Sunday, 30 June 2013

AAMCHYA BANGLORE MADHLYA GHARCHYA GAMATI

हां, तर मागच्या वेळी भैयांच्या गमती सांगत होते. लखनौला एक भैया होता त्याच नाव आता आठवत नाही, पण त्याला टिमीचा खूप लळा  होता. तर तीन दिवसांसाठी सुट्टी  सुट्टी चालला होता तो.  टिमीला समोर बसवून   त्याला कुरवाळत सांगत होता,"टिमी, मैं आता हूँ  ना  दो तीन दिन में, हाँ? तुम रोना नहीं हां।" आणि परत तोच डायलोग! हे अस पाच एक मिनिट चालल होत.  शेवटी मी त्याला म्हटल," भैय्या, तुम्हारा छुट्टी इधरही ख़तम हो जाएगा! जाओ, नहीं तो ट्रेन भी छूट  जाएगी!" तेंव्हा कुठे तो निघाला. 

जम्मुच्या पोस्टिंग मधे कुलदीप भैय्या होता, तो पण  टिमीचा जानी दोस्त! तसे  यूनिट मधले बरेचसे जवान त्याचे  मित्र होते!(खरच  आहे हे ! सगळे जण त्याच काम करायला तयार!) तर, जेंव्हा आम्ही यूनिट मधून निघालो, तेंव्हा सगळे जवान त्याला बाय  करायला आलेले! आम्हाला बाय केला म्हणजे काय ? आमची आपली गाड्या बरोबर …. समजलं  ना?आणि एक दोन जवान तर रडत होते, खरच सांगते.
टिमी  आणि त्याचा दोस्त कुलदीप भैया!

नाशिकला आम्हाला सेटल केल्यानंतर कुलदीप  परत निघाला तेंव्हा पण हेच इमोशनल सीन! मला तर हसू यायचं, पण आवरायची स्वतःला इतकच.नाशिकच्या कॉलनीत टिमीला एक सरदारजी दिसला, आणि टिमी  जोरात शेपटी हलवायला लागला! मी पण चकीत झाले, कारण त्याच्या ओळखीचे तिथे कुणीच नव्हते! तर, तो सरदारजी  हुबेहूब आमच्या मंगत भैया सारखाच दिसत होता! म्हणून टिमी  फसला! हा मंगत म्हणजे उत्तम कुक  होता, आणि दोन वर्ष आमच्या घरी होता जम्मूला. त्याची आणि टिमी ची फारच गट्टी! (म्हणजे टिमीची गट्टी नाही असं  कुणी विरळाच असेल, आणि अशी व्यक्ती आम्हाला माहीत नाही!) तर अशा ह्या गमती जमती!
कुलदीप भैय्या, मंगत भैय्या, आणि टीवी actor  संदीप राजोरा

 ह्या फोटोत असलेला संदीप राजोरा ह्या च्या बद्दल पुन्हा केंव्हा तरी सांगेनच. असो.

लखनौहून बंगलोरला आलो, आणि एका सुंदर शहराची ओळख झाली बर! ह्या शहराची मजा काही औरच! अतिशय सुंदर शहरम्हणजे,  जुने  बंगलोर आणि नवीन झपाट्याने वाढलेले अत्याधुनिक शहर असे दोन भाग करता येतील,एव्हढा फरक.

हे शहर जितके परंपरा सांभाळणारे, तितकेच  आधुनिक! भरपूर मंदिर, जुन्या आर्किटेकचरची साक्ष देणाऱ्या सुंदर इमारती, घरां मध्ये पारंपारिक रिवाजांची जपणूक करणारे  लोक, आणि त्याच बरोबर आधुनिक जगाची ओळख  म्हणून नावारूपाला आलेले हे शहर!
गोपुरम असलेली मंदिर   भरपूर पहायला मिळतात.

जुन्या पद्धतीचे कॉफी  हाउसेस, बाजार, मल्लेश्वरम सारखा  भाग, उडुपी हॉटेल, आणि त्याच बरोबर पब्स, डिस्कोज, कॅफे, बरिस्ता, सारखी  आधुनिक विरंगुळ्याची ठिकाणे पण आहेत. जिथे  दिग्गज कलाकारांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली रंगतात, तिथेच पाश्चात्य संगीताचे मोठे जलसे देखील होतात. दोन्हीचा चाहता वर्ग मोठा आहे, आणि वेगळा पण आहे, त्यामुळे दोन्हीला भरपूर गर्दी होतेच !नवीन, आधुनिक सुखसोयींनी युक्त residential  complexes, multiplexes, shopping malls, ह्या सगळ्या मुळे  शहराच्या  सौंदर्यात भरच पडली आहे. असे  नव्या _ जुन्याचा संगम असलेले, आणि ते सर्व जपणारे असे हे शहर आहे.
विधान सौधा म्हणजे विधान भवन.
  बद्दल आणखी बराच काही आहे पण पुन्हा केंव्हा तरी!         

SHANDAAR BANGLORE MADHLA GANAPATI UTSAV

बंगलोरला आलो आणि तिथला बंगलो पाहून थक्कच झालो! हे एवढ मोठ आवार, मोठ्या खोल्या, आणि पुढे मोठी मोकळी जागा,आणि त्या नंतर मेन  गेट! टिमीची  तर मजाच झाली. मोकळ फिरायला भरपूर जागा!  कितीही फिरला तरी जागा संपणार नाही अस घर.


