तर अशी अशी ही ऑस्ट्रेलियाची टूर! दीड महिना कसा आणि कुठे गेला काही कळलं नाही! एकेक दिवस मजेचा, उत्साहाचा, अनेकविध रंजक, मजेशीर, माहितीपूर्ण घडामोडींनी भरलेला! Not A Single Dull Moment! मी जे नेहमी म्हणते, की आजचा दिवस हा कालच्या दिवसापेक्षा आणखीन उत्तम व्हावा! तसंच काहीसं इकडे झालं! रोज काहीतरी नवीन, रोज ज्ञानात काहीतरी भर घालणारं, रोज काहीतरी उत्साह वाढवणारं! मी अनेक प्रकारच्या सुंदर, अभिरुचीपूर्ण,ज्ञानवर्धक गोष्टींनी समृद्ध झाले हे मात्र खरे!

माझा स्वतःवरचा ठाम विश्वास, कुठेही बिनदिक्कत, निर्भयपणे वावरण्याचा आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमता, नेहमी सतर्क राहण्याची सवय,आणि मुळातला धाडसी स्वभाव... अशा अनेक गोष्टींचा मला इकडे उपयोग झाला असं मला वाटतं. मला दोन तीन जणांनी विचारलं देखील की तुम्ही ह्यापूर्वी परदेशवारी केलेली आहे का? मी नाही म्हणल्यानंतर त्यांना आश्चर्यच वाटलं! कारण त्यांना माझा एकूण वावरण्यातला confidence कमालीचा वाटला! कारण इथे आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी मला मामानी आणि अनिरुद्धनी ट्रान्सपोर्ट बाबत समजून सांगितलं, आणि मी रोज एकटीनेच प्रवास केला! कुठेही रेस्टॉरंट मध्ये एकटीने बसावं, खावं, प्यावं, कुठेही एकटीने पायी फिरावं, दुकानं बघावीत, शॉपिंग करावं, साईट सिईंग करावं, काहीच दडपण नाही, भीती नाही, एकदम फुल्ल टु एन्जॉय!
 |
Buddhist Temple sydney |
एकदा मामा मामी सोबत buddhist temple ला गेले होते. तिथे मंदिरात पादत्राणे घालून जाता येतं, ही पाटी वाचून थोडसं वेगळ वाटलं . पण आम्ही ही पाटी वाचून देखील चपला बाहेर काढून ठेवणे योग्य समजलो, कारण आपले संस्कार! तिथल्या coffee shopमध्ये chop sticks नी गरम गरम momo खाल्ले! मजा आली!
तिथल्या लोकांचे हे वैशिष्ठ्य आहे की, त्यांच्याकडे बघितलं, की त्यांच्यातलंच व्हायला होतं! त्या वातावरणात आपण रमून जातो! हरवून जातो. पण असं एकट्याने परका मुलुख एन्जॉय करणं सगळ्यांनाच शक्य होणार नाही, हेही तितकंच खरं आहे असो.
ऑस्ट्रेलियात आले, इथे फिरले, बराचसा प्रदेश पहिला, लोकांना जवळून [पाहिलं, अनुभवलं, आणि प्रेमात पडले मी ऑस्ट्रेलियाच्या! खूप सुंदर देश, प्रदेश, चांगली, मदतीला तत्पर माणसं, उत्तम नागरिक कसे असावे हे इकडे कळते. नियमांचे काटेकोर पालन, अन्यथा कठीण शिक्षा किंवा दंड हे इथे पहिले. टोल ब्रिज म्हणजे माणसं ,नाका, बुबी ट्रॅप सारखं आपल्याला अडकवून ठेवणं, मोठा गुन्हा केल्यासारखं टोल नाही दंडच भरतोय असं वाटण्यासारखे वातावरण,काही नाही! त्या कमानीखालून आपली गाडी गेली, की आपल्या गाडीवर लागलेला डिजिटल सेन्सर बीप करतो, आणि टोल भरल्याची डिजिटल नोंद होते, बस! डिजिटल सेन्सर नसेल तर, आपल्या घरी नोटीस येते, आणि आपण जाऊन दंडाची रक्कम भरून यायचं, बसं ! मला शेवटच्या दिवशी मामा एरपोर्टला सोडायला आला, त्या दिवशीची गम्मत सांगते म्हणजे सोदाहरण पटेल मी काय सांगते ते.... मामानी चुकून U_Turn घेतला, आणि कुठून कुणास ठाऊक, पण फटक्यास पोलीस मामा समोर हजर ! त्याने शांतपणे गाडीच्या नम्बर प्लेटचा फोटो घेतला, मामाच्या लायसेन्सचा फोटो घेतला, आणि नम्रपणे जायला सांगितलं! हा दंड त्याच्या अकाउंट मधून आपोआप वसूल होणार! झालं की नाही काम सोपं? बाचाबाची नाही, ओरडा आरडा नाही, पोलिसांना शिवीगाळ नाही, गाडी बाजूला घ्या... वगैरे करून वेळेचा अपव्यय नाही, कामाचा खोळंबा नाही, आपल्या जानपहेचानच्या पदाधिकाऱ्यांना फोनाफोनी नाही, कूच काही नाही!(अरेरे...)
