Friday, 22 November 2013

DIWALICHYA DIVASANCHE MAHATV

 दिवाळीची धूम सुरु होते शुक्ल पक्षातल्या द्वादशी पासून. द्वादशीला   म्हणतात 'गोवत्स द्वादशी' किंवा 'वसू बारस.'  वसू बारस म्हणजे गाई_वासराची पूजा करणे.  गाय आणि वासराला कुंकू लावतात, फुलांनी सजवतात, त्यांची ओवाळणी करतात, आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात.
वात्सल्याचे प्रतीक असते गाय आणि बालपणाची निरागसता दिसते वासरामध्ये, त्या वात्सल्याचे आणि निरागसतेची ही आराधना!

दुसरा दिवस 'धनत्रयोदशी' चा. धनत्रयोदशीला  आरोग्याची देवता म्हणजे धन्वंतरीची पूजा करण्याचा दिवस.
धन्वंतरी
आरोग्य सेवा आणि संबंधित सेवा पुरविणारे किंवा त्यात सहभागी असणारे लोक धन्वंतरीची पूजा करतात. डॉक्टर्स, medical practitioners या सर्वांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आणि भक्तीसाठी अगदी खास दिवस.  .भगवान धन्वंतरी म्हणजे सर्व देव देवतांचे वैद्य  मानले जातात, आणि ते आयुर्वेदाचे जनक म्हणून त्यांची पूजा करून आपण दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याची त्यांच्या पाशी प्रार्थना करायची.

 ह्याच दिवशी संध्याकाळी यम दीप दान करतात, म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एक पणती लावायची जिची ज्योत दक्षिणेला असेल अशी ठेवायची, पणतीला हळदी कुंकू वाहायच, फुल वाहायच, आणि दक्षिण  दिशा ही यमाची   दिशा असल्यामुळे,तिकडे हात जोडून, अपमृत्यू पासून अभय मागायचे, घरात सुख शांती मागायची.

तिसऱ्या दिवशी असते 'नरक चतुर्दशी'.  ह्या दिवशी  उठून उटणे लाऊन स्नान करून, सर्वांनी मिळून दिवाळीचा फराळ करायचा, फटाके उडवायचे, आणि घरात, भोवतीने भरपूर पणत्या लावायच्या.   नरकासुराचा वध झाला तो हा दिवस म्हणून आनंद साजरा करतात.

नंतरचा दिवस 'लक्ष्मीपूजा' म्हणजे कार्तिकातली अमावस्या. ह्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन करतात.  व्यापारी मंडळी त्यांच्या हिशोबाच्या चोपड्यांचे पूजन करतात.
लक्ष्मी माता
 
लक्ष्मीच्या प्रतिमेची, किंवा लक्ष्मीच्या चांदीच्या टाकाची पूजा केली जाते, लाह्या बत्तासे नैवेद्य म्हणून दिला जातो. लक्ष्मी बरोबरच धनाची देवता' म्हणून कुबेर'  ह्याचेही पूजन होते.
कुबेर _धनाची देवता
  सोबतच सोन्याच्या दागिन्यांची, आणि पैशांची पूजा केली जाते.

त्यानंतरचा दिवस मात्र खास बर का! कारण 'बळी प्रतिपदा' ह्या दिवशी पाडवा म्हणजे बायकोने नवऱ्याला ओवाळण्याचा आणि नवऱ्याने बायकोला छानशी ओवाळणी देण्याचा दिवस!!   

आणि द्वितीयेला सर्व बहिणींचा आवडता दिवस___ भाऊबीज!!
भाऊबीज
भावाने बहिणीला ओवाळणी देण्याचा हा दिवस. बहिण पण भावाला प्रेमाने घरी बोलावते, त्याला ओवाळते, आणि मग मनासारखी वस्तू ओवाळणी म्हणून घेते!

.
त्यानंतर एकादशीला तुळशीचे लग्न लागले की दिवाळी संपन्न होते!

तुळशी विवाह
 
 

Monday, 28 October 2013

DIWALICHI MAJA AANI MASTI!!!!

दिन दिन दिवाळी!
'दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी.
गाई म्हशी कुणाच्या?
लक्ष्मणाच्या .
लक्ष्मण कुणाचा?
आई बाबांचा!'
असं  म्हणत, फटाके, फराळ आणि पाहुण्यांच्या बरोबर धमाल मस्ती करत दिवाळी  साजरी झाली!

काही दिवसांपूर्वी देव  दिवाळी साजरी झाली, तुळशीचे लग्न लागले, आणि लगेचच पाठोपाठ  घरातली लग्नकार्य हाती घेण्याची लगबग सुरु  झाली! पुढील काही महिने भरपूर मुहूर्त  आहेत, त्यामुळे आता घरात निमंत्रण पत्रिकांचा ओघ वाढणार,(दोन already येउन पडल्या सुध्दा!) आणि सतत लग्नाला जावे लागणार, तिथले जड जेवण जेवावे लागणार! मग काय, acidity वगैरे त्रास उदभवणारच! 

अर्थात, त्रास होतो म्हणून काही कोणी खायचं थांबत नाही ना! आतां चातुर्मास संपला, त्यामुळे strictly non   vegetarian असणाऱ्या मंडळींनी सुटकेचा निःश्वास सोडला   असणार! chicken, mutton वगैरे भरपूर ताव मारून खाल्लं असणार!

अर्थात  मी पण चिकन केलंच  की! ते पण थाई स्टाईल! पण थोड fusion! दही,  मीठ,तिखट, चिकन मसाला, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण,लांब कापलेला कांदा, थोडे तेल आणि हवा असल्यास लाल रंग घालून ३ ते ४ तास चिकन marinate  करून, नंतर तेलावर छान परतून   घेतली. शेवटी, थाई रेड चिली पेस्ट पातळ करून घातली, आणि नीट शिजवून घेतले. कोथिंबीर आणि पुदिना घालून गरम गरम सर्व्ह केलं! मुलीनं ताव मारून खाल्लं की!

नंतर मूगडाळीचा शिरा खाल्ला! खाल्ला म्हणजे काय, फस्त केला!!!!
मूग डाळीचा शिरा
  

DIPAWALI ANANDACHI KARUYAA!

परवा बाजारात गेले होते. बाजाराचे रुपडे पाहून आनंदून गेले! अर्थात प्रत्येक सणाच्या प्रसंगी बाजार असाच  नटलेला असतो म्हणा! दिवाळी निमित्त बाजारपेठ नुसती फुलली होती, शृंगारली होती! रोषणाई, सजावट, आकर्षकपणे मांडलेल्या वस्तू, ग्राहकांना प्रलोभन दाखविणाऱ्या   खरेदीच्या नव्या नव्या आकर्षक योजना, भेटवस्तू, scratch card ,  काय नि काय! अशा वेळी  , 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी!' ह्या म्हणीच्या धरतीवर 'विकणाऱ्याच्या  वस्तू हजारो रे, परी, रिकामे माझे पाकीट रे!'असा  दुबळा विचार मनात येतो, पण क्षणभरच, की पुन्हा आपली shopping  सुरु! असो.

पण ह्या खरेदीच्या धुमश्चक्रीत दीपावली खऱ्या अर्थाने साजरी व्हायची तर राहून जात नाही ना,ह्याचे भान  मात्र ठेवायला हवे आपण सर्वांनी.दीपावलीच्या पाच दिवसांचे आपापले महत्व आहे, त्याप्रमाणे त्या दिवशी आचरण करावे.,थोडी का होईना  काही पूजा अर्चा करावी, आणि मग मजामस्ती! ह्यातूनच आपण आपले संस्कार पुढच्या पिढीला देणार आहोत, ह्याचे भान राहू द्यावे, अन्यथा, संस्कारांच्या रूपाने फक्त 'shop till you drop' एवढेच राहील!