  बंगलोर शहर खूप मोठ आहे. वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडत. म्हणजे एमज़ी. ऱोड , ब्रिगेड रोड, सारखे रस्ते म्हणजे बंगलोर शहराची शानच! मोठ्या, शानदार दुकानात शोप्पिंग साठी, फिरण्यासाठी, मित्र_मैत्रिणीन सोबत मजा करण्यासाठी, मोठ्या हॉटेल्सची हौस करण्यासाठी, छोट्या कॅफे,इराणी हॉटेल  मध्ये कॉफीचा, बन मस्काचा आस्वाद घेण्यासाठी, कॅफे कॉफीडे , बरिस्ता, सारख्या कॅफे मध्ये निवांत बसून एन्जॉय करण्यासाठी, आणि मुख्य म्हणजे मनसोक्त शोप्पिंगसाठी, एम. जी. रोडच!


सिल्कच्या साड्या ? वा!वा! मोठ्या "सिल्क palace  मध्ये दुकानात तर  सर्व जुन्या नव्या हीरोइन्सचे फोटो लावलेले आहेत. त्यांनी घेतलेल्या साड्या? विचारूच नका. पन्नास हजार(साठ आणि सत्तर च्या  दशकात ल्या किमती आहेत ह्या मी सांगत्ये त्या !) च्या पुढच्या साड्या, सोन्याच्या धाग्याच्या  साड्या , वगैरे वगैरे. नुस्त बघूनच खुश होतो माणूस (अर्थात तो माणूस आपल्या सारखा असेल तर नक्कीच फक्त बघूनच खूष व्हाव लागणार त्याला , नो option  यु सी !)असो.

चंदनाच्या फार आकर्षक वस्तू इथे मिळतात. शोभेच्या वस्तू, चंदन पेस्ट, उदबत्त्या वगैरे तर आहेतच, पण नक्षी काम केलेले दरवाजे, हत्ती, नटराजाच्या मूर्ती, वा!वा! नुस्त बघत रहाव! लाखो रुपयांच्या वस्तू. मल्लेश्वरम सारख्या भागाला  खूप पारंपारिक रूप आहे. तिथे ही मोठी बाजार पेठ आहे.  गणपती उत्सवात ह्या भागातच गणपतीच्या POP च्या मूर्ती मिळतात, आपल्या सारख्या शाडूच्या  मिळत नाहीत. पण प्रत्येक गणपतीच्या मूर्तीला कपाळावर  पांढऱ्या  चंदनाचे आडवे पट्टे  असतात!(तिथल्या पद्धती प्रमाणे ) . मग मी दर वर्षी पुण्याहून मे  महिन्यात सुट्टी वरून परत येतांना "ग्राहक पेठे "तून गणपतीची शाडूची मूर्ती घेवून यायचे!आम्ही लखनौ पासून गणपती बसवायला लागलो , तेंव्हा पण पुण्यातूनच न्यायचे गणपतीची मूर्ती. आणि मग साग्रसंगीत पूजा, आणि प्राणप्रतिष्ठा करून गौरी गणपती चा हा सण साजरा व्हायचा. माझा वर्षभरातला हा एकच मोठा सण.
देवा बाप्पा! ह्याला पण  थोडी बुद्धी दे!

गणपतीच्या आरती साठी पाहुणे आलेले आहेत !

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
















       













 







 



 गणपती आणि माझी नऊवारी साडी हे मेन आकर्षण बर का!  संध्याकाळ च्या आरतीसाठी तर बरेच ऑफिसर्स खास यायचे, आणि नंतर मिळणारा मोदक खावून फारच खूष व्हायचे.एक वर्षी जम्मूला गणपती साठी मी आणि आमच्या कूक पार्टीने मिळून ६ दिवसात जवळ जवळ ५०० तळलेले  मोदक केले होते! चेष्टा नाही!



गणपती बाप्पा मोरया!पुढच्या वर्षी लवकर या!

 
पण महाराष्ट्र सारखा गणपती उत्सवाचा बडेजाव तिथे नाही. फारशी मंडळ वगैरे नाहीत, आवाज, गाणी,  देखावे वगैरे काहीच नाही! छोट्या प्रमाणावर गणपती साजरा होतो. घरगुती गणपती भरपूर. कारण तिथलं आराध्य दैवत सुद्धा गणपती आहे. चतुर्थीला गणपतीच्या दर्शनासाठी आपल्यासारख्याच रांगा लागतात तिथे मंदिरान मध्ये. असो, बंगलोर च्या गप्पा एवढ्यात संपणार नाहीत, तर पुन्हा उद्या!



