Friday, 12 August 2016

समर्थांचा प्रयत्नवाद... प्रचितीविण बोलो नाही!

'अचूक येत्न करवेना ।म्हणौन  केले ते सजेना ।
आपला अवगुण जाणवेना काहीकेल्या ।।'

समर्थांच्या ह्या वाक्यात प्रयत्नवादा बाबत सर्वांसाठी मोठी शिकवण आहे.  आपण कित्येक वेळा म्हणतो कि मी इतके प्रयत्न केले  पण मला एखाद्या कामात यश येतच नाही. आणि बघितलं तर आपण ,प्रयत्न तर करीत असतो,पण पाहिजे तसे यश लाभत नसते. तर समर्थांचे  मार्गदर्शन असे कि, यश येत नाही ह्याचा अर्थ  कुठेतरी काहीतरी चुकतंय हे नक्की.

 तर आपण काय म्हणत असतो? माझं नशीबच खोटं आहे . किंवा दुसऱ्या कुणावर तरी आपल्या अपयशाचे खापर फोडतो, आणि आपल्या कमतरतेची भावना दाबून टाकायचा प्रयत्न   करतो.  नाही तर मग 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी ' असे म्हणत प्रयत्नच सोडून देतो. समर्थ म्हणतात दुसऱ्यांचा  दोष काढण्यात किंवा त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो, आपलेच  सामर्थ्य कमी पडते हे लक्षात घ्यावं आणि   मग हेच सामर्थ्य वाढविण्याचे प्रयत्न करावेत, यश  मिळाल्या शिवाय राहणार नाही.

पण पुढे  सावधगिरी पण अशी सांगतात की,योग्य वेळी,योग्य संधी मिळताच ती ओळखून,योग्य दिशेने योग्य प्रमाणात प्रयत्न करावे लागतात, तेंव्हा यश हमखास मिळते ह्याबद्दल मनात यःकिंचितही  शंका बाळगू नका! एवढ्यावर समर्थ थांबले नाहीत तर, पुढे म्हणतात की ज्ञानाचा,अंतःप्रेरणेचा किंवा  अनुभवाचा जर वेळेवर उपयोग नाही केला तर मग हि विद्या, अंतःप्रेरणा  आणि अनुभव कुचकामी ठरतो.

अचूक प्रयत्न केले नाहीत तर काहीच साध्य होणार नाही. आणि यशाच्या मार्गावर क्रमण करतांना आपण डोळसपणे विचार केला नाही तर आपल्या उणिवा,चुका, आपल्याला कधीच दिसणार नाहीत. तेंव्हा स्वतःला  नियमितपणे तपासत राहावे, उणीव भरून काढण्याचे पर्यंत करावेत,चुका सुधारून घेण्याचा प्रयत्न करावा... तेंव्हा जे साध्य करायचे असेल ते स्पष्टपणे ठरले,की त्यासाठी योग्य प्रयत्न केले,तर काहीच कमी पडणार नाही!

 मी असे म्हणेन की मी पण  आयुष्यात ह्या प्रयत्न वादाचा उपयोग केला आणि बऱ्याच पेचांतून, संकटांतून सहीसलामत बाहेर पडले आहे आणि माझा स्वभाव पण असा आहे की मी सहजी हार मानीत नाहीच. १०० टक्क्यां पेक्षा जास्त प्रयत्न करू तेंव्हा कुठे थोडे  यश मिळते असा माझा अनुभव आहे.

 त्यामुळे समर्थ म्हणतात  त्याप्रमाणे,'आधी केले मग सांगितले'  

No comments:

Post a Comment