लखनौ शहरात प्रेक्षणीय स्थळ भरपूर आहेत. मी आणि भानुप्रिया वेळ मिळाला की जायचो. शिवाय आई बाबा आले होते तेंव्हा पण भरपूर फिरलो. एक म्हणजे "बावडी" ही एक ७ माजली इमारत आहे, आणि मध्ये विहीर आहे. तर तिथे खासियत अशी आहे की, काही ठराविक "झरोके" आहेत, जिथून इमारतीचे प्रवेशद्वार दिसते,आणि तिथली सविस्तर हालचाल दिसते, पण प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या व्यक्तीला वरचे काहीच दिसत नाही! तर संरक्षणासाठी केलेली ही बेमालूम रचना!
दुसर होत "भूल्भूल्लैया " ह्या इमारतीच्या गोलाकार रचनेत डावीकडे आणि उजवीकडे जिने आहेत, जे तुम्हाला पुन्हा दुसऱ्या ठिकाणी घेवून जातात, की पुन्हा तिथे जिने! आणि रस्ता नीट माहीत नसल्या मुळे तुम्ही हरवून जावू शकता. आणि त्या सासाठीच अशी रचना केलेली होती, ज्या मुळे दुष्मनाचा गोंधळ उडेल!
 |
भूलभुलैया |
हे पण सुरक्षा व्यवस्थेचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. आपल्याला मात्र तिथे गाईडच न्यावा लागतो. आणि एवढे करून गच्चीत पोहोचतो तेंव्हा लखनौ शहराचे जे दर्शन घडते ते मस्तच!
अर्थात , हे दर्शन म्हणजे "दुरून डोंगर साज्र्रे" ह्या म्हणी प्रमाणे आहे. कारण, लखनौ शहरात फिरताना मात्र उघडी गटारे, नाले आणि घाणीचे साम्राज्य! बघायला मिळेल! पण असो.
 |
कत्थक नृत्य |
लखनौ आणि उत्तर प्रदेशातच कत्थक ची खूप मोठे परंपरा पहायला मिळते. भानुप्रिया पण २ वर्ष कत्थक शिकली , आणि २ परीक्षा पण दिल्या, पण पुढे काही शिकता आले नाही. आर्मी लाईफचा हा मोठा fallout आहे. कोणत्या ही गोष्टीचा पाठपुरावा करता येत नाही. पण लखनौ मध्ये आर्ट आणि संकृती ची मोठ्या प्रमाणावर जोपासना होताना दिसते. आपल्याकडे जसं सवाई गंधर्व संगीत महोत्सव, किंवा वसंत व्याख्यानमाला असते, तसे नृत्याचे महोत्सव होतात. गझल गायन पण खूप प्रमाणात ऐकायला मिळते. लखनवी अदब वगैरेचे पण दर्शन होते. कत्थक वरून आठवलं, मी भानुला क्लासला सोडायला आणि घ्यायला जायची . तर एक दिवस मी मोटरसायकल कम्पाउंड मध्ये वळवली, तर तिचा क्लास सुटला होता, आणि मुली बाहेर उभ्या होत्या. तर त्यातली एक छोटी मुलगी होती ती अगदी बाहुली सारखी दिसायची, तिला मी "बार्बी डॉल" म्हणायची. तिने मला मोटर सायकल वर बघितले, आणि म्हणते कशी,"ऑ, मैने तो फस्ट टाईम कोई गर्ल को मोटर सायकल चलाते देखा!" मला गर्ल म्हणाली म्हणून मी तिला "thanks " म्हटलं! मग काय, सगळ्या बायका हसायला लागल्या! तिला पण छोटीशी राईड मारून आणली, तर किती खुश झाली!
लखनौला उन्हाळ्यात बाजारात फिरण्याची मजा काही वेगळीच होती! कारण, तिथे छोट्या दुकानात लस्सी, छास, थंडाई, किंवा थंड लिंबू सरबत मिळायचं. आणि विविध प्रकारची लोणची? आहाहा! त्या मोठ्या मोठ्या बरण्यात ठेवलेली ती मसालेदार लोणची!
 |
कुल्हड मधली थंड लस्सी! |
 |
चमचमीत लोणची |
आजही ते दृश्य आठवलं तरी तोंडाला पाणी सुटत! आवळा, लसूण, लाल मिरची,हिरवी मिरची, भोकर, गाजर, वांगी, मिक्स भाज्या, असे अनेकविध लोणच्याचे प्रकार! मी सगळे ट्राय केले आहेत. तिथली एक गम्मत सांगते! मी एक दिवस त्या दुकानदारबाईंना म्हटलं की, लोणची बघून तोंडाला पाणी सुटत, आणि लगेच खावीशी वाटतात, तेंव्हा रोटी पण ठेवायला सुरुवात करा! तर त्या बाईंना माझ्या ह्या अजब सूचनेच भारी हसू आलं. त्यानंतर मी दिसले की त्या हसायच्या! बहुधा तो विनोद त्या अजूनही विसरल्या नसतील!
आणि चाट म्हणजे तर लखनौचा प्राणच असावा!
 |
एव्हर ग्रीन पाणीपुरी! |
बास्केट चाट,पकोडी चाट, आलूचाट, पाणीपुरी, रगडापाटीस, इत्यादी,इत्यादी! वा! वा! नुस्त आठवल तरी तोंडाला पाणी सुटत! म्हणजे बघा!
 |
बास्केट चाट |
तर तोंडाला पाणी सुटेल, असा टिक्की चा प्रकार_
 |
आलू टिक्की |
आलू मुंग भरवाँ टिक्की: १०० ग्रॅम मुगडाळ ३ ते ४ तास भिजवून, त्यात लसूण , आलं , हिरवी मिरची घालून वाटावे. तेल गरम करून त्यात डाळ परतून घ्यावी. मीठ,कोथिंबीर घालुन शिजवावी. थंड करावी .
बटाटे उकडून mash करून, तिखट, मीठ,जिरेपूड,ब्रेड्चुरा किंवा बेसन घालून मळून घ्यावे. ह्याची पारी करून, त्यात डाळीचे सारण भरून, बंद करून तेलात डीपफ्राय किंवा शालो फ्राय करून चटणी सोबत सर्व्ह करावे.
लखनवी समोसे: १ वाटी मैदा,२ चमचे कॉर्नफ्लोर, २ चमचे रवा,मीठ,गरम तेलाचे मोहन घालून घट्ट मळून घ्यावे. बटाटे उकडून, mash करून, ठेवावा.इरे,तेलावर बडीशोप,मिरची तुकडे,हिंग,कलौंजी (कांद्याचे बी ) घालून, मग बटाटा घालून नीट परतावे. धने पूड, मीठ,कोथिंबीर, (अनारदाना_बडीशोप_कलौंजी)मसाला घालून थंड करावे. वरील मैद्याच्या पोळीत बटाट्याचे सारण भरून सामोसे बनवून डीपफ्राय करावेत.
लखनौ बद्दल आणखी बरच काही, पण पुढे!
No comments:
Post a Comment