Sunday, 23 June 2013

TIMMY , KILLA AANI BARECH KAHI

timmy च्या गमती आठवत  आठवत मला लखनौ मधल्या होळीची आठवण झाली. होळीच्या दिवशी सकाळी आमच्याकडे बरीच मन्डळी  आली होती, आणि टेरेस वर रंग खेळत होती. सगळ्यांना मी बुंदीचे  लाडू दिले, आणि बाऊल हॉलमध्ये ठेवला. तर कुणीतरी मुल मला सांगत आली,"आंटी,आंटी, timmy  ने लड्डू उठा लिया!और कोने  में बैठकर खा रहा है! timmy ला बुंदी चे लाडू फारच आवडायचे, त्या मुळे  आम्हाला फारच मजा वाटली. हा पिल्लू होता ना, तेंव्हा चहा फार आवडायचा त्याला . सकाळी आणि दुपारी आमच्या बरोबर चहा प्यायचा!
चहा प्यायला की मी कसा एकदम active  baby !
बघा बर मी कुठे दिसतो का ते ?आता बुंदीचे लाडू फस्त केल्या वर पचवायला हवेत ना? म्हणून थोडी विश्रांती, इतकचं!   
काय असेल ते असो, पण लखनौ  कॅंटच्या  सदर बजार मधल्या "छप्पन भोग मिठाई "ह्या प्रसिद्ध दुकानातले बुंदीचे लाडू हे आमच्या कडे सतत येत राहिले आणि timmy  ते खात राहिला! तर  आणि आमची, सर्वांचीच मजा. खरेदी आणि खाणे दोन्ही भरपूर केले!
आईने packing ला सुरुवात केली, तर मी म्हटल थोडी मदत आपली पण! मी आपला  इथे बसून सगळ्यांवर लक्ष ठेवून  असतो ,कसं?

अरे   हो, किल्ला केला ते सांगितलच नाही की! मी पुण्यातच  किल्ला करायला सुरुवात केली होती. लखनौला  तर वरच्या मजल्यावर flat होता तर बाल्कनीत किल्ला केला होता. दिवाळीची खरी मजा फराळ आणि किल्ला!माझ्या लहानपणच्या छंदाला नव्याने उजाळा मिळाला होता.



   
 भानुप्रीयाला पण शिकायला मिळालं. दगड,माती, पोती, काय काय समान लागायचं! किल्ला बनवायचा, गवत उगवायचं, खेळणी सजवायची, दिवे, मेणबत्त्या लावायच्या, रांगोळी काढायची! आणि रोज दिवसातून दोनतीनदा बघायचा! आमच्या कडे दिवाळीत घरी कोणी आल, की पहिला किल्ला बघूनच खुश व्हायचे. फराळ वगैरे नंतर. मुल तर एकदम आश्चर्याने बघायची!


आणि नाशिकला आल्यावर देखील हा किल्ला बनवणे चालू आहे. ह्या किल्ल्या संदर्भात मी "गावकरी"ह्या स्थानिक पेपर मध्ये माझा  एक लेख देखील प्रसिद्ध झाला होता,"आम्ही किल्लेदार" ह्या नावाने. पण त्यातल एक वाक्य फार बोलक होत,"जेंव्हा किल्ला उतरवतो, तेंव्हा अगदी गणपती विसर्जनाच्या वेळी बाप्पा बोळवताना   जसं  मन भरून येत, तसच मन भरून येत! तर नाशिक मधल्या केलेल्या किल्ल्यांचे हे फोटो….


त्या काळी  गणेशोत्सवात होणारे गावातले करमणुकीचे कार्यक्रम

 महाराजांचा दरबार भरलाय ! किल्ल्याच्या बाजूने कडेकोट बंदोबस्त आहे!

हा शिवाजी महाराजांचा किल्ला, आणि खाली वसलेलं गाव! आणि हो,  अत्याधुनिक ऐअर फोर्स स्टेशन पण आहे!







आणि २ वर्षांनंतर आमची पोस्टिंग बंगलोरला झाली. मला फारच आनंद झाला! एप्रिल २००० मध्ये बंगलोरला गेलो. आता timmy ला २ जवानां  बरोबर सामानाच्या  ट्रक बरोबर पाठवलं. ३ _४ दिवसांचा प्रवास करून timmy  आणि सामान बंगलोरला पोहोचले. तसा timmy  अगदी दोनच वर्षांचा होता, पण फार समजूतदार होता. त्यानं  काहीही त्रास दिला नाही. आणि मुख्य म्हणजे त्याची तब्येत व्यवस्थित राहून तो आला हे आम्हाला महत्वाचं  होत.
पण आमचे जवान खरच आमची सर्वांचीच खूप काळजी घेतात, अगदी जिवाला जीव लावतात असं  म्हटलं तरी चालेल. म्हणजे समोर आपण नसलो तरी निष्काळजीपणा नाही करत. खरतरं  we  owe  them  our  very  existence  in the army!आम्ही लेडीज आणि मुल त्यांना "भैया" म्हणतो. म्हणजे हा  कॉमन शब्द आहे. आम्ही ऑफिसर्स आणि लेडीज  दोघही  कितीतरी वेळ, आणि किती तरी वेळा घरा बाहेर असतो, पण मुलांची काळजी हेच जवान करतात, त्यांना खायला देणे,लक्ष ठेवणे, आणि कितीतरी वेळा आमचे भैय्याच जेवण बनवून घालतात मुलांना!
भैया सोबत असले की अगदी सुरक्षित वाटत!
!
भानुप्रिया अगदी लहान होती तेंव्हा आमचा "पाटील भैय्या" होता,  तो तिची खूप काळजी घ्यायचा! त्यांचे अगदी दोस्तच होऊन जातात हे भैया! पोस्टिंग आली की निघतांना अनेक वेळा हे भैया रडतात! फार इमोशनल सीन होतात कधी कधी. अजून सुद्धा तो कधीतरी भेटायला  येतो , कारण तो मालेगावला रहातो  जे नाशिक पासून जवळच आहे. एखाद्या पार्टीला जायचं असलं  तर हाच पाटील भैया भानुला चारपाई वर ठेवून ,लक्ष ठेवायचा.

