उद्या स्वातंत्र्य दिन! म्हणजे दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं पण हि बाब कमी लोकांच्या लक्षात राहते. बहुतेक मंडळींना तो सुट्टीचा दिवस, मजेचा दिवस असेच वाटते, अर्थात ह्याला आपणच सगळे जबाबदार आहोत. कारण विचार करतांनाच मुळी सुट्टीचा केला जातो,मग स्वातंत्र्य दिन कोण लक्षात ठेवतो?तो पण देशाचा? आपण आपले स्वतःचे स्वातंत्र्य बघायचे... शाळेच्या, कामाच्या ठिकाणच्या,घरकामाच्या किंवा इतर जबाबदारींतुन एक दिवसाची सुटका, मस्त निवांत भटकायचं, मजा करायची बस! !आणि ज्यांना धवजारोहण वगैरे सारख्या कार्यक्रमांना हजेरी लावणे अनिवार्य असते, त्यातली बहुतेक मंडळी तो कार्यक्रम आटोपायचीच वाट पाहत त्या कार्यक्रमात सहभागी होतांना दिसतात. त्यांची देहबोली, मोबाइलवरची संभाषण, इतरांसोबतची बोलणी हेच सर्व सुचवत असतात... म्हणजे आटपा बरं काय असेल ते, आम्हाला महत्वाची कामं आहेत. पण असे ते उघडपणे नाही दाखवू शकत ना... तीच तर भानगड आहे. तिथे मग अगदी देशप्रेम, देशसेवेचा बांधलेला चंग वगैरे दिसला पाहिजे! आतून, मनातून नुसती घालमेल चाललेली असते जीवाची... अरे नाही यार, flag hoisting ला जायला लागणार आहे ना रे... ही आणि तत्सम संभाषणं बऱ्याच तरुण मंडळीं मध्ये ऐकू येतात. काय म्हणावं ह्या विचारसरणीला? कृतघ्न्ता आणि असंवेदनशीलता. आता प्रत्येक वेळी सिनेमा बघायच्या आधी राष्ट्रगीत लावतात, म्हणून लाजेस्तव का होईना, आपल्या देशाचे सो कॉल्ड सुजाण नागरिक हातातला बर्गर,पॉपकॉर्न, कॉफ़ी खाली ठेवून उभे राहता, चला, हेही नसे थोडके! अच्छे दिन फिर आयेंगे, हमें पूरी उम्मीद है! तर पुढच्या वेळी सुट्टीचा विचार न करता, आपण ज्या देशाचे नागरिक आहोत,ज्या देशात आपण वाढलो,मोठे झालो, नोकरी करतो,व्यवसाय करतो, म्हणजेच अर्थार्जन करून आपले कुटुंब चालवतो त्या देशात आपल्याला असलेले अनेक प्रकारचे स्वातंत्र्य कसे उत्तम आहे ह्याबाबत कृतज्ञता व्यक्त करून त्या ध्वजाला मानवंदना द्या, द्या, म्हणजे बघा आपल्याला हुरूप येईल तो ह्या देशासाठी काही करण्याचा...पर्यायाने आपली प्रगती करण्याचा!
जरुरी नाही आपण जवान बनून सीमेवर बंदूक घेऊन जाऊ तरच देशप्रेम... .आपण अनेक गोष्टी करू शकतो, ज्यामुळे आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो... घर तर स्वच्छ ठेवतो, पण परिसरही स्वच्छ ठेवुयात... आपल्याला दिलेले काम, जबाबदारी चोखपणे पार पाडू, लाचलुचपतीला आळा घालू, त्यासाठी सुरुवात आपल्यापासूनच करू... केलं तर आपण आपलं काम चोखपणे करू शकतो. त्यासाठी आहे त्या पर्यायां मध्ये,आहे त्या उत्पन्ना मध्ये कल्पकतेने आपल्या गरज पुऱ्या करता आल्या पाहिजेत! आणि गरजा पुऱ्या होत नसतील तर आणखीन काम करा,कष्ट करा आणि पैसे कमवा, पण शेवटी तेच, काम चोखपणेच करावे लागेल. पायरेटेड गोष्टींना किंवा आपल्या शत्रू देशांमधून अवैध मार्गाने आलेल्या, कमी किमतीच्या आणि कमी दर्जाच्या वस्तूंना प्राधान्य देऊ नका. आपल्या लोकांनी बनवलेले दिवाळीतले आकाशकंदील विकत घ्या, त्यावर हिंदू संस्कृतीची छाप असते, जी दिवाळीसाठी आवश्यक आहे. आपल्या देशाची संस्कृती दर्शवणाऱ्या राख्या विकत घ्या आणि भावांच्या हातांवर बांधा, हेच तर छोट्या छोट्या गोष्टीतले देशप्रेम, आणखीन देशप्रेम देशप्रेम म्हणजे काय असते? आपल्या देशात उद्योग व्यवसाय सुरु करा, त्यांना चालवून अनेक हातांना काम द्या, इथल्या बुद्धिमत्तेचा वापर इथेच होऊ द्या, म्हणजे brain drain पण थांबेल. आजूबाजूला बघुयात,,,अनेक गोष्टी दिसतील जिथे आपली आवश्यकता आहे..तिथे उणिवा भरून काढूयात..आपल्या देशाच्या प्रतिमेला,प्रतिष्ठेला साजेसे कार्य करूया... देशआपोआपच प्रगती करेल!