दिवाळीच्या आपल्या घरातील झगमगाटात,   रोषणाईत, फराळाच्या सुगंधात, पाहुण्यांच्या सरबराईत, एकमेकांना शुभेच्छा देण्यात, आणि फटाक्यांच्या आतषबाजीत, आणि ह्या सर्व धामधुमीत, थोडा वेळ काढून एखाध्या उपेक्षित तान्हुल्याला काही खेळणं, खाऊ देवून, त्याच्या चेहऱ्यावरचे निर्व्याज्य हसू पहा, किंवा एखाद्या दुःखी जीवाला त्याच्या दुःखद प्रसंगी देखील दोन घटका गोड करून द्या, एखाद्या मुक्या प्राण्याला ताज्या पोळीचा घास घालून पहा,   त्याची आनंदाने गोलगोल फिरणारी शेपटी तुम्हाला किती आनंद देऊन जाईल! ह्यामुळे तुमची दिवाळी  आनंदमय होईलच, आणि त्यांच्या आशीर्वादाने भरभराटीची पण होईल हे नक्की!

दिवाळी अशीच गोड करण्यासाठी एक खास   वडी तुमच्या साठी……

काजूवडी: १ कप मिल्क पावडर, १ कप काजुपुड, ११/२ ते १३/४ कप पिठी साखर, गुलाबी रंग,१/२ कप  बटर,१/२ कप  दूध 

मिल्क पावडर, काजुपुड, पिठी साखर, रंग,बटर  आणि अंदाजाने दूध मिक्स करून pan मध्ये low heat वर शिजत ठेवावे. घटत गोळा झाला, की थापून वड्या कापाव्यात.

हवा असल्यास खवा घालता येतो. १/२ कप मिल्क पावडर कमी करून १/२ कप खवा गुठळ्या मोडून, थोडा भाजून घ्यावा.  

चला, फराळ बनवायचा आहे, तेंव्हा घाई  करायला हवी, नाही का? 


Friday, 25 October 2013

केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!

९ सप्टेंबर! त्या दिवसानंतर आज ब्लॉग लिहिते आहे!  इतका आनंद होतो आहे, काय सांगू! झालं होतं काय, की ब्लॉग चा  लँग्वेज ऑप्शन काम करेनासा झाला, आणि सगळं कामच थांबलं की! मग काय, सुरु झाली धावाधाव आणि पळापळ! भगीरथ प्रयत्नांना सुरुवात झाली.  (माझ्या साठी भगीरथ प्रयत्नच हो!) मोहीमच हाती घ्यावी लागली. मग मित्रमैत्रिणींना फोन, ईमेल, ब्लॉगवर मदतीसाठी कमेंट टाकली, प्लीज हेल्प म्हणून फेसबुक वर स्टेट्स अपडेट केलं , म्हणजे थोडक्यात जे जे शक्य होतं ते ते केलं. शेवटी, एका स्नेह्यांच्या मुलाने हा प्रॉब्लेम सोडवून दिला,  आणि मी  माझा ब्लॉग  लिहिण्यास पुन्हा सुरुवात केली आजच!

म्हणतात ना, की संकट आलं, तरी न डगमगता, संकटाला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हावे लागते. प्रसंग कठीण, संकटातून बाहेर पडण्याचा नक्की मार्ग माहित नाही, वाट अवघड, आणि कुठून सुरुवात करायची हेही माहित नाही! अशा वेळी, आपले ध्येय खूपच असाध्य आणि दूर वाटायला लागते, आणि सर्व अवसान गळून जाते, निराश व्हायला होतं आणि अशात  हार मानण्याची शक्यता बरीच असते. पण अशा वेळी, निर्धाराने आपल्या ध्येयाकडे फक्त एक पाउल उचलावे, मग बघा, किती तरी पाउले पडत जातात, पडत जातात! आणि ध्येयपूर्ती होतेच होते! मोठ्या संकटाचे छोटे छोटे भाग पाडावेत, आणि एकेका भागाला सोडवण्याचा प्रयत्न सुरु करावा. तर,' केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे' ह्या समर्थांच्या ब्रहमआणि त्यांचे  वाक्याची प्रचिती येते! I strongly believe in the adage, 'God helps those who help themselves' . असो, All is Well, that ends well!, rather, ह्या ब्लॉग संदर्भात म्हणायचं तर, Begins well once again!

मध्यंतरी, महालयम पर्व झालं. ह्या पंधरा दिवसात आपण आपल्या   पितरांचे स्मरण करतो, त्यांना पिंड दान करतो, त्यांच्या पुण्य स्मृतीला अभिवादन करतो,  आणि   पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतो.

त्यानंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र सुरु झालं. नऊ दिवस देवीची आराधना, उपासना, पूजा अर्चा करून, दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करून, ज्येष्ठ मंडळींना सोनं म्हणून आपट्याची पानं  देऊन त्यांचे आशीर्वाद घेतात. 'दसरा सणमोठा, नाही आनंदा तोटा' असं म्हणतात. देवीचे नवरात्र उठले, की लहान थोर सर्वांना वेध लागतात ते दिवाळीचे!

 आनंदाची दिवाळी, फटाक्यांची दिवाळी, फराळाची दिवाळी, मौज मस्तीची दिवाळी, सुट्टीची दिवाळी, अभ्यंग स्नानाची दिवाळी, पाहुण्यांची दिवाळी, किल्ल्याची दिवाळी ,  दिवाळी अंकांची दिवाळी! कितीतरी रंग आहेत दिवाळीचे! ज्याला जो रंग आवडेल, तो त्यात रमतो. महिला वर्ग फराळात रंगतो, बच्चे कंपनी फटके, आकाश कंदील, किल्ले करण्यात रमतो, पाहुण्यांसाठी स्वागताची तयारी करण्यात कुणी रमतो,  आणि ज्येष्ठ मंडळी सर्वांवर बारीक लक्ष ठेवण्यात, आणि सर्व सुचना देऊन, काम करून घेण्यात रमतात! (हा! हा!)  आणि हो, नवरे आपल्या बायको साठी गिफ्ट आणण्यासाठी धडपडत जातात! (हो, पण त्याआधी त्यांना हळूच ह्याची आठवण करून   द्यावी लागते! दुसरं  कोण आठवण करून देणार?  बायकोच की!)   आणि भाऊ बहिणीसाठी तिच्या आवडीची भाऊबीज घेण्यासाठी धडपडतो!

तर दिवाळीच्या तयारीला लागायचं  आहेच, पण त्याआधी माझ्या मैत्रिणीनी मूग डाळीच्या रेसिपीज विचारल्या  होत्या, त्या देते.

मुगडाळ ओट्स डोसा:  १ वाटी मुगडाळ ३ तास   भिजवून नंतर शिजवावी , किंवा मोड आलेले मूग शिजवून घ्यावेत. डोसे बनवायच्या १/ २   तास आधी २ वाट्या ओट्स पाण्यात भिजवावेत. आता ओट्स आणि मूगडाळ एकत्र वाटून घ्यावे. त्यात लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर,बारीक चिरून कांदा,  आणि २ चमचे तांदुळाचे पीठ, थोडे पाणी घालून डोसा पीठ बनवावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर डोसे बनवावेत. हे डोसे थोडे जाडच  ठेवावेत. लसुन चटणी, लाट मिरची चटणी, कोथिंबीर पुदिना चटणी किंवा सॉस बरोबर  गरम सर्व्ह करावे.

मुगडाळ भाकरी  : १ वाटी मुगडाळ भिजवून, शिजवावी, किंवा मोड आलेले मूग  शिजवावे. तेल गरम करून त्यात  मोहरी,जिरे, बडीशोप, हिंग, हळद, तिखट, कोथिंबीर चिरून घालावी, आणि परतून  घ्यावे. लगेच त्यात मुगडाळ घालावी आणि नीट   शिजू द्यावी. शेवटी  मीठ,तिखट, गरम मसाला,  बारीक चिरलेली कोथिंबीर घालून  करावी. ह्यात १ ते १/२ वाटी ज्वारीचे पीठ घालून (approx_ १ १/२ वाटी सांगितले आहे.) हाताने भाकरी थापून तव्यावर भाजावी आणि नंतर  तेल घालून दोन्हीकडे खरपूस भाजावी. लोणी, चटणी, ठेचा बरोबर छान  टेस्टी लागते ही भाकरी.

