'मेरे भैय्या, मेरे चंदा, मेरे अनमोल रतन
तेरे बदले मैं जमानेकी कोई चीज न लूं ।'
मंडळी, उद्या राखी पौर्णिमा! म्हणजे सर्व बहिणींना आपल्या भावांची आठवण होणार! नाही म्हणजे आठवण व्हायला विसरतात थोडीच बहिणी आपल्या भावांना? पण ह्या दिवसाची विशेष आठवण असते हो बहिणीला! नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा दोन गोष्टी ह्या दिवशी.
श्रावण महिन्यात मध्यावर येणारी नारळी पौर्णिमा... ह्या दिवशीचे शास्त्रीय महत्व म्हणजे ह्या दिवशी जलतत्वाची पूजा करायची.. म्हणजे सृष्टीत ओलावा,स्नेह टिकून रहवा म्हणून जलाची पूजा. शिवाय ह्या दिवसात समुद्र खवळलेला असतो, म्हणून त्याला नारळ वाहून,त्याचे पूजन करून त्याला शांत करणे हा देखील यामागचा हेतू होय. कोळी लोकांचा हा महत्वाचा सण कारण त्यांचे जीवनच मुळी ह्या समुद्रावर आणि त्याच्या लहरींवर(पाण्याच्या आणि समुद्राच्या स्वभावाच्या दोन्ही) अवलंबून !नारळ रसधातू वाढवतो, तहान भागवतो, वात आणि पित्त दोषांचे शमन करतो. म्हणून त्याचे ह्या पावसाळ्यातले महत्व. जेवणात, नैवेद्यात नारळाचा पुरेपूर वापर ह्या चातुर्मासात होतांना दिसतो तो ह्या कारणानेच.आणि नारळाचे पीक होतेच मुळी 'आनूप देशात' म्हणजे भरपूर पाणी असलेल्या देशात! नारळीभात केला जातो राखी पौर्णिमेला ते ह्याच साठी.
तर राखी ही मूलतः नाजूक, रेशीम धाग्याची असायची, कारण रेशीम हे घट्ट विणीचे, म्हणून बहीण भावातील नाजूक नात्यात स्नेह देखील घट्ट राहावा ही भावना.
हे झाले राखी बांधणे. परंतु त्यामागची रक्षणाची भावना देखील योग्य रीतीने समजून घेतली पाहिजे. संरक्षण म्हणजे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक संरक्षण, विचारांचे कोंदण करून दिलेले संरक्षण हे देखील महत्वाचे आहे. हा सण कुटुंबातल्या सर्व सदस्यां मधील स्नेह टिकवून ठेवण्याची जणू आपल्याला आठवण करून देतो. एकमेकांचे रक्षण करू, एकमेकांना अडीअडचणीत साथ करू, वाट चुकली असेल त्याला समजुतीने योग्य वाटेवर आणू, असे वचनच जणू ही राखी आपल्याकडून मागते!
सर्व कुटुंबाला, आणि पर्यायाने समाजाला स्नेहाच्या बंधनात बांधू शकते ही राखी!
सध्या पावसाळा आहे, भाज्या अनेक आहेत, तेंव्हा ह्या भाज्या वापरून एक डिश करूयात! आजकाल डाएट चा जमाना आहे तर करूयात डाएट पोहे....
डाएट पोहे:
१ वाटी जाडे पोहे ५ मिनिटांसाठी भिजवून ठेवावेत. सिमला मिरची,गाजर,कोबी, फ्लॉवर,अशा मिक्स भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. एका बाऊल मध्ये भाज्या, पोहे, मीठ, साखर, कोथिंबीर, चाट मसाला, भाजलेले किंवा तळलेले दाणे, फुटण्याचे डाळे, आणि लिंबाचा रस घालून सर्व्ह करावेत डाएट पोहे.

No comments:
Post a Comment