिवाय श्रीनगरहून परत येताना आम्ही वैष्णोदेवीला पण जाऊन  आलो. घोड्यावरून वैष्णोदेवीला जाताना आणि येताना अभिषेकला मी backsack मध्ये घालून अगदी घट्ट  धरून बसले होते, त्याला धक्के बसू नये म्हणून! मी अगदी दमून गेले होते, पण मला त्याचे काहीच वाटले नाही .

तर, ह्या सगळ्यातून मी स्वतः ची   ही समजूत करून घेतली, की तो बहुधा देवदर्शना साठीच आला होता, ते झालं, आणि तो निघून गेला. पण, आज सुद्धा एकही  क्षण असा नाही की त्याचे  नाव   माझ्या  डोक्यात, मनात, नाही, किंवा त्याचा विचार माझ्या मनात नाही.


त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला काही ना काही उपक्रम करते आणि त्याची आठवण ठेवते.कधी लहान मुलांना कपडे, कधी कुणाची शाळेची फी भरणे,  किंवा असे  काहीही ज्यामुळे मला आनंद आणि समाधान दोन्ही मिळेल
.





प्रमोदिनीला माझ्या नंतर एक महिन्यानीच मुलगा  झाला.  आदित्य!. त्यामुळेच की काय, माझा आदित्यवर जास्त जीव आहे, आणि त्याच्या प्रगतीत मी मनातल्या मनात अभिषेकची पण प्रगती बघते.
अभिषेक आणि आदित्य!
.आता आदित्य मोठा झाला आहे. त्याच्याशी बोललं  की छान  वाटत. त्याला बघीतलं की आनंद वाटतो. त्याला काही गिफ्ट दिलं, की मनाला समाधान मिळत!
थोडे मोठे ८ _ ९ महिन्याचे आदित्य आणि अभिषेक !
असो, सगळ दुःख आता मागे टाकले आणि फक्त छान  आठवणी समोर ठेवून पुढे निघाले.  
         .         

Tuesday, 21 May 2013

२१ दिवसांच्या सुट्टी नंतर पुण गाठलं! ती आठ नोव्हेंबर ची तारीख होती. दुसऱ्या  दिवशी अभिषेकला दवाखान्यात न्यायचं होत. थोडी सर्दी, खोकला, झाला होता आणि थोडा मलूल पण दिसत होता. आई, बाबा पण आले होते रहायला.  घराचा  गाडा  पुन्हा जागेवर आणला . घरचे जेवण जेवल्यावर काय बर वाटल, काय सांगू! अर्थात बहुतेक मन्डलींना असच वाटत असणार! दुसऱ्या दिवशी दुपारी अभिषेकला दवाखान्यात न्यायचं होत. त्यामुळे दुपारी रिक्षात बसले, तर त्याला बाय करायला ४_५  मुलांनी गर्दी केली. सगळ्यांना बाजूला केलं  आणि निघालो.मी दवाखान्यात कधीच  कुणाला बरोबर नेत नाही,तशी गरजही कधी वाटायची नाही.   पण का कोण जाणे, त्या दिवशी आईला बरोबर घेतले.

आणि अघटीत घडलं ….   चेकअप करून अभिषेकला बाहेर आणलं, आणि खुर्चीवर आईच्या मांडीवर झोपवून कपडे घालून देत होते.  तेवढ्यात___तो एकदम स्तब्ध झाला आणि डोळे मिटल्यासारखे वाटले. मला काही तरी खटकले, आणि एकदम त्याला उचलून डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरले. त्यांनी लगेच त्याला  ICU मध्ये नेले ,जे करू शकत होते ते केले ,पण…. सगळे प्रयत्न व्यर्थ गेले …।

दिवाळीचे दिवस होते ते. घरात आकाश कंदील  लावले होते, पण  आम्ही सगळे वेगळ्याच मनः स्थितीत घरी परत आलो होतो. न माझ्या मनात प्रश्न होता की, मी भानुप्रियाला  काय उत्तर देणार होते? आणि तिला काय समजणार होते? तिचे वय तरी होते का काही समजायचे? मन सुन्न झाले होते.  अभिषेक बरोबर घालवलेले सर्व क्षण झरझर डोळ्या समोरून तरळून  गेले. पण आता काहीच हाती लागणार नव्हते….