आज गोपाळकाला, आणि दही हंडी फोडण्याची धावपळ! कृष्णाला आवडणारा गोपाळकाला बनवायला सोप्पा, रुचकर आणि पौष्टिक देखील! गोपालकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत रानात गाई चरायला न्यायचा, मग एकत्र बसून खायचे. तर प्रत्येक गोपालाची जशी परिस्थिती, तशी न्याहारी त्याच्या शिदोरीत असायची. पण मग उच्च नीच, गरीब श्रीमंत, असे कोणतेही भेद राहिले तर इतर गोपाळांना वाईट वाटते. म्हणून मग हा भेदभाव दूर करण्यासाठी सर्वांची शिदोरी एकत्र करून मग सगळे गोपाळ त्या काल्याचा आस्वाद घ्यायचे! तो कला किती चविष्ट लागत असेल ह्याचा अंदाज हा गोपाळकाला खाल्ल्यानंतरच येईल!
गोपींच्या घर जाऊन, मटकी फोडून दही, लोणी, दूध खायचं, बाळगोपाळांना वाटायचं हा कृष्णाचा आवडता छंद! गोपींना द्वारकेबाहेर दूध, दही, लोणी विकायला कृष्णाची बंदी होती . मग वाटेत त्यांची मटकी फोडून बालगोपाळ सर्व काही खाऊन घेत असतं! पण ह्यामागचा मोठा हेतू लक्षात घेण्यासारखा आहे. आपल्या मुलाबाळांना, किंवा आपल्या शहरातल्या लोकांना पुरेसे दूध,दही न देता बाहेरच्यांना विकायचे हे कृष्णाला मान्यच नव्हते. म्हणून हा खटाटोप! मॅनेजमेंटचा हा फ़ंडा आजही लागू होतो, नाही का? स्वतःच्या जिल्ह्याचे पाणी कमी करून दुसऱ्या जिल्ह्याला द्यायचे, किंवा आणखीन पुढे जाऊन सांगायचे तर आपल्या देशात पिकणारी उत्तम दर्जाची फळफळावळ, भाजीपाला हे परदेशात पाठवायचे, आणि इथे निकृष्ट दर्जाचे विकायला ठेवायचे.
इथे एक चातुर्मासातली गोष्ट आठवते आहे... एका राज्याचा राजा मोठा शिवभक्त होता. एकदा त्याच्या मनात आले, की महादेवाचा गाभारा दुधाने भरावा. पण हे कसं व्हावं? प्रधानाने सुचविले की नगरातील प्रत्येक घरातून सर्वच्या सर्व दूध ह्या गाभाऱ्यात ओतले जावे . झालं... सगळ्या लोकांनी दूध आणायला सुरुवात केली . सर्व दूध ओतलं , पण गाभारा काही भरेना. शेवटी एक म्हातारी आली,छोट्या तांब्यात दूध भरून आणले होते ते तिने गाभाऱ्यात भरले, आणि काय चमत्कार! गाभारा दुधाने तुडुंब भरला की!
राजाला आश्चर्य वाटलं! विचारलंच की हा चमत्कार कसा झाला. म्हातारी म्हणाली... अरे राजा तुझा आदेश झाला आणि सगळ्या लोकांनी घरातल्या मुलाबाळांच्या, लहान मोठ्यांच्या, म्हाताऱ्या कोताऱ्याच्या तोंडचे दूध गाभाऱ्यात आणून ओतले, त्या सर्वांची, गाई वासरांची हाय तुला लागली,आणि असे करणे हे देवाला आवडले नाही...
मी काय केले? घरचं काम आटोपलं, मुलाबाळांना खाऊ पिऊ घातलं, लेकी सुनांना न्हाऊ घातलं, गाई वासरांना चारा दिला ,त्यांना तृप्त केलं. मग मी हातात फुलं,अक्षता,बेल आणि खुलभर दूध घेऊन इकडे आले, आणि गाभाऱ्यात दूध ओतल्या बरोबर गाभारा भरला! बाकी काही नाही.
आजकाल दहीहंडी हे एक राजकारणाचे, व्यापाराचे, अहमिकेचे, वर्चस्व सिधद करण्याचे, थोडक्यात मसल पॉवर दाखवायचे मोठे व्यासपीठच बनले आहे.. श्रीकृष्णाने दही हंडी रचून दूध लोणी खाऊन मुलांसाठी एक खेळ म्हणून त्याचा वापरकेला . एक चेष्टा मस्करी करण्याचे साधन . त्यात कुणाचेही नुकसान नाही, अवहेलना नाही, वर्चस्व सिधद करण्याची अहमिका नाही...होता फक्त विरंगुळा आणि बालिश चेष्टा! आता तर दही हंडीचे प्रकरण थेट कोर्टातच गेले आहे...काय म्हणावे ह्याला? होतं काय, झालं काय? कुणी विचार करतोय का?
माणसांचे मनोरे रचून दही हंडीवर केलेला कब्जा ह्यातून श्रीकृष्णानी कदाचित असे दाखवले असावे की मनुष्याने नवविधा भक्तीतून, अष्टांग योगसाधनेतून पुढे जात, साता जन्माच्या पलीकडे जाणारी वाट धारावी. ह्यासाठी षडरिपू म्हणजे काम,क्रोध,लोभ, मद , मोह ,मत्सर ह्या सहा दुर्गुणांवर मात करीत,पंचेंद्रियांना वंश करीत, चौफेर उधळलेले मनाचे दोर आवळून ,सत्व रज आणि तम ह्या त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन, ज्ञान आणि वैराग्य ह्या दोहोंची कास धरीत आत्मज्ञान मिळवावे,आणि शेवटी अहंकार रुपी हंडी फोडून, त्यातील लोणीरूपी परमात्म्याशी एकरूप होऊन सायोज्यमुक्ती मिळवावी.
तर समाजाने ह्या दही हंडीच्या ओंगळ, बीभत्स आणि प्रसंगी घातक,जिवघेणा किंवा त्याहूनही क्लेशलकारक असे अपंगत्व आणि लाचारी ओढवून आणणाऱ्या स्वरूपाचे पुनरावलोकन करून, पुन्हा ह्या खेळाला आनंदाचे रूप बहाल करावे. ह्या सर्वांसाठी मिळणाऱ्या निधीचा समाजोपयोगी कार्यात उपयोग करावा हा निर्धार केला तर काहीच अशक्य नाही.
असो. आता थोडे अवांतर . म्हणजे आज श्रीकृष्णाला नैवेद्य म्हणून पंचामृताचे घारगे केले होते.
![]() |
| पंचामृताचे घारगे |


No comments:
Post a Comment