कुणाच्या दुःखद प्रसंगी त्याला भेटायला जाणारे पण बघा,,, नीट निरीक्षण केलं तर लक्षात येतं की तिथे जमा झालेले बरेच लोक हे त्यांची हजेरी दाखवण्यासाठी तिथे येतात. कारण मग त्यावरच त्यांची बाहेर इभ्रत ठरणार असते ना! 'अहो तुम्ही दिसला नाहीत त्या दिवशी?' असे खोचकपणे विचारणारे भेटतात ना! वर आणिक 'आम्ही सगळे होतो, फक्त तुम्हीच नव्हतात!' असे म्हणून आपला पाणउतारा करायला तत्पर! काय म्हणायचं ह्याला?
ह्याला उत्तर एकच असंवेदनशीलता. कुणाला त्याच्या दुःखाच्या क्षणी भेटायला जा पण तिथे, त्याच्या कडच्या परिस्थितीचे थोडे भान ठेवा. त्या प्रसंगात स्वतःला ठेवा, मन तिथे ठेवा, आणि आपली तिथली भेट आवश्यकतेपेक्षा जास्त लांबवू नका,वेळ होताच तिथून निघून जा. त्याच्याशी फक्त धीर देण्यापुरते बोलावे. फार लांबण लावू नये,गेलेल्या व्यक्तीच्या आजारपणा विषयी, घरच्या गोष्टीं विषयी, किंवा तत्सम निरर्थक बोलू नये, ते उचित नाही . किंवा इतर लोक भेटतात त्यांच्याशी आपल्या कामाबाबत, व्यवसायाबद्दल बोल्ट बसू नये. एवढे तारतम्य बाळगावे. अशा प्रसंगी लोक फार आंबटशौकीनपण दाखवतात. त्या कुटुंबाबद्दल अनेक माहिती काढायला बघतात आणि छोट्या छोट्या गोष्टीं मध्ये नको इतका रस घेतात, कशासाठी? तुझ्या घरात कुणी डोकावलं तर तुला चालेल का? नाही ना? मग दुसऱ्याच्या घरात डोकावायला हक्क तुला कुणी दिला? बरं ही माहिती स्वतःजवळ ठेवतील तर मग काय हवं? आणखीन चार लोकांना हे सगळं मीठ मसाला लावून सांगायचं, सवंग चर्चा करायची तरच त्यांच्या जीवाला चैन पडेल.
रोज अनेक गोष्टीं मध्ये ही असंवेदनशीलता बघायला मिळते...आलेला पाहून दारातून बाहेर पडला, की त्याच्या समोरच दरवाजा लावून घेणे..उद्धटपणा दिसतो ह्यातून. तुला नसेल आवडलं त्याच येणं, कारण काहीही असो, असे होऊ नये, करू नये. बसमध्ये रेखीव जागांवर इतर मंडळी बसतात, आणि त्या जागेचे हक्क असणारे आले तरी जागा देत नाहीत. उद्धटपणा ! माज.. दुसरं काय ? बाबा नेहमी म्हणतात... अरे बायका मुलांना म्हाताऱ्या कोताऱ्या जीवांना अरेरावी केलीस तर त्यात काय मर्दानगी? तुझ्या बरोबरीच्या माणसाशी टक्कर दे, आणि जिंकून दाखव. मग तू बहाद्दर मर्दगडी खरा!
sense and sensibilities... थोडा sense ठेवू यात, आणि थोड्या sensibilities वाढवू यात.
तर सांगायची गोष्ट ही की विचारांचा फोकस योग्य ठेवा, योग्य कार्य आपोआपच घडेल.. जे काम असेल त्यात मनानी रहा, म्हणजे मग कार्य नीट पार पडेलच, पण आपल्याला समाधान देखील मिळेल.. बसेसवर लिहिलेलं असतं ना... मनावर ब्रेक उत्तम ब्रेक? थोडा प्रयत्न आपण सगळेच करूयात! मनावर ब्रेक ठेवण्याचा!