ट्रेनमध्ये, बसेस मध्ये कितीही गर्दी असली तरी एकमेकांना धक्का देणे,असभ्य वर्तन करणे हे गैर मानलं जातं. महिलांना आपल्या आवडीनुसार वेशभूषा,केशभूषा करण्याचे स्वातंत्र्य आहे. कुठेही एकट्याने हिंडण्याफिरण्याचे स्वातंत्र्य आहे... पोलीस यंत्रणा तत्पर आणि कुशल आहे. आणि प्रत्येक ठिकाणी व्यवस्थाच अशी चोख करून ठेवतात की कुणाला काही गैरप्रकार करण्याचा scope फारच कमी. सर्व नागरिकांना पायाभूत गरजा पुरवणारे सरकार आहे.शिस्त, काटेकोरपणा, कष्ट करण्याची तयारी, सर्वांना समान न्याय ह्या गोष्टी जनमानसात रुजल्या की मग रोजच्या जगण्यासाठीचा संघर्ष संपतो आणि जीवनमान उंचावणे ह्या ध्येयपूर्तीसाठी माणसं झटायला लागतात.,सरकारी यंत्रणा ही समाजासाठी आहे ह्याचे प्रत्यंतर सगळीकडे येते
मेलबर्न मध्ये संध्याकाळी एका कॉफी शॉप मध्ये थांबले, तेंव्हा मी सेल्फी घेत होते, तर त्या मालकांचा छोटा मुलगा पण आला, आणि त्याला सेल्फी घ्यायचा होता!
 |
melbourne |
 |
Blue Mountains Rail ride |
 |
Sydney tour by Cruise |

Cruise नी sydney शहराची शोभा पहिली. तिकडे 'VIVID sydney' नावाने एक महिनाभर tourism ला बढावा देण्यासाठी उपक्रम राबवला गेला. संपूर्ण sydney शहरात वेगवेगळ्या ठिकाणी, पर्यटन स्थळांच्या ठिकाणी laser show केले, लोकांना आकर्षित करून अनेक प्रकारे australia चे tourism वाढविण्याचे काम केले.मी भरपूर फिरले. प्रवासात लोकांशी बोलले,त्यांचे विचार ऐकले,आपल्या देशाबद्दल काही सांगितले. ऑस्ट्रेलियाचेअंतरंगाचे जवळून दर्शन झाले. सिडनी, कॅनबेरा, मेलबर्न बघितले, आणि साधारणपणे एक देश म्हणून ऑस्ट्रेलियाचा अंदाज आला.अर्थात, देशाच्या सर्वांगीण विकासात जनतेचा हातभार आहे. सगळीकडे सुबत्ता,वैभव, समृद्धी असली तरी, सर्व देशांच्या असतात तशा ह्या देशाच्याही अनेक समस्या आहेत. रोजच्या बातम्या ऐकल्या, वर्तमानपत्र वाचले की समजते .... एवढा समृद्ध देश आहे तरी बेरोजगारी आहे, पैशांसाठी अनेक लोकांना प्राण गमवावे लागतात. ह्याच पैशांच्या हव्यासापायी अनेक गुन्हे घडतात,त्यामुळे गुन्हेगारीची समस्या बिकट आहे.जितकी टेक्नॉलॉजी वाढते तितकेच गुन्हे वाढतात.अनेक scam, घोटाळे देखील घडतात. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेतच. जितकी समृद्धी तितकीच जीवनाची अनिश्चितता,आपल्या आणि आपल्या प्रियजनांच्या सुरक्षेची काळजी, ह्यातून अनेक मानसिक समस्याही उद्भवतात. छोट्या कुटुंबात अनेक समस्या असतात. पण तरी चांगल्याला चांगलं म्हणावंच लागेल.
ऑस्ट्रेलिया पाहण्यासाठी रोज लाखो पर्यटक येतात, आणि अशा सुंदर देशातील वैभव पाहतात, आनंद घेतात आणि छान आठवणींचा खजिना घेऊन परत जातात! मी पण अशीच एक पर्यटक! पण, मुक्काम संपत आला तसे परतीचे वेध लागले, घर दिसायला लागलं....