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! आपणा सर्वांना ही दिवाळी  आनंदाची,  आणि येणारे   नवीन वर्ष सुखाचे, भरभराटीचे, समाधानाचे जावो!!!!!  

                

Thursday, 19 September 2013

BAPPALA NIROP AANI LAVKAR YENYACHI PRARTHANA!

गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!
'गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!' किंवा 'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला!' असे म्हणत भक्तांनी त्यांच्या लाडक्या   बाप्पाला साश्रू नयनांनी, प्रेमाने निरोप  दिला, आणि  काल काही घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जना बरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता झाली,

गेल्या आठ दहा दिवसांपासूनची   धावपळ संपली, आणि  routine सुरु झाले! दहा दिवसांचा गणेशोत्सव पार पडला, त्यामुळे खूप  मोठे  काम   झाल्यासारखे वाटते आहे. त्याचे  खूप समाधान भरून राहिले आहे  हे नक्की.
गेले तीन चार  दिवस मंडळी गणपती देखावे बघण्यासाठी बाहेर पडत होती. पाउस असून देखील उत्साह दांडगा होता. मोठ्या प्रमाणात गर्दी होते, आणि लोकं गणपतींची आरास, देखावे   बघत बघत हिंडताना दिसत होते. आणि रात्र रात्र गणपती बघायचे म्हणजे खाणे पिणे ओघानेच आले! मग चणे, फुटणे, पॉपकॉर्न, आईस्क्रीम, भेळ, नुडल्स, असे अनेक पदार्थांचा आस्वाद घेत घेत, मुलांचे फुगे, पिपाणी, चॉकलेटचे हट्ट पुरवत पाहटे पहाटे घरी जायचं! पूर्वीचे दिवस आठवले, ग्रुपनी केलेली धमाल मस्ती मजा वेगळीच होती.  आता मात्र ह्या गोंधळाचा कंटाळा येतो, गर्दी नकोशी   वाटते. त्यापेक्षा, घरी बसून TV वर गणपतींचे देखावे, मिरवणूक, विसर्जन सोहळा बघणे सोयींचे आणि आनंदाचे   वाटते!

 खव्याची पोळी
 परवा खव्याच्या पोळ्या केल्या होत्या,  टेस्टी झाल्या होत्या!

खव्याच्या पोळ्या करण्यासाठी, १ वाटी खवा परतून घ्यावा. थंड करून त्यात ३/४ वाटी पिठी साखर,१ टीस्पून  इलायची पावडर, आणि थोडा (२ छोटे चमचे) मैदा/तांदुळाचे पीठ मिक्स  करावी. साधी पोळीची कणिक माळून घ्यावी. त्याची छोटी पोळी करून, त्यात फिलिंग भरून उंडा बंद करावा. पोळी लाटून तव्यावर भाजावी. सर्व्ह करतांना, पोळी  तूप घालून खरपूस भाजून द्यावी.
दुसरी पद्धत म्हणजे दोन छोट्या पोळ्या करून, एका पोळीवरतूप लावून, फिलिंग पसरून , दुसरी पोळी  ठेवावी, कडेने बंद करावे, आणि पोळी लाटून घ्यावी.

बऱ्याच पोळ्या करून ठेवल्यास बिनतुपाच्या भाजून foil मध्ये ठेवाव्यात. सर्व्ह करतांना तूप  लावावे .

Saturday, 14 September 2013

GANAPATI BAPPA MORYA! PUDHCHYA VARSHI LAVAKAR YAA!

काल दुपारी गौरींना, आणि बाप्पाला दहीभात, भाजीपोळीचा साधासाच नैवेद्य दाखवून, संध्याकाळी घरच्या  गणपती बाप्पाचे विसाजन केले. बाप्पाला निरोप देतांना, ' गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!' किंवा 'गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला!' असं  म्हणत म्हणत संपूर्ण घरातून बाप्पाला फिरवून, घरा भोवती फेरी मारून, नंतर बादलीत बाप्पाचे विसर्जन केले, तेंव्हा खरच डोळ्यात पाणी येतं, आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणतांना तोंडातून शब्द फुटत  नाहीसे होतात.

 बाप्पाची शाडू मातीची मूर्ती आणली, आणि घरीच बादलीत विसर्जन केले. ह्याचे बरेच फायदे आहेत….  एक तर, शहर हद्दीत गर्दीत जाण्याचा त्रास वाचतो, दुसरं  म्हणजे, नदीच्या काठी जाऊन , प्रदूषित पाण्यातले प्रदूषण वाढवण्याचे पाप होत नाही,  तिसरं म्हणजे,  शाडूच्या मातीमुळे पर्यावरणाला पूरक असे विसर्जन होते. चौथा फायदा हा की, बादलीत विसर्जन करून दोन चार दिवसांनी ही माती बागेत खत आणि बाप्पाचा आशीर्वाद म्हणून पसरून देवून, बागेची देखभाल पण Eco _ friendly पद्धतीने करता येते.
 बाप्पाला शिधा म्हणून दहीपोहे आणि कान्होले होते.
बाप्पाचा शिधा_ कान्होले आणि दहीपोहे

विसर्जनानंतर अनेक ठिकाणी पाण्याच्या स्रोतां जवळ, खडकांवर, गणपतीच्या प्लास्टर ऑफ पेरिसच्या छोट्यामोठ्या मूर्ती भंगलेल्या अवस्थेत इतस्तः  पडलेल्या आढळतात, त्यांच्या भोवती निर्माल्य, कचरा, आणि अनेक प्रदूषित वस्तू अडकलेल्या आढळतात, तेंव्हा अत्यंत दुःख होतं, मनाला क्लेश होतो. एक विचारावेसे वाटते, आपण  इतक्या श्रद्धेने, प्रेमाने ज्या बाप्पाची  प्राणप्रतिष्ठा केली, दहा दिवस त्याच्या आरती, पूजनात लीन होतो , त्याच बाप्पाला असे विसर्जन करून हालत केलेली आपल्याला पटते? मनाला रुचते?  पाहूयात की असे वेडेवाकडे पडलेल्या त्या बाप्पाला काय वाटत असेल? आपल्याला कुणी असे वरून नदीत फेकून दिले, लोटून दिले, नदीच्या किनारी कचऱ्यात फेकले तर आपल्याला कसे वाटेल? मग विचार  करा,त्या \विघ्नहर्त्याला  किती क्लेश, किती दुःख होत असेल ते. हा 'विनायक' असा 'विदारक' अवस्थेत पडलेला  अनेकांना वाईट वाटतं, पण ह्यात आपण एकटे  फारसं  काही करू  शकणार नाही, हे प्रत्येकाला माहित असतं, आणि ही लाचारीची भावना, त्या विदारक दृश्यापेक्षा अनेक पटींनी जास्त क्लेशकारक असते .

तेंव्हा ही लाचारीची, अगतिकतेची बोच थोडी कमी करण्यासाठी, आम्ही आमच्या परीने शाडूची मूर्ती घरीच विसर्जित करून, त्याचे आशीर्वाद मागतो एवढेच! प्रत्येकाने एक छोटीशी सुरुवात केली, तरी बरच काही होऊ शकतं!            

Thursday, 12 September 2013

.VASASI VYAPAK RUPE TU STHUL SUKSHMI!

महालक्ष्मी
"जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
  वससी व्यापकरुपे तू स्थूल सूक्ष्मी द्य देवी जय देवी।।"

महालाक्ष्मींचे पूजन  झाले, गौरींना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला, पुरणाची आरती झाली, मन अगदी प्रसन्न झाले!
 
आजचा नैवेद्य खासच होता … कटाची आमटी, सोळा भाज्यांची मिक्स भाजी, पुरणपोळी,खव्याची पोळी, कारंजी, शेवयाची  खीर,खुरचंदवडी, तीन चटण्या, पोळी, पापड कुरडई, वरण, भात  मस्त तुपाची धार! बस! नैवेद्याचे ताट  बघूनच पोट भरलं!खरचं!

