ऑफिसर स्टेशनमधेच पोस्टेड असेल तरी आम्ही बिझी असतोच. आर्मी मध्ये' लेडीज क्लब,' हा आम्हा बायकांसाठी एक मोठाच विरंगुळा असतो अस म्हटल तर वावग ठरणार नाही. पण त्याच बरोबर शिकायला मिळते हे ही खरेच. अर्थात, तसा हा प्रोग्राम फार सिरीयसली घेतला जातो. प्रत्येका युनिटला एक प्रोग्राम करायला मिळतो, आणि त्यात कधी नृत्य, संगीत, एखादा डेमो देणे, मनोरंजनपर कार्यक्रम सादर करणे,आसन व्यवस्था , कार्यक्रमांचे सूत्र संचालन करणे, काही स्पर्धा असतील तर योग्य प्रकारची बक्षिसे देणे, जेवण किंवा अल्पोपहार असेल त्याचे नियोजन करणे, त्यात विविध आणि रुचकर पदार्थ सादर करणे,नवीन आलेल्या ऑफिसरच्या बायकांची रीतसर ओळख करून देणे, पोस्टिंग वर निघालेल्या ऑफिसर्स च्या बायकांना योग्य मेमेंटो देणे, पाहुण्यांची उठ बस ह्याकडे प्रामुख्याने लक्ष देणे,सर्वांचे स्वागत करणे आणि निरोप देणे,अशा अनेक जबाबदाऱ्या सर्व लेडीजना दिल्या जातात, आणि त्या चोखपणे पार पाडाव्या लागतात. ह्या कार्यक्रमा साठी विशेष परिश्रम घेतले जातात. ह्या कार्यक्रमातून देखील आपल्या कला गुणांना वाव मिळतो. कधी कधी बाहेरहून सिनियर ऑफिसर्स आणि पत्नी येतात तेंव्हा त्यांच्या स्वागता प्रित्यर्थ विशेष कार्यक्रम आखले जातात .
जवानांच्या बायकांसाठी देखील 'वेल्फेअर प्रोग्राम' केले जातात. त्यात त्यांच्या साठी शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि मनोरंजनाचे कार्यक्रम केले जातात. त्या बायका पण खूप talented असतात. शिवणकाम, विणकाम, हस्तकला, पाककला, हे सर्व पारंपारिक तर करतातच, पण हल्ली तर त्या computer शिकतात, नवीन नवीन उपक्रम त्यांच्या साठी हाती घेतले जातात. ह्यात ऑफिसर्स, त्यांच्या बायका, आणि त्यांच्या मुलांचे देखील बरेचसे योगदान असते. ह्यात विधवा महीलांसाठी पण काही योजना राबवल्या जातात, आणि त्यांना पण वेळोवेळी कार्यक्रमाला बोलावले जाते, त्यांची खबर ठेवली जाते, काही प्रश्न असतील तर ते मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जातात. ह्या द्वारे त्यांच्याशी आपुलकीचे नाते राखले जाते.
आर्मी मध्ये दिवाळीत 'दिवाली मेला ' हा मोठा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी घेतला जातो. ह्यात 'आनंद मेळा' जसा भरतो, तसा हा मेळा असतो, पण ह्याची खासियत अशी की प्रत्येक युनिटचा आपला एक stall असतो, आणि त्यात विविध वस्तू विक्रीसाठी ठेवतात, ज्यात बऱ्याच वस्तू जवानांच्या बायकांनी बनवलेल्या असतात. शिवाय, एका दिवशी खास सर्वासाठी म्हणून फटाक्यांची आतषबाजी असते, ही मात्र अगदी बघण्या सारखे असते .
