Wednesday, 10 August 2016

रिसेप्शनची रोषणाई... पाहुण्यांची सरबराई !

लक्ष्मीपूजनाचे वेळी रविशंकरनी ताटातील  तांदुळावर 'भानुप्रिया' हे नाव अंगठीने लिहिले आणि भानुप्रिया रविशंकर अकोलेकर झाली! officially!सर्वांच्या ओट्या भरून, एकमेकांना भेटवस्तू देऊन, सर्वांच्या यथोचित आदर करून सर्वजण संध्याकाळच्या रिसेप्शनच्या  तयारीला लागले.

सुंदर रिच अशी  शिफॉनची साडी, हलका फुलका मेकअप,आणि हसऱ्या चेहऱ्याने भानुप्रिया नटून थटून हॉटेलच्या गार्डन   एरियात आली, आणि तिच्या पाठोपाठ एकदम सूटबूट घालून,ऐटबाजपणे रविशंकरनी पण एन्ट्री घेतली! तो एक जो त्यांचा फोटो आहे... तो फोटो   मला विशेष  आवडतो!

दोघांना  तिथे सजवलेल्या स्टेजवर घेऊन गेलो, आणि बसवलं. आता हळूहळू पाहुण्यांचे आगमन व्हायला लागले होते. सर्व मंडळी  हॉटेल मधील तो रिसेप्शन एरिया पाहून  जाम खुश होत होती ! तिथली सजावट,रोषणाई, बैठकीची उत्तम व्यवस्था पाहून आनंद होत होता. नव्या जोडप्याला आशीर्वाद द्यायला हळूहळू लोकं स्टेजकडे निघत होती . मग पुन्हा फोटोंची चढाओढ! साहजिकच आहे म्हणा! सर्वांनाच  नवरानवरी बरोबर फोटो   काढायला आवडतं!

आलेल्या पाहुण्यां बरोबर थोडे बोलत बोलत, एकीकडे सर्वांना जेवणाचा आग्रह करत माझा वेळ मजेत चालला होता. धावपळ होती पण आनंदही होता!

तीनएक तासांच्या नंतर  ह्या सोहळ्याचे समापन झाले. सर्व पाहुणे निरोपिले, आणि मग घरच्या मंडळींनी जेवणाचा आस्वाद घेतला, कौतुक केले! व्याही मंडळी पण खुश दिसत होती. मला चांगले आठवते, मी जेंव्हा गप्पांच्या ओघात भानुच्या तिकडच्या घरात तुम्ही सर्व मंडळी तिची काळजी घ्यालच, त्यामुळे मला अजिबात  चिंता नाही असे  म्हटले, तेंव्हा सचिननी मोठ्या प्रेमाने माझ्या खांद्यावर हलकेच हात ठेवून मला सांगितलं,' तुम्ही अजिबात काळजी करू नका! आम्ही सर्व आहोत ना!' बास....तो स्पर्श अतिशय बोलका होता ... मी एकदम टेन्शनफ्री झाले, आणि आनंदित झाले! व्याह्यांनी पण संपूर्ण लग्नसोहळा उत्तम पार पडल्या बद्दल, आणि त्यांच्या आलेल्या पाहुण्यांची उत्तम व्यवस्था असल्या बद्दल समाधान व्यक्त केले, आणि कुणाला काहीही कमी पडले नाही, सर्व छानच झाले असे सांगितले, तेंव्हा जो काही आनंद झाला, आणि ओठावर शब्द आले... ह्याच साठी केला होता अट्टाहास!

नाशिकमधील उत्तम हॉटेल! हॉटेल व्यवस्थापना बाबत  समाधानी होतो! रहाण्याची उत्तम व्यवस्था, खाण्यापिण्याची उत्तम सोय, अदबशीर सेवा, सर्व  विधीं साठी करून दिलेली परिपूर्ण तयारी आणि तत्पर सहाय्य , सकाळची आणि संध्याकाळची सजावट, स्वादिष्ट जेवण, आणि लग्नाचा हा सोहळा उत्तम  पाडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य ...  आम्हाला फार समाधान वाटले!

 संपूर्ण कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याचे समाधान व्यक्त करीत विश्रांती साठी सर्व मंडळी परतली... मला मात्र झोप येणार नव्हती.. आनंदाने, समाधानाने, का कशाने...कोणतीच भावना ओळखू येत नव्हती..


  

No comments:

Post a Comment