नैवेद्यासाठी  सर्व  पदार्थातील तिखट, मीठ, इतर जिन्नस  अंदाजानेच टाकायचे असतात , चव घेता येत नाही, त्यामुळे स्वयंपाक करताना खूप जागरूक राहावं  लागतं।  अर्थात,जितके जास्त पदार्थ तितके ताट खुलून दिसते!  आणि एवढा स्वयंपाक करून, जेंव्हा नैवेद्य दाखवून होतो, तेंव्हा अगदी समाधान वाटतं! सगळं  नीट  झाल्याचं  समाधान!

 सोळा भाज्यांची मिक्स भाजी करण्या साठी दोडका, भोपळा,भेंडी, फ्लोवर, गवारी, बटाटा, गिलका, दुधी , गाजर, वालपापडी, बीन्स, तोंडली, तुरा, पडवळ, कारले, कोबी, सुरण अशा सोळा भाज्या चिरून घ्याव्यात. तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, घालून नंतर भाज्या घालून  घ्याव्यात. पूर्ण शिजल्या नंतर, त्यात मीठ, गोडामसाला,  कोथिंबीर,नारळ चव आणि लिंबू पिळून सर्व्ह करावी.  हवे असल्यास, नारळाचे काप लावून सर्व्ह करावी.    

सोळा भाज्यांची मिक्स भाजी

आज बाप्पांकडे   बघत होते, तेंव्हा वाटलं  ते  खुश दिसत होते! आज गौरींची भेट झाल्यामुळे ते  आनंदात असणारच  ना! उद्या बाप्पांना निरोप द्यायची वेळ आली, तसं  मन उदास व्हायला लागतं , पण पुढल्या वर्षी लवकर येणार ह्याचा आनंद मनात घेवूनच,  त्यांच्या  दहीपोहे, कान्होले  असलेल्या शिध्याची , निरोपाची तयारी करायची लगबग सुरु होईल!

आजच काही छोटी मुलं एक वाक्य म्हणतांना ऐकलं,
'Vodafone Samsung
गणपती  बाप्पा Handsome!'
वा! मुलांनी मुलांच्या परीने बाप्पाचे वर्णन केले! मला  हसायला आले ते वाक्य ऐकून. हे हसू असचं  सर्वांच्या ओठांवर राहो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना!  एका प्रसिद्ध गाण्याच्या ओळी आठवतायत,


'तुझ्या कृपेचा हात मस्तकी।  पायी तव, मम चिंता।  
प्रथम तुला वंदितो कृपाळा।  गजानना, गणराया।।'          



Wednesday, 11 September 2013

GAURI AVAHAN, PUJAN, AANI HALDIKUNKVACHA ANAND!

डॉलर:  'सून राहा है ना तू?'

रुपया : 'रो रहा हूँ मैं''

 रुपयाची घसरण अजुन चालूच आहे!  गणपती बाप्पा, एवढी  घसरण थांबव रे बाबा! अणि किती घसरणार?  अवमूल्यन होणार? अणि किती ढासळणार पत? थांबवा हे सगळं.

 असो,आल्या आल्या त्या बाप्पाला गाऱ्हाणी तरी किती सांगणार आहोत? गेल्या दोन दिवसात इतकी गाऱ्हाणी सांगून झालीत, की शेवटी बाप्पा भक्तांना म्हणतायत, 'अरे, दर  वर्षी तेच तेच गाऱ्हाणं काय  सांगतोस? पेट्रोल दरवाढ, महागाई, भ्रष्टाचार, खराब रस्ते  वगैरे वगैरे?'

आता ह्या मागण्यांबाबत बाप्पांच्या हातात काही आहे असं वाटत नाही.  तो तरी काय करणार? मला तरी वाटतय की  तो म्हणतोय, तुम्हीच  निस्तरा हा घोळ!

आज गौरींचे, महालक्ष्मीचे आगमन! गृहिणींची लगबग चालू असते गौरींच्या  आगमनाची,पुजेची, नैवेद्याची, गौरींचे सजावटीची! गौरी म्हणजे माहेरवाशिणी असे मानले जाते. त्या तीन दिवस राहतात. त्यांच्या बरोबर त्यांची बाळे पण असतात, म्हणजे लेकुरवाळ्या माहेरवाशिणी … आज त्यांचे आगमन, म्हणजे गौरी आवाहन, उद्या त्यांचे साग्रसंगीत  पूजन आणि पंचपक्वान्न नैवेद्य. आणि  त्यांना निरोप देणे म्हणजे विसर्जन.

राजस पुरी (पाकातल्या पुऱ्या )
सकाळी गौरी आवाहनाला मी गणपतीला पाकातल्या पुऱ्या, किंवा राजसपुरी चा नैवेद्य केला होता. माहेरवाशीण  घरी  आली,की त्या दिवशी  प्रवासाने शिणलेली असते, म्हणून तिला साधसच  जेवण, म्हणजे पालेभाजी,  भाकरी, चटणी, असा नैवेद्य असतो.
 
भाजी भाकरी चटणी
 
दुसऱ्या दिवशी पुरणाची आरती करतात, पंचपक्वान्नांचे  जेवणाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सवाष्णींना हळदी कुंकवाला बोलावले जाते, माहेरवाशिणींची ओटी भरली जाते, आणि गप्पा गोष्टी करून, आनंदाने एकमेकींचा निरोप घेतला जातो.
    ह्या गौरी पूजनाच्या दिवशी सजवलेल्या उभ्याच्या गौरी ज्यांनी बघितल्या असतील, त्यांना हा अनुभव आला असेल, की त्या संध्याकाळी गौरींच्या मुखावर खूप तेज चढलेलं वाटतं,आणि ते जाणवतं!त्या संध्याकाळी खरचं  त्याचं रूप न्याहाळण्याचा मोह होतो! इतक्या त्या लोभस दिसतात!

आणि माहेरचा दोन घटकेचा पाहुणचार घेऊन, तृप्त होऊन, ह्या माहेरवाशिणी पुन्हा सासरला जायला सज्ज होतात. खूप उदास  वाटतं  अशा निरोपाच्या  वेळी , मन  भरून येतं. ह्या दिवशी गौरींना कान्होला (पुरणाची विशिष्ट पद्धतीने मुडपून  केलेली कारंजी) , दहीभात असा नैवेद्य असतो. ह्या मागे कारण असं  की, प्रवास करणार तर भोजन हलकं हवं.

सर्व गोष्टीं मध्ये आपल्याच रोजच्या वागण्या,  बोलण्या, खाण्याचे पडसाद उमटतात असे नाही वाटतं?उद्या गौरी विसर्जना बरोबरच  विसर्जन होणार. तोपर्यंत बाप्पाचा, गौरींचा भरपूर पाहुणचार करायचा आहे!

          

Tuesday, 10 September 2013

BAPPANCHE AAGAMAN AANI GANESHOTSAVACHI DHOOM!

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया!
काल गणेशचतुर्थीच्या शुभ दिवशी श्री गजाननाचे 'गणपती बाप्पा   मोरया!' च्या घोषात,  ढोल ताशांच्या तालावर , लेशीम, झांजांच्या गजरात, नाचत नाचत आगमन झाले! खूप आनंद होतो बाप्पा आले की!  मी तर अगदी भारावून जाते!
वक्रतुंड महाकाय सुर्य कोटी सम प्रभ! निविघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा!
गणेशाची प्रतिष्ठापना झाली, की मग धूम उडते ती नैवेद्याची! सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री अशा चारही वेळा वेगळा वेगळा नैवेद्य दाखवायचा, म्हणजे नैवेद्याची मालिकाच लागते! मी गौरी  विसर्जना पर्यंत ह्या नैवेद्यासाठी मेनू plan करते, म्हणजे मग तयारी जय्यत, आणि स्वयंपाक झटपट होतो! सार्वजनिक गणपती मंडळाच्या आरतीला पण  जायचे असते , त्यामुळे सगळा दिवस धावपळीत, आणि मजेत जातो!

