![]() |
| गुरु शिष्य संवाद |
गुरु कसा असावा हे कळलं, पण गुरु उत्तम हवा तर मग आपणदेखील शिष्य म्हणून उत्तमच असायला हवे , नाही का? मग उत्तम गुरु आपला उत्तम शिष्य कसा ओळखणार? किंबहुना आपण ज्या गुरुकडे विद्या ग्रहण करणार आहोत, त्यांचे शिष्य जसे असावेत तसे आपण आहोत का? ह्याचा विचार व्हायला हवा.
शिष्याचे ध्येय निश्चित पाहिजे. ध्येयपूर्ती साठी उचित बुद्धिमत्ता, त्या अभ्यासाची रुची, कुशाग्र ग्रहणशक्ती आणि त्यासोबतच कष्ट, चिकाटी आणि मेहनत घेणे पण तितकेच जरुरी आहे. आणि हे सर्व असले तरी आपल्या गुरूंवर अनन्य भक्ती आणि सम्पूर्ण श्रद्धा हवी, म्हणजे मग विद्या संपादनात आणखी गती येते गुरूंवर पूर्ण विश्वास असला म्हणजे मग शिष्याचा स्नेह आणि प्रेम पाहून गुरु समाधान पावतो हे नक्कीच. आपला शिष्य हा आपल्या पुढे प्रगती करतो आहे, आपल्या पेक्षा जास्त चांगले काम करतो आहे ह्यासारखे समाधान गुरूंना दुसरे नाही. गुरु शिकवायला तयार असतात, पण शिष्य जर शिकायला तयार नसेल तर मग अशा शिष्याचा काय उपयोग?
अर्थात, गुरूंनी नाकारल्या नंतरही, केवळ ' हाच गुरु हवा' म्हणून, त्यांची प्रतिमा समोर ठेवून विद्या संपादन करणारा एकलव्य घडलाच की! पण मग त्याची अपार निष्ठा कामी आली हे सत्य आहे. असे अनेक एकलव्य असतात, पण गुरूंचे महत्व अनन्यसाधारण आहे हे नक्की.
आजकाल शिक्षणाचा बाजार झाला आहे. त्याला इलाज नाही, कारण वाढती लोकसंख्या,घटणारी साधनसंपत्ती, भ्रष्टाचार,अनाचार, आणि उत्तम विचारांची, चांगल्या माणसांची, दर्जेदार मूल्यांची पायमल्ली! तरीसुद्धा ज्याला कोणतीही गोष्ट साध्य करायची असते, तो अनेकानेक संकटांना सामोरे जात यश सम्पादन करतोच! आजच्याच olympics चे उदाहरण घ्या ना... निकृष्ट दर्जाची साधन सामग्री, चांगल्या मार्गदर्शकांचा अभाव, आणि असे चांगले मार्गदर्शक असूनही राजकारणाचे बळी, खेळाडू निवडीतील राजकारण, कमकुवत नियमावली, कमकुवत राज्य व्यवस्था आणि नियोजनाचा अभाव...आपल्या खळाडूंच्या निकृष्ट दर्जाच्या परफॉर्मन्सला कारणीभूत आहेत आणि तरी सुद्धा ह्या सर्वांवर मात करून काही खेळाडू निव्वळ आपल्या जिद्दीवर पदक मिळवून आणतात! अशी जिद्द असेल तर काय असाध्य आहे, बोला? अशा शिष्यांना, अशा गुरूंना, आणि अशा एकलव्यांना माझे प्रणाम!

No comments:
Post a Comment