पाटीलभैय्या जवळ बसूनच कार्यक्रम बघणार मी!
अशी नाती बनून जातात,आणि काही काही आठवणी तर आयुष्यभर आपल्या सोबत राहतात!अशा भैय्यानच्या  पण बऱ्याच आठवणी  आहेत. पुन्हा केंव्हा तरी!                     

Friday, 21 June 2013

KHAAYCHI CHANGAL AANI RIKSHAW CHI SAFARI-LUCKNOW MADHLI

तर, लखनौ बद्दल सांगत होते ना! उन्हाळ्यात तशी मजा तर थंडीची वेगळीच मजा!थंडीत 'कोहरा ' म्हणजे काय असते ते अनुभवायला मिळालं . म्हणजे डोळ्या समोर धुके आलेले पाहिलं आहे!थंडीतली उडालेली तारांबळ तुम्ही मागच्या लेखात वाचलीच ना! पण तरी, थंडीत सकाळी अकरा च्या सुमारास बाजारात जायचं! आहाहा! ठराविक मिठाईच्या दुकानांसमोर जमलेली गर्दी बघायची.
खवैये खवैये मंडळी जमा झाली!
छप्पनभोग मिठाई चे दुकान

गर्दी कशा साठी ? तर, भरपूर ड्रायफ्रुट्स घातलेला  गरमा गरम गाजर का हलवा,  वर्ख लावलेले गुलाबजामून,  जलेबी, असे गोड पदार्थ,

किंवा मग कचौडी, पाकौडे, पुरी _सब्झी ह्या तिखट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी!आणि घरी पार्सल नेण्यासाठी! बघा, पुन्हा तोंडाला पाणी सुटले!ही अशी दृश्य आहेत जी "they  are etched  in my  mind forever!मी कधी उदास वगैरे झाले, तर अशी दृश्य मनात आठवते, म्हणजे हसू पण येत आणि फ्रेश पण वाटत!

म्हणजे उन्हाळ्यात संध्याकाळी आणि थंडीत सकाळी हे  बाजार गच्च भरलेले असतात! तिथे सलवार कुडता एकसे एक शिवून मिळतात!आणि बायका, मुली, कुणीही पहा,  अगदी डोक्या पासून पाया पर्यंत matching   करणार आणि मगच बाहेर पडणार! थंडीत तर, ड्रेस किंवा साडी   बरोबर शाल, स्वेटर  बरोबर match  झाली पाहिजे!  आणि दुपट्टा घ्यायची  style वा!वा !शाल एका खंद्या वर घ्यायची style वा!म्हणजे महिला कोणत्याही सामाजिक, आर्थिक, धाटणीतली असो, नखशिखांत मेकअप आणिक कपडे!छानशौकी जे म्हणतात ते हे!मला तर वाटत   त्यांच्या रक्तातच गुण असावा!मागे सांगितले तसे,सायकल रिक्षा मधून  गेलं  तरी हाच नखरा!तोच attitude!तोच तोरा! कारण सायकल रिक्षा हेच साधन. पण आता आणखी गम्मत अशी की, सामान्य वजनाची २ माणसं बसतील एवढी  सीट असलेल्या सायकल रिक्षात किती जणांनी,आणि कसं  बसावं ?ह्याला काही मर्यादा? बिलकूल नाही!


८० ते ९०  किलो वजनाच्या जाडजूड २ बायका मेन सीटवर हं. मेनसीटच्या समोर १ फूट रुंदीच्या फाट्यावर ३ मुलं  किंवा २ मोठी माणस बसणार, आणि रिक्षाच्या मागच्या बाजूला पण खाली आणखीन एक पट्टा, त्यावर पण २_३  मुलं  बसू शकतात! म्हणजे बघा? आणि बरोबर सामान असणारच, ते वेगळ हं !ही जत्रा बाजारातून निवांत चाललेली असते. आता कदाचित हसू  येईल हे  वाचतांना, पण हे दृश्य जेंव्हा बघतो तेंव्हा हसू तर नाहीच येत,उलट , त्या  काटकुट्या रिक्षा वाल्याची होणारी दमछाक आणि पोटासाठी, ते ओझं वाहून  नेण्याची त्याची केविलवाणी धडपड बघून डोळ्यात पाणीच येत. हे आठवून सुद्धा डोळ्यात पाणी आलं.

आणि हो, एवढी मोठी जत्रा ओढून नेण्या साठी रिक्षावाल्याने मागितलेले पैसे द्यायला मात्र कुरकुर करणार, हुज्जत घालणार आणि दीडदमडी त्याच्या हातावर टेकवून निघून जाणार, परत "आम्ही तुझ्यावर उपकारच  केलेत एवढे पैसे दिले ते!"हा भाव चेहऱ्यावर! हे मी स्वतः पाहिलंय म्हणून सांगते आहे. आणि आम्ही? २० रुपये झाले तर ३०  देतो!

तर आणखी काही किस्से नंतर. पण मूड बदलण्यासाठी  काही छान  लखनवी रेसिपी:

 दहीवाले आलू: तेलावर मोहरी,हिरवी मिरची, कढीपत्ता, आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतणे. बटाट्याचे मोठे तुकडे घालून परतणे.मीठ, तिखट, हळद घालून नंतर दही घालून नित परतावे. लिंबू  रस,  घालून वाढावे.