काल विधिवत पूजा झाल्या नंतर, बाप्पाला पंचखाद्य आणि फळांचा नैवेद्य होता. दुपारच्या जेवणात  बटाटा भाजी, आमटी,  पोळी,कोशिंबीर, आणि तळलेले मोदक.

तळलेले ओल्या नारळाचे मोदक

बेसन लाडू आणि चण्याच्या डाळीचे वडे

संध्याकाळच्या आरतीला चण्याच्या डाळीचे वडे  आणि बेसनाचे लाडू. आणि रात्री जेवणाच्या नैवेद्याला फ्लावरची भाजी, पोळी आणि उकडीचे मोदक.

ओल्या नारळाच्या करंज्या
आज  ऋषी पंचमी आहे.  आज सकाळी करंजीचा नैवेद्य होता. ह्या दिवशी हमखास केली जाते ती भाजी आणि हातसडीच्या तांदुळाचा भात. (हातसडीचा म्हणजे unpolished rice, तो नाही  मिळाला, तर brown rice वापरावा.)

ऋषीपंचमीचा भात:    तुपावर १ छोटा चमचा  जिरे, २ ते ३ हिरवी मिरची घालून, नंतर लाल भोपळा, दुधी भोपळा, आणि अंबाडीची भाजी मिळून १ वाटी भाजी घालून परतावी. नंतर धुवून, निथळत ठेवलेला १ वाटी हातसडीचा तांदूळ घालून परतावा. २ ते २ १/२ वाट्या गरम पाणी घालून भात मऊ शिजवावा.शेवटी १/२ वाटी टोमेटोच्या फोडी,  मीठ घालून, लिंबू रस, कोथिंबीर घालून, दह्या सोबत सर्व्ह करावे.

ऋषिपंचमीची भाजी:  पडवळ, दोडका, सुरण, बटाटा, रताळी, लाल भोपळा, दुधी भोपळा, कच्ची केळी   अशा सर्व भाज्या मिळून  १ वाटी घेवून, शिजवून घ्याव्यात. मीठ, हिरवी मिरची ठेचा, चिंच, गूळ, घालून नीट  हलवून घ्यावे.  ,तुपात जिरे, हिंग घालून वरून फोडणी ओतावी. नारळाचा चव, कोथिंबीर घालून वाढावे.

उद्या ज्येष्ठा गौरींचे आवाहन, परवा गौरी पूजन, आणि मग गौरी गणपतीचे विसर्जन! अजून भरपूर नैवेद्य आहेत, सवाष्णींना जेवण आहे, त्यामुळे सगळीकडे आनंदी आनंद आहे! हा आनंद असाच राहावा, हीच बाप्पाला प्रार्थना!

Sunday, 8 September 2013

HARITALIKA PUJAN AANI.. VEDH GANAPATI BAPPA CHYA AGAMANACHE!


गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

 उद्या पासून १० दिवस गणेशोत्सवाची धूम राहणार! आज 'हरितालिका पूजन' म्हणजे  महिलांसाठी  खास श्रद्धेचा आणि पूजेचा दिवस! हिमालयाची पुत्री पार्वती. वडिलांनी  विष्णुंशी ठरवलेला विवाह मान्य नाही, म्हणून पार्वतीला तिची सखी पळवून अरण्यात नेते, आणि तिथे पार्वती  महादेवा साठी तप करते., त्यांना प्रसन्न करते, त्यांच्यासारखे तपस्वी आणि विरागी जीवन जगावे ह्यासाठी त्यांच्याशीच लग्न व्हावे ही इच्छा व्यक्त करते.  महादेव 'तथास्तु' म्हणून आशीर्वाद देतात. त्यानंतर हिमालय पार्वतीच्या चिंतेत तिला शोधत अरण्यात येतात, तिची शिवांशी  लग्नाची इच्छा ऐकतात, मान्य करतात, आणि शिव पार्वतीचा विवाह संपन्न होतो. तर 'हरिता' म्हणजे जिला पळवून नेली ती, आणि 'आली' म्हणजे सखी. शिवांना प्राप्त करण्यासाठी पार्वतीला तिची सखी घेवून गेली, म्हणून पार्वतीला 'हरितालिका' म्हणतात.

हरितालिका आणि शिवपूजन
इच्छित वरप्राप्तीसाठी कुमारिका हे व्रत पाच वर्ष करतात, आणि पाचव्या वर्षी उद्यापन करतात. ह्या आदिशक्तीच्या  रूपांचे पूजन , त्यासोबतच महादेवाचे पूजन करणे म्हणजेच हरितालिका पूजन. स्त्रिया, मुली संपूर्ण दिवस उपवास करतात, आणि सकाळी पार्वतीला नैवेद्य दाखवून, आरती करून उपवास सोडतात.

शिव पार्वती हे समस्त जगताचे माता आणि पिता आहेत. त्यांचा गृहस्थाश्रम हा आदर्श मानला जातो. त्यांचे वैराग्य अति उच्च कोटीचे आहे. म्हणजेच सुखी आणि संपन्न गृहस्थाश्रम हा सुखी आणि संपन्न समाजाचा आधार आहे, आणि आपण त्यांच्या गोष्टीमधून   काही बोध घेतला पाहिजे हे खरे.
  
"आपुले शक्तीनुसार।   पुजावा परमेश्वर।
परंतु पुजू नये हा विचार।   कोठेची नाही ।।"

ह्या ओवीतून समर्थांनी एकंदरच देव आणि भक्ती ह्याबाबत सोपी मीमांसा केली आहे. 'भाव तिथे देव' म्हणतात ना!  पण बहुतेक वेळा माणसं  नुसतं म्हणतात असं, आणि त्याच वेळी देव शोधत सर्वदूर भटकत राहतात!  म्हणून समर्थ सांगतात की, आपल्या मनातील भावभक्तीनुसार, आपल्या शक्तीनुसार देव पुजावा, पण देव पुजुच नये , असा विचार कुठेच आढळत नाही. आपल्या शक्तीनुसार, आपल्याला भावणाऱ्या मार्गाने भक्ती करावी. समर्थांनी नवविधा भक्ती सांगितलेलीच आहे (ह्यात भक्तीचे नऊ मार्ग सांगितलेले आहेत.)  दुसरा कुणी काय वा कशी भक्ती करतो, ह्यावर  आपला मार्ग ठरवू नये.

आता उपवासाला सारखी खिचडी करून  कंटाळा आला असेल तर, ही उपवासाची मिसळ ('मिसळ' म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटलं  ना? पण ही ती मिसळ  नव्हे बर का!) करून खाऊन बघाच!

उपवासाची मिसळ:  बटाटे उकडून छोटे छोटे  हातानीच करावेत , म्हणजे ओबडधोबड होतात. तूप गरम करून,  ठेचा, किंवा हिरवी मिरचीचे तुकडे घालावेत,, बटाट्याचे तुकडे घालून  परतावेत. भरपूर पाणी घालून उकळून घ्यावे. तिखट, मीठ, जिरेपूड,दाणेकूट, कोथिंबीर, खोबरं घालून दाट  करावे. सर्व्ह करतांना, डिश मध्ये उपवासाचा चिवडा ठेवून, त्यावर हा रस्सा ओतावा. वरून दाणे, वेफर्स, कोथिंबीर, आणि लिंबू पिळून द्यावे.

काही गोड खावेसे वाटले तर, हा वरईचा शिरा (भगर पण म्हणतात) करून पहा …।

वरईचा शिरा:  तूप गरम करून, त्यावर १ वाटी  वरई परतून छान  भाजून घ्यावी. वरई परतली, की २ वाट्या गरम पाणी घालावे, आणि नीट ढवळून, झाकण ठेवावे. ३ ते ५ मिनिटांनी त्यात १/२ वाटी गूळ किंवा साखर घालावी. झाकून नीट शिजू द्यावे. शेवटी वेलचीपूड, २ चमचे दुधात मिसळून पिवळा किंवा केशरी रंग, ड्राय  फ्रुट्स, थोडेसे तूप, आणि चारोळ्या घालून   सर्व्ह करावा.

