Wednesday, 24 August 2016

कृष्णजन्माष्टमी... बालपण नव्याने अनुभवण्याची एक संधी!!




आज कृष्णजन्माष्टमी! कृष्णाचा जन्मदिवस! बर्थडे!
 आपली गम्मत हो! आजकाल सगळं इंग्लिश मध्ये सांगावं लागतं, नाहीतर पूर्ण समजत नाही! असो, तर आज रात्री अनेक  ठिकाणी कृष्णजन्म साजरा केला जातो. कृष्णाचा पाळणा सजवून, त्याला झोका द्यायचा, श्रीकृष्णाचा  जन्म झाल्याचा आनंदोत्सव साजरा करायचा. आज कृष्णाला  लोण्याचा नैवेद्य  दाखवायचा,दिवसभर उपवास करायचा, रात्री भजनकीर्तन करीत रात्र  जगवायची, दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा.

हे सर्व झाले, पण मुख्य श्रीकृष्णाची लीला  साध्या सोप्या शब्दात  कळली  पाहिजे. श्रीकृष्णाची अनेक रूपे आहेत... नटखट बालक, सुमधुर बासरी वादन करून सर्वांना मंत्रमुग्ध करणारा   कलाकार ,गीतेतून तत्वज्ञान आणि जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा तत्वज्ञ, रणभूमीवर अर्जुनाचे सारथ्य करणारा, त्याला गीता आणि त्यातला अभिप्रेत असलेला   कर्मयोग योग्य तऱ्हेने सम्पन्न करायला प्रवृत्त करणारा रणधुरंधर, नीतिशास्त्राला अनुसरून , आणि  बहुतेक वेळा मनुष्य स्वभावानुसार डावपेच खेळत बाजी तर मारणारच , पण त्यासोबत समोरच्या व्यक्तीला आपला असीम भक्त ही  बनवणारच पण त्याला  त्याच्या पापांपासून मुक्त करून मोक्ष   प्राप्त करून   देणारा  चतुर, चाणाक्ष राजकारणी, कुशल  व्यूहरचनाकार, नीतिज्ञ, बालगोपाळांचा, गोपींचा, आणि विशेष करून राधेचा हा सखा... ही  आणि आणखी  बरीच काही रूपे! ज्याला तो जसा दिसतो,त्याला तो त्या स्वरूपात भावतो!

अतुल्य शौर्य, धैर्य, बुद्धिमत्ता, निःस्पृहता, स्थितप्रज्ञ, तपस्वी,  अलौकिक वक्ता, आणि कर्मसिद्धान्त सांगणारा तरीही अलिप्त राहणारा असा हा श्रीकृष्ण... आत्ताच वृत्तपत्रात वाचलेले लेख आणि त्यातील लेखकांनी नमूद केलेले श्रीकृष्णाचे गुण...जे त्यांना भावले ते त्यांनी लिहिले!

सुदाम्याचे पोहे  आणि बालगोपाळांनी आणलेला खाऊ एकत्र करून गोपाळकाला खाऊन समानतेचे धडे देणारा, कालियामर्दन करून दुष्ट प्रवृत्तींना आळा  घालणारा, अहंकार आणि लालसा हे दुर्गुण आहेत त्यांना लांब ठेवा असा संदेश देणारा, सत्यवचनी असा हा कृष्ण!

उत्तम व्यवस्थापन कौशल्य श्रीकृष्णाचा आणखीन एक गुण! योग्य निर्णय घेणे आणि त्यांची  अंमलबजावणी करणे हे शिकण्यासारखे आहे.

मला विशेष आवडलेला भाव म्हणजे श्रीकृष्णाचा लढाऊबाणा! ह्याच लेखात पुढे वीरचक्र विजेते कर्नल. साळुंखे लिहितात की, वेगवेगळ्या व्यूहरचना करून शत्रूंचा नाश केलेल्या ह्या लढवय्याच्या अनेक रणनीती भारतीय सैन्याने देखील अंगिकारल्या आहेत, ज्यायोगे अनेक वेळा शत्रूला नामोहरम केले आहे.अवघ्या ५८ भारतीय  सैनिकांनी दोन हजाराहून अधिक संख्येने आलेल्या शत्रूला नामोहरम केले होते. अर्थात असे अनेक किस्से आहेत भारतीय सैन्याचे.. पण मग अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील पुढे जायचे ह्या श्रीकृष्णाच्या सिद्धान्तावरच तर सैन्याला प्रशिक्षण दिले जाते. त्याचाच  हा परिणाम असतो! 'आगे बढो' हाच मंत्र  भारतीय सैनिकांनी  जपला आहे असे देखील साळुंखे आपल्या लेखात म्हणतात.

पण श्रीकृष्ण म्हटला की क्षणात डोळ्यासमोर छबी उभी राहते   ती गोपाळकृष्णाची... लोणी खाणारा नटखट छोटा कृष्ण! हीच छबी जास्त लोकप्रिय आहे. आणि असावी पण. कारण इतर अनेक गुणांसोबतच जीवनात थोडे बाल्य हवे, नाहीतर मग आपल्या जगण्यातली   निरागसता, हसू, आणि गोडवा निघून जाईल...राहील ते निरस, कंटाळवाणे आयुष्य.. उगीच जगायचं म्हणून जगायचं   झाल ... म्हणूनच कदाचित प्रत्येक घरातील देव्हाऱ्यात लंगड्या बाळकृष्णाचा टाक किंवा मूर्ती असते... घरात लहान   मुलांच्या रूपाने बालपणाचे चैतन्य आणि नखळ आनंद सदैव राहो हीच त्यामागची भावना असावी!

 

No comments:

Post a Comment