एखादा नवीन ऑफिसर स्टेशन मध्ये पोस्टिंग वर आला, की त्याला घरी जेवायला किंवा चहाला बोलावले जाते, एखादा सिनियर ऑफिसर असेल तर ऑफिसर्स मेस मध्ये पार्टी दिली जाते. क्वचित प्रसंगी एखाद्याला ब्रेकफास्टला देखील बोलावले जाते. हेच सर्व आपण नवीन स्टेशन मध्ये पोस्टिंग वर गेल की पण होत. तर जेवणाची वेळ, येणारी माणसे त्यांची संख्या, त्यांची सिनियरटी, वगैरे बाबी लक्षात ठेवूनच मेनू तयार करावा लागतो. त्या प्रमाणे घरात कधी कधी सजावट पण बदलावी लागते! म्हणजे थोडक्यात काय की, तुम्ही सतत बिझी असता! तेंव्हा डिप्रेस व्हायला, दुखी व्हायला, बोअर व्हायला वेळही नसतो, आणि वावही नसतो! नेहमी रेडी असाव लागत, कोणत्याही प्रसंगाला सामोर जायला! शिवाय घरच्या इतर जबाबदाऱ्या, मुलांच्या शाळा, जेवण, डबे, ह्या गोष्टी तर आहेतच.
पोस्टिंग आले, की पण धमाल असते! म्हणजे काय की निघायच्या साधारण आठ दिवस आधी पासून packing ला सुरुवात होते. तेंव्हा जेवण बनवायचे काम जरा जडच वाटते. पण चिंता नसते. कारण, आपल्या सोबतच्या ऑफिसर्स कडून आपल्याला अगदी ब्रेकफास्ट पासून डिनर पर्यंत आमंत्रण असते. कारण जेंव्हा दुसरा कुणी पोस्टिंग वर जातो, तेंव्हा आपण त्याला बोलावतोच ! तर अशी एकूण मजा असते.आणि ह्या सर्व मेजवानी प्रसंगी खूप फॉर्मल वातावरण असत. म्हणजे क्रोकरी, मेनू, गप्पांचा ओघ सर्व अगदी व्यवस्थित असावे लागते, वगैरे. पण कधी कधी सम्बन्ध फार चांगले असतील तर थोडे वागणे बोलणे शिथील आणि मनमोकळे रहाते, हे नक्की.
ऑफिसर्स साठी पण वेगळे कार्यक्रम होतात. त्यांना वेलकम स्पीच किंवा फेअरवेल स्पीच द्यावे लागते.
त्यानंतर महत्वाचा कार्यक्रम _मेजवानी!
मेजवानी नंतर ऑफिसर तिथल्या रेकोर्ड बुक मध्ये सही करतो.
आणि त्या ऑफिसरला मग सीओफ केले जाते.
आता पार्टी मध्ये खास करून बनवले जाणारे snacks खाली देत अहे.
चिकन टिक्का: चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्यांना मीठ, तिखट, आलं _लसूण पेस्ट, गरम मसाला, दही , लाल मिरची पेस्ट, लाल रंग, लावून ३ ते ४ तास मुरवत ठेवावे. सर्व्ह करण्या साठी टिक्का तंदूर मध्ये भाजावेत, किंवा तळून घ्यावेत. कांदा, लिंबु सोबत सर्व्ह करावे.
वेजिटेरियन्स साठी __ हीच डिश पनीर, बटाटा तुकडे घेवून करता येते.
एग ऑन टोस्ट : ब्रेडचे छोटे चौकोनी तुकडे करून तळून घ्यावेत. तेल गरम करून त्यावर अंडे फोडूनशिजवावे. त्यात मीठ, मिरची तुकडे, मिरे पूड घालावी आणि भुर्जी बनवावी. आता सर्व्ह करण्या साठी, प्लेट मध्ये टोस्ट ठेवावेत, त्यावर भुर्जी घालावी, कोथिंबीर,आणि हवे असल्यास पनीर, चीझ, चेरीने सजवून सॉस सोबत द्यावे.
व्हेजीटेबल्स विथ मेयोनेस: बटाटा, काकडी, गाजर, मुळा, पनीर, फ्लॉवर, ब्रोकोली, ह्या भाज्यांचे लांब तुकडे करून थंड करून घ्यावेत. प्लेट मध्ये भाज्या ठेवून मेयोनेस सोबत सर्व्ह करावे. हा snacks चा प्रकार खास करून उन्हाळ्यात दिला जातो.
असेच पदार्थ पुढे ही आहेत, आणि गमती सूध्दा!
No comments:
Post a Comment