आता 'गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!'  म्हणत बाप्पाचे स्वागत करायचे!      

Thursday, 5 September 2013

ASHI PITHI SUREKH BAI KARANJYA KARAVYA!

'पसेवरी वैरण घातले।  तांतडीने जाते वोडिले।।
तेणे पीठ बारिक आले।  हे तो घडेना।। '

समर्थांनी ह्या ओवीतुन आपल्याला  महत्वाचा संदेश दिला आहे. 'पसाभर' म्हणजे 'मूठभर ' पेक्षा जास्त धान्य जात्यात घातले,  जात्याचा  खूंटा जोराने ओढला, तर त्यातून बारीक़ पीठ येणार नाही, तर भरडच येईल.म्हणजे असे, की, हळूहळू, एका लयीत, जातं ओढून, प्रमाणात, म्हणजे एका वेळी फक्त मूठभरच धान्य त्यात  घातले, तर, पीठ बारीक  निघते, आणि  भाकरी देखील मऊसूत होते! 

 म्हणजे, कोणतीही गोष्ट, कोणतीही कला, कौशल्य, कशाचेही ज्ञान, हे त्या गोष्टीचा पाठपुरावा योग्य प्रमाणात, धीराने, चिकाटीने, सातत्याने आणि  प्रामाणिक प्रयत्नांनी केला, तरच ते ज्ञान आपल्याला आत्मसात करता येते. आणि असे लाभलेले ज्ञान हे चिरंतन राहते, पक्के असते.  ह्या ज्ञानाच्या बळावर केलेले कार्य देखील उत्तम होते. त्यातून प्रसिद्धी, मानमरातब मिळतोच,  पण त्यापलीकडे एक उत्तम व्यक्तिमत्व घडते!

जातं
आता ह्या जात्यावर पीठ काढायचं म्हणजे फार धीराच, चिकाटीच , आणि वेळखाऊ  काम आहे बर! पण पूर्वीच्या काळी बायकांना करायला तर लागायचं! मग त्या कामात  जीव कसा रमवायचा? तर, ओव्या म्हणत म्हणत जात्यावर हात  चालवत राहायचं!

'अरे संसार संसार।  जसा तवा चुल्यावर।।
आधी हाताले चटके। तेंव्हा मिळते भाकर।।'

 अशा, संथ लयीत, मधुर आवाजात, सहज सोप्या शब्दात आयुष्याचा गाभा, सार  उलगडून सांगणाऱ्या ओव्या म्हणत म्हणत, जात्यावर पीठ काढायचं, म्हणजे मग ओव्यांच्या संथ लयी प्रमाणेच, जात्याचा खुंटा देखील संथ लयीतच ओढला जातो, आणि बारीक पीठ तर मिळतचं , पण एक सुंदर, सुरेल संगीतही तयार होतं! (हे दृश्य ज्यांनी बघितलय, अनुभवलय, त्यांना डोळ्यासमोर चित्र आल्याशिवाय  राहणार नाही!)

'पहिली माझी ओवी गं!
जात्यावर दोघीजणी असतात, तेंव्हा कष्टामुळे शरीराला व्यायाम होतो, गप्पा मारीत काम होते, म्हणजे मनाला विरंगुळा मिळतो. शिवाय,ओव्यांतून,  गाण्यातून,मनोरंजन करणारे,   जीवन जगण्याचे, काही शहाणपणाचे, काही बोध करून देणारे संदेश  देखील मिळतात, एकमेकींचा सहवास मिळतो, चार एकांताचे क्षण सुद्धा  विनासायास  मिळतात, त्यातून मनं  जुळतात!

पहिली माझी ओवी ग।   वाहिली एकाला। ।
पार्वतीच्या लेकाला।  गणेश  देवाला। ।

म्हणजे, मी  नेहमी ह्या ब्लॉग मध्ये म्हणते तसं,शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक   स्तरावर आरोग्य जपले जाते,  कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागतो, शिवाय, बऱ्याच  जणी  हे काम करीत असल्या, तर सामाजिक बांधिलकीही जपली जाणार! आणि महत्वाचं म्हणजे, पिठावर लक्ष केंद्रित झाल्यामुळे, उत्तम दर्जाचं पीठ मिळतं, ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळला जाऊन आर्थिक बाजू   भक्कम राहते ते वेगळच!

असं पीठ मिळाल्यावर, एखाद्या सुवासिनीच्या तोंडी आपोआपच शब्द येतील,
'असं जातं  सुरेख बाई, सपीठी काढावी! 
अशी पीठी सुरेख बाई ,करंज्या कराव्या !
अशा करंज्या सुरेख बाई, माहेरी धाडाव्या! '

करंजी
 असो, तर जात्यावारचे पीठ नाही तर नाही, पण उत्तम दर्जाचे रवा  आणि मैदा मिळाले, तर नारळाचे सारण घालून, करंज्या बनवून माहेरी नाही धाडता आल्या, तरी खायला कराव्यात!
    

Wednesday, 4 September 2013

RANJAK KAHANI 'BAILPOLYACHI'



एका दैनिकात आलेली ही कथा माझ्या वाचनात आली, म्हणून  ती  आपल्या सर्वांबरोबर   share करते आहे.

एकदा देवांचा दरबार भरला होता, आणी त्यांची वाहने, म्हणजे गणपतीचा उंदीर, सरस्वतीचे वाहन मोर, विष्णूचे गरुड, आणि महादेवाचा नंदी, असे सगळे बाहेर देवांची प्रतीक्षा करीत होते. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या, आणि प्रत्येक जण आपल्या मालकाची स्तुती करीत होता.

महादेवाचा नंदी
नंदी म्हणाला, 'माझे मालक तापट आहेत, त्यांची सर्वांना भिती  वाटते, पण मी त्यांचा लाडका आहे,  म्हणून मग काही काम असले की,  सगळे जण मलाच विचारतात. माझे विशेष महत्व आहे.' नारदमुनी सर्व काही ऐकत होते, आणि त्यांना कळले  की, नंदीला अतिशय गर्व झाला आहे, आणि त्याच्या गर्वाचे हरण  हे केलेच पाहिजे.

ऋषी नारदमुनी
काही  दिवसांनी नारद महादेवाला भेटायला गेले. तेंव्हा महादेव ध्यानस्थ बसले होते. हे पाहून नारद नंदीला  म्हणाले, 'महादेव तर ध्यानाला बसलेत. त्यांची समाधी भंगली, तर ते कोपतील. तेंव्हा तूच माझे काम करू शकतोस.' हे ऐकून नंदी गर्वाने फुलला. त्याने नारदांना काम विचारले. तशी नारद म्हणाले, मी महादेवांना भेटायला आलो  होतो, आणि हे पांढरे फुल आणले होते त्यांच्यासाठी. पण ह्याचा वास मला तरी थोडा उग्र वाटला. तेंव्हा तूच एकदा वास घेऊन सांग, हे फुल महादेवांना द्यावे का ते.' नंदी  गर्वाने आणखीनच फुगला. त्याने फुलाचा वास घेतला मात्र, त्याच्या नाकात हुळहुळले, आणि त्याला जोरात शिंक आली. शिंकेच्या जोरामुळे त्याची शेपूट जोरात हलली, आणि त्याचा फटका महादेवांना बसला! महादेवाची समाधी भंगली, म्हणून ते कोपले, नंदीवर रागावले! त्यांनी नंदीला शाप  दिला, 'आयुष्यभर पृथ्वीवरच्या लोकांकडून तुला असेच फटके खायला लागतील, आणि तुझ्या नाकात कायम वेसण घातले जाईल.'