कैरीचे लोणचे:   १ किलो कैरीचे मोठे तुकडे करून ३ ते ४ तास उन्हात वाळवावेत. थंड करून घ्यावेत . १/ २ किलो मोहरीचे तेल गरम करून हिंग घालून थंड करून घ्यावे. आता मसाला बनवावा_ १ tbsp मेथी दाणे  तळून, १ tbsp बडीशोप भाजून पूड, १ tbsp मीठ, १ tbsp  हळद,१ tbsp  कलौंजी (कांद्याचे बी)भाजून पूड,१ tsp हिंग, सर्व एकत्र करावे. आता कैरीच्या फोडी, मसाला, तेल, आणि १ tbsp  acetic acid  सर्व एकत्र करून नीट    कालवून लोणचे भरून ठेवावे.

TIMMY CHE LUKHNOW MADHLE AAGAMAN

मागे सांगितलेलं तर झालं  लखनौच्या संस्कृती बद्दल. आमच्या लखनौ कॅन्टोनमेंट बद्दल काय सांगावे?  आणखीन ४ पाने लागतील!लखनौ कॅन्टोनमेंट फार छान, शांत एरिया! पुण्या सारखे" शहरातून जाणारे cantt चे रस्ते, किंबहुना cantt मधून जाणारे शहराचे रस्ते," लखनौ मध्ये नाहीत. मस्त वातावरण होत! सकाळ संध्याकाळ वॉकला, बाजारहाट असेल तर सदर बजार मध्ये जायचं.
आणि तिथलं वर्णन तर आधीच केल आहे ना? लोणची, ताज्या भाज्या, गरमागरम पकवान, थंड लस्सी, छास, कापड बाजार, वा!वा!
आणि दुकानदारांचे बोलणे तर मिठ्ठास!अदबशीर!म्हणजे,  गिऱ्हाईक खूष कसं  करावं, हे तंत्र आत्मसात केलेलं  असे हे दुकानदार! नाहीतर आपल्याकडे म्हणजे, "  दुकानातील सर्वात दुर्लक्षित वस्तू कोणती? तर ती म्हणजे गिऱ्हाईक! "हे तंत्र कसोशीन  पाळल  जात! आणि त्यांच्या ह्या मिठ्ठास बोलण्याच्या  खुबीनेच छोट्याश्या वस्तूची खरेदी सुद्धा प्रसन्नता देवून जाते. आणि नेहमी प्रमाणे इथे सुद्धा मोटरसायकल वर भरपूर फिरलो! सगळे लोक आश्चर्याने आणि कुतुहलाने बघायचे!ह्याचीच मजा वाटायची.

आणि लखनौ च्या पोस्टिंग मधला  आणखीन एक महत्वाचा किस्सा म्हणजे आमच्या  TIMMY( पोमेरीयन) चे गोड आणि खलबळजनक आगमन!खळबळजनक का म्हटल ते पुढे कळेलच!
  
हा आमचा TIMMY ! 
  १९९३ मध्ये SUMA  आम्हाला सोडून गेली आणि त्या नंतर १९९४ मध्ये अभिषेक. हे दोन्ही धक्के मला आणि भानुला पचवायला फार अवघड गेले. खरतर, आजही आम्ही त्यांची तिघांची आठवण काढत नाही असा क्षण विरळा. त्या नंतर कुत्र वगैरे पाळायच नाही असं ठरवल होत. पण २००० साली लखनौला आम्ही टिमीला आणले. त्याला आणायला गेलो तो किस्सा फार मजेशीर आहे. म्हणजे, ज्यांच्याकडे कुत्र आणायला गेलो,त्यांच्याकडे नेमके लाईट गेले होते. आम्ही बसलो, आणि तेवढ्यात त्यांनी  ७_८  पोमेरीयन पिल्लं  बाहेरच्या खोलीत सोडली! ते दृश्य फार मजेशीर होत, कारण ती पिल्लं  सैरभैर पळत सुटली! मी त्यातल एक पिल्लू उचललं, मांडीवर घेतलं, ती female  होती , पण ४ _५ मिनिट नुसती बसून होती. भानू म्हणली ही फारच आळशी दिसते!मग दुसर पिल्लू उचललं, आणि तो इतका active  होता की धडपणे हातात  सुद्धा थांबत  नव्हता! भानुला तो आवडला! त्याला घेतलं, बास्केट मध्ये मऊ मऊ गादीवर ठेवलं, अर्थात तिथे तरी तो स्वस्थ कुठे बसतोय? बास्केट सारखी हलत होती,आणि गाडी मुळे  धक्के पण लागत होते ना! (म्हणून म्हटलं होत खळबळजनक एन्ट्री!)आणि अशा प्रकारे TIMMY घरी आला!
खूपच वळवळ  आहे timmy च्या अंगात! त्याला उचलून घेतलेल अजिबात आवडत नाही!

