'गुरुविरहित असो नये ।नीच यातीचा गुरु करो नये। '
गुरु शिवाय ज्ञान नाही... ज्ञाना शिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय वैराग्य नाही आणि वैराग्याशिवाय मुक्ती नाही. तर सायोज्य मुक्ती कडे नेणारा, वाट दाखवणारा सद्गुरूच असतो. आयुष्यात गुरु अनेक असतात. आई वडील, शिक्षक, आपल्या कार्यक्षेत्रातील आपले सिनियर्स, असे इतर अनेक लोक ज्यांच्या कडून आपण कोणतीही जीवनोपयोगी कला शिकतो ते सर्व लोक आपले त्या क्षेत्रातले गुरु असतात. आणि आपण निःसंकोचपणे त्यांचे योगदान मान्य केले पाहिजे. पण बऱ्याच वेळा आपण हे ऋण मनातच नाही. संकोच असेल किंवा ते गुरु आहेत ह्याबाबत अज्ञान असेल, किंवा हे मान्यच नाही करायचे असे असेल तर मग हे आपल्या गुरूला सांगायचे राहूनच जाते. पण असे होऊ देऊ नये. कधीतरी गुरूला नमन करून त्याचे आपल्या आयुष्यातील स्थान मान्य करावे, त्याला वंदन करावे. म्हणून गुरु पौर्णिमेला गुरूंना वंदन करण्याची प्रथा आहे.
मी तर अनेक वेळा लहान मुलांकडून देखील काही शिकले आहे. कधी कधी येणारा एखादा प्रसंग देखील आपल्याला काहीतरी शिकवून जातो , तर तो प्रसंग देखील आपला गुरु बरं! एखादा सिनेमा, नाटक, एखादे दृश्य, एखादी जीवाचा ठाव घेणारी घटना, अशा अनेक गोष्टीं मधून काही ना काही शिकायला मिळतं! तर कधी कधी एखाद्या आपत्तीमध्ये आपल्याला एक संधी चालून येते.. ती आपत्ती म्हणजे देखील गुरूच की!
तर गुरु कसा ओळखावा? शास्त्रात लिहिल्या प्रमाणे, ज्यात्या शास्त्रातला गुरु हा सर्व ज्ञान सम्पन्न असावा, त्याच्यात अहंकार,असूया,मानसिक विकृती, क्रोध नसावा, तो दृढवृत्तीचा आणि निरपेक्ष असावा, स्वतः कर्तृत्ववान असला तरी गर्व नसावा. आणि योग्य शिष्य ओळखण्याची अपार क्षमता गुरुमध्ये हवी. तरच एक उत्तम गुरु एक उत्तम शिष्य घडवू शकतो. उत्तम शास्त्र जरी निवडले,तरी उत्तम गुरु नाही मिळाला तर उत्तम फलप्राप्ती म्हणजे ज्ञानर्जन होत नाही आणि मग जीवनात उत्तम प्रगती होणे नाही. समर्थांनी म्हटल्या प्रमाणे, नीच यातीतील म्हणजे नीच कुळातला, किंवा अयोग्य माणूस गुरु करू नये.
आपल्याला ज्ञान आणि मनःशांती देणाऱ्या गुरूंना त्रिवार वंदन!

No comments:
Post a Comment