हे ऐकून नंदी  घाबरला, आणि त्याने देवांची माफी मागितली, पण महादेव काही ऐकेनात. तेंव्हा मग  नारद मध्ये  पडले, आणि  त्यांनी सांगितले की, ' नंदीचे गर्वहरण करण्यासाठीच मी ही चाल खेळली होती. तेंव्हा त्याला उःशाप द्यावा. ' महादेवांनी त्याला सांगितले, ' माझ्या देवळात माझे दर्शन घेण्याआधी भक्त तुझे दर्शन घेतील आणि मगच आत येतील. तसेच, वर्षातून एकदा लोक तुझी पूजा करतील, त्या दिवशी तुला फटके मारणार नाहीत, तर,  तुला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतील. ' तेंव्हा पासून, श्रावणी अमावास्येला 'बैलपोळा' सण  साजरा करतात.  त्या दिवशी बैलांना नटवून, सजवून त्यांची मिरवणूक काढली जाते, त्यांना कामाला जुंपले जात नाही, फटके मारले जात नाहीत., आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. हा  सण  शेतकरी वर्गासाठी खास महत्वाचा आहे.
बैलपोळा


पुरणपोळी करतांना १०० ग्रॅम  चण्याची डाळ शिजवून घ्यावी.नंतर त्यात ७५ ग्रॅम गूळ किंवा   साखर घालून नीट शिजवावे. पुरणयंत्रातून किंवा स्टीलच्या बारीक जाळीच्या गाळणीतून गाळून  घ्यावे. थंड करून, त्यात वेलचीपूड, जायफळपूड  घालून मिक्स करावे.
१ कप कणिक  आणि १/४ कप मैदा,  थोडेसे मीठ, तेल घालून सैलसर मळून घेवून थोड्या वेळ ठेवावी.  नंतर छोटी गोळी बनवून, त्यात पुरण भरून, पोळी लाटावी, आणि तव्यावर  भाजून घ्यावी.तूप घालून सर्व्ह करावी.

दुसरी पद्धत अशी की,  वरील कणकीच्या  दोन लाट्या घेवून, दोन छोट्या पोळ्या लाटाव्यात. एकावर थोडे तेल आणि कोरडी कणिक भुरभुरावी, पुरणाचा गोळा नीट पसरावा, दुसरी पोळी वरून ठेवून,  कडा बंद कराव्यात. पोळी लाटून, भाजावी.

पुरणपोळी
तिसऱ्या पद्धतीत, फक्त मैदा,मीठ आणि तेल घालून सैलसर मळून पोळी करावी.
  



Friday, 30 August 2013

SABRKA LPHAL MEETHA HOTA HAI!

एका मुलाने मुलीला propose केले. त्या मुलीने मुलाला धु धु धूतलं ! (बडवले!)
मुलगा उठला, हात, शर्ट झटकत विचारलं, 'तर मग, मी  'नाही'  समजू का?'

कठीण आहे ह्या प्रेमवीरांची! कित्ती पेशन्स असतो ह्यांच्यात! म्हणजे आपलं ट्राय  करत रहायचं, वाजली तर पुंगी, नाहीतर गाजर!

तसं  बघितलं, तर असा पेशन्स बऱ्याच गोष्टींसाठी लागतो. कुठलीही कला जसं  नात्य, नृत्य, चित्रकला, अभिनय किंवा एखादी कारीगरी शिकायची तर भरपूर पेशन्स हवा. वर्षानुवर्ष कठोर मेहनत, रियाज, कलेची उपासना केली तर ती कला आत्मसात करता येते. एखादी कारीगरी शिकायची म्हणजे पण नित्य सराव हवा, अभ्यास हवा, तेंव्हाच एखादी  उत्तम कलाकृती घडते.
एखाद्या मिठाईच्या दुकानातील कारागीर बघा. एक जण  मिठाई बनवतो, दुसरा रोल करतो, तिसरा त्यावर डेकोरेशन करतो, चौथा वर्ख लावतो, आणि मग ती मिठाई ट्रे भरून दुकानात येते. आपण ती मिठाई बघून खुश होतो, इतक्या  आकर्षकपणे ती   ठेवलेली असते!


पण  किती लोकांची मेहनत असते त्यात. आपल्याला वाटते, एवढी महाग मिठाई कशाला घ्यायची? घरीच करू. पण घरी हे सर्व complicated  काम होत नाही, कारण 'तेथे पाहिजे जातीचे.' म्हणतात ना, ' जेणो काम तेणोच ठाय, दुजो करे, तो गोतो खाय!' ह्या प्रेमवीरांच पण बहुधा असचं  आहे, तेथे पाहिजे जातीचे!

कच्छी दाबेली
 'कच्छी दाबेली ' असाच एक प्रकार जो stall वरच खायला मस्त लागतो, पण तितकीच टेस्टी घरी पण बनवता येते . दाबेली मसाला दुकानात मिळतो, पण मी घरी पण तयार करते. साहित्य मात्र बरच लागतं, पण एकदा हे सर्व साहित्य जमलं, की मग जी दाबेली बनते, वाह!

कृती:
 तेलावर मोहरी, हिंग, हळद, तिखट घलवे. लगेच उकडून mash केलेला बटाट्याचा लगदा घालून, नीट परतून घ्यावे. मीठ, दाबेली मसाला, तिखट, कोथिंबीर घालावी. भाजी  थंड करून घावी.
एका प्लेटमध्ये सर्व भाजी नीट दाबून बसवावी. त्यावर शेव पसरावी, नंतर सुकं खोबरं, नंतर कोथिंबीर, नंतर टूटीफ्रुटी, बेदाणे, काजू तुकडे,   डाळिंब दाणे, तिखट शेंगदाणे,सीजन मध्ये असल्यास काळी आणि हिरवी द्राक्ष तुकडे असे सर्व एकावर एक पसरून टाकावे. वरती एक चेरी मधोमध लावावी.
सर्व्ह करायच्या आधी ब्रेड मधोमध कापून, बटर वर गरम करावा, आत आधी चिंचेची  चटणी लावावी, नंतर भाजी स्प्रेड   करावी,( लाल  चटणी हवी कसेल तर लावावी ) आणि ब्रेड सर्व्ह करावा.


 ऑप्शन:  हवे असेल तर चीज, किंवा एक्स्ट्रा बटर लावून द्यावे. दोन चार दिवसात गणेशोत्सव सुरु होतो आहे. त्याची धमाल ती जादू  वेगळीच असते! माझ्याकडे हा  गणपतीचा सण फार महत्वाचा असतो. रोज सकाळ_ संध्याकाळ आणि दुपार _ रात्रीचा नैवेद्य वेगळा असतो, त्यामुळे रोजचं मेनू प्लानिंग आधीच करून ठेवावं लागतं. माझी आठ दिवसांची लिस्ट समोरच ठेवलेली असते. खरेदी, तयारी, पूजा, चटण्या, मसाले, मोदकाचे सारण सर्व काही वेळेवर तयार  हवं! तेंव्हाच स्वयंपाक वेळेत होतो. तोवर थोडा वेळ आहे, तर आणखी काही चटपटीत पदार्थ करून घेईन म्हणते आहे.


Thursday, 29 August 2013

SHRIKRISHNACHA GOPALKALAA AANI SAMAJIK BANDHILKICHA SANDESH

'गोविंदा आला रे आला, जरा मटकी स्म्भाल ब्रिजबाला!
अरे एक दो तीन चार, संग पांच  छे  सात हैं  ग्वाला!'


आज दहीहंडी,   गोपाळकाला , नुसती धूम! सगळ्या बाल गोपाळांचा कुतूहलाचा विषय असतो ही दहीहंडी. माणसांनी  उंच उंच मनोरे रचायचे,आणि एकाने  सर्वात वरती पोहोचून दहीहंडी फोडायची! थ्रिलिंग! डेरिंग! कमाल आहे  ह्या गोविंदांची ! हल्ली तर महिला आणि मुलींची पथकं देखील ह्या दहीहंडी मध्ये हिरीरीने, आणि  जय्यत तयारीने भाग घेताना दिसायला लागल्येत.Talk about women's  emancipation!