बसं! तेंव्हा पासून घर टिमीमय होऊन गेलं!दिवसभर टिमीचाच विषय! तो कुठे आहे? तो काय करतोय? तो दूध प्यायला का?  खाल्लं  का? शू,शी केली का?वगैरे वगैरे असंख्य प्रश्न!आणि त्यांची मजेदार उत्तर! पूर्ण वेळ ह्यातच जात होता.आणि त्याला "प्रतापराव" अशी पदवी देखील बहाल केलेली आहे, कारण त्याचे असेच प्रताप आहेत म्हणून! सांगते……

एकदा  स्वयंपाकघरातून आमटीचे पातेले घेवून चालले होते, आणि तो अगदी पिल्लू होता, तर अचानक पायात आला,मी अडखळून पडले, आणि सगळी आमटी सांडली! हा घाबरून पळून गेला, पण आमची मात्र जेवणाची पंचाईत झाली! कारण आमटी म्हणजे  जीव की प्राण आमचा!  असो,तर हे असे आणखी बरेच पराक्रम आहेत timmyचे.

टेलिफोनची रिंग वाजली की सैरभैर पळणार, वाशिंग मशीनचा बझर वाजला तर घाबरणार,  डोअरबेल वाजली तर आतल्या खोलीत लपून बसणार!हे असं  घाबरट! आणी हो, कुकरची शिट्टी, ती विसरलेच की! त्याला पण जाम घाबरायचा, आणि भुंकायला लागायचा!
माझे लाड करा, पण कामाचं  मात्र बोलू नका!
त्याला फक्त लाड करून घ्यायला हवेत. लाड केले की खुश! आणि बाकी वेळ कसा घालवायचा? त्याच उत्तर ----------हे पहा! 
तसा भनुचा सगळा अभ्यास मीच घेतो  बर का! आई नाही काही.,कळलं?
घराच्या आत पाउस? मग काय?आईची छत्री आहे ना!
             

Monday, 17 June 2013

LUKHNOW DARSHAN

लखनौ शहरात प्रेक्षणीय स्थळ भरपूर आहेत.  मी आणि  भानुप्रिया वेळ मिळाला की जायचो. शिवाय आई बाबा आले होते तेंव्हा पण भरपूर फिरलो. एक म्हणजे "बावडी" ही एक ७ माजली इमारत आहे, आणि मध्ये विहीर आहे. तर तिथे खासियत अशी आहे की, काही ठराविक "झरोके" आहेत, जिथून इमारतीचे प्रवेशद्वार दिसते,आणि तिथली सविस्तर हालचाल दिसते, पण प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या व्यक्तीला वरचे काहीच दिसत नाही! तर संरक्षणासाठी केलेली ही बेमालूम रचना!

दुसर होत "भूल्भूल्लैया " ह्या इमारतीच्या गोलाकार रचनेत डावीकडे आणि उजवीकडे जिने आहेत, जे तुम्हाला पुन्हा  दुसऱ्या  ठिकाणी घेवून जातात, की पुन्हा तिथे जिने! आणि रस्ता नीट  माहीत नसल्या मुळे  तुम्ही हरवून जावू शकता. आणि त्या सासाठीच  अशी रचना केलेली होती, ज्या मुळे  दुष्मनाचा गोंधळ उडेल!
भूलभुलैया
हे पण सुरक्षा व्यवस्थेचं  उत्तम उदाहरण म्हणता येईल. आपल्याला मात्र तिथे गाईडच न्यावा लागतो. आणि एवढे करून गच्चीत पोहोचतो तेंव्हा लखनौ शहराचे जे दर्शन घडते ते मस्तच!


अर्थात , हे दर्शन म्हणजे "दुरून डोंगर साज्र्रे" ह्या म्हणी प्रमाणे आहे. कारण, लखनौ शहरात फिरताना मात्र  उघडी गटारे, नाले आणि घाणीचे साम्राज्य! बघायला मिळेल! पण असो.

कत्थक नृत्य 
लखनौ आणि उत्तर प्रदेशातच कत्थक ची खूप मोठे परंपरा  पहायला मिळते. भानुप्रिया पण २ वर्ष कत्थक शिकली , आणि २ परीक्षा पण दिल्या, पण पुढे काही शिकता आले नाही. आर्मी लाईफचा  हा मोठा fallout  आहे. कोणत्या ही गोष्टीचा पाठपुरावा करता येत नाही. पण लखनौ मध्ये आर्ट  आणि संकृती ची मोठ्या प्रमाणावर जोपासना होताना दिसते. आपल्याकडे जसं सवाई गंधर्व संगीत महोत्सव, किंवा वसंत व्याख्यानमाला असते, तसे नृत्याचे महोत्सव होतात. गझल गायन पण खूप प्रमाणात ऐकायला मिळते. लखनवी अदब वगैरेचे  पण दर्शन होते. कत्थक वरून आठवलं, मी भानुला क्लासला सोडायला आणि घ्यायला जायची . तर एक दिवस मी मोटरसायकल  कम्पाउंड मध्ये वळवली, तर तिचा क्लास सुटला होता, आणि मुली बाहेर उभ्या होत्या. तर त्यातली एक छोटी मुलगी होती ती अगदी बाहुली सारखी दिसायची, तिला मी "बार्बी डॉल" म्हणायची. तिने मला मोटर सायकल वर बघितले, आणि म्हणते कशी,"ऑ, मैने तो  फस्ट  टाईम कोई गर्ल को मोटर सायकल चलाते देखा!" मला गर्ल म्हणाली  म्हणून मी  तिला "thanks " म्हटलं! मग काय, सगळ्या बायका हसायला लागल्या! तिला पण छोटीशी राईड  मारून आणली, तर किती खुश झाली!