गो गो गोविंदा!
कृष्ण आपल्या सवंगड्यांना घेवून यमुनातीरी खेळायचा, तेंव्हा न्याहारीची वेळ झाली, की कृष्ण सगळयांना गोल बसवून घ्यायचा. सर्व  न्याहारीचे पदार्थ एकत्र करायचा, आणि मग सगळ्यांनी मिळून त्याचा आस्वाद घ्यायचा! हाच तो गोपाळकाला! ह्यामुळे व्हायचे काय, की कुणाचा पदार्थ जास्त चांगला, कुणाचा कमी, कुणाचा  हलका, कुणाचा भारी, कुणाचा स्वादिष्ट, कुणाचा बरा, कुणा गरीबाचा, कुणा श्रीमंताचा, असा कोणताही भेदभाव उरायचा नाही, किंबहुना हा भेदभावच   विसरायला लावणारा हा गोपाळकाला!
गोपाळकाला
भेदभाव विसरायला होतात, त्यातून सामाजिक बांधिलकी जपली जाते आणि बंधुभाव वाढीस लागतो .  आणि सर्व स्वाद एकत्र   झाल्यामुळे हा गोपाळकाला लागायचा पण स्वादिष्ट! म्हणजे आर्थिक आणि सामाजिक दोन्ही स्थरांवर स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा कृष्णाचा हा सोप्पा मार्ग होय! एकात्मतेचा संदेश  देणारा हा श्रीकृष्णाचा  गोपाळकाला! भाषणबाजी नाही, लेक्चर नाही, जड जड शब्द नाहीत, फक्त सहज, सोपी कृती!

ह्यावरून आठवलं, मध्यंतरी, एका शाळेत एका शिक्षकाने असाच काहीसा प्रयोग केला होता. त्यांच्या लक्षात आले  होते,की एक मुलगी वेगळी  बसून आपला डबा  खाते. त्यांनी तपास केला, तेंव्हा त्यांना कळलं, हिच्या डब्यात अगदीच काही नसतं  खायला! काही तरी सुकं पाकं आणायची, ह्याला कारण तिची नाजूक आर्थिक परिस्थिती. म्हणून तिला इतरांबरोबर बसून डबा  खायला  लाज वाटायची. मग, त्यांनी दुसऱ्या  दिवशी पासून एक प्रयोग सुरु केला. मधल्या सुट्टीत, त्यांनी वर्गातल्या सर्व मुलांना गोलाकार बसवून , आपल्या स्वतः च्या डब्यातला एक घास खाऊन, डबा पुढे सरकवायला सांगितला, आणि मग मागच्या डब्यातल्या खाऊची चव घेऊन तोही डबा  पुढे सरकवायचा. असा एक राउंड पूर्ण करायचा! त्यामुळे झाले काय, सगळ्यांना एकमेकांच्या डब्यातला खाऊ चाखता आला, आणि त्या मुलीची भीती पण कमी झाली! किती सहज, सोपी कृती! पण त्या मुलीसाठी खूप काही साध्य करून गेली ! मला फार आवडली ही गोष्ट! असे कल्पक शिक्षक आपल्या मुलांना मिळाले तर कितीतरी प्रोब्लेम समस्येचं उग्र किंवा गंभीर रूप धारण करण्या आधीच सुटतील, नाही?

गोपाळकाला करण्यासाठी:  मी चुरमुरे, भिजवलेले पोहे,  मीठ, साखर, हिरवी मिरची तुकडे,  पंढरपुरी डाळ, भाजलेले शेंगदाणे,  बेदाणे, टोमेटो तुकडे,, कांदा चिरून, काकडी तुकडे, सफरचंद तुकडे, पेरूचे तुकडे, केळीचे तुकडे,दही, दूध, कोथिंबीर आणि लिंबाचा रस, खवलेला नारळ असे सर्व पदार्थ एकत्र करून, वरून मोहरी_ जीऱ्याची फोडणी देते, आणि सर्व्ह करते.

आणि नवीन जमान्यातला  म्हणाल तर STEW किंवा  HOTCH  POTCH सूप  हा मला  वाटतं गोपाळकाल्याच्या जवळपास जाणारा, त्याच्याशी साधर्म्य असणारा पदार्थ आहे. One dish meal म्हणता येईल अशी ही सोपी डिश आहे.  पोटभर, स्वादिष्ट, पचनास हलकी आणि पोषकतत्वांनी भरपूर!

vegetable  stew
STEW:  शिजवलेल्या मिक्स डाळी, शिजवलेला भात, शिजवलेली मक्रोनी, किंवा पास्ता, शिजवलेल्या मिक्स भाज्या, (हवे असल्यास शिजवलेले चिकनचे तुकडे), बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, किंवा चिली फ्लेक्स, हवी असल्यास थोडी लसूण बटर वरती लाल करून, हे सर्व जिन्नस, किंवा ह्यातले हवे असतील ते जिन्नस एकत्र करावेत, त्यात बटर, मीठ, काळी मिरीपूड, कोथिंबीर किंवा पार्स्ले,टोमेटो सॉस आणि थोडे पाणी घालून पातळसर करावे.  गरम करून, थोडे क्रीम आणि bread  croutons, गार्लिक ब्रेड, किंवा सूप स्टिक्स घालून सर्व्ह करावे.

दहीहंडी एन्जॉय करा!     

Wednesday, 28 August 2013

KRISHNA JANMASHTAMI SOHOLA

जय श्रीकृष्ण!
आज गोकुळाष्टमी! श्री कृष्णाचा जन्मदिवस! हा दिवस  भक्तिभावाने, जाल्ल्लोशाने साजरा होतो. उद्या गोपाळकाला आणि दहीहंडी ची धूम असणार!

कृष्ण जन्माचा सोहळा
 रात्री १२ वाजताचा जन्म.  संध्याकाळपासून भक्त मंडळी मंदिरांमधून, घरांमधून भजन, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमात रंगलेली दिसायला लागतात. मग रात्री कृष्ण जन्म, पाळणा, श्रीकृष्णाची आरती,  त्यानंतर पंजिरी, सुंठवडा, फळ, आदींचा नैवेद्य, आणि पुन्हा भजनांचा सूर टिपेला पोहोचतो!


श्रीकृष्णाचा पाळणा म्हण्यासाठी महिलांची चढाओढ  आणि पाळण्याची दोरी धरायला  मिळावी म्हणून मुलांच्यात चढाओढ! पाळण्याची दोरी ओढायची,  कृष्णाला जोजावायचं, म्हणजे सर्व मातांसाठी वात्सल्याचा महापूर! महिला आणि बालगोपालांसाठी आनंदाची पर्वणी!

अनेक ठिकाणी ह्या दिवसात भागवत सप्ताह असतो, जिथे  आठ दिवस कृष्ण लीला आणि कृष्ण जन्माचे प्रयोजन ह्यावर प्रवचनातून लोकांपर्यंत कृष्णाचा उपदेश पोहोचवला जातो. 'राधाकृष्ण! गोपालकृष्ण!' आणि 'जय राधे, जय गोपाल!' च्या तालावर महिलावर्ग टिपऱ्या च्या ठेक्यावर फेर धरतात, आणि राधा कृष्णाची आराधना करतात. सगळ वातावरण कसं  रंगबिरंगी, उल्हासित, आणि भक्तीने भारलेलं!


आज अनेक महिला उपवास करतात. एकीकडे कृष्ण मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळते, तर दुसरीकडे   तरुण मंडळींची उद्याच्या दहीहंडीची जय्यत तयारी चालू झालेली असते!

ह्या दहीहंडी फोडण्याच्या कृतीतून कृष्णाने मनुष्याला, आपल्यातील षड्रिपू म्हणजे काम, क्रोध, लोभ,मद, मोह, मत्सर ह्यां चा नाश करून, म्हणजेच अवगुणरुपी  मटकी फोडून, लोण्याच्या रुपात असलेला निर्मळ परमानंद  मिळवण्याचा संदेश दिला आहे.

असो. तर संध्याकाळी भजनांच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्या आधी सकाळी केलेला  मस्त, चमचमीत, झणझणीत आणि स्वादिष्ट चनाआलू पुरीचा ब्रेकफास्ट!

चना आलू पुरी