लखनौला उन्हाळ्यात बाजारात फिरण्याची मजा काही वेगळीच होती! कारण, तिथे छोट्या दुकानात लस्सी, छास, थंडाई, किंवा थंड लिंबू सरबत मिळायचं. आणि विविध प्रकारची लोणची?  आहाहा! त्या मोठ्या मोठ्या बरण्यात ठेवलेली ती मसालेदार लोणची!
कुल्हड मधली थंड लस्सी!
चमचमीत लोणची

आजही ते दृश्य आठवलं तरी तोंडाला पाणी सुटत! आवळा, लसूण, लाल मिरची,हिरवी मिरची, भोकर, गाजर, वांगी, मिक्स भाज्या, असे  अनेकविध लोणच्याचे प्रकार! मी सगळे ट्राय  केले आहेत. तिथली एक गम्मत सांगते! मी एक दिवस त्या दुकानदारबाईंना म्हटलं की, लोणची बघून तोंडाला पाणी सुटत, आणि लगेच खावीशी वाटतात, तेंव्हा रोटी पण ठेवायला सुरुवात करा! तर त्या बाईंना माझ्या ह्या अजब सूचनेच भारी हसू आलं. त्यानंतर मी दिसले की त्या हसायच्या! बहुधा तो विनोद त्या अजूनही विसरल्या  नसतील!

आणि चाट म्हणजे तर लखनौचा प्राणच  असावा!

एव्हर ग्रीन पाणीपुरी!

बास्केट चाट,पकोडी चाट, आलूचाट, पाणीपुरी, रगडापाटीस, इत्यादी,इत्यादी! वा! वा!   नुस्त आठवल तरी तोंडाला पाणी सुटत! म्हणजे बघा!
बास्केट चाट
तर तोंडाला पाणी  सुटेल, असा टिक्की चा प्रकार_
आलू टिक्की


आलू मुंग भरवाँ टिक्की:   १०० ग्रॅम  मुगडाळ ३ ते ४ तास भिजवून, त्यात लसूण , आलं , हिरवी मिरची घालून वाटावे. तेल गरम करून त्यात डाळ  परतून घ्यावी. मीठ,कोथिंबीर घालुन शिजवावी. थंड करावी .
बटाटे उकडून mash करून, तिखट, मीठ,जिरेपूड,ब्रेड्चुरा किंवा बेसन घालून मळून घ्यावे. ह्याची पारी  करून, त्यात डाळीचे सारण  भरून, बंद करून तेलात डीपफ्राय किंवा शालो फ्राय करून चटणी सोबत सर्व्ह करावे.

 लखनवी समोसे:     १ वाटी मैदा,२ चमचे कॉर्नफ्लोर, २ चमचे रवा,मीठ,गरम तेलाचे मोहन घालून घट्ट  मळून घ्यावे. बटाटे उकडून, mash  करून, ठेवावा.इरे,तेलावर बडीशोप,मिरची तुकडे,हिंग,कलौंजी (कांद्याचे बी ) घालून, मग बटाटा घालून नीट  परतावे. धने पूड, मीठ,कोथिंबीर, (अनारदाना_बडीशोप_कलौंजी)मसाला  घालून थंड करावे. वरील मैद्याच्या पोळीत बटाट्याचे सारण भरून सामोसे बनवून डीपफ्राय करावेत.

लखनौ बद्दल आणखी बरच काही, पण पुढे!

Sunday, 16 June 2013

LUKHNOW SHAHRACHI SAFAR

2000साल ! first  year  ऑफ a  new millenium!इतका छान  वाटला हा अनुभव!  एका इसवीसनातून दुसऱ्या मध्ये प्रवेश!   माझ्या साठी एक नवीन पर्वच  सुरु झालं  म्हटलं  तर वावगे ठरणार नाही. कारण, हैदराबाद ची ६ महिन्यांची पोस्टिंग सोडली तर, आम्ही पुणे आणि देवळालीलाच जास्त होतो. त्यामुळे, लखनौला पोस्टिंग म्हणजे छान  खबर होती.
लखनौ रेल्वे स्टेशन

लखनौला सगळ्यात पाहिलं जाणवलं  ते म्हणजे, कडक उन्हाळा आणि कडक थंडी!  उन्हाळा म्हणजे इतका की अंगाची लाही लाही होण  म्हणजे काय ते कळत ! दिवसभर वातावरण तापलेलच आणि रात्री म्हणाल तर फारसा फरक नाही. नुसत्या पंख्याने भागात नाही,तिकडे सगळ्यांच्याकडे एसी आणि कूलर पाहिजेतच. पण आम्ही ह्या दोन्ही शिवाय काम चालवलं खर.

थंडी म्हणजे पुन्हा कहरच! डोळ्या समोर धुकं  पहायची ही पहिलीच वेळ! एवढी थंडी आम्ही कधीच अनुभवली नव्हती! नाही म्हणायला श्रीनगरला २१ दिवस होतो तेंव्हा थोडी थंडी होती. आणि थंडीचा हा तडाखा आणि त्याचा मुकाबला करण्या साठी आमच्या कडे फक्त २ _३  हलके फुलके स्वेटर!त्यामुळे तडक मार्केट गाठलं! स्वेटर, शाली खरेदी साठी!

अरेहो, लखनऊ मध्ये फिरण्यासाठी वाहन काय? तर माणसाने चालवलेली सायकल रिक्षा! तीन चाकी.
पहिल्या वेळी जेंव्हा मी बसले, तेंव्हा मला फार गिल्टी वाटत होत की, काय ह्या माणसाला आपला बोझा वाहायला लावतोय.! संकोच वाटत होता, पण नंतर लक्षात आलं, की काही इलाज नाही ह्याला. आणि ते रिक्षा चालवणारे इतके गरीब असतात की, अंगावर फटके कपडे, किंवा कधी कधी तर नुसता पंचा गुंडाळलेला, पण रिक्षा  ओढून गुजराण करणार. ३ _ ४ जुने  shirt _pant मी स्वतः काही रिक्षा वाल्यांना दिले आहेत. पण कितीही केलं  तरी पुरे थोडेच पडणार आपण ? असो, थोडी मनाची बोच कमी करण्याचे साधन! बाकी काय?


अमिनाबाद मार्केट
लखनौला 'अमिनाबाद' ह्या व्यापारी उलाढालीच्या परिसरात भरपूर दुकानं  आहेत. छोटी छोटी दुकानं, पण कपड्यांनी गच्च भरलेली!चिकन वर्क म्हणू नका, इम्ब्रोयडरी म्हणू नका, हेंड प्रिंटेड म्हणू नका! सर्व प्रकारचा कपडा तिथे मिळतो. स्वस्तात स्वस्त, आणि म्हटलं तर महागात महाग!तुम्ही मागाल ती रेंज आणि मागाल ते कापड!इम्ब्रोयडरी  करणाऱ्या  लोकांची तर तिथे एक विशिष्ट वस्तीच आहे. तिथे छोट्या छोट्या गल्ल्या मध्ये   दुकांनांच्या रांगा आहेत. पण इम्ब्रोयडरी बघितली तर डोळ्यांचे पारणे फिटेल अशी! कारागिरांचे हात चालत असतात, आणि सुंदर सुंदर रंगबिरंगी नक्षीकाम कापडावर अवतरत असते. हे पाहून अचंबित व्हायला होते.!
चिकन वर्क
त्यामुळे, फक्त खिशात पैसे हवेत! मग खरेदीचा आनंद लुटणे कितीसे दूर? पण बार्गेनिंग केल्या शिवाय इथे खरेदी नाही. मला तर मोलभाव करायला फार आवडत. त्यामुळे खरेदीचा आनंद द्विगुणीत होतो, कारण प्रश्न हा नसतो की वस्तू कितीला घेतली, पण कळीचा मुद्दा हा असतो की किंमत सांगितली किती आणि कमी किती केले! ह्यातच खरी मजा!

तर, मी लखनौहून पुण्याला  सुट्टीत यायचे, तेंव्हा मोठी काळी bag  भरून ड्रेस मटेरीअल, साड्या  आणायची. म्हणजे बिझिनेसचा उद्देश नव्हता, पण सगळ्यांना लखनौचा कपडा मिळावा तो पण ओरीजनल, हा उद्देश!मी बेंगलोरला पण सिल्क साड्या  घेतल्या होत्या तिथल्या  factory  outlet  मधून, आणि जम्मूला शाली घेतल्या होत्या!

लखनौ च्या आणखी गमती जमती पुढच्या वेळी! तोपर्यंत लखनौ च्या काही खास रेसिपीज!

दही भल्ले: १ वाटी उडीद डाळ, १ /२ वाटी मुगडाळ, एकत्र रात्रभर भिजवावे.(किंवा किमान ५ तास तरी ), नंतर बारीक वाटावे. कढईत तेल गरम करून छोटे वडे तळून घ्यावेत, आणि थोडा हिंग घातलेल्या कोमट  पाण्यात ५ मिनिटे बुडवून ठेवावेत. गोड दही, मीठ, आणि साखर घालून तयार करावे. सर्व्ह करताना, वडे हलकेच पिळून  प्लेट मध्ये ठेवावेत, त्यावर दही, जिरेपूड, चिंच चटणी , तिखट, हवे असल्यास चाट मसाला, आणि कोथिंबीर घालून द्यावे. हवे असल्यास प्लेट मध्ये  कडक पुऱ्या पण ठेवाव्यात.

मुंगभजी चाट: १००  ग्रॅम  मुगडाळ रात्री भिजत घालावी, नंतर वाटून मीठ घालून छोट्या भजी तळून घ्याव्यात. ४ ते ५ मिनिटे थंड पाण्यात बुडवून ठेवाव्यात. सर्व्ह करताना प्लेट मध्ये भजी ठेवून वरती चिंच चटणी घालून द्यावे.

मुगडाळ हलवा: २ वाट्या मुगडाळ रात्री भिजवावी, आणि सकाळी बारीक वाटावी. २ वाट्या तूप गरम करून डाळ  मंद gas  वर चांगली खरपूस भाजावी. १ वाटी तूप वेगळे ठेवून हळू हळू घालीत राहावे.  २ वाट्या साखर आणि २ वाट्या पाणी उकळत ठेवावे.  वरील डाळ  भाजली की हे पाणी घालावे, आणि झाकून मंद gas  वर हलवा नीट  शिजू द्यावा. लागल्यास थोडे दूध किंवा पाणी घालावे. हलवा थंड किंवा गरम  कसाही सर्व्ह करावा. ड्रायफ्रुट्स,वेलची पूड, केशर, वर्ख, आणखी तूप घालून द्यावे.
TIP: ही डाळ  चांगली भाजावी लागते, हे लक